परफेक्ट क्लिक – Part 1

सूचना: या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 🙂 😛 

टक टक टक…. अनिताची बोटं पटापट कीबोर्ड वर चालत होती. मध्येच घड्याळाकडे लक्ष जात होतं. एवढ्यात मागून सीमा आली. “चल… येतेस ना. वेळ झाली.” “अं… हो हो आलेच. तुम्ही व्हा पुढे, मी एवढं संपवून आलेच.” अनिता लॅपटॉपवरून नजर न हटवताच म्हणाली. “ओके.” असं म्हणून सीमा मिटिंग रूममध्ये गेली. अनिताने पटापट काम संपवलं आणि घड्याळाकडे बघत जागेवरून उठली. ‘६.४०… अरे बापरे. १० मिनिट उशीर झाला. आता बोलणी खायला तयार राहा.’ असं स्वतःशी म्हणत ती रूम मध्ये शिरली. “I am so sorry for the delay, actually, I had to do some changes in the report at last minute.” पण तिच्या अपेक्षेप्रमाणे मॅनेजर अजिबात चिडला नाही. त्याला कारणही तसंच होतं. अनिताने नुकतीच तिच्यावर टाकलेली एक कठीण जबाबदारी खूप उत्तम रीतीने पार पडली होती आणि त्याबद्दल client ने तिला आणि त्यांच्या सगळ्या टीमला special appreciation दिलं होतं. मॅनेजर भरभरून तिच्याबद्दल बोलत होता. “Let’s give her a big round of applause.” तो म्हणाला.  सगळ्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या. “Thank you. Thanks.” अनिता प्रसन्न चेहऱ्याने हसून सगळ्यांकडे बघत होती. इतर महत्वाचे updates झाल्यानंतर अर्ध्या तासाने मिटिंग संपली. मिटिंग रूममधून बाहेर पडताना सगळ्यांनी पुन्हा एकदा अनिताचे अभिनंदन केले आणि सगळे आपापल्या जागेवर परतले. 

अनिता आपल्या डेस्क वर येऊन बसली. तिला एकदम हवेत असल्या सारखं वाटत होतं. ‘शेवटी माझ्या मेहनतीचे फळ मिळाले. आता या appreciation मुळे, येणाऱ्या appraisal मध्ये प्रमोशन तर नक्की मिळेलच. पण त्यापेक्षा onsite मिळाले तर जास्त चांगलं.’ तिची कधीपासूनची इच्छा होती USA ला जाण्याची. त्यासाठी २ वेळा कंपनी पण बदलली. प्रत्येक ठिकाणी तेवढीच मेहनत घ्यायची पण काही ना काही कारणामुळे प्रत्येक वेळी तिची ती संधी हुकली होती. या वेळी मात्र तिच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. एक महत्वाचा email पाठवल्या नंतर तिने लॅपटॉप बंद केला आणि बॅग आवरायला घेतली.  ‘मनाली घरी येऊन बसली असले कधीची, वाट बघून कंटाळली असेल. पण त्याहीपेक्षा जास्त आईची बडबड ऐकून कंटाळली असेल. आजही उशीरच झाला आपल्याला.’ सगळं आवरून ती घाईघाईने निघाली. “अनिता, परवा आम्ही मूवी चा प्लॅन करतोय, तू येतेयस ना.” सीमाचा आवाज आला. “नाही ग सॉरी, परवा मी ट्रेकला जातेय. आधीच ठरलंय. आणि तसंही तुम्ही रोमँटिक मूवीलाच जाणार ना. I am not interested. पुढच्या वेळी Sci-Fi चा प्लॅन करा मग नक्की येईन मी.” अनिता डोळे मिचकावत म्हणाली. “शी… कसली unromantic आहेस तू.” सीमा त्रासिक स्वरात म्हणाली. अनिता फक्त गालातल्या गालात हसली आणि सगळ्यांना बाय म्हणून निघाली. लिफ्ट आलेलीच होती त्यात पटकन शिरली. 

‘Unromantic!!!! खरंच इतके unromantic कधी झालो आपण कळलंच नाही ना. एक काळ होता जेव्हा आपण romantic शिवाय दुसरे कोणतेच मूव्हीज बघायचो नाही. पण गेल्या दोन वर्षात इतकं सगळं बदललंय. फक्त त्या एका गोष्टीमुळे….. की व्यक्तीमुळे??’ “ground floor” लिफ्ट च्या आवाजाने अनिताच्या विचारांची तंद्री तुटली. पण फक्त तेवढ्यापुरतीच. बसमध्ये येऊन बसल्यावर अचानक तिचे फोन कडे लक्ष गेले आणि तिने तारीख पहिली. ‘आज त्याचा वाढदिवस.’ तिने whatsapp उघडले. contacts मधून त्याच्या नावावर टच केले. ‘DP दिसतोय अजून म्हणजे मला block नाही केलंय अजून.’ तो DP मोठा करून बघणार एवढ्यात तो दिवस तिला आठवला. याच दिवशी दोन वर्षांपूर्वी. सगळं घडलेलं जसंच्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलं. “थांब… प्लिज थांब. असा रागावून जाऊ नकोस. माझं एकदा ऐकून तरी घे.” अनिता रडवेली होऊन त्याला सांगत त्याच्या मागे धावत होती. त्याला थांबवण्यासाठी तिने त्याचा हात धरला. “Don’t touch me” जोरात हिसका देऊन त्याने तिचा हात झटकला आणि चालायला लागला. पुन्हा ती पावसातून, चिखलातून त्याला थांबवत, त्याच्या मागे मागे धावत होती. त्याने रिक्षाला हात दाखवला. रिक्षा थांबली आणि त्यात बसून तो निघून गेला. बाहेरच्या पावसाबरोबरच तिच्या डोळ्यातल्या अश्रूंचा बांध फुटला. रिक्षा दिसेनाशी झाली तरी ती त्याच दिशेला बघत उभी राहिली. शून्यात. ‘कर्रर्रर्रर्र’ बसने करकचून मारलेल्या ब्रेकच्या आवाजाने पुन्हा एकदा तिच्या विचारांची तंद्री तुटली. तिचा स्टॉप जवळ आला होता. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. दोन वर्षांपूर्वी होता अगदी तसाच. 

मनाली घरी येऊनच बसली होती. तिने आल्या आल्या अनिताला एक धपाटा मारला आणि मग दोघींनी एकमेकींना मिठी मारली. मनाली तिची सगळ्यात जवळची मैत्रीण. लहानपणापासूनची. दोघी एकाच सोसायटी मध्ये, एकाच शाळेत, एकत्र लहानाच्या मोठ्या झाल्या. सगळी सुखं दुःख वाटून घेतली. दोन वर्षांपूर्वी मनालीचं लग्न झालं आणि ती पुण्यात सेटल झाली. पण अधूनमधून मुंबईला यायची घरी तेव्हा अर्थातच अनिताच्या घरी एखादा दिवस तरी night out चा प्लॅन असायचाच. आजही होताच. 

अनिता फ्रेश होऊन बाहेर आली आणि मनाली जवळ येऊन बसत म्हणाली. “मग… या वेळी तरी केदार जास्त दिवस राहणार आहे की उद्या लगेच रिटर्न?” “नाही ग.. त्याला नाही जमत जास्त दिवस सुट्टी घ्यायला, तुला माहितेय ना. पण तरी या वेळी २ दिवस जास्त राहणार आहे. मी थांबायला लावलं त्याला. तू काही तुझा ट्रेक माझ्यासाठी कॅन्सल करणार नाहीस आणि उद्या पण तुला पूर्ण दिवस आराम करायचा असणार घरात. म्हणून मग त्यालाच म्हटलं थांब जरा आमच्या मॅडम फ्री होईपर्यंत.” मनालीच्या स्वरातली नाराजी अनिताला जाणवली. “रागवू नकोस यार. तू आहेस ना अजून १५ दिवस. मी येईन ना तुझ्याबरोबर शॉपिंगला नक्की. ट्रेकचा हाच एक सिझन असतो ना. आणि तुला माहितेय ना, मला जरा मनाला शांती मिळते तिकडे गेल्यावर. सगळे टेन्शन विसरायचे असतात मला निदान एक दिवस तरी.” अनिताचा पुन्हा समजावणीचा स्वर. तिच्याकडे रोखून बघत मनाली म्हणाली, “ohh really?? टेन्शन विसरायला जातेस? की  सिद्धार्थला विसरायला?” तिच्या या प्रश्नाने अनिता गडबडली. तरी पण चेहऱ्यावर काही न कळल्याचा भाव आणत म्हणाली, “काय? कोण? कोण सिद्धार्थ? मी… मी नाही ओळखत कोणी सिद्धार्थला.” पण हे बोलताना तिने नजर दुसरीकडे फिरवली. “कोण सिद्धार्थ? तोच ज्याचा DP चेक करत होतीस.” मनाली शांतपणे म्हणाली. “प्लिज यार मनू, Stop spying on me.” अनिता चिडलेल्या स्वरात म्हणाली. “I am not spying, I never did that in my life. तुला माहित आहे मला त्याची गरज नाही कारण तू माझ्यापासून काहीच लपवणार नाहीस हे माहित आहे मला.” मनाली त्याच शांत स्वरात म्हणाली. “त्याचा DP ओपन केलेला होता आणि तू चुकून फोन लॉक न करता तसाच इकडे टाकून गेलीस. सहज माझं लक्ष गेलं तेव्हा बघितलं.” अनिता गप्प होती. “आता आज काय विशेष म्हणून पुन्हा याचं तोंड बघावंसं वाटलं? आज तुमच्या कोणत्या भांडणाची anniversary आहे का?” अनिता अजूनही गप्पच होती.

