न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति……. आजही??

माझ्या ऑफिस मधली एक मैत्रीण पूर्वी नॉइडाला राहत असतानाची गोष्ट सांगत होती. तिथे ती एका भाड्याच्या घरात राहत होती. त्या घराची मालकीण एक मध्यमवयाची बाई होती. ती खाली तळमजल्यावर राहायची आणि मैत्रिणीला वरची खोली भाड्याने दिली होती. तिच्या सोबत ऑफिस मधली तिची एक मैत्रिण सुद्धा रूममेट म्हणून राहायची. त्या वेळी त्या दोघी ही सेकंड शिफ्ट मध्ये काम करायच्या  त्यामुळे रात्री घरी यायला कधी १ तर कधी २ वाजायचे. अर्थात कंपनी ची कॅब होतीच घरापर्यंत सोडायला. एके दिवशी  काय झाले कोण जाणे, त्या मालकीणबाई सकाळी सकाळी हिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या “कल शाम तक ये कमरा खाली हो जाना चाहिये” माझी मैत्रीण आणि तिची रूममेट आवाक होऊन बघतच राहिल्या. खोली खाली करायची तर निदान १ महिना आधी तशी नोटीस द्यावी लागते आणि या बाईंनी तर तशी काहीच  बोलणी केली नव्हती. आता एवढ्या शॉर्ट नोटीस वर नवीन जागा कधी  आणि कशी शोधणार? पण मुळात प्रश्न हा होता कि असं अचानक जागा खाली करायला लावण्याचे कारण काय? त्या काही कारण सांगायला तयारच नव्हत्या. फक्त जागा खाली करा एवढेच त्यांचे म्हणणे होते. खुपदा विनवण्या केल्या नंतर त्या बोलल्या. “मै एक शरीफ और अच्छे घर कि औरत हु और ये मोहल्ला भी शरीफ लोगो का है.   मैने तुम लोगो को रेहने दिया क्योंकी मुझे लागा था लडकी है तो कोई गलत  काम करने का सवाल ही नाही आता. लेकिन आजकल तो किसी पे भी भरोसा नाही किया जा सकता” त्या दोघी आश्चर्याने आणि त्याहीपेक्षा जास्त गोंधळून त्या बाई कडे बघत होत्या. “गलत काम?” असा कोणता गैरप्रकार केला होता त्यांनी तिच्या घरात ज्यामुळे ती त्यांना घरातून निघून जायला सांगत होती? त्यांनी विचारल्यावर त्या आणखीनच चिडल्या आणि म्हणाल्या “सब करके अनजान बनने का नाटक कर रही हो? मै सब जानती हु. पिछले १ हफ्ते से तुम रोज रात को दर से आ रही हो. कभी १ बजे कभी २ बजे. तुम्हे क्या लगा मेरे सोने के बाद तुम कुछ भी करोगी और  मुझे पता नाही चलेगा? ये सब नाही चलेगा यहा ” आत्ता त्या दोघींच्या डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे त्यांच्या रात्री उशिरा घरी येण्याला ती “गलत काम” समजत होती. ती त्या दोघींना “तसल्या” मुली समजत होति. त्यातून दारापर्यंत सोडायला येणारी ऑफिस ची कार बघून तर या कोणीतरी खूप मोठ्या साहेबाकडे जातात रात्री आणि तोच  गाडी पाठवतो यांना सोडायला अशी समजूत झाली होती तिची. अरे देवा!! रात्री उशिरा घरी येण्याचा किती भयानक आणि किळसवाणा अर्थ घेतला होता त्या बाईने. पुढचा १ तास त्या कोणतेही वाईट धंदे करत नाहीत, चांगल्या कंपनीत काम करतात आणि  सॉफ्टवेर इंजिनियर चे काम सुद्धा असे रात्री उशिरा पर्यंत थांबून करायचे असते, असू शकते हे त्यांना समजावण्यात गेला. कशीबशी समजूत पटवली त्या बाईंची.

