व्हेलेंटाइन डे

अर्धवट झोपेत किलकिल्या झालेल्या डोळ्यांवर सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप पडली. फाटकं पांघरूण डोक्यावर ओढून घेऊन तिने पुन्हा डोळे मिटले. ‘शी बाई!! आजकाल सकाळ किती लवकर होते.’ मनातल्या मनात ती पुटपुटली. ‘स्वप्न ऐन रंगात आलेलं असताना नेमकी उन्हं येतात डोळ्यावर आणि सगळ्याचा विचका होतो. किती सुंदर स्वप्न होतं’……. तिला आठवलं आणि हळूच स्वतःशी खुदकन हसली. हल्ली अशीच स्वप्न पडतात रात्री. आणि कधी कधी तर चक्क दिवसा सुद्धा. तिने पुन्हा डोळे मिटले. ‘बघूया तरी…….पुन्हा डोळे मिटल्यावर स्वप्न जिथे थांबलं होतं तिथून पुन्हा सुरु होतंय का. किंवा पुन्हा पहिल्यापासून सुरु झालं तरी चालेल.’ आणि ती पुन्हा त्या स्वप्नात हरवून गेली. आजूबाजूला सगळीकडे नुसतं धुकं धुकं पसरलेलं. काहीच दिसत नव्हतं. गार वारा कानशिलांना सुखावत होता. पक्ष्यांची मंजुळ किलबिल दूर कुठेतरी ऐकू येत होती. आणि अचानक कोणीतरी तिला हाक मारतंय असं वाटलं. पण कोणीच दिसत नव्हतं. सगळीकडे फक्त धुकं. डोळ्यावर खूप ताण देऊन आवाजाच्या दिशेने पाहिलं. एक अंधुकशी आकृती दाट धुक्यातून वाट काढत तिच्याच दिशेने चालत येत होती. जसजशी अजून जवळ येऊ लागली तसतसा चेहरा दिसू लागला. हो… तोच होता तो. तिच्याकडे बघत होता, गालातल्या गालात हसत होता. चालत चालत तो तिच्या एकदम जवळ येउन उभा राहिला . ती डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. लाजत होती… मधेच हसत होती. काय बोलावे तिला कळत नव्हते, काहीच सुचत नव्हते. तेवढ्यात त्याने तिचा हात हातात घेतला आणि……

अचानक सगळं हलायला लागलं. त्याचा हात हातातून सुटला आणि तो दिसेनासा होऊ लागला. हे असं काय होतंय हे कळायच्या आतच आईचा कर्कश आवाज कानावर पडला. “अगं ए…… कधी होणार आहे तुझी सकाळ. कधीपासून बोंबलतेय मी घसा फाडून पण हिच्या कानात शिरेल तर शपथ. अगं ए …उन्हं डोक्यावर येतील आता. अजून किती झोपायचंय. काय झोप म्हणावी की काय हिला. कुंभकर्ण आहे जणू.” खडबडून तिने डोळे उघडले. समोर आई हाताने तिला गदागदा हलवत होती. ‘अरेच्या…. म्हणजे आई हलवत होती तर. आणि मला वाटलं सगळं जग का हलतंय.’ या विचाराने तिला खुदकन हसू फुटलं. “हसायला काय झालं गं. मी काय मस्करी करतेय का.” आईचा आवाज आता चढला होता. “नाही काही नाही. तुला नाही हसले.” असं म्हणून ती उठली. मळक्या केसांच्या विस्कटलेल्या झिपऱ्या सावरत त्यांचा बुचडा बांधला आणि तोंड धुण्यासाठी मोरीजवळ गेली. आईची बडबड चालूच होती. “पंधरा वर्षांची घोडी झालीये पण अजून अक्कल अजिबात आलेली नाही. जबाबदारीची जाणीव म्हणून नाही अजिबात. लवकर उठून पटापट आवरावं, आईला मदत करावी असं कधी म्हणून वाटत नाही हिला. मला मदत व्हावी म्हणून शाळेतून काढून हिला घरी बसवली पण काय उपयोग? अजूनही मीच एकटी मरमर करतेय. अगं अजून एक दोन वर्षात लग्न होईल तुझं तेव्हा कशी करणार आहेस सगळं. अशी झोपून राहिलीस तर सासू लाथा घालेल लाथा.”