 काही क्षण असेच गेले. थोड्या वेळाने मनालीने बोलायला सुरुवात केली. “हेच कारण आहे का मुलांना नकार देण्याचं? कधी कोणाचा जॉब interesting वाटत नाही तर कधी कोणाच्या अपेक्षा अवास्तव वाटतात तर कधी पूर्ण profile न बघताच फक्त फोटो बघून नकार देतेस म्हणे.” “अच्छा म्हणजे या सगळ्या चहाड्या करून झाल्या आहेत का? वाटलंच होतं मला. आईला कोणी ना कोणी लागतंच ना माझ्या लग्नाच्या गोष्टी सांगण्यासाठी. आणि तू तर हक्काचं गिऱ्हाईक आहेस ना तिचं.” आता अनिताचा आवाज चढला होता. तिच्या खांद्यावर हात ठेवत मनाली म्हणाली, ” chill… relax. त्या तरी कोणाजवळ बोलणार हे सगळं. आणि तुझंही चुकतंय असं नाही का वाटत तुला? ही काही कारणं झाली का नकार द्यायची? आणि द्यायचाच आहे तर त्याला भेटून, त्याच्याशी बोलून, मग दे ना. एखाद्याला न भेटताच नुसती profile वाचून कसं कळेल की तो माणूस म्हणून कसा आहे? profile मध्ये लिहिलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही ना. हवं तर मी येईन तुझ्या सोबत. पण त्याआधी मला हे सांग, की तुला नक्की लग्न करायचं आहे ना? कारण जर तूच मनापासून तयार नसशील तर या सगळ्याचा काहीच उपयोग नाही.” “तसं नाही गं.” अनिता म्हणाली. “करायचं नाही असं नाही. पण… तुला माहित आहे ना, मला हे arranged marriage नाही समजत गं. म्हणजे मला पटतच नाही. असं एखाद्या अनोळखी व्यक्तीला एक दोन वेळा भेटून लगेच लग्न कसं करणार गं? एवढ्या कमी वेळात आयुष्याचा इतका मोठा निर्णय कसा घ्यायचा? आपण आपले friends निवडताना पण किती विचार करतो, आणि ज्याच्यासोबत अख्खं आयुष्य घालवायचं त्याची निवड इतकी पटकन कशी करायची? नाही …. हे arranged marriage मला नाही जमणार, it’s not my cup of tea.”

मनाली काही बोलणार एवढ्यात अनिताची आई आत आली. “अगं अनु, तुला सांगायचं राहिलं, त्या स्वप्निलला तुला एकदा भेटायचंय. तर उद्या जमेल ना तुला? म्हणजे मी त्यांना तसं कळवते. आणि एखादा ड्रेस घालून जा हां” आई एका दमात बोलतच होती. “आई आई… जरा हळू. जरा शांतपणे मला कळेल असं सांगशील का? कोण स्वप्निल?” “अगं ते पवार नाही का, अगं राजेश मामाचे मित्र. त्यांचा मुलगा स्वप्निल.” आई म्हणाली. “म्हणजे अजून एक नवीन स्थळ. Ohh god” सुस्कारा सोडत अनिता म्हणाली. “आई मी परवा ट्रेकला जातेय त्यामुळे मला उद्या आराम करायचा आहे. मी कोणाला भेटणार नाहीये.” “अगं पण…” आई काहीतरी बोलत होती पण तिला मध्येच तोडत अनिता म्हणाली “आई please, मला यावर कसलच discussion नको आहे. आणि तू please हे स्थळ आणणं बंद कर बघू. I am not interested.” आणि मग मनालीकडे वळून म्हणाली “हे सुद्धा एक कारण आहेच ट्रेकला जाण्याचं. या कटकटी पासून पण सुटका होते माझी.” आणि रागाने खाोलीतून बाहेर गेली. आई भांबावून बघत होती. मनालीने त्यांना नजरेनेच शांत राहायची खूण केली.

रात्री बिछान्यावर पडलेले असताना मनाली शांतपणे अनिताला म्हणाली, “अनु, तू मघाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ का?” अनिताने प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिलं. “ते गं… arranged marriage नाही जमणार आणि माणसाला कसं ओळखायचं वगैरे.” मनाली म्हणाली. “कसं आहे ना अनु, माणूस पूर्णपणे ओळखता नाहीच येत एका भेटीत. पण ते महत्वाचं नसतं. महत्वाचं हे असतं की कोणत्या माणसाला पूर्णपणे ओळखायला, जाणून घ्यायला मला आवडेल हे ठरवणं.” अनिता गोंधळून तिच्याकडे बघत होती. “अगं म्हणजे पहिल्या भेटीत सगळं नाहीच कळत पण थोडीफार कल्पना येतेच की हा माणूस कसा आहे. आणि मला त्याला पुन्हा भेटायला आवडेल की नाही, एवढं तर ठरवूच  शकतो आपण. मी जेव्हा केदारला पहिल्यांदा भेटले ना, तेव्हा मी काही लगेच त्याच्या प्रेमात वगैरे नाही पडले किंवा तो खूप चांगला किंवा खूप वाईट आहे असंही काही मला कळलं नाही. पण… पण एवढं नक्की वाटलं की याला नकार देण्यासारखं काही नाहीये. अजून थोडं थांबूया. मला त्याला पुन्हा भेटावसं वाटलं. त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यावंसं वाटलं.” अनिता अजूनही काहीशी गोंधळलेलीच होती. “तुला नक्की काय म्हणायचंय ना मला अजून कळत नाहीये.” अनिता म्हणाली. “अगं म्हणजे तुझं तुलाच कळेल. मला असं नीट सांगता येत नाहीये पण ते कळतं. Intuition, inner feeling or gut feeling येतं. हा…. तुझं तुलाच click होईल ते. आणि मग तुला वाटेल, हाच तो. मला याच्यासोबतच सगळं आयुष्य घालवायचंय.” मनालीचे डोळे आनंदाने चमकत होते. पुन्हा अनिताचा प्रश्न, “असं click होतं का?” “हो हो नक्की होईल.” मनाली ठामपणे म्हणाली. “पण त्यासाठी आधी तुला तुझा past पूर्ण विसरून पुसून टाकावा लागेल.” आणि तिने अर्थपूर्ण नजरेने रोखून अनिताकडे बघितलं. “तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते. जोपर्यंत  जुन्या आठवणींना कवटाळून बसशील तोपर्यंत तुझ्याकडे नवीन काही कसं येईल. साधी गोष्ट आहे, जर एखाद्या पिशवीत किंवा भांड्यात काही वस्तू ठेवायची असेल तर ते भांडं रिकामं हवं ना. त्यात आधीपासूनच काहीतरी ठासून भरलं असेल तर नवीन वस्तू त्यात कशी ठेवता येईल? तसंच आहे. जुनं सगळं मनातून काढून टाक, मनाची पाटी पूर्ण कोरी कर, एका नवीन सुरुवातीसाठी. मग बघ सगळं छान होईल आणि मग तुला ‘click’ पण होईल.” डोळे मिचकावत मनाली म्हणाली. “हं… कळलं.” अनिताने होकारार्थी मान हलवली. “चल झोपूया आता. उशीर झालाय खूप.” मनाली म्हणाली आणि तिने dim light बंद केला. अंगावर पांघरूण ओढून तिने डोळे मिटले. 

अनिता मात्र जागीच होती. मनालीचे शब्द तिच्या मनात घुमत होते “तुझं तुलाच click होईल.” आणि विचार करता करता अचानक तिला काय वाटलं कोण जाणे. तिने हात लांब करून डोक्याजवळ ठेवलेला फोन घेतला. contacts मध्ये जाऊन सिद्धार्थचा नंबर काढला. Delete option वर टॅप केलं. ‘Are you sure you want to delete this contact?’ dialog box आला. क्षणभर ती तिथेच रेंगाळली. पण दुसऱ्याच क्षणी तिने yes वर टॅप केलं. काही क्षण तशीच फोनकडे बघत राहिली. मग तिने पुन्हा तो डोक्याजवळ ठेवून दिला आणि पांघरूण अंगावर ओढून डोळे मिटले. 