त्या बाईंचे वागणे हा एका अर्थी हास्यास्पद, एका अर्थी आश्चर्य वाटण्यासारखा आणि एका अर्थी चीड आणणारा विषय आहे. आताच्या काळातही एखाद्या स्त्री चे रात्री उशिरा येणे आक्षेपार्ह ठरू शकते आणि त्यापेक्षाही जास्त  त्याचा असा वाईट आणि घाणेरडा अर्थ घेतला जाऊ शकतो? रात्री उशिरा घरी येणारी स्त्री ही वाईट चालीरीतींचीच असली पाहिजे किंवा ती काहीतरी वाईट धंदे करूनच पैसे कमावणारी असली पाहिजे अशी ठाम समजूत असणाऱ्या व्यक्ती आजही आपल्या समाजात आहेत ही खरंच खूप खेदाची गोष्ट आहे. एकीकडे “मुलगी शिकली प्रगती झाली” च्या पाट्या लावून, मुलींना शिक्षणात सवलती देऊन, आपण मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहान देतोय आणि दुसरीकडे जेव्हा त्याच मुली आपल्या शिक्षणाचा आणि बुद्धीचा वापर करून आकाशात उंच भरारी घेऊ पाहतायत तेव्हा त्यांना आपण ही अशी लेबलं लावून एका परीने त्यांचे पंखच छाटतोय. आजकाल पारंपारिक डॉक्टर, इंजिनिअर आणि बँकेतील नोकरी याव्यतिरिक्तहि  शिक्षणाच्या आणि करिअर च्या इतक्या वेगवेगळ्या आणि अमर्याद संधी उपलब्ध आहेत, त्यातल्या कित्येक कोर्सेस आणि व्यवसायांची आपल्याला नीट माहितीही नसेल. असे असूनही रात्री उशिरा घरी येणारी स्त्री ही काहीतरी वाईट कामच करत असणार असा साधा सोपा आणि मूर्खपणाचा निष्कर्ष आपण कसा काय काढू शकतो? ती स्त्री एखादी निष्णात सर्जन असू शकेल जी रात्री उशिरा हॉस्पिटल मध्ये आलेली एखादी इमर्जेन्सि केस बघून परत आली असेल, एखादी सॉफ्टवेर इंजिनियर असेल जी परदेशातल्या client ना त्यांच्या वेळेत कामात मदत करत असेल, एखादी बिझनेस वुमन असेल जी तिच्या client सोबत ची मिटिंग संपवून परत आली असेल, एखादी फॅशन डिझायनर असेल जी तिच्या डिझाइन्स चा शो संपवून परत आली असेल किंवा अशाच एखाद्या शोज मध्ये काम करत मॉडेल होण्याचे स्वप्नं उराशी घेऊन धडपड करणारी, स्ट्रगल करणारी एखादी नवोदित मॉडेल असेल. ही काही मोजकीच उदाहरणे झाली पण यापेक्षाही कितीतरी वेगळ्या (आणि चांगल्या) क्षेत्रात काम करणाऱ्या कित्येक स्त्रिया असतील. काही त्यात उच्च पदावर असतील किंवा काही अजून तिथे पोचल्या नसतील पण त्यासाठी मेहनत घेत असतील. ही सर्वच क्षेत्रे कायदेशीर दृष्ट्या आणि नैतिक दृष्ट्या सुद्धा “चांगली” या वर्गात च मोडतात पण तरीही या सगळ्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करून रात्री उशिरा घरी आलेली ती स्त्री कोणते तरी अनैतिक काम च करत असणार असा शिक्का तिच्यावर मारणाऱ्या लोकांच्या बुद्धीची खरच कीव करावीशी वाटते.