पण आईचे शब्द तिच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. किंवा कानात शिरत होते पण मेंदूपर्यंत पोचत नव्हते. ती अजूनही मघाशी अर्धवट राहिलेल्या स्वप्नाचाच विचार करत होती. तोंड पुसता पुसता कोपऱ्यातल्या आरशाजवळ जाऊन उभी राहिली आणि एकटक आपलं रूप न्याहाळू लागली. हल्ली का कोण जाणे पण तिचा बराचसा वेळ आरशा समोरच जायचा, सारखं नटावसं वाटायचं. आता पण ती आरशा समोर उभी राहून बोटाने  केसांच्या बटांना आकार देत होती. तेवढ्यात आई पुन्हा कडाडली “आवरलं की नाही तुझं अजून. कसला मेला एवढा नट्टापट्टा चालू असतो हिचा रोज कुणास ठाऊक. जशी काय सिनेमातली नटीच आहे. चल ये पटकन चहा पिउन घे.” थोड्याशा नाराजीनेच ती चहा प्यायला गेली. “आता मला जरा मदत कर गजरे बनवायला, आज गुलाबांचे देठ पण कापायचे राहिलेत. ते पण कर जरा. आणि नंतर समोरच्या गल्लीतल्या हॉल मध्ये जायचं आहे तुला. तिकडे साफसफाईच काम आहे. माझ्यासोबतच निघ नाहीतर उशीर करशील तू. ” आईच्या या वाक्याने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. ‘म्हणजे आईला आज दुसरा काम पण आहे. या संधीचा फायदा घेऊया.’ “आई, असं करूया ना. आज मी जाते फुलं घेऊन स्टेशन वर, तू जा हॉल वर कामाला. नाहीतरी रोज उन्हात जातेस तू, आज एक दिवस आराम कर. आणि तसंही मला ते साफसफाईच काम एवढं नीट नाही जमत.” असं म्हणून ती आशेने आईकडे बघायला लागली. “आज बरी तुला माझी काळजी वाटायला लागली गं.” आई आश्चर्याने म्हणाली. “बरं ठीक आहे जा. पण सगळी फुलं आणि गजरे नीट मोजुन घे. आणि हिशेबात गडबड करू नकोस मागच्या वेळेसारखी.”

आईच्या सगळ्या बोलण्याला नुसतं हो हो करत ती पटकन उठली. स्टेशनला जायला मिळणार या विचाराने तिला वेगळाच उत्साह आला होता. कितीतरी दिवसांनी पुन्हा त्याला बघण्याची संधी मिळणार होती. ६ महिन्यांपूर्वी जेंव्हा ती त्याला पहिल्यांदा भेटली होती तेव्हापासून तिच्या डोक्यात फक्त त्याचाच विचार असायचा. त्याला भेटावं, त्याच्याशी बोलावं, निदान त्याला नुसतं लांबून बघता तरी यावं एवढी एकच इच्छा असायची. रोज तो स्टेशनच्या रस्त्यावरून जायचा, त्याचं कॉलेज जवळच होतं बहुतेक. जाताना तिच्या आईकडून फुलं विकत घ्यायचा….रोज न चुकता. बाकिची गिऱ्हाईकं  वाद घालायची, पैसे कमी करून मागायची. पण हा वेगळाच होता. कधीच वाद घालायचा नाही, आई सांगेल तेवढे पैसे द्यायचा. आणि किती छान बोलायचा. “मावशी कालचा मोगऱ्याचा गजरा खूप छान होता, आईला खूप आवडला.” “मावशी तुमच्याकडची फुलं नेहमीच एकदम फ्रेश असतात, सुकत नाहीत लवकर.” त्याच्या या बोलण्याने खूष होऊन आई पण २-४ फुलं जास्तच टाकायची त्याच्या पिशवीत. आणि ती… ती तर वेडीच झाली होती त्याच्यासाठी. उंच, गोरापान, केस नीट विंचरलेले, जीन्स आणि टी-शर्ट आणि सतत हसतमुख चेहरा. एक दोन वेळा तिच्याकडे बघून हसला होता. पण ती त्याच्या नुसत्या जवळ असण्यानेच इतकी भारावून गेलेली असायची की काही बोलायचे सुचतच नसे. त्याला पाहिलं की छातीत धडधडायला लागायचं. त्याचा नुसत्या विचारानेच अंगावर शहारा यायचा. हे आपल्याला नक्की काय होतंय, का होतंय? काहीच कळत नव्हतं. १४-१५ वर्षांच्या तिच्या मेंदूवर विचारांचं काहूर उठायचं. त्यात घरच्या परिस्थितीमुळे शाळा सोडलेली त्यामुळे मैत्रिणींशी संपर्क तुटलेला. हे सगळं बोलणार तरी कोणाजवळ. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच असतं का हे तिला कळत नव्हतं आणि ते सांगणारंही  कोणी नव्हतं.  मग ती एकटीच हरवून जायची तिच्या विश्वात…. तिच्या स्वप्नांच्या विश्वात. ज्यात फक्त तो आणि ती होते. जे ती कधी त्याला बोलली नव्हती जे कधी घडलं नव्हतं ते सगळं ती तिच्या स्वप्नात बोलायची करायची आणि त्या आनंदात राहायची.