—————————————————————————————————————————————–

अनिता आणि तिची मैत्रीण साक्षी, पाठीवर बॅग घेऊन चालत होत्या. दगड, खडक मध्येच हिरवळ मध्येच चिखल. आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे हिरवंगार दिसत होतं. फक्त हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा दिसत होत्या. “अनु ते बघ किती छान फूल आहे.” साक्षीने अनिताचं लक्ष वेधून घेतलं. “ए हो गं, खरंच खूप सुंदर आहे. काहीतरी वेगळीच जात आहे वाटतं.” विस्फारलेल्या डोळ्यांनी तिकडे पाहत अनिता म्हणाली. “थांब जवळ जाऊन बघते आणि फोटो पण काढते.” असं म्हणून अनिता त्या फुलाजवळ गेली आणि तेवढ्यात आवाज आला. “one sec, wait wait… ohh shitt.” दचकून अनिता इकडे तिकडे बघायला लागली. मागच्या बाजूला एकजण गुडघ्यांवर बसून DSLR कॅमेरा चेहऱ्यासमोर धरून बसलेला. अनिताने त्याच्याकडे बघितल्यावर कॅमेऱ्या मागून त्याने डोकं वर केलं आणि उभा राहिला. उंच, मध्यम बांधा, गव्हाळ रंगाचा पण दिसायला smart, डोक्यावर कॅप आणि गळ्यात DSLR. त्याच्याकडे बघितल्यावर अनिताच्या लक्षात आलं की तो फोटो काढत असताना आपण मधेच आलो. पटकन बाजूला होत ती म्हणाली, “ohh… I am so sorry. माझं लक्षच नव्हतं तू फोटो कढतोयस तिकडे. काढ काढ.” हसतमुख चेहऱ्याने तो म्हणाला, “no its ok. not an issue. तू काढून घे तुझे फोटो. मग मी काढेन.” “हो पण तू छान angle घेऊन काढत होतास ना, मध्येच मी आले आणि बिघडला.” अनिता खजील स्वरात म्हणाली. “हाहाहा.” मोठ्याने हसतं तो म्हणाला, “चालतं गं. एवढं काय त्यात. तसंही पहिल्याच click मध्ये चांगला फोटो कधीच येत नाही. ४-५ wrong clicks नंतर एखादा ‘perfect click’ होतो. आम्हा फोटोग्राफेर्सना सवय असते त्याची. Don’t worry, you carry on.” अनिता लगेच फोटो काढण्यासाठी पुढे सरसावली. पण साक्षीने काढलेल्या 2-3 clicks नंतरही तिला हवा तसा फोटो काही येइना.

“काय गं तू… एक फोटो पण नीट काढता येत नाही तुला” अनिता वैतागून म्हणाली
“मी नीटच काढलेत पण तुला नाही आवडत तर मी काय करु? आणि एकदम एवढे perfect हवे होते तर मघाच्या त्या फोटोग्राफरला सांगायचंस ना”
“अरेच्या… हो गं. हे लक्षातच नाही आलं माझ्या” असं म्हणून अनिता आजुबाजुला बघायला लागली. पण तो कुठेच दिसत नव्हता. “तो गेला कधीच पुढे. तुझे सगळे नखरे होइपर्यंत कोणी थांबणार आहे का?” साक्षी तिला चिडवत म्हणाली. “तू गप गं. अरे यार… त्याचं नाव पण विचारायचं राहिलं” हताश स्वरात अनिता म्हणाली. “Relax….आपल्याच group सोबत आलाय तो, दिवसभर असणार आपल्याच सोबत. भेटेल थोड्या वेळाने. नाहीतर वर पोचल्यावर तर भेटेलच. तेंव्हा घे हवे तेवढे फोटो काढुन. चल आता. साक्षी तिला जवळजवळ ओढत म्हणाली.

सगळे वर पोचले तेव्हा हलका पाऊस सुरू झाला होता. पण त्याहीपेक्षा जास्त वारा सुटला होता. आजुबाजुला दाट धुकं पसरलं होतं. ढग अंगावरून गुदगुल्या करत पुढे चालले होते. गडाच्या माथ्यावरून खाली दिसणारं हिरवगारं दृश्यं धुक्यात हरवून गेलं होतं. एखाद्या हिरव्या रंगाने रंगवलेल्या चित्रावर मध्ये मध्ये पांढरे फटकारे ओढावे तसं दिसत होतं. अनिता हे सगळं बघत शांतपणे एका बाजूला उभी होती. ‘किती शांत, प्रसन्न वाटतय. कसलेही विचार नाही, टेन्शन नाही, फक्त शांतता. ही खरी मनःशांती. ना भूतकाळाच्या आठवणी ना भविष्याची चिंता. Ultimate peace of mind. कधी कधी वाटतं इथेच राहावं, परत जाऊच नये माणसांच्या जगात. इथेच … निसर्गाच्या कुशीत राहावं. तंबू ठोकून. पण खरंच राहू शकू का आपण इथे? विशेषतः रात्री.’ आणि मग आपल्या या विचाराने तिलाच हसू आलं. गालातल्या गालात हसत ती वळली आणि बघते तर तोच… मघाचा मुलगा कॅमेरा तिच्याकडे रोखून उभा होता. “Ohh….sorry मी पुन्हा तुझ्या फोटोच्या मध्ये आले का.” असं म्हणून ती बाजूला होणार एवढ्यात तो म्हणाला “नाही नाही हलू नकोस अजिबात, तिथेच थांब.” ती जागच्या जागी उभी राहिली. “perfect” असं म्हणून त्याने कॅमेरा डोळ्यासमोरून बाजूला केला. “मागे हिरवळ, धुकं आणि तू तिकडे बघत होतीस. छान moment होती. एकदम natural. म्हणून पटकन capture केली.” मघासारखाच प्रसन्न हसत तो म्हणाला. “Ohh.. ok.” ती मंद हसत म्हणाली. “Whatsapp group वर टाक नंतर किंवा facebook वर tag कर.” “हो हो नक्कीच.” तो म्हणाला आणि पुन्हा कॅमेऱ्याची lens adjust करण्यात गुंतला.

एकदम आठवल्यासारखं अनिता म्हणाली, “अरे हो.. मघाशी तुझं नाव विचारायचं राहिलं.”
“आदित्य”.
“Ok. Actually introduction round मध्ये सगळेच नाव सांगतात ना त्यामुळे लक्षात नाही राहात. sorry हा.” अनिता म्हणाली.
“हाहाहा…never mind. होतं असं” तो पुन्हा तसाच प्रसन्न हसत म्हणाला. “मला पण लक्षात नाहीये तुझं नाव.”
“I am Anita.” ती पण हसून म्हणाली. “OK” तो स्मित करून म्हणाला. “By the way, तू इथे अशी का उभी? I mean सगळे selfie घेण्यात busy आहेत. किंवा ते नाही तर खालच्या view चे फोटो घेतायत. तूच एकटी odd man out वाटतेस इथे.” असं म्हणून हसला. “sorry, just kidding. Dont mind”. 

“No no, not at all. त्यात काय sorry.” ती म्हणाली. “selfie घेण्यात मला खरंच काही interest नाही. view चे फोटो घेतले मी थोडे. पण सगळा वेळ जर फोटोच घेत बसले तर प्रत्यक्ष कधी बघणार ना?” ती हसत म्हणाली. “म्हणजे?” त्याने आश्चर्याने विचारलं. “अरे म्हणजे, फोटो वगैरे ठीक आहे. पण काही गोष्टी या डोळ्यात साठवून घ्यायच्या असतात असं मला वाटतं. काय माहीत पुन्हा इथे कधी यायला मिळेल, मिळेल की नाही? हा असा निसर्ग पुन्हा बघायला मिळेल की नाही. आता chance मिळालाय तर बघून घेउया, त्याचा आनंद घेउया ना. फोटो काय google वर पण मिळतात गडाचं नाव टाकल्यावर, ते पण सगळ्या angles नी काढलेले. मी काय असे मोठे वेगळे काढणार आहे? मी माझ्या साध्या फोनमधून काढणार, माझ्याकडे काही तुम्हा लोकांसारखा DSLR नाही. हा.. एक आठवण म्हणून काढले थोडे. बस्स झालं. त्यापेक्षा हा निसर्ग डोळे भरून बघुन घेऊया, हा वारा हा पाऊस, हे सगळं वातावरण, हे सगळं Feel करूया, अनुभवुया. त्याचा आनंद घेऊया. असं मला वाटतं. in short, फोन मध्ये capture करण्यापेक्षा मनात capture करूया.” असं म्हणून पुन्हा मान वळवून ती समोरच्या view कडे बघण्यात दंग झाली. 

आदित्य मात्र तिच्याकडेच बघत होता, एकटक. कसली तरी तंद्री लागल्यासारखा. २ मिनिटांनी त्याचं त्यालाच कळलं, तेंव्हा तो भानावर आला. त्याला थोडं ओशाळल्या सारखं झालं,पण त्याने बघितलं तर तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती अजूनही समोरचा निसर्ग बघण्यातच गुंगली होती. मग त्याला जरा बरं वाटलं. “Yeahh….thats right. Nice thought. I agree with it.” असं म्हणून त्याने आपल्या कॅमेऱ्याची lens रूमालाने पुसली आणि दुसऱ्या दिशेला कॅमेरा वळवला. १-२ click केले आणि मग त्याला काय वाटलं कोण जाणे. कॅमेरा बाजूला करून तो नुसताच समोर बघत राहिला, त्याच्याही नकळत मग त्याने दोन्ही हात उघडले, एखाद्याला मिठीत घेण्यासाठी उघडावे तसे. आणि त्याच्या चेहऱ्यावर आपोआप एक सुखद स्मित उमटले.  दरीतून वर येणारा वारा, जणू आपल्याला मिठी मारतोय असं वाटलं. कोणीतरी अलगद उचलून आपल्याला वर नेतय असं वाटत होतं, जणू हवेत तरंगतोय असं वाटलं. खूपच सुंदर अनुभव होता तो. त्यात हरवून तो डोळे मिटणार एवढ्यात “ओ साहेब, बस्स झाली फिल्मी pose.” दचकून त्याने मागे बघितलं. त्याचा मित्र सुमित उभा होता. “काय रे, फोटो काढायला मागे कोणीच उभा नाहीये मग कोणाला pose देतोयस? तू ज्याला काढायला सांगितलं होतंस तो मागच्या मागे पळून गेला की काय?” सुमित हसत हसत म्हणाला. “नाही, फोटोसाठी नाही. मी असाच उभा होतो.” आदित्य म्हणाला. “ऑं… असाच? कशाला?” सुमितने विचारलं. “काही नाही, असंच.” आदित्य गालातल्या गालात हसत म्हणाला. “बरं ते जाऊदे, पाऊस नाहीये तोपर्यंत जेवून घेउया. पुन्हा उतरायला उशीर नको.” सुमित म्हणाला. “हो…. चल.” असं म्हणून आदित्य निघाला पण त्याची नजर सगळीकडे भिरभिरत होती. आणि ती दिसली. अनिता. साक्षी बरोबर डबा खात. वाऱ्यामुळे तिच्या केसाची एक बट तिच्या डाव्या डोळ्यावर सारखी येत होती. त्याने पटकन कॅमेऱ्याची lens adjust केली. तेवढ्यात त्यांच्यात काहीतरी विनोद झाला असावा, ती खळखळून हसायला लागली. हसता हसता किंचित पुढे झुकली आणि तिच्या केसाची बट डोळ्यावरून खाली गालावर आली. ‘Click’. आदित्यने कॅमेर्याचं बटन दाबलं. ‘Perfect click’, तो हळूच स्वतःशीच पुटपुटला. दुसरा फोटो घेण्यासाठी तो lens adjust करणार एवढ्यात त्याला काय वाटलं कोण जाणे, त्याने कॅमेरा बंद केला आणि तो एकटक बघायला लागला. ‘काही गोष्टी मनात capture करायच्या असतात. खरं आहे.’ तो मनात म्हणाला आणि स्वतःशीच हसला.

