मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने….

नमस्कार

सर्वप्रथम मराठी भाषा दिनाच्या सर्व मराठी ‘जनांस’ आणि मराठी ‘मनांस’ शुभेच्छा. आता तुम्ही म्हणाल हे दोन वेगवेगळे शब्द वापरायची काय गरज? फक्त मराठी जनांस म्हटलं असतं तरी पुरे. तेवढं म्हणून पुरे झालं असतं तर मलाही आनंदच झाला असता पण दुर्दैवाने मराठी जन आणि मन एकाच अर्थाचे शब्द नाहीयेत…. निदान आपल्या मराठीपुरते तरी. म्हणजे जे ‘जनं’ मराठी आहेत त्या सर्वांचीच ‘मनं’ मराठी आहेतच असं नाही ना. काही जण फक्त महाराष्ट्रात जन्माला आले किंवा मराठी आडनावाच्या घरात जन्माला आले म्हणून मराठी. बाकी मराठी भाषेशी त्यांचा दूरवर काहीही संबंध नसतो. म्हणून हे दोन वेगळे शब्द वापरले. 

तर असो…. वरचे शीर्षक वाचून आजचा ब्लॉग मराठी भाषेबद्दल आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. खरं तर आज मी नेहमीसारखं अमुक एका विषयावर लिहूया असं म्हणून ठरवून लिहायला बसले नाही. सकाळी उठल्यापासून whatsapp आणि facebook वरून जो मराठी भाषेबद्दलच्या messages चा पाऊस पडतोय, तो बघून मनात जे विचार आले ते मांडतेय फक्त. एवढ्या सर्व मराठी लोकांना आजचा दिवस लक्षात आहे आणि त्याचा ते सगळीकडे प्रचारही करतायत. हे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. पण हे मराठी भाषेबद्दलचं प्रेम फक्त एकाच दिवसापुरतं का असावं? तो एक दिवस मराठी भाषेबद्दलचे messages सगळ्यांना फॉरवर्ड करायचे, मराठी status ठेवायचे आणि अजून काय काय. facebook ची wall या अशा सगळ्या messages नी भरून जाते. पण हे सगळं फक्त एक दिवस. उद्यापासून पुन्हा सगळे इंग्लिशच्या मागे. तो एक दिवस वगळता इतर वेळी आपण आपल्या भाषेवर हे एवढं प्रेम का करत नाही? किंवा त्या भाषेसाठी काय करतो?

खरं तर मराठी भाषा म्हणजे काही दसरा किंवा दिवाळी नाही एक दिवस साजरी करण्यासारखी. ती आपली मातृभाषा आहे, ती आपल्या रोजच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग आहे….. म्हणजे असायला हवा. पण आपल्यातले किती जण खरंच रोजच्या जीवनात तिचा प्रामाणिकपणे वापर करतात? Globalization मुळे मराठीच काय पण सगळ्याच प्रादेशिक भाषांवर इंग्लिशने आक्रमण केलंय. पण हल्ली मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये टाईप करण्यासाठी कितीतरी नवीन apps आले आहेत. आपल्यापैकी किती जण त्याचा वापर करतात? रोज whatsapp वर पाठवल्या जाणाऱ्या १०० पैकी निदान ५-१० messages मध्ये तरी आपण मराठी वापरतो का? टाईप करायला कठीण आहे, किचकट आहे मान्य आहे. पण जरा विचार करा की जेव्हा इंटरनेट आणि कॉम्पुटर नवीन आले होते तेव्हा इंग्लिश मध्ये टाईप करणे सुद्धा आपल्याला कठीणच वाटले होते ना? पण तो दिवस आठवा आणि आजचा दिवस बघा. आज आपण किती सराईतपणे की बोर्ड वर बोटे चालवतो. facebook आणि whatsapp पण जेव्हा नवीन आले होते तेव्हा वापरायला किचकटच वाटले होते ना? पण आज आपलं पान सुद्धा हालत नाही त्याच्याशिवाय. सांगण्याचा मुद्दा हा की कोणतीही गोष्ट सुरुवातीला कठीण वाटतेच पण सरावाने सवय होते. निदान थोडा प्रयत्न तरी करूया. 