सगळं  आवरून घाईघाईने ती स्टेशनला पोचली तोपर्यंत ११ वाजत आले होते. नेहमीच्या जागी जाऊन तिने आपली फुलांची टोपली ठेवली आणि घाम पुसला. “अगं हो हो…. दमानं घे की जरा. कशापायी एवढी धावत पळत आलीस.” सखू मावशीच्या आवाजाने ती भानावर आली. “आज आई नाही आली का गं?” “नाही आज तिला हॉल वर साफसफाई साठी जायचंय.” ओढणी सावरत खाली बसत ती म्हणाली. “आस्स व्हय…. तरीच म्या म्हनतेय आज तू कशी काय आलीस हितं.” तोंडातलं पान चघळत सखू मावशी म्हणाली. “मावशी, शेवंता नाही आली का गं आज?” भिरभिरत्या नजरेने इकडेतिकडे पाहत ती म्हणाली. “आलेय की.” तेवढ्यात तिच्या पाठीवर थाप टाकत शेवंता म्हणाली. “आज सकाळी लवकरच आले आन पलीकडच्या कालेजाजवळ गेलते. या हफ्त्यात तिकडच जात व्हते म्या. लई धंदा व्हतुया. कसला तरी डे की काय हाय म्हनं, समदी पोरं पोरी फुलं विकत घेत्यात आन एकमेकाला देत्यात. आज पण समदी टोपली रिकामी झाली बघ माझी. आन उद्या तर अजूनच लई धंदा व्हईल आस्स सावरी सांगत होती. उद्या त्यांचा लई मोठा दिवस हाये म्हनं. काय बरं नाव म्हणली ती……… हां वेलांटीन डे का असंच कायतरी.” ती गोंधळलेल्या चेहऱ्याने शेवंताकडे पाहात होती. तिच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव समजून शेवंता हसत म्हणाली “अगं हो हो…. सांगते. आधी मला बी कायच कळल नव्हतं. मग सावरीने समद नीट सांगितलं. कसं आसतय ना, या दिवशी ना पोरं पोरी त्यांचं एकमेकांवर प्रेम हाय आस्स सांगतात, फुलं देऊन. आन अजून बी काय काय देतात, चाकलेट, टेडी बेर आन अजून काय काय. आन मग कुठं कुठं फिरायला जात्यात. प्रेमाचा दिवस असतुया म्हनं उद्या.”