डबे खाऊन, फोटो घेउन झाल्यावर सगळे उतरायला लागले. मध्येच एक कठीण patch आला. त्यात नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे निसरडं झालं होतं. नक्की कुठुन कसा पाय टाकावा या विचारात अनिता होती. तेवढ्यात मागून आदित्यचा आवाज आला. “थांब, मी जातो पुढे मग हात देतो.” असं म्हणून तो अगदी सराईतपणे तिथून पुढे गेला. “हं… आता इथे पाय ठेव, मग इथे” त्याच्या सूचनेप्रमाणे अनिता एक एक पाउल ठेवत होती. “हं… आता हात दे” आदित्यचा हात धरुन तिने हळूहळू तो patch ओलांडला. “Thanks” ती हसून म्हणाली. “तू या group सोबत पहिल्यांदाच आलायस का?”
“नाही, आधी पण एका ट्रेकला आलो होतो. Garbet point”.
“Ohhh…. मी तो miss केला होता. पण बाकी कोणते नाही केलेस ना या group बरोबर?”
“नाही… तोच एक”
“हं…वाटलंच मला. कारण मी नेहमी यांच्या सोबतच करते ट्रेक. तुला पहिल्यांदाच बघतेय ना या group मध्ये आज.”
“हं… यांच्यासोबत दोनच केलेत पण तसे overall खूप केलेत मी”
“हो ते कळलं मघाशी. तू तो patch जसा cross केलास त्यावरून, u must be regular trekker.”
अशाच गप्पा चालू होत्या.
“तू पण professional photographer आहेस का?” अनिताचा प्रश्न. “Not really. I am MBA in finance and working in logitech services.  पण photography माझं passion आहे. सध्या तरी wedding shoot हे part time income आहे. पण खरं तर मला तेच full time करायचं आहे. त्यात अजून थोडा जम बसला की job सोडुन तेच करायचा विचार आहे.” “Thats nice”. अनिता म्हणाली. “All the best”. “thanx” आदित्यने मंद स्मित केलं. “By the way, तू काय करतेस?” आदित्यचा प्रश्न. “Software engineer in BNP Paribas “. तिने उत्तर दिले. “Ohh…. thats great.” आदित्य म्हणाला. “Great काही नाही त्यात.” अनिता हसून म्हणाली. “आमचा त्रास आम्हाला माहिती.” “हो…. ते तर झालंच. त्रास तर प्रत्येक job मध्ये असतोच.” गप्पा चालू होत्या. मध्येच एखाद्या चांगल्या जागी आल्यावर अनिता pose देत होती आणि साक्षी सोबत आदित्यही click करत होता, तिने त्याला फोटो काढायला सांगितलं नसूनही. तशी अनिता काही फार सुंदर, देखणी वगैरे नव्हती. सावळा रंग पण नाकी डोळी नीटस होती. पण तरीही तिचा चेहरा काही photogenic वगैरे नक्कीच नव्हता. आणि हे आदित्यला पण कळलं होतं. पण का कोण जाणे त्याला तिची प्रत्येक pose capture कराविशी वाटत होती.

आदित्य बिछान्यावर पडला होता. शरीराला थकवा जाणवत होता पण तरीही झोप काही येत नव्हती. त्याने mobile हातात घेतला आणि whatsapp वरचा आजच्या ट्रेकचा ग्रुप उघडला. ‘अरे…. एवढी बडबड केली पण तिचा नंबर घेतलाच नाही. आता 42 लोकांमधून नेमकं हिला कसं शोधणार? श्या:.’ त्याला स्वतःचा राग आला. ‘बघू…. उद्या सकाळी करूया काहीतरी.’ अशी स्वतःच्या मनाची समजूत काढून त्याने mobile बाजूला ठेवला आणि डोळे मिटले. मिटल्या मिटल्या त्याला दिसलं, हिरवागार डोंगर, आजूबाजूला सगळीकडे हिरवळ आणि धुकं. मध्येच धुक्याचा एक थर विरळ झाला आणि त्यातून एक चेहरा दिसला… अनिताचा. केसाची एक बट कपाळावरून उजव्या गालावर आली होती. तिला मागे सारत ती हसली. प्रसन्न, प्रफुल्लित. अर्धवट झोपेत आदित्यच्या चेहऱ्यावर एक हलकं स्मित उमटलं

—————————————————————————————————————————————–

दुसऱ्या दिवशी whatsapp वर trek group वर messages चा पाऊस पडत होता. सगळे कालच्या ट्रेकला किती मजा आली काय गमती झाल्या ते बोलत होते. फोटो share करत होते. आणि त्यात अचानक अनिताला एक नवीन message आला, unknown नंबर वरुन. तिने तो open केला. “Hi, Aditya here. Hope u remember.”
अनिता : “Ohh…. yes of course.”
पुढे काही बोलणार एवढ्यात पटापट messages यायला लागले. message नव्हते ते, फोटो होते. तिचे, वेगवेगळ्या background मधले, वेगवेगळ्या pose मधले. एकापेक्षा एक सुंदर, natural, candid. ती थक्क होउन बघत होती.

ती: “Omg….. these r sooo nice. Thanx… thanx a lott.
तो: welcome 🙂 हे तुझे solo pics होते म्हणून group वर नाही टाकले. मला वाटलं तुला personally ping करुन दिलेलं जास्त चांगलं
ती: yes yes. Thats correct. Thanx. पण एवढे सगळे फोटो तू कधी काढलेस? I m surprised!!!
तो: हाहाहा…. तू pose देत होतीस तेंव्हाच.
ती: हो पण तेंव्हा मी साक्षीला काढायला सांगितले होते. आणि तरीही मी एवढ्या pose नव्हत्या दिल्या.
तो: हं…. पण सगळे फोटो pose देऊनच काढायला हवेत असं कुठं आहे? Some of them are jst natural pics. Random clicks.
ती: random clicks म्हणून 4-5 फोटो ठीक आहेत. 27 फोटो कोणी randomly काढतं का? तेही एकाच व्यक्तीचे?
ती: हाहाहा….. असं काही ठरवून किंवा मोजून नाही काढले. एखादी चांगली moment दिसली की मी लगेच capture करतो. i mean सगळेच photographers करतात.
ती: अच्छा ….. okkk
तो: बाकीच्या लोकांचे पण काढलेत solo. ते पण त्यांचे त्यांना दिले. On personal chat
ती: हं…… okk. Anyways…. thanx for these pics haa. They r really vry nice.
तो: My pleasure 

अजून थोडा वेळ अशाच ट्रेक च्या गप्पा झाल्यावर ते चॅट तिथेच थांबले. पण खरं काय ते आदित्यलाच माहित होतं. त्याने बाकी कोणाचेही solo pics काढले नव्हते, फक्त अनिताचे काढले होते. म्हणजे त्याला बाकी कोणाचे काढायचे नव्हते असं काही नाही. wedding shoot करत असल्यामुळे त्याला माणसांचे, त्यांच्या चेहऱ्यांचे उत्तम फोटो काढता येत होते आणि इतर वेळी प्रत्येक ट्रेकला तो सोबतच्या लोकांचे फोटो काढायचाच थोडेफार. पण याच वेळी त्याने बाकी कोणाचेही फोटो काढले नव्हते, म्हणजे काढले होते पण ग्रुप फोटो, तेही मोजकेच. बाकी सगळे अनिताचे. आणि असं का ते त्याचं त्यालाही कळलं नव्हतं. लॅपटॉप उघडून तो सगळे फोटो बघत बसला होता. पहिल्यांदाच त्याला निसर्गाच्या फोटोंपेक्षा व्यक्तीचे फोटो जास्त निरखून बघावेसे वाटत होते आणि तेही एकाच व्यक्तीचे. काहीतरी वेगळं होतं तिच्या डोळ्यांत….. जे दिसत होतं त्यापेक्षा अजून काहीतरी. ते काहीतरी सांगत होते, बोलत होते पण नक्की काय ते त्याला कळत नव्हतं. 