वर दिलेली उदाहरणं ही तुलेनेने “high profile” करिअर ची होती. ही झाली मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय स्त्रियांची बाजू. पण याला दुसरीही एक बाजू आहे ती म्हणजे चतुर्थ श्रेणीतील कष्टकरी स्त्रियांची ज्या जेमतेम लिहिता वाचता येण्यापुरतं शिकलेल्या आहेत किंवा काही तर पूर्णपणे अंगठा छाप आहेत. अशा कित्येक स्त्रिया कुठे धुणीभांडी करून, कुठे पोळीभाजी करून आपल्या संसाराचा गाडा ओढत असतात. माझ्या स्वतःच्या ऑफिस मधल्या washroom ची स्वच्छता करणाऱ्या  कितीतरी बायका रात्रपाळीत काम करतात किंवा दुपारच्या पाळीत काम करणाऱ्या बायकांना रात्रपाळीची बाई आल्याशिवाय निघता येत नाही. त्यानाही घरी जायला किती उशीर होत असेल. पण त्यामुळे त्या सर्व स्त्रियांच्या चारित्र्याविषयी अशी शंका घेतली तर आपण त्यांच्या कष्टांचा किती घोर अपमान केल्यासारखे होईल? बरं, हे सगळे नोकरी धंद्याचे मार्ग थोडा वेळ बाजूला ठेवू आपण. पण त्याव्यतिरिक्तही एखाद्या स्त्रीची काही अडचण असु शकते. कधी घरी परतण्याच्या वाटेवर एखाद्या अपघातात सापडलेल्या किंवा कोणत्या तरी अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी थांबली असेल किंवा तिच्याच नात्यातल्या किंवा ओळखीतल्या एखाद्या व्यक्तीला मदत करायला गेली असेल असा विचार आपण का नाही करत?

कितीतरी पुरुष जे सेकंड शिफ्ट मध्ये काम करतात त्यांना घरी यायला रात्रीचे १२-१ वाजतात किंवा जे रात्रपाळीत काम करतात ते रात्रभर घरी येत नाहीत. पण त्याबद्दल कधी कोणी आक्षेप घेत नाही किंवा तो कुठेतरी भलतीच कामं करायला गेला असेल अशी शंका कोणाच्या मनात येत नाही. उलट कुटुंबासाठी किती कष्ट करतो असं म्हणून त्याचं कौतुकच केलं जातं. खरं तर रात्री उशीरयेणाऱ्या पुरुषांपैकी किती जण खरोखर कामासाठी बाहेर असतात आणि किती जण कामाच्या नावाखाली मित्रांबरोबर मजा करत असतात हा एक वेगळा संशोधनाचा विषय होउ शकेल. अर्थात सगळेच पुरुष असे असतात असं माझं मुळीच म्हणणं नाही. कुटुंबासाठी रात्रीचा दिवस करून कष्ट करणारे अनेक पुरुष आहेत आणि मलाही त्यांच्या बद्दल आदर आणि कौतुक वाटतंच. पण तोच आदर आणि कौतुक आपण अशा स्त्रियांबद्दल का नाही दाखवू शकत? त्या सुद्धा आपल्या कुटुंबासाठीच राबत असतात ना? अर्थात याला अपवाद असतातच. कामाच्या नावाखाली मजा मारणाऱ्या स्त्रियाही आहेत या जगात यात शंका नाहीच. पण म्हणून सगळ्याच स्त्रियांना आपण त्याच तराजूत तोलणं कितपत योग्य आहे? अगदी आजही लग्न जमवताना मुलीच्या कामाच्या वेळा हा महत्त्वाचा मुद्दा मानला जातो. कामाच्या वेळा अनिश्चित असतील किंवा उशीरा पर्यंत थांबावं लागणार असेल तर त्या कारणावरून तिला एकतर नकार तरी मिळतो किंवा कामाची वेळ बदलून घ्यावी लागते किंवा ती नोकरीच बदलावी लागते. मग ती नोकरी तिच्या करिअरच्या दृष्टीने कितीही महत्त्वाची असली तरीही सासरच्या लोकांना काय वाटतं याला जास्त महत्व असते. आणि त्यांना शिकलेली, चांगलं कमावणारी सूनच हवी असते पण त्यांनी दिलेल्या वेळेतच काम करून कमावणारी.

रात्री उशीरा घरी येण्यात सुरक्षिततेचा प्रश्न असल्याने त्याला विरोध होतो हा मुद्दा मान्य आहे. पण रात्री उशीरा बाहेर फिरणाऱ्या स्त्रिया सुरक्षित नसण्याला एका परीने आपणच जबाबदार आहोत. रात्री उशीरा एकटी बाहेर फिरणारी स्त्री ही चांगल्या घरातील असुच शकत नाही, ती “तसल्या” प्रकारची असणार, मग थोडा “चान्स” मारायला काय हरकत आह? हा विचार त्या रोडरोमियोंच्या मनात असण्यामागे आपल्या समाजाची मानसिकताच जबाबदार आहे. स्त्री ने रात्री उशीरा घराबाहेर राहणे हे आक्षेपार्ह आणि निषिदधच आहे हे आपल्या संस्कृतीत खूप खोलवर रुजलेलं आहे आणि त्याचे प्रतिबिंब वेळोवेळी रात्रीच्या वेळी स्त्रियांवर होणार्या अत्याचारांमधून आपल्याला दिसते. दिवसा विनयभंग किंवा तत्सम प्रकार घडत नाहीत असं नाही पण त्यांचं प्रमाण तुलनेत खूप कमी आहे. रात्रीच्या वेळी बाहेर एकट्या फिरणाऱ्या स्त्रिया हे त्यांच्यासाठी “easy target” असते आणि तसं काही करण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही हे निर्भया प्रकरणातल्या आरोपींनी केलेल्या निर्लज्जपणाच्या विधानांवरून सिद्ध होते. “ती रात्री बाहेर पडली ही तिची चूक आहे. अशा वेळी बाहेर फिरणारी मुलगी ही चांगल्या घरातली नसणार आणि अशा मुलीचा आम्ही फायदा घेतला तर त्यात काय चुकलं?” हे विचार ऐकून आपण खरंच एकविसाव्या शतकात आहोत का असा प्रश्न पडतो. की असे विचार मनात रुजवणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीला मुळात संस्कृती म्हणावं का हाच प्रश्न आहे? अशा घटनांसाठी सर्वस्वी सरकारला जबाबदार धरण्याआधी आपण जरा आत्मपरीक्षण करायला हवं

कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या स्त्रियांच्या प्रगती वर आणि सक्षमीकरणावर अवलंबून असते असं विवेकानंदांनी म्हटलं होतं. स्त्री शिकली तर एक कुटुंब शिकते हेही आता लोकांना पटायला लागलय. पणं फक्त तेवढच पुरेसं नाहीये. ती जेव्हा त्या शिक्षणाचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने देशाच्या प्रगती साठी करण्यासाठी घराबाहेर पडेल तेंव्हा सगळयांनी तिच्या पाठीशी ठाम उभं राहण्याची गरज आहे. तिच्या रात्री बाहेर राहण्याचा बाउ न करता, त्याची लाज न बाळगता अभिमान बाळगायला हवा. तिच्या कामाचं, कष्टांचं कौतुक करायला हवं. सरकारला कायदे बदलायला लावण्यासाठी शंख करण्याऐवजी आपण समाजाची मानसिकता बदलुया, आपला दृष्टिकोन बदलुया. आणि हा बदल कधी घडेल याची वाट बघत बसण्यापेक्षा त्याची सुरुवात आपण आपल्यापासून का करू नये? प्रत्येक वेळी “शिवाजी जन्माला यावा पण तो शेजाऱ्याच्या घरी” असं म्हटलं तर तो कधीच जन्माला येणार नाही. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे “Be the change you want to bring”. आपल्याला जो बदल घडून यायला हवा आहे त्याची सुरुवात आपण आपल्यापासूनच करायला हवी. मुलीला किंवा सुनेला रात्री उशीरा बाहेर राहू नको असं सांगण्याऐवजी मुलाला रात्री उशीरा बाहेर राहणाऱ्या स्त्रियांकडे आदराने बघायला शिकवुया.

Advertisements