विस्फारलेल्या डोळ्यांनी ती शेवंताकडे बघत होती. हे सगळं ऐकताना तिचे प्राण कानात गोळा झाले होते. ‘प्रेमाचा दिवस!!! प्रेम एकेमेकांना सांगायचा दिवस असतो, किती छान आहे न हे सगळं. आणि ते सुद्धा फक्त फुलं देऊन. ती तर माझ्याकडे भरपूर आहेत. म्हणजे उद्या मी सुद्धा त्याला माझ्या मनातलं सांगू शकते. माझं त्याचावर किती प्रेम आहे हे त्याला मला उद्या सांगता येइल.’ या विचारानेच तिच्या पोटात गुदगुल्या झाल्या. “काय गं कुठं लक्ष आहे तुझं?” शेवंताच्या आवाजाने ती पुन्हा भानावर आली. “अं… काय म्हणालीस?” विचित्र नजरेने तिच्याकडे बघत शेवंता म्हणाली “कुठल्या तंद्रीत असतीयास आजकाल  कोन जानं. तुझ्या समोर तर बोलतेय नव्हं. म्या म्हनलं उद्या लई चांगला धंदा व्हैल म्हणून म्या उद्या जर लवकरच येईन म्हणतेय. तुझं काय ठरतंय?” “हो हो…. मी पण लवकरच येईन सकाळी.” गालाच्या एका कोपऱ्यापासून दुसर्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण बत्तीशी दाखवत हसत ती म्हणाली. खरतर आनंदाने उडीच मारावी असं वाटत होतं तिला. “चल निघते म्या.” असं म्हणून शेवंता कधी निघून गेली ते तिला कळल सुद्धा नाही. ती तिच्याच विचारात गढलेली होती. “गजरा कसा दिला गं?” समोर एक बाई विचारत होती. तिची विचारांची तंद्री तुटली. “एक रुपयाचा एक मावशी.” ‘चला… पटापट काम उरकुया. आज सगळी टोपली संपवली आणि सगळा हिशेब आईला नीट दाखवला तर ती खुश होईल आणि मग उद्या पण यायला मिळेल.’ ती निट सावरून बसली. येणाऱ्या जाणाऱ्याना सांगायला लागली, “मावशी गजरा घ्या मोगऱ्याचा, आबोलीचा. अहो ताई फुलं घ्या ना लाल गुलाबी पिवळी सगळी आहेत. एकदम फ्रेश आहेत घ्या ना ताई.” कोणी भाव कमी करून मागत होते त्यांना पण जास्त वाद न घालता कमी करून देत होती. सगळ्या गिऱ्हाईकांशी शांतपणे गोड बोलत होती. तिला कोणाशीच भांडायचे नव्हते, कोणावरच रागवायचे नव्हते आज. कारण ती खूप खुश होती. उद्याच्या दिवसाची कल्पना मनात करून करून सुखावत होती.

“आज मावशी नाही आल्या का?” अचानक आवाज आला. तिने चमकून वर बघितले आणि…… समोर तो उभा होता. तिला काय बोलावे सुचेना. ज्याच्यासाठी ती इथे आली होती तो समोर होता. तिचा इकडे येण्याचा उद्देश सफल झाला होता पण …. नेहमीप्रमाणे त्याला पाहताच तिच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले होते. नजर त्याचा चेहऱ्यावरून हलत नव्हती. “१० रुपयांची फुलं मिळतील का?” त्याने जरा मोठ्यानेच विचारले तेव्हा ती भानावर आली. तो काहीसा गोंधळून तिच्याकडे बघत होता. ‘अरे देवा …. काय हा बावळटपणा. हा मला काहीतरी विचारतोय आणि मी नुसतीच त्याचं तोंड बघत बसलेय. काय वाटलं असेल त्याला ही बहिरी आहे की काय.’ तिला ओशाळल्या सारखे झाले. “अं…. हो हो आहेत ना. कोणती देऊ?” तिने स्वतःला सावरत विचारले. त्याने बोटाने दाखवली आणि म्हणाला, “आज मावशी दिसल्या नाहीत मला वाटलं मला यायला उशीर झाला की काय. म्हटलं आज काही आईला फुलं मिळणार नाहीत. पण तेवढ्यात तू दिसलीस आणि बरं वाटलं.” त्याच्या शेवटच्या वाक्याने तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. ओठांवर नकळत हसू फुललं. ‘मी त्याच्या लक्षात आहे तर. माझी आठवण आहे त्याला, मला ओळखतो तो. आणि मला बघून बरं वाटलं म्हणाला तो.’ पोटात असंख्य फुलपाखरं इकडून तिकडे धावायला लागली. “आई नाही आली आज, मीच आलेय सकाळपासून.” आनंदाला अवर घालत ती म्हणाली. “अच्छा. अरे हो आज २ गुलाबं पण हवे आहेत आईला, मी सांगायलाच विसरलो.” “हो हो देते ना.” ती उत्साहाने म्हणाली आणि घाईघाईने गुलाबांच्या जुडीत हात घालून गुलाब काढायला लागली. त्याला देण्यासाठी सगळ्यात चांगला सगळ्यात सुंदर गुलाब शोधायचा होता तिला. “अगं हळू हळू…. काटे लागतील, सांभाळून. मला काही घाई नाही सावकाश दे.” त्याच्या तोंडून पडलेले हे शब्द म्हणजे तिच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्याच  होत्या. माझी इतकी काळजी!!! तिला स्वर्ग फक्त दोन बोटेच उरला होता. फुलं पिशवीत टाकत तिने हसून त्याच्याकडे पाहिलं आणि पिशवी त्याच्या हातात दिली. त्याने पण हसत पैसे दिले आणि निघून गेला.