—————————————————————————————————————————————–

त्यानंतर तिच्या संपर्कात राहण्याचा आदित्यचा प्रयत्न चालूच होता. Good morning, good night, कधी jokes, कधी forwards असं काहीतरी पाठवणं चालू होतं. अनिता पण बोलायची, पण जास्त नाही, जेवढ्यास तेवढं. तिलाही कळत होतं की आदित्य इतरांपेक्षा जरा जास्तच बोलत होता तिच्याशी. एका ओळखीत जरा जास्तच जवळ येण्याचा प्रयत्न करत होता हे तिला चांगलं समजत होतं. पण तरीही तिला त्याचा राग येत नव्हता. त्याला टाळावंसं वाटत नव्हतं. एरव्ही विनाकारण जवळीक साधणाऱ्या मुलांना, flirt करणाऱ्या मुलांना भाव देणे तर सोडाच, पण त्यांना कडक शब्दात त्यांची जागा दाखवून देऊन, कायमची त्यांची तोंडं बंद करणारी अनिता, आदित्यच्या बाबतीत मात्र ती काहीच का करत नव्हती हे तिचं तिलाही कळत नव्हतं. तो खरं तर सरळसरळ flirt करत नव्हता, आडून आडून करायचा, छुप्या रीतीने. त्यामुळे त्याला ओरडताही येत नव्हतं. एखाद्या मित्रासारखाच बोलायचा पण खरं तर इतका जवळचा मित्रही नव्हता. त्याला टाळणं सहज शक्य होतं पण तरीही टाळावंसं वाटत नव्हतं. एका दिवसाच्या ओळखीवर सुरु झालेल्या chatting मध्ये त्यांनी एकमेकांबद्दल बरंच काही share केलं होतं. ऑफिसच्या वेळा, ऑफिसमधून घरी आल्यानंतर कसा वेळ घालवला, काय जेवले, tv वर काय बघितलं आणि असंच रोजच्या आयुष्यातलं काही काही. 

२ आठवडे गेले. आणि एक दिवस आदित्यचा मेसेज आला.
तो: Hey या रविवारी कलावंतीण दुर्ग येणार आहेस ना?
ती: अं… नाही मला जरा काम आहे नाही जमणार. 😦
तो: ohhh…. आॅफिस आहे का?
ती: नाही… दुसरं काम आहे
तो: अच्छा….. बघ जमलं तर. खूप छान ट्रेक आहे. Every trekker must do it once in life
ती: yaaa i knw. पण काय करू खरंच नाही जमणार. बघू….. पुन्हा कधी 🙂
तो: hmmm…. ठीक आहे
ती: तू जातो आहेस ना? मस्त फोटो काढ आणि मला दाखव आणि सांग सगळी मजा
तो: अं… actually माझं पण काही नक्की नाही. बघू…
ती: आँ…. आत्ताच तर म्हणालास तू जाणार आहेस म्हणून
तो: अं….. हो म्हणजे जायचा विचार आहे पण मला पण एक काम आहे. त्यामुळे जमेल की नाही माहित नाही. बघू
ती: Ok.. 🙂 गेलास तर pics send कर
तो: हो हो नक्की 🙂

—————————————————————————————————————————————–

अनिताचे पाय तालावर बरोबर पडत होते. गाण्याच्या ठेक्यावर घुंगरू थिरकत होते. गाण्याच्या प्रत्येक ओळीला चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. ती भान हरपून नाचत होती. प्रेक्षकही मंत्रमुग्ध झाले होते. Performance संपला आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनिताने प्रसन्न चेहऱ्याने सगळ्यांना वाकून अभिवादन केलं आणि स्टेजवरून उतरून खाली आली. “छान झालं…Very good… बहुत अच्छा किया” अशा सगळ्या मैत्रिणींच्या comments ऐकत, त्यांना thanks म्हणत अनिता आपल्या जागेवर येउन बसली. रूमालाने चेहऱ्यावरचा घाम पुसत पुढचा performance बघणार एवढ्यात आवाज आला, “Superb Dance… Awsome yaar…too good” तिने मागे वळून पाहिलं तर समोर आदित्य. “तू?” ती दोन्ही डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. “तू इथे कसा?” “हाच प्रश्न मी तुला विचारू शकतो, तू इथे कशी?” खुर्चीवर बसत आदित्य म्हणाला.
“कशी म्हणजे? मी participate केलंय, बघितलास ना माझा performance”
“हो बघितला पण आणि आवडला पण. It was awesome सांगितलं ना तुला. But it was unexpected…. i mean मला माहित नव्हतं तू dance करतेस आणि तोही इतका सुंदर. म्हणजे तू बोलली नाहीस कधी एवढ्या दिवसात.”
“हं…. नाही बोलले.”
“का?…. म्हणजे….
“नाही…. काही खास असं नाही. म्हणजे लक्षात नाही आलं तुला सांगायचं. i mean…. आपली काही दिवसापूर्वीच ओळख झाली ना.”
“अं…. हो पण…. तरी आपण बरंच बोलतो ना रोज….i mean i thought we r good friends”
“No….. not really”
“Means???”
“अं….काही नाही” 
“काय?? बोल ना”
“काही नाही रे… तू नाही सांगितलंस तू इथे कसा?”
“माझ्या एका मित्राची बायको पण participate करतेय, so he called me up to shoot it. show चे व्हिडीओग्राफर्स कधी कधी नीट शूट करत नाहीत म्हणे आणि ते वेळेवर मिळतही नाही. खूप दिवस लागतात. म्हणून मला बोलावलं. 

“अच्छा….. हं. good” 

“By the way…. तू खूपच सुंदर dance करतेस. मी फॅन झालोय तुझा.”

“Thank you so much.”अनिता हसून म्हणाली. “But still… there is a long way to go. मी गेल्या २ वर्षांपासून शिकतेय क्लासिकल डान्स. अजून खूप शिकायचं आहे. At present I am just a kid.”

“हं …. ते तुझ्यासाठी. पण माझ्या दृष्टीने हे पण खूप आहे. माझ्या म्हणजे माझ्यासारख्या डान्स शी काही संबंध नसलेल्या लोकांच्या दृष्टीने.”

हाहाहाहा….. अनिता मोठ्याने हसली. 

“अच्छा म्हणजे ट्रेकला न येण्याचं हे कारण होतं का?” त्याने विचारलं. “हो… म्हणजे प्रॅक्टिस बाकी होती ना. मधल्या दिवशी ऑफिसमुळे वेळ नाही मिळत जास्त. म्हणून वीकेंडलाच केली.” ती म्हणाली. “पण तू का नाही गेलास? गेला असतास तर मला pics बघायला मिळाले असते ना.” ती म्हणाली. 

“अं… मला जरा महत्वाचं काम होतं त्यामुळे नाही जमलं.” तो तिच्याकडे न बघताच म्हणाला. ती नव्हती म्हणून त्यालाही जावंस वाटलं नाही हे अर्थातच तो तिला सांगू शकत नव्हता, निदान आत्ता तरी नाही. 

“By the way….. u are  looking beautiful” आदित्य तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाला. अनिता क्षणभर स्तब्ध झाली, त्याच्या रोखलेल्या डोळ्यांकडे तीही बघत राहिली. पण दोनच क्षण. नंतर पुन्हा नजर हटवत हसून म्हणाली, “त्यात काय… मेकअप केल्यावर कोणीही सुंदरच दिसते. काढल्यावर बघ.” 

“नाही…. मेकअप मुळे नाही….” आदित्य अजूनही तिच्या डोळ्यांकडे बघत होता 

“मग?” अनिताने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं 

“नाही……काही नाही.” आदित्य स्टेजकडे बघत म्हणाला, “बाकीचे डान्स बघूया.” 

अनिताला तिसरं बक्षीस मिळालं. आदित्य इतक्या आनंदाने टाळ्या वाजवत होता की जणू काही त्याला स्वतःलाच बक्षीस मिळालं होतं. बक्षीस घेऊन अनिता पुन्हा जागेवर येऊन बसली. 

“Congrats.” आदित्यने शेकहॅण्डसाठी हात पुढे केला. “पण माझं मत विचारशील तर you deserve 1st prize. तुलाच मिळायला हवं होतं ते.” 

“प्लिज… काहीही बोलू नकोस. They deserve it. In fact मला तर हे बक्षीस पण मिळेल असं वाटलं नव्हतं. माझ्यापेक्षा कितीतरी चांगले चांगले परफॉर्मन्स झाले. I am glad की मला हे मिळालं. 

“Please… stop being too modest. तू नेहमीच अशी modest आणि एकदम down to earth असतेस का ग? की फक्त आज मला दाखवण्यापुरतं?” आदित्य डोळे मिचकावत म्हणाला 

“Excuse me….. what do you mean दाखवण्यापुरतं?” अनिता त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली. 

“हो मग काय. मघाशी काय ते  I am just a kid आणि अजून खूप शिकायचंय आणि आता पण माझ्यापेक्षा कितीतरी चांगले होते वगैरे. एवढं modest कोणी असतं का?”

