बाप्पास पत्र २

प्रिय बाप्पास,
साष्टांग नमस्कार,

पोचलास ना रे नीट? तू पाण्यातून कसा घरी पोचतोस रे? तुला थंडी नाही वाजत का पाण्यात? मला नाही आवडत तुला असं पाण्यात बुडवायला. पण सगळे म्हणतात असंच असतं, तू तिथूनच तुझ्या घरी जातोस म्हणे. तू गेलास पण घर कसं एकदम शांत वाटतंय, कसंतरीच वाटतंय. एवढे दिवस तू होतास तेव्हा किती छान वाटायचं. रोज सगळे मिळून तुझी आरती करायचे तेव्हा किती मज्जा यायची. आणि तुझ्यामुळे रोज नवीन नवीन प्रसाद पण मिळायचा खायला. मला तर तुला जाऊच द्यायचं नव्हतं, मला दर वर्षी असं वाटत की तू इथेच रहावस आमच्या घरी पण आई म्हणते की बाप्पा आपल्याकडे पाहुणा म्हणून येतो थोडेच दिवस, नंतर त्याला त्याच्या घरी जायचं असतं.

आज तू गेल्यावर बाबा आईला म्हणत होते, तुझी खूप दगदग झालीये सुट्टी घे जर २ दिवस, आराम कर. पण आई म्हणाली नको आधीच खूप सुट्ट्या झाल्यात, अजून घेतल्या तर पगार कापतील. दगदग म्हणजे काय असते रे बाप्पा? आणि पगार कोण कापते? नंतर काहीतरी लिहित बसले होते दोघं वहीत. मी सगळं नाही ऐकलं कारण मोठ्या माणसांचं बोलणं चोरून ऐकयच नसतं. पण थोडं थोडं आपोआप ऐकू आलं. बाबा काहीतरी टेस्ट आता नको पुढच्या महिन्यात करू असं म्हणत होते, या महिन्यात गणपतीचा खर्च झालाय असं म्हणाले. बाप्पा खर्च म्हणजे काय रे?

मला ना या मोठ्या माणसांचं काही कळतच नाही बाप्पा. सगळे म्हणतात बाप्पा सगळ्यांना खूप देतो. पण बाबांचे मित्र त्यादिवशी म्हणत होते गणपतीमुळे खूप पैसा जातोय, कशाला करतोस हे सगळं झेपत नाही तर. बाप्पा तू खरंच आमचे पैसे घेऊन जातोस का रे? मी आईला असं विचारलं तेंव्हा ती मला ओरडली. म्हणाली की असं कधीही बोलायचं नाही. बाप्पाने आपल्याला खूप दिलंय, मग थोडेसे पैसे त्याच्यासाठी गेले तर काही बिघडत नाही. तिनेच मला सांगितलं की तुझ्यामुळे आम्हाला पोटभर जेवण मिळतं, चांगले कपडे मिळतात आणि हे आमचं घर पण तुझ्यामुळेच मिळालंय. thank you बाप्पा हे एवढं सगळं दिल्याबद्दल.

पण तरी तू बाबांकडून जास्त पैसे नको घेऊस please. पैसे नसले की बाबा त्यांची औषधे आणत नाहीत असं ताई काल सांगत होती. बाबांकडे अद्वैतच्या बाबांएवढे पैसे आले ना की मग घे. मग तेव्हा मीच सांगेन बाबांना तुला जास्त पैसे द्यायला. अद्वैतच्या बाबांकडे खूप पैसे आहेत असं तो सांगतो. म्हणून तो रोज नवीन कपडे घालतो. आणि english पण किती छान बोलतो. बाप्पा, मला पण त्याच्यासारखं पटापट english बोलता येईल का रे? काकू म्हणतात तो मोठ्या शाळेत जातो म्हणून त्याला एवढं चांगलं english येतं. पण बाबा म्हणतात आपण चांगला अभ्यास केला तर सगळं जमू शकतं. बाप्पा तू मला चांगली बुद्धी दे आणि मी पण खूप अभ्यास करेन आणि अद्वैत सारखं english बोलेन.

बाप्पा आईचे पाय आणि कंबर रोज दुखते. मी तिला विचारलं का दुखते तर हसून म्हणाली की ऑफिसला जाणाऱ्या सगळ्यांच्या आईची दुखते. पण अद्वैतच्या आईची नाही दुखत असं म्हणाला तो. त्याची आई गाडीतून जाते ना, म्हणून नाही दुखत असं काकू सांगत होत्या. मी आईला विचारलं की बाप्पाने आपल्याला गाडी का नाही दिली? तर ती म्हणाली असं बोलायचं नाही. बाप्पाने खूप दिलंय आपल्याला. मी तिला सांगितलं आपण पण गाडी आणुया तर आई जोरात हसायला लागली. आणि मग म्हणाली तू लवकर मोठा हो आणि घे गाडी. ती का हसली बाप्पा ? तुला माहित आहे का रे? तू आम्हाला एवढं सगळं दिलंस मग गाडी का नाही दिलीस? आणि गाडी घेण्यासाठी मोठं का व्हावं लागतं? अद्वैत तर माझ्याएवढाच आहे मग त्याच्याकडे कशी आली गाडी?

बाप्पा तू मला लवकर मोठा कर म्हणजे मी गाडी घेइन आणि मग आईचे पाय कधीच दुखणार नाहीत. आणि माझ्या बाबांना थोडे पैसे पण दे म्हणजे ते त्यांची औषधे वेळेवर घेतील. पण हे सगळं मी तुला सांगितलं हे आईबाबांना सांगू नकोस हां please, हे आपलं secret आहे.

पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा आणि खूप दिवसांसाठी ये, लगेच जाऊ नकोस हां.

कळावे
तुझा लाडका चिन्मय

Advertisements