आयुष्य असचं जगायचं असतं

कडू गोड सगळ्या चवींना चाखून बघायचं असतं
कधी आसू, कधी हसू, आयुष्य असचं जगायचं असतं
 

कायम वसंत फुलण्याची खात्री देता येत नाही
कधी ग्रीष्माच्या चटक्यांनी होते अंगाची लाही

पण तरीही श्रावणाची वाट बघणं सोडायचं नसतं
आणि पावसात चिंब भिजून पुन्हा नव्याने फुलायचं असतं

ध्येयाचा मार्ग अवघड, नेहमीच खाच-खळग्यातून जातो
कधी हरवते वाट, तर कधी नकळत पाय अडखळतो

पण कितीही ठेचा लागल्या तरी पाऊल थांबवायचं नसतं
अपयशाच्या पायरया चढूनच यशाचं शिखर गाठायचं असतं 

प्रेमाचा सुगंधी गुलाब, पण त्यालाही असतात काटे
कधी सुकतात पाकळया, तर कधी रक्ताळतात बोटे

दोष नसतो कुणाचा, कधी कधी ते फूलचं आपलं नसतं
अश्रू पिऊन मग नव्या कळीला उमलू द्यायचं असतं 

प्रत्येक वळणावर असते आयुष्यात अनेक नात्यांची दाटी
तरी कधी उसवते वीण, कधी टोचतात रेशीम गाठी

पण कितीही धागे तुटले तरी विणकाम थांबत नसतं
नवीन नात्याचं वस्त्रं पुन्हा नव्याने जपायचं असतं

रात्रीच्या अंधारातच पहाटेचं गुपित दडलेलं असतं
सुखाची किंमत कळावी म्हणूनच दु:खाचं अस्तित्वं असतं
 
भूतकाळ विसरून भविष्याचं सुंदर स्वप्नं रंगवायचं असतं
कधी आसू, कधी हसू, आयुष्य असचं जगायचं असतं
 

 

 
 

 

 
 
Advertisements