ती मात्र या जगातच नव्हती. वेगळ्याच विश्वात पोचली होती. सगळ्या अंगावरून मोरपीस फिरल्यासारख वाटत होतं. मनाचं पाखरू आभाळात उंच उंच भराऱ्या घेत होतं. “बनके तितली दिल उडा है कही दुर” मनात गाणं सुरु झालं होतं. आज पहिल्यांदा तो तिच्याशी बोलला होता आणि ते ही इतकं सुंदर. इतकं गोड. त्याच आनंदाच्या भारत तिने सगळी फुलं आणि गजरे संपवले आणि आनंदाने घरी आली. सगळ्या पैशांचा चोख हिशेब आईला दिला. “गुणाची गं माझी पोर” आईने डोक्यावरून हात फिरवत म्हटलं. “चल आता जेवून घेऊया.” तिचं पोट तर आधीच भरलं होतं. जेवता जेवता तिने संधी साधून आईकडे विषय काढला. “आई मी पण येईन उद्या तुझ्या  सोबत स्टेशनला.” “का ग?” आईने आश्चर्याने विचारले. “अगं उद्या २ टोपल्या घेऊन जायच्या आहेत ना मग तुला एकटीला झेपणार नाही.” “दोन कशाला गं?” “उद्या खूप चांगला धंदा होणार आहे, आपल्याला २ टोपल्या फुलं घेऊन जायला हवं.” आणि मग तिने शेवन्ताने सांगितलेली सगळी कथा तिच्यापेक्षाही जास्त रंगवून आईला सांगितली. “अस्स होय… असा पण दिवस असतोय का. बरं बरं. कुठला का दिवस असेना, त्या निमित्ताने जास्त फुलं विकली जातील ना, बरं आहे. पण ऐक, तुला पण उद्या सकाळी लवकर माझ्यासोबत यावे लागेल फुल आणायला. आणि देठ कापण्यापासून गजरे माळण्यापर्यंत  सगळ्या कामात मदत करावी लागेल. काय कळल?” “हो हो येईन ना मी” तिने जोरजोरात मान डोलवत सांगितले.  उरलेला दिवस आणि रात्र सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या विचारातच गेली. तिच्या स्वप्नांनी वेगळीच उंची गाठली होती. तिच्या कल्पना विश्वात तिने त्याला लाल गुलाब देऊन आपल्या मनातलं सांगितलं होतं, त्याने ते स्वीकारलंही  होतं. आणि त्यानंतर त्याचा हात हातात घेऊन ती कुठे कुठे फिरली होती. धुक्यातून, बर्फाच्या डोंगरांवरून, समुद्राच्या मऊशार वाळूतून आणि अजून कुठे कुठे.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ती तयार झाली. रात्री झोपच कुठे लागली होती म्हणा. आईसोबत फुलं आणायला गेली. आज तिला सर्वात सुंदर आणि नाजूक फुलं आणायची होती. फक्त त्याच्यासाठी. ती सगळीच्या सगळी फुलं त्याला देऊन त्याला सांगायचं होतं माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. आणि त्याच्याकडून वचन घ्यायचं होतं की तू माझ्यासोबत राहशील. मला सोडून कुठेही जाणार नाहीस. कसं काय काय बोलायचं त्याचा १०० वेळा सराव पण करून झाला होता. २ टोपल्या घेऊन ती आईसोबत स्टेशन वर आली. थोड्याच वेळात गर्दी वाढायला लागली. कॉलेजची मुलं मुली येऊ लागली, गुलाब घेऊन जाऊ लागली. गजरे पण संपत होते. ती पण नेहमी प्रमाणे हसून लोकांना आग्रहाने फुलं घ्यायला लावत होती. १२ वाजत आले. लाल गुलाब जवळ जवळ संपत आले होते. तिची नजर चारी बाजूंना भिरभिरत होती, त्याला शोधत होती. तिची अस्वस्थता वाढत होती. आज एवढा उशीर का झालाय याला. येणारच नाही असं तर नाही होणार ना? मनात हजार शंका आणि विचार येत होते. तेवढ्यात…. लांबून एक बाइक येताना दिसली. हो …. तोच होता. तिचा चेहरा आनंदाने उजळला. छातीत धडधडायला लागलं. श्वास रोखून ती त्याच्या दिशेला बघत होती. काय बोलायचं हे मनाशी ठरवत होती. टोपलीतून एक लाल गुलाब काढून तिने हातात धरला होता. तो आल्यावर आधी त्याला गुलाब द्यायचा आणि मग.