“Hello…. मी काही मुद्दाम modest वगैरे होत नाहीये. मला मनापासून जे वाटलं ते मी बोलले. आणि तुला दाखवण्यासाठी तर मुळीच नाही. तू कोण एवढा मोठा लागून गेलास रे? आणि तसं तर मीही म्हणू शकते की तू सगळ्याच मुलींशी असा flirt करतोस की फक्त माझ्याशीच?”

“Excuse me….. Flirt?” आदित्य डोळे मोठे करत म्हणाला. 

“हो मग काय? मघाशी काय ते मी तुझा फॅन झालोय आणि मग खूप सुंदर दिसतेस आणि आता हे तुलाच मिळायला हवं होतं वगैरे, हे काय आहे?” अनिता अजूनही त्याच्याकडे रोखूनच बघत होती. 

“hello…. त्याला flirt नाही म्हणत, ती compliment होती. मनापासून जे वाटलं ते बोललो. तुला flirting वाटलं तर मी काय करू?” आदित्य खांदे उडवत म्हणाला. 

“हो ना… मग मी पण मनापासून जे वाटलं तेच बोलले. तू का तुझे तर्क लावतोयस?”

“Ok OK…. Let’s stop it. I am sorry बस्स?” आदित्य म्हणाला 

“You should be.” अनिता तोऱ्यात म्हणाली. 

तेवढ्यात कोणीतरी आदित्यला हाक मारली. “Hi… हा माझा मित्र अभिजित आणि त्याची wife श्रेया. मी मघाशी सांगितलं ना.” आदित्य अनिताकडे बघून म्हणाला. “ohh… hi.” अनिता तिच्याशी हात मिळवत म्हणाली. “खूपच छान झाला तुमचा डान्स.” “थँक यु.” श्रेया हसून म्हणाली, “तुम्ही पण खूपच छान केलात. आणि congrats for the prize.” “Thanks a lot.” अनिता म्हणाली. आणि मग त्यांच्या डान्स बद्दलच्या गप्पा सुरु झाल्या. आदित्य पण अभिजितशी बोलण्यात गुंतला. थोड्या वेळाने त्याने आजूबाजूला बघितलं तर बरीचशी गर्दी पांगली होती. अनिता कुठेच दिसत नव्हती. तो थोडासा अस्वस्थ झाला. ‘आज चांगला चान्स होता तिच्याशी गप्पा मारायचा, तिच्यासोबत वेळ घालवायचा. पण आपण घालवला. श्या…’ अशा विचारात असतानाच श्रेया आली. “चला निघूया का?” तिने अभिजितला विचारलं. “अगं… अनिता तुझ्याबरोबरच होती ना मघाशी. कुठे गेली?” आदित्यने अधीरपणे विचारलं. “नंतर तिला कोणीतरी तिची मैत्रीण भेटली वाटतं, तिच्याशी बोलत होती. नंतर कुठे गेली माहित नाही कारण मी चेंजिंग रूममध्ये गेले.” श्रेया म्हणाली. “कॉल करून विचार ना.” “अं… हो करतो.” असं म्हणून कॉल करायला त्याने फोन हातात घेतला तेवढ्यात लांबून अनिता येताना दिसली. मघाचा डान्सचा ड्रेस तिने बदलला होता, म्हणजे सगळंच बदललं होतं.  जीन्स त्यावर साधासा टी शर्ट, केसांचा पोनी, चेहऱ्यावरचा मेकअप काढलेला होता पण तरीही डोळ्यातलं काजळ पूर्ण निघालं नव्हतं. त्याची हलकीशी छटा अजूनही दिसत होती. “अरे ही बघ आलीच.” श्रेया म्हणाली. “बरं चल… आम्ही निघतोय. तुला सोडू का वाटेत? मी कार आणली आहे.” अभिजीतने आदित्यला विचारलं. “नाही नको, मला इथेच जरा दुसरं काम आहे.” आदित्य म्हणाला. “आणि तुला सोडू का?” श्रेयाने अनिताकडे बघत म्हटलं. “नाही नको …. thanks. मलाही इथे जवळचं जरा मैत्रिणीकडे जायचंय.” अनिता म्हणाली. “okk … fine. चला मग निघतो आम्ही. bye.” असं म्हणून ते दोघे निघाले. 

अनिता पण निघणार एवढ्यात आदित्य म्हणाला, “अं…. ऐक ना. आपण इथे जवळच कुठेतरी काही खायला जाऊया का? किंवा चहा कॉफी असं काही? Actually मला खूप भूक लागली आहे”

अनिताने त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघितलं. “अरे मग तू तुझ्या मित्रासोबतच का नाही गेलास? त्याने विचारलं ना तुला?”

“हो… पण नाही गेलो. जाऊ दे ना त्यांना दोघांना” तो म्हणाला. “का?” तिने मोठा आ वासून विचारलं. 

“अरे यार… सगळं explain करायलाच हवं का?” तो वैतागून म्हणाला. “त्यांचं आताच लग्न झालंय २ महिन्यांपूर्वी. त्यांचा दुसरा काही प्लॅन असेल, कुठे फिरायला किंवा डिनरला जायचं असेल तर ते माझ्यामुळे विस्कटायला नको. मी कशाला उगाच ‘कबाब मे हड्डी’ म्हणून जाऊ त्यांच्या मध्ये?” आणि मग तिच्याकडे बघत खोडकर हसत म्हणाला, “आपण दोघे जाऊया ना. तुला काही प्रॉब्लेम आहे का माझ्यासोबत यायला?” 

“काही प्रॉब्लेम नाहीये आणि इंटरेस्ट पण नाहीये. तू जा कुठे जायचं तिथे.” असं म्हणून ती चालायला लागली. 

“अगं थांब थांब.” तो तिच्या मागे येत म्हणाला. “मला या एरियामधलं काहीच माहित नाहीये. कुठे चांगलं हॉटेल आहे कुठे काय मिळतं I have no idea. निदान हॉटेल दाखव तरी. हे बरोबर नाही राव. तुमच्याकडे आलेल्या पाहुण्याला असं वागवता का तुम्ही? Very bad… very  bad.” तो मान हलवत म्हणाला. 

तिने त्याच्याकडे रागाने बघितलं. मग म्हणाली, “चल… दाखवते.”

“Thank you very much.” हॉटेलमध्ये शिरताना तो म्हणाला. “चल…. bye.” असं म्हणून त्याने हात पुढे केला. तिने बाय म्हटलं आणि तिथेच उभी राहिली. “तू जात नाहीयेस का?” त्याने विचारलं. तिने काहीच उत्तर दिल नाही, ती हॉटेलमध्ये सगळीकडे बघत होती. “Ohh….तू पण येतेस का? छान. चल मग.” तो हसून म्हणाला. “नाही.” ती म्हणाली. “तू जा बस. मी दुसरं टेबल शोधते.” 

“सध्या सगळी टेबलं फुल्ल आहेत. Except one.” तो एका टेबलाकडे हात दाखवत म्हणाला. “so… आपल्याला एकत्रच बसावं लागेल.” तो खोडकर हसत म्हणाला. “आणि एवढी काय रागावतेस. मघाशी चुकलं माझं, मी सॉरी म्हटलं ना. ठीक आहे सोड ना.” तो डोळे बारीक करत म्हणाला. “प्लीज.” 

ती फक्त त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसली. मग म्हणाली, “चल.. बसुया. नाहीतर ते टेबल पण जाईल.” 

—————————————————————————————————————————————–

“अजून काही घेणार का?” सँडविचचा शेवटचा घास घेत आदित्यने विचारलं

“नाही नाही. बस्स झालं.” अनिता म्हणाली. “तू मागव अजून काही हवं असेल तर.”

“No.. I am full.” पाण्याचा घोट घेता घेता आदित्य म्हणाला. “It’s a good restaurant. टेस्ट चांगली होती आणि रेट्स पण reasonable आहेत.”

“Yes… this is one of the best restaurants in this area.” अनिता म्हणाली. “आम्ही नेहमी इथेच येतो काही प्लॅन असला की.”

“हं …. good. आपण पण येऊया.” आदित्य म्हणाला आणि त्याला वाटलं आपण काही चुकीचं बोललोय कदाचित, मग लगेच म्हणाला, “I mean… पुन्हा कधी इकडे आलो तर मीही इथेच येईन असं म्हणायचं होतं मला.”

अनिता मोठ्याने हसली. “अरे chill. its ok. आपण येऊया पुन्हा. कधी या एरियात आलास तर भेटूच.” 

आदित्यने  खूष होऊन  स्मित केलं. “चला.. म्हणजे finally तुझा माझ्यावरचा राग गेला आणि मी flirt नाही हे तुला पटलं.” तो म्हणाला. 

“राग गेला.. पण तू flirt नाहीस असं कुठे म्हटलंय मी?” ती त्याच्याकडे बघत म्हणाली. “म्हणजे?” तो आश्चर्याने म्हणाला, “तुला का असं वाटतंय की मी flirt आहे?”

“का म्हणजे?” मघाशी माझी जी स्तुती चालवली होतीस, त्यावरून कळलं मला. म्हणे सुंदर आहेस खूप.” ती हसत म्हणाली

“हो मग, आहेसच तू सुंदर. खरंच बोललो मी.” तो गंभीरपणे म्हणाला. 

“हो हो… बोल हा तू काहीही बोल.” ती अजूनही हसतच होती. तेवढ्यात पटकन काहीतरी आठवल्यासारखं अनिता म्हणाली, “अरे हो मघाशी मेकअप केलेला चेहरा होता. आता बघ सगळा मेकअप काढल्यावर. आता सांग.” 