बरं chat वर मराठी टाईप करणे कठीण आहे मान्य. पण समोरासमोर बसून किंवा फोन वर बोलताना तरी मराठी बोलावं की नाही? तेही कठीण आहे? म्हणजे अगदी शिवाजी महाराजांच्या काळातली शुद्ध मराठी भाषा वापरावी असं माझं म्हणणं मुळीच नाही. मध्ये एखाद दुसरा हिंदी इंग्लिश शब्द आला तर समजू शकतो पण काही लोकांच्या बाबतीत हे नेमकं उलटं असतं, म्हणजे मध्येच एखादा मराठी शब्द टाकायचा उपकार केल्यासारखा, बाकी सगळं इंग्लिश मध्ये. नक्की कोणावर उपकार करतोयस बाबा तू? मराठी भाषेवर? की स्वतःच्या आईबापावर? हे लोक म्हणजे मी वर उल्लेख केलेल्या फक्त मराठी ‘जनं’ या वर्गात मोडणारे. ज्यांना मराठी बोलायची लाज वाटते किंबहुना ‘माझं मराठी फार चांगलं नाही’ हे सांगण्यातच अभिमान वाटतो. अशांना मला विचारावंस वाटत की तुम्हाला आईला आई म्हणायची पण लाज वाटत असेल ना? कारण मातृभाषा ही आईसारखीच असते. आई आपल्याला पहिल्यांदा बोलायला शिकवते म्हणून तर तिला मातृभाषा म्हणतात ना? ज्यांना मातृभाषेची लाज वाटते, त्यांना आपल्या आईबापाची पण वाटत असेल. ‘माझं मराठी फार चांगलं नाही’ असं म्हणणं म्हणजे ‘मला आईची गरज नाही’ ही गोष्ट अभिमानाने सांगण्यासारखंच आहे असं मला वाटतं. 

आणि बऱ्याच वेळा याला पालकच जबाबदार असतात. आजकाल इंग्लिश मिडीयम शाळेत घालण्याचं  फॅड इतकं वाढलंय की अपुऱ्या विद्यार्थी संख्येमुळे बऱ्याचशा मराठी शाळा बंद पडत आहेत. अजून काही दिवसांनी तर मराठी शाळा ही एक ऐतिहासिक वास्तू होऊन जाईल की काय अशी भीती वाटतेय. म्हणजे एखाद्या थोर व्यक्तीचा किंवा राजाचा राजवाडा किंवा वस्तुसंग्रहालय जसं तिकीट लावून बघायला जातात तशा मराठी शाळा या फक्त बघायला जाण्यापुरत्या उरतील. आश्चर्याची बाब अशी की जे लोक स्वतः मराठी शाळेतून शिकले आणि तरीही आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले, वरच्या पदापर्यंत पोचले त्यांचाही कल आपल्या मुलांना इंग्लिश मिडीयम शाळेत घालण्याकडेच असतो. तुमचं काही अडलं का मराठी शाळेत शिकल्यामुळे? नाही ना? मग तरीही मुलांना का मराठीपासून तोडताय? बरं एकवेळ इंग्लिश शाळेत घालणं हे मी समजू शकते ती काळाची गरज असेल कदाचित. पण घरात सुद्धा त्यांनी इंग्लिशच बोलावं हा अट्टहास का? कित्येक पालक घरात सुद्धा आपल्या मुलांशी इंग्लिश मधूनच संवाद साधतात. माझ्या जुन्या ऑफिस मधली एक सहकारी…. मराठीच होती. पण तिच्या मुलाशी कायम इंग्लिश मधेच बोलायची. ऑफिस मध्ये असताना घरून कधी फोन आला तर हिचं चालू व्हायचं, ‘What are you doing? Did you have apple? First complete your homework.’ ही गोष्ट मला तशी थोडी विचित्र वाटायची पण त्याचं गांभीर्य मला तेव्हा लक्षात आलं जेव्हा मी ऑफिसच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिच्या मुलाला भेटले. ५-६ वर्षांचा असेल तो. त्याला तुझं नाव काय असं विचारल्यावर तो गप्पच होता, माझं आणि त्याच्या आईचं तोंड बघत होता. आधी मला वाटलं की कदाचित लाजरा बुजरा असेल किंवा नवीन माणूस पाहिल्यावर घाबरला असेल. पण नंतर माझ्या एका दुसऱ्या मैत्रिणीने ( जी मराठी नव्हती ) त्याला तोच प्रश्न इंग्लिश मध्ये विचारला तेव्हा त्याने पटकन उत्तर दिलं. मला काय बोलावं तेच कळेना. आणि त्याची आई पण हसत हसत मला म्हणाली, ‘अगं मराठी नाही समजत त्याला.’ म्हणजे त्याच्या आई बाबानी त्याच्या कानावर एकही मराठी शब्द पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती आणि ती गोष्ट अभिमानाने सांगतही होते. काय म्हणावं याला? हा कसला विचित्र हट्ट? मातृभाषेशी अजिबात संबंधच ठेवायचा नाही?  इतकी लाज वाटत असेल मराठीची तर मग मराठी आडनावं तरी कशाला लावता ना? तीही बदलून टाका. 

