प्रेम म्हणजे….

प्रेम प्रेम म्हणतात ते नक्की काय असतं 

सिनेमात दाखवतात ते की अजून काही असतं 

कितीही उशिरा झोपली तरी लवकर उठणारी आई 
आपण घरचाच डबा न्यावा म्हणून तिने केलेली घाई 
झोप येत नसताना डोक्यावर मायेने फिरलेला हात 
आजारी असताना उशाशी बसून जागवलेली रात 
तिच्या हाताने बनलेल्या आपल्या आवडीच्या भाजीत जे असतं 

प्रेम प्रेम म्हणजे आणखी वेगळं काय असतं?

स्वतःला  जुना शर्ट मात्र आपली हौसमौज करणं 
उन्हा-पावसात बाबांचं अडमिशन साठी उभं राहणं 
आपली डिग्री पाहून आनंदाने भरून आलेला उर 
उशीर झाल्यावर फोनवरचा काळजीतला त्यांचा स्वर 
त्यांच्या धाक आणि ओरडण्यातही जे लपलेलं असतं 

प्रेम प्रेम म्हणजे आणखी वेगळं काय असतं 

रात्री झोपताना आजीने रंगवून सांगितलेली गोष्ट 
झेपत नसतानाही घेतलेले लाडू बनवायचे कष्ट 
आई बाबांपासून वाचवून पाठीशी घातलेल्या सगळ्या खोड्या 
लपवून हळूच दिलेल्या खोबऱ्याच्या जास्तीच्या दोन वड्या 
तिने प्रेमाने गालावर पटापटा घेतलेल्या मुक्यांमध्ये जे असतं 

प्रेम प्रेम म्हणजे आणखी वेगळं काय असतं 

पॉकेटमनितुन वडापावची पार्टी देणारा मित्र 
कॉलेज मध्ये इकडून तिकडे त्याने पोचवलेली पत्रं  
जगापासून लपवलं दुःख तरी त्यालाच कळतं सगळं 
खांद्यावरच्या त्याच्या हाताने मन होऊन जातं मोकळं 
त्याने मस्तीत घातलेल्या धपाटे आणि शिव्यांमध्ये जे असतं 

प्रेम प्रेम म्हणजे आणखी वेगळं काय असतं 

झाडांमधुन गाणी म्हणत पळणं
समुद्रावर हातात हात घालुन फिरणं
प्रेम म्हणजे त्यापलिकडचं ही काहीतरी असतं
जिवाला जीव देणारी नाती
आणि ती नाती जपणारी माणसं मिळणं
हे सुद्धा प्रेमच असतं
कुणाच्या आठवणीत झुरणं आणि कुणासाठी मरणं
म्हणजेच फक्त प्रेम नसतं
तर अशी नाती जपणं आणि आपल्या माणसांसाठी जगणं
म्हणजेच खरं प्रेमच असतं 

 

 

Advertisements