“नको… मी काही बोललो तर तुला पुन्हा वाटेल की मी flirt करतोय.” असं म्हणून आदित्य दूरवर बघायला लागला. “नाही अरे … तू खरं बोललास तर नाही वाटणार flirt. बोल तरी” अनिता म्हणाली. 

“ok मग ऐक.” आदित्य तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. “मी मघाशी जे म्हणालो तेच आताही म्हणेन. तू सुंदर दिसतेस आणि तू सुंदर आहेस. आणि ते मेकअप मुळे नाही.  मुळात काळा किंवा गोरा रंग, नाक, डोळे, ओठ या सर्वामुळे माणूस सुंदर दिसतं असं मला वाटत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सुंदर असले ना की तो आपोआप सुंदर दिसतो. आणि म्हणूनच प्रत्येक माणूसच मला सुंदर वाटतो कारण प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर काही ना काही भाव असतात आणि तेच त्याचं वेगळेपण असतं. तुझ्याही चेहऱ्यावर एक निरागसता आहे. तुझी smile खूप सुंदर आहे. ती निरागसता, ती smile मला सुंदर वाटते. आणि म्हणूनच तू सुंदर आहेस असं मला वाटतं. तुझे डोळे खूप बोलके आहेत, काहीतरी बोलतात ते, काहीतरी सांगतात. पण….” एवढं बोलून तो मध्येच थांबला

अनिता त्याच्याकडे बघतच होती. आश्चर्य, कुतूहल, अविश्वास आणि अशा बऱ्याच काही भावना एकाच वेळी तिच्या मनात आणि डोळ्यात दाटून आल्या होत्या. पण दुसऱ्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. “पण… पण काय?” तिने विचारलं. “पुढचे डायलॉग विसरलास वाटतं.” असं म्हणून ती हसायला लागली. “कसले डायलॉग?” त्याने गंभीरपणे विचारलं. “हेच तुझे फिल्मी डायलॉग.” ती म्हणाली. “कोणत्याही फिल्ममध्ये चांगले शोभतील. की आधीच कोणत्या फिल्ममधले आहेत आणि तू तेच पाठ करून आलायस?” तिने डोळे मिचकावत विचारलं. “प्लीज, काही डायलॉग नाही, मी खरं तेच सांगतोय.” तो अजूनही गंभीरच होता. “चल चल… माहित आहे. असे डायलॉग मारून तू बाकीच्या मुलींना इम्प्रेस करशील, मला नाही. कळलं?” असं म्हणून तिने त्याच्याकडे रोखून बघितलं.  तेवढ्यात वेटर बिल घेऊन आला आणि दोघांची तंद्री भंगली. आदित्यने खिशातून पाकीट काढलं. तो पैसे काढून ठेवणार एवढ्यात अनिताने पैसे त्याच्या हातात ठेवले. “हे काय?” त्याने विचारलं. “माझा हिस्सा.” ती म्हणाली. “म्हणजे?” त्याने विचारलं. 

“अरे म्हणजे तुझ्या सॅन्डविचचे पैसे तू दे, माझ्या डोश्याचे पैसे मी देते.” 

“नको नको कशाला? ठेव ते. मीच देतो.”

“नाही हा ….. असं अजिबात चालणार नाही. मला माझे पैसे देऊ देत.” अनिता ठाम स्वरात म्हणाली. 

“अग असं काय करतेस. Normally gents देतात बिल. विसरलीस का?”

“Hello…. gents काय gents? कुठल्या जगात आहेस?” आता मात्र अनिताचा आवाज चढला. “पूर्वी बायका फक्त घरकाम करायच्या तेव्हाचे नियम होते हे सगळे. आता मुली पण शिकतात आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून सगळी कामं करतात. त्यामुळे त्यांच्या खर्चाचा भार दुसऱ्या कोणी उचलायची गरज नाही. कळलं?. I am an independent girl. मी स्वतः कमावते त्यामुळे माझे खर्च सुद्धा मी स्वतः करू शकते ok? त्यामुळे माझ्या खाण्याचे पैसे मीच देणार.” अनिता एवढ्या मोठ्याने बोलत होती की आजूबाजूच्या २-३ टेबलावरचे लोक त्यांच्याकडे बघायला लागले. आदित्यला कसंतरीच झालं. तिला समजावत हळूच तो म्हणाला, “अगं हो हो…पण जरा हळू बोल. आजूबाजूचे लोक आपल्याकडेच बघतायत.” पण अनिता अजूनही चिडलेलीच होती. “बघू देत. I don’t care. आणि मी काही चुकीचं बोलत नाहीये. ” “हो पण जरा ऐकून घे…” आदित्यचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच ती म्हणाली, “नाही … तू हे पैसे घेतले नाहीस तर इथून पुढे मला कधीही contact करायचा नाही. मी निघते.” असं म्हणून ती उठणार एवढ्यात आदित्यने पटकन तिचा हात धरला, “थांब थांब… मी ऐकतो तुझं बस्स? खाली बस खाली बस.” आणि पटकन त्याला लक्षात आलं आणि त्याने हात सोडला. “sorry sorry.” तो म्हणाला.  ती खाली बसली.  त्याने तिच्याकडून पैसे घेतले आणि बिल दिलं. “तू शांत हो… relax.” त्याचं तिला समजावणं चालूच होतं. 

हॉटेलमधून बाहेर पडताना दोघेही शांतच होते. काहीतरी बोलायला हवं म्हणून आदित्य बोलला, ” तू ठीक आहेस ना?”

“म्हणजे? मला काय झालंय?’

“नाही मघाशी ते…. म्हणजे तू चिडली होतीस ना ते.”

“हो कारण तू चुकीचं बोलत होतास, मग चिडणारच ना. तू पैसे घेतलेस विषय संपला.” 

“मला हे आवडलं तुझं.” आदित्य हसून म्हणाला. “काय? काय आवडलं?” अनिताने विचारलं. “हेच. मी स्वतंत्र आहे मग माझे पैसे मीच देणार.” तो म्हणाला 

“त्यात काय? आजच्या काळातली कोणतीही शिकलेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली मुलगी हेच म्हणेल.”

“नाही. सगळ्याच मुली अशा नसतात.” आदित्य म्हणाला. “म्हणजे शिकलेल्या, स्वतःच्या पायावर उभ्या असल्या तरीही जबाबदाऱ्या नको असतात त्यांना. म्हणजे पुरुषांच्या बरोबरीचे हक्क हवे असतात पण त्याचबरोबर मुलींना ज्या परंपरागत सवलती मिळाल्यात त्याही हव्या असतात. म्हणजे स्वतः कितीही कमावत असल्या तरी बाहेर जेवायला गेल्यावर सगळा खर्च बॉयफ्रेंडनेच करायचा असा हट्ट असतो. तू तशी नाहीस. I liked it.”

“हं… पण सगळ्याच काही तशा नसतात. काही थोड्या मुलींमुळे सगळ्या मुली बदनाम आहेत.” अनिता म्हणाली आणि क्षणभर थांबून म्हणाली, “पण तू कुठे माझा बॉयफ्रेंड आहेस?” “अं…. नाही नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. I mean to say की सोबत मुलगा असेल तर त्यानेच खर्च करायचा असं वाटत त्यांना. बॉयफ्रेंडच असं नाही. म्हणजे मी फक्त एक उदाहरण दिलं. ” तो म्हणाला 

“हं… अच्छा.” अनिता गालातल्या गालात हसली. 

“माझा आतापर्यंतचा अनुभव असाच आहे की मुलगाच नेहमी बिल भरतो. आपणही त्यातला अर्धा भार उचलावा असा हट्ट धरणारी मुलगी मी तरी नाही बघितली. म्हणून मी माझ्या नेहमीच्या सवयीने देत होतो बिल. त्यात कुठेही तुला किंवा मुलींना कमी लेखण्याचा हेतू नव्हता माझा.” आदित्य म्हणाला. 

“हं… ठीक आहे. Its ok. मी पण जरा जास्तच हायपर झाले. Actually कुठेही असा मुलगा मुलगी भेद झाला की मला प्रचंड चीड येते. सॉरी”

“Its ok. Don’t  say sorry.” तो हसून म्हणाला. “By the way… तू कशी जाणार आता? तुला कुठे सोडू का? मी बाईक आणली आहे.” 

“No thanks… मी जाईन. इथून डायरेक्ट बस आहे माझ्या घरापर्यंत. आणि तसंही मला बाईकवर भीतीच वाटते. I am not really comfortable on two wheeler.”

“अगं मी अजिबात रॅश चालवत नाही बाईक. नीट सांभाळून नेईन तुला. Don’t worry.”

“नाही खरंच नको. म्हणजे तुझ्यावर विश्वास नाही असं नाही, पण नको. आणि तू कशाला उगाच वाकडी वाट करून मला सोडायला येतोस?”

“अगं फ्रेंड साठी एवढं तर करतोच की आपण.”

“फ्रेंड? आपण इतके चांगले फ्रेंड्स नाही झालो आहोत अजून.”

“म्हणजे? काय म्हणायचंय तुला? नाही मघाशी पण तू आत हॉलमध्ये असंच काहीतरी म्हणालीस जेव्हा मी विचारलं की तू मला का नाही सांगितलंस की तू डान्स करतेस. You don’t  consider me as friend?”