…. तेवढ्यात त्याची बाइक तिच्याजवळ येउन थांबली. तिने हळूच नजर वर करून बघितलं आणि……. त्याच्या मागे एक मुलगी बसली होती. त्याच्या खांद्यावर हात ठेवून. ‘ही कोण आहे? आधी तर हिला कधीच बघितलं नव्हतं याच्यासोबत.’ गोरीपान, उंच सडपातळ, त्याच्यासारखीच जीन्स आणि टॉप घातलेली. ती अजून काही पुढचा विचार करणार एवढ्यात तो म्हणाला, “मावशी ४ लाल गुलाब द्या बघू पटकन.” तेवढ्यात त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं. “अरे वा… तू तर आधीपासूनच गुलाब तयार ठेवलायस. छान छान.” असं म्हणून तो तिच्या हातातला गुलाब घेणार एवढ्यात ती मुलगी बोलली. “तू पुन्हा विसरलास ना. I like pink roses baby.” “ohh… I am so sorry sweetheart.” दोन्ही हातांनी आपले दोन्ही कान पकडत तो म्हणाला. “ठीक आहे मी विसरलो म्हणून काय झालं, मावशी तर नाही विसरल्या ना. त्यांच्याकडे सगळे रंग आहेत. हो की नाही मावशी?” असं म्हणून त्याने तिच्या आईकडे बघितलं. “हो आहेत की, कोणती हवी सांग.” तिने नेहमी प्रमाणेच हसून उत्तर दिले. “४ गुलाबी द्या.” आईने तिच्याकडे वळून म्हटलं, “दे गं जरा गुलाबी काढून.”

पण ते शब्द तिच्या कानात पडलेच नाहीत. ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे आणि त्या मुलीकडे बघत होती. हातातला लाल गुलाब तसाच होता. तिचा एवढासा मेंदू काय चाललय, काय घडतंय याचा अर्थ लावण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता पण … पण काहीच अर्थबोध होत नव्हता. पोटातली फुलपाखरं थांबून त्यांची जागा खूप मोठ्या अवाढव्य गोळ्याने घेतली होती. मघापर्यंत भिरभिरणारी नजर आता मात्र शून्यात हरवली होती. सगळं जग हलतंय की काय असं वाटत होतं. “अगं बहिरी आहेस का?” आईच्या आवाजाने ती दचकली. “४ गुलाबी काढून दे सांगतेय कधीपासून, नुसती ठोंब्या सारखी उभी काय रहिलीस. दे काढून पटकन.” ती लगबगीने खाली वाकली, टोपलीतून ४ गुलाबी रंगाचे गुलाब काढले आणि त्याला देणार एवढ्यात त्यानेच पटकन तिच्या हातातून ओढून घेतले. खसकन काटा बोटात रुतला. आई गं… काळजात कळ गेली. टचकन डोळ्यात पाणी आलं. पण त्याचं तिकडे लक्षच नव्हतं. पैसे आईकडे देत तो म्हणाला, “thank  you मावशी.” “काय रे आज गजरा नको का?” आईने विचारलं. “संध्याकाळी येईन मावशी गजरा घ्यायला. आता जरा घाईत आहे.” तो नेहमी सारखाच हसतमुख चेहऱ्याने म्हणाला. गुलाब त्याने त्या मागे बसलेल्या मुलीला दिले. तिच्या चेहऱ्यावर निखळ हसू फुललं. “Love you baby.” असं म्हणून ती त्याला घट्ट बिलगली. त्याने बाईक सुरु केली आणि भुरकन निघून गेला. काही क्षणातच दृष्टी आड झाला. ती मात्र तो दिसेनासा झाला तरी त्याच दिशेला बघत होती. त्याच्या न दिसणाऱ्या आकृतीकडे….  की  शून्यात …… की  बाईकमागे उडालेल्या धुराळ्याकडे. तिचं तिलाच माहित. इकडे तिची आई बोलत होती, “अहो ताई घ्या गजरे घ्या मोगऱ्याचा, जाई जुईचा. घ्या फुलं घ्या ना, गुलाब आहे चाफा आहे. एकदम फ्रेश आहेत सगळी फुलं. घ्या ना.”

Advertisements