आपल्या मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईबापाला वाटतं. आपलं मूल हे आपण लावलेल्या झाडासारखं आहे असं समजा. आपलं झाड खूप मोठं व्हावं, खूप उंच व्हावं, त्याच्या फांद्यांचा विस्तार खूप व्हावा, ते आभाळाला जाऊन भिडावं असं आपल्याला वाटतं. ते योग्यचं आहे आणि तसंच व्हायला हवं. पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की झाड कितीही मोठं, कितीही उंच झालं तरी त्याची मुळं ही जमिनीतच असतात. झाडाची मुळं जितकी मजबूत आणि घट्ट रोवलेली असतात तितकं ते झाड उंच वाढतं. एकवेळ फांद्या छाटल्या तरी त्या पुन्हा वाढू शकतात पण जर मुळापासून उपटलं तर ते झाड पुन्हा वाढेल का? माणसाचंही तसंच असतं. खूप शिकावं, मोठं व्हावं, वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं, वेगवेगळ्या भाषाही शिकाव्यात. पण आपली मुळं इथेच आहेत ना, आपल्या मातीत. आपल्या मराठी मातीत. त्या मुळांनाच विसरून कसं चालेल? ती मुळं आपल्या मातीत घट्ट रोवलेली असायलाच हवीत ना? मोठ्या मोठ्या संशोधनातुन हे सिद्ध झालंय की लहान मुलांना प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतुनच द्यायला हवे. त्यामुळे त्यांचे सर्व गोष्टींचे आकलन पक्के होते. ज्याला आपण इंग्लिश मध्ये basic concepts clear होणे म्हणतो, ते मातृभाषेतून केल्याने जास्त चांगल्या प्रकारे होते. आणि यालाच अनुसरून जगातल्या बऱ्याचशा देशांमध्ये हा प्रयोग सुरूही करण्यात आला आहे आणि त्याचे खूप चांगले परिणामही दिसून येतायत. दुर्दैवाने आपल्याकडे मात्र इंग्लिश येणं हे माणसाची बुद्धिमत्ता मोजण्याचं एक साधन आहे. माणूस कितीही हुशार असला, कितीही वेगवेगळ्या विषयतलं त्याला ज्ञान असलं, तरीही जर त्याला इंग्लिश येत नसेल तर तो अतिशय क्षुद्र समजला जातो. माणूस मराठीत बोलतोय म्हणजे त्याला इंग्लिश येतंच नसणार किंवा इंग्लिश कच्च असणार हे गृहीत धरलं जातं. इंग्लिश येत असूनही आपल्या भाषेवर प्रेम म्हणून मराठी बोलणं हा गुन्हा आहे का? जिथे आवश्यक आहे तिथे जरूर इंग्लिश बोलावं पण कारण नसतानाही सतत इंग्लिश बोलत राहणं यात कसली आलीये हुशारी? 

इंग्लिशने सर्व भारतीय भाषांवर आक्रमण केलेलं असलं तरी त्यामुळे मराठी भाषेचं जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं दुसऱ्या कोणत्याही भाषेचं झालेलं नाही असं माझं मत आहे. आणि त्याला आपण मराठी माणसंच जबाबदार आहोत. इतर सर्व भाषिक लोकांना त्यांच्या भाषेचा प्रचंड अभिमान असतो. ते भले इंग्लिश मिडियम मध्ये शिकतील, अमेरिकेत जातील पण आपल्या लोकांशी आपल्या भाषेतच बोलतील. कधी दोन गुजराती किंवा दोन बंगाली माणसांना एकमेकांशी हिंदीत बोलताना ऐकलंय? ते लोक नेहमी आपल्या मातृभाषेतच बोलतात. एवढंच काय पण एखादा मोठा ग्रुप असेल वेगवेगळ्या भाषिक लोकांचा, तरी त्यात २ लोक सामान भाषिक असले तर ते आपसात आपल्याच भाषेत बोलणार, मग भले बाकीच्यांना कळों किंवा न कळों. आपण मराठी माणसं का असं वागत नाही? कित्येकदा आपण एखाद्या नवीन अनोळखी माणसाशी हिंदीत बोलायला सुरुवात करतो आणि खूप वेळ गेल्यानंतर कधीतरी ओघात आपल्याला कळते की तो माणूस पण मराठीच आहे. जर आपण सुरुवातच मराठीत केली तर? कधी कधी एखाद्या कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केल्यानंतर मराठी भाषेचा पर्याय दाबल्यानंतरही अमराठी माणूस बोलायला येतो. आणि आपण सुद्धा त्याच्याशी हिंदी किंवा इंग्लिश मधून बोलायला सुरुवात करतो. तिकडे का नाही नाही आपण मराठीचा आग्रह धरत? मला मराठीच येते दुसरी कोणती भाषा येत नाही असं ठामपणे का नाही सांगत? आपल्या या वागण्यामुळेच मुंबईत आणि महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी येणे सक्तीचे नाही ही भावना इतर अमराठी लोकांमध्ये बळावतेय. कस्टमर केअरचे सगळे कॉल्स रेकॉर्ड होतात. जर आपण मराठीचा आग्रह धरला तर ही गोष्ट त्या कंपनीत वरपर्यंत जाईल आणि त्यांना कळेल की मराठी कस्टमर्सना मराठी बोलणारेच लोक लागतात. भाषेच्या अडचणीमुळे आपले कस्टमर्स कमी व्हावे असं कोणत्याही कंपनीला वाटणार नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्या कॉल सेंटर मध्ये मराठी लोकांना नोकऱ्या द्याव्याच लागतील किंवा अमराठी लोकांना मराठी शिकणे सक्तीचे करावेच लागेल. आपल्याच राज्यात, आपल्याच शहरात आपण आपली भाषा वापरायला एवढे का घाबरतो? राजकीय नेते मराठीचं राजकारण तेवढ्यापुरतं करतात, घोषणा देतात, मराठी पाट्यांची सक्ती करतात आणि अजून काय काय करतात. पण ही जबाबदारी फक्त त्यांचीच आहे का? राजकीय नेत्यांची संख्या जास्त की सर्वसामान्य मराठी माणसांची? मग आपण एवढे सगळे मराठी असूनही आपण आपल्या भाषेच्या हक्कासाठी, विकासासाठी त्यांच्यावर अवलंबून का राहायचं? त्यासाठी आपण का काही करत नाही?

आणि त्यासाठी फार काही मोठं करायचं नाहीये आपल्याला. रोजच्या जीवनात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करूया. निदान मराठी माणसाशी तरी मराठीत बोलूया. मराठी साहित्यविश्व इतकं अफाट आहे. ते वाचूया आणि एकमेकांशी त्याबद्दल बोलूया, त्याची देवाणघेवाण करूया. मुलं जरी इंग्लिश मीडियम मध्ये शिकत असली तरी घरी त्यांना मराठी पुस्तकं वाचायला देऊया. मराठी साहित्य, मराठी गाणी, मराठी लोकसंगीत यांची गोडी लावूया. मराठी भाषा दिनाच्या दिवशी फक्त message फॉरवर्ड करणाऱ्यांपैकी किती जणांनी कुसुमाग्रजांच काही लिखाण वाचलंय? किंवा निदान ते कोण होते याबद्दल काही माहिती आहे? ते आणि त्यांच्यासारख्या कित्येक दिग्गज साहित्यिकांनी मराठी भाषेला आणि मराठी साहित्यविश्वाला खूप समृद्ध करून ठेवलंय. त्यात जरी भर घालता आली नाही तरी निदान ते जतन करून ठेवायचं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं एवढं तर करूच शकतो ना. भाषेच्या बाबतीत कायम दाक्षिणात्य विशेषतः तामिळ लोकांचा आदर्श समोर ठेवावा. त्यांना इतका प्रचंड अभिमान आहे आपल्या भाषेचा की ते दुसऱ्या कोणत्याही भाषेत बोलत नाहीत. तिकडे गेल्यावर तुम्हाला त्यांची भाषा शिकावीच लागते नाहीतर तुम्ही राहूच शकत नाही तिथे. जसं आपल्या इथले काही ‘अति सुशिक्षित’ लोक आपल्या मुलांच्या कानावर मराठीचा लवलेशही पडणार नाही याची काळजी घेतात तशीच काळजी तिथले लोक आपल्या भाषेशिवाय दुसरी कोणती भाषा कानावर पडणार नाही याची घेतात. त्यांचा भाषेचा अभिमान अतिरेकी असेलही कदाचित पण त्यामुळेच त्यांच्या भाषेत अजूनपर्यंत हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेचं मिश्रण झालेलं नाहीये. आपल्या मराठी भाषेत किती भेसळ झालीये हे वेगळं सांगायची गरज नाही, कोणत्याही मराठी चॅनेल वरच्या जाहिराती बघा. कोणी कपड्यांवरचे डाग ‘मिटवतो’ तर कोणी वेदनेपासून ‘सुटकारा’ मिळवतो. मराठी सिरिअल्स मध्ये तर सर्रास सगळे ‘तुझी मदत’, ‘माझी मदत’ करतच असतात. यांचं मराठी ऐकून कोणीतरी मराठी भाषेला मदत करा असं ओरडून सांगावंसं वाटतं. हे हिंदीतून मराठीत जसंच्या तसं भाषांतर करणं असंच चालू राहिलं तर काही दिवसांनी आपली मूळची शुद्ध मराठी भाषाच अशुद्ध वाटायला लागेल की काय अशी भीती वाटतेय. किंवा कोण जाणे, मराठी ही भाषा हिंदीतूनच निर्माण झालीये असंही कदाचित शिकवलं जाईल पुढच्या पिढीला आणि त्यांना ते पटलं तर त्यात त्यांची चूक नसेल कारण मूळ शुद्ध मराठी भाषा काय होती, कशी होती, तिचा इतिहास काय होता हे त्यांच्यापर्यंत पोचवलंच नसेल कोणी. 

हे सगळं टाळायचं असेल तर फक्त एक दिवस मराठी भाषेचा म्हणून साजरा न करता प्रत्येक दिवस तिचा अभिमान बाळगला पाहिजे, तिचा प्रचार केला पाहिजे आणि जपली पाहिजे. मायमराठी म्हणतो ना आपण तिला. मग आपल्या आईवर फक्त एकच दिवस प्रेम करायचं हा कुठला न्याय? बाकीचे ३६४ दिवस ती माय वृद्धाश्रमात पडून तिच्या लेकरांची वाट बघत असते आतुरतेने. तिला वृद्धाश्रमातून सन्मानाने आपल्या घरी आणूया आणि जगवूया. आणि आजच्या दिवशी आपण वर्षभर तिच्यासाठी काय काय केले याचा आढावा घेऊया. आजचा दिवस हा तिचा वाढदिवस म्हणून साजरा करूया. म्हणजे तिची किती वाढ झाली हे बघण्याचा आणि अनुभवण्याचा  सोहळा साजरा होईल आजच्या दिवशी. असं केलंत तर कुसुमाग्रज आणि त्यांच्यासारख्या अनेक थोर लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि तीच खरी श्रद्धांजली ठरेल. 

आता रोजच म्हणूया

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी                                                                                             जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी 

P.S.:- या लेखात मी  शक्य तेवढा इंग्लिशचा वापर टाळायचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तरीही काही शब्द आलेले आहेत कारण त्यांना पर्यायी मराठी शब्द मला माहित नव्हते किंवा जरी माहित असते तरी ते वाचणाऱ्याला कळायला कठीण गेले असते म्हणून वापरले नाहीत. त्याबद्दल क्षमा असावी. इथून पुढे ते वापरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन  
  
 
Advertisements

4 thoughts on “मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने….

  1. अनुया,
    “खरं तर मराठी भाषा..” हा परीच्छेद जेव्हा वाचला तेव्हा अगदी मनापासून पटला. तू खूप सही उदाहरणं दिलीयेस. म्हटलं ठरलं तर.. आजपासून कितीही किचकट का वाटेना मराठी लोकांशी बोलताना मराठी लिपीतूनच लिहूया. पहिले २-३ दिवस कठीण गेले आणि जाम शाॅट लागला पण आता मराठी कीबोर्डवरपण बऱ्यापैकी हात बसलाय. व्हाॅटस्ॲपवर मराठी लोकांशी मराठीतून बोलताना मी मराठी लिपीतून लिहायला सुरू केलंय आणि आपल्याला वाटतं तेवढं कठीण नाही हे ही समजतंय. मनापासून धन्यवाद अनुया.. thanks a lot.. जियो मेरे दोस्त.. जियो!! 😀😀😬😀

    Liked by 1 person

  2. Hey thanks a lott. सॉरी खूपच उशिरा रिप्लाय देतेय, गडबडीत ही कमेंट वाचायची राहूनच गेली माझ्याकडून. आज अचानक दिसली. मी मांडलेल्या गोष्टी तू एवढ्या मनावर घेतल्यास हे बघून खरंच खूप आनंद झाला. Keep it up 

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s