“अं… तसं नाही म्हणजे…” अनिता अडखळली. काय बोलावं तिला कळेना. आदित्य तिच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होता. “सांग ना जे असेल ते. Be frank please.” तो म्हणाला. तिने एक दीर्घ श्वास घेतला. मग बोलली, “बघ मी जरा स्पष्ट बोलतेय. पण खरंच मला नाही वाटत आपण चांगले फ्रेंड्स झालो आहोत. म्हणजे मला माहित आहे की, आपण गेले काही दिवस चॅट वर खूप काही बोलतोय. पण तरीही मला असं वाटत की प्रत्यक्ष भेटून किंवा बोलून जशी ओळख होते तशी चॅट वर होत नाही. आणि आपण प्रत्यक्ष एकदाच भेटलोय. ट्रेक च्या दिवशी. आणि त्यानंतर आज. We hardly know each other. एवढ्या थोड्या ओळखीत माझ्या डान्स बद्दल सांगणं किंवा माझा हॉटेलचा खर्च करायला लावणं किंवा मला सोडायला घरी येणं, हे मला खरंच योग्य नाही वाटत. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुझ्यावर विश्वास नाही किंवा तू वाईट मुलगा आहेस. पण मी इतक्या लवकर कोणासोबत नाही comfortable होत. Good friend किंवा close friend होण्यासाठी बराच काळ जावा लागतो असं माझं मत आहे. I might be wrong पण… मी अशीच आहे. Please understand and please don’t feel bad.” 

“नाही नाही… Its alright. मला वाईट वाटलं नाही. I respect your opinion. माझी काहीच तक्रार नाही. फक्त माझं मत जरा वेगळं आहे. मला असं वाटत की कधी कधी खूप वर्ष एकमेकांना ओळखत असूनही काही लोक आपले चांगले मित्र नाही बनत पण कधी कधी थोड्याच दिवसांच्या ओळखीत सुद्धा खूप चांगली मैत्री जमते. It’s not a matter of time, it’s a matter of Click. ती व्यक्ती click होते आपल्याला आणि मग त्याच्याशी ट्यूनिंग जमतं आपलं.” त्याने ‘Click’ हा शब्द उच्चारल्यावर अनिताने चमकून त्याच्याकडे बघितलं. तो पुढे बोलतच होता.”म्हणजे माझ्या आयुष्यात काही लोकांच्या बाबतीत असं झालंय म्हणून मला असं वाटलं आणि तुझ्याही बाबतीत मला असंच वाटलं की आपलं ट्यूनिंग चांगलं जमेल. But it’s ok… तुझं मत वेगळं असू शकतं And I respect that.” असं म्हणून तो छानसा हसला. “By the way… मित्र म्हणून नाही पण gentleman म्हणून तरी कुठे सोडू का तुला? कारण मेन रोड जरा लांब आहे इथून, म्हणून म्हटलं.” 

“Thanks for your courtesy पण खरंच नको. हा रस्ता माझ्या नेहमीच्या ओळखीचा आहे, मी खूपदा येते इथून आणि तसंही फार उशीर नाही झालाय. मला तर रात्री ११-१२ वाजेपर्यंत एकटं फिरायची सवय आहे.” यावर आदित्य काहीतरी बोलणार एवढ्यातच ती त्याला थांबवत म्हणाली, “I know तू काय विचारणार आहेस, तेच सांगतेय पुढे. मला कराटे येतात आणि माझ्याकडे पेपर स्प्रे पण आहे. So….. you know…” असं म्हणून हसली. “ohh… अच्छा. thats great!!! मग काय प्रश्नच नाही.” असं बोलताना त्याच्या चेहऱ्यावर खूपच मजेशीर भाव आले होते. आणि ते अनितालाही कळलं होतं. ती हळूच खाली बघून मिश्कीलपणे हसली, त्याला कळणार नाही अशा रीतीने.  “जसं  मी मघाशी म्हणाले, I am an independent girl”. 

“Yes yes… of course. तू खरंच independent आहेस. खऱ्या अर्थाने.” त्याने तिच्या डोळ्यात बघत म्हटलं. “चला मग, निघुया. मी माझी बाईक तिकडे पार्क केली आहे.” असं म्हणून तो तिकडे जाण्यासाठी वळला. पुन्हा मागे वळला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, “Thanks for your company. Had a great time with you. I enjoyed a lot.” 

“Same here.” ती पण प्रसन्न हसून म्हणाली. “मला पण खूप मजा आली.” 

तो त्याच्या बाईकच्या दिशेने गेला. बाईक बाहेर काढली आणि किक मारल्यावर त्याला काय वाटलं कोण जाणे, तो पुन्हा हॉटेलच्या दिशेने आला. कदाचित… ती फार लांब गेली नसेल तर दिसेल. पण ती नव्हती. त्याने पुन्हा बाईक वळवली आणि मेन रोडकडे गेला. सिग्नलला बाईक थांबवून तो विचार करत होता, तेवढ्यात त्याचं लक्ष रस्त्याच्या कडेला गेलं. एका म्हाताऱ्या बाईला रस्ता क्रॉस करायचा होता, पण बहुतेक तिला दिसत नव्हतं किंवा काहीतरी प्रॉब्लेम असावा. ती येणाऱ्या जाणाऱ्यांना हात जोडून मदत मागत होती. पण कोणीच तिच्याकडे लक्ष देत नव्हतं. तिला मदत करूया असा विचार करून आदित्य त्या दिशेला बाईक वळवणार, एवढ्यात तिथे एक मुलगी आली. अनिता! हो.. ती अनिताच होती. ती त्या बाईजवळ आली. २ मिनिट काहीतरी बोलणं झालं दोघांमध्ये. मग अनिताने तिला हाताला धरून रस्ता क्रॉस करून दिला. क्रॉस करून झाल्यावर त्या बाईने हात जोडले तर अनिताने लगेच तिचे हात उचलून आपल्या डोक्यावर ठेवले. तो कौतुकाने तिच्याकडे बघत राहिला, तिच्याबद्दलच्या त्याचा आदर आता खूपच वाढला होता. तो तिच्याकडे बघत असतानाच मागून जोरात हॉर्नचे आवाज आले आणि तो भानावर आला. सिग्नल चालू झाला होता. त्याने पटकन बाईक चालू केली आणि तिच्याजवळ जाण्यासाठी वळवली. पण तोपर्यंत ती बस स्टॉप पर्यंत पोचली होती. आदित्य तिच्यापर्यंत पोचणार एवढ्यात तिकडे एक बस आली आणि ती त्यात चढली. 

 बस निघून गेली तरी आदित्य काही वेळ त्या दिशेलाच बघत होता. 

—————————————————————————————————————————————–

आदित्य बिछान्यावर पडला होता पण डोळे उघडे होते. डोक्यात बऱ्याच गोष्टी येत होत्या. आजच्या दिवसात घडलेल्या सगळ्या गोष्टी एखाद्या फिल्म सारख्या डोळ्यासमोर येत होत्या. स्टेजवर भान हरपून डान्स करणारी अनिता, गाण्याच्या प्रत्येक बीटवर पायासोबतच तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, ते दाखवणारे डोळे, बिल भरण्यासाठी… नाही समान हक्कासाठी तिचं चिडणं, अनोळखी माणसालाही आपलं समजून मदत करणं, आणि त्यानंतर तिच्या डोळ्यात दिसणारा आनंद. तिच्या डोळ्यात सगळे भाव दिसतात. आनंद, आदर, मिश्किलपणा, खोडसाळपणा, Confidence, राग, चीड सगळंच. पण….. अजूनही काहीतरी आहे. ते डोळे काहीतरी बोलतात, काहीतरी सांगतात. पण काय? तेच कळत नाही. “काय रे.. झोपला नाहीस अजून?” आई त्याच्या खोलीत येत म्हणाली. “नाही ग.. अजून झोप नाही आली. तुझं आटपलं का? झोपतेस ना आता?” त्याने आईला विचारलं. “हो आटपलंय.. पण झोपू नाही शकत मी. तुझे बाबा कुठे आलेत अजून?” आई त्याच्याजवळ येऊन बसत म्हणाली. “ठीक आहे गं. एक दिवस झोपलीस त्यांच्या आधी तर काय आकाश कोसळणार आहे एवढं? त्यांचं ते घेतील वाढून. मी नाही का घेत. झोप तू. दमली असशील.” आदित्य फोनमध्ये बघतच म्हणाला. “तू घेतोस कारण मी तुला तसं शिकवलंय लहानपणापासून. तुझ्या बाबांचं तसं नाही. आणि काय आकाश कोसळेल ते माझं मला माहित. तुला नाही कळणार.” आई सुस्कारा टाकत म्हणाली. “म्हणजे?” आता आदित्यने फोनमधून डोकं वर काढलं होतं आणि तो आईकडे बघत होता. “म्हणजे मी दमली आहे हे जसं तुला वाटतंय तसं त्यांना नाही वाटत ना. तेवढं वाटलं असतं तर…” बोलता बोलता आई थांबली. “जाऊ दे… तू नको विचार करुस. तू झोप शांत.” असं म्हणून आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. पण तो मात्र एकटक तिच्याकडे बघत होता. तिच्या डोळ्यात. ‘आई नेहमी असं काहीतरी बोलते… अर्धवट. तिला वाटत आपल्याला काही कळत नाही. पण मला माहित आहे सगळं. बाबांच्या खूप गोष्टी खटकतात तिला, पण कधी आपल्यासमोर त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. बाबा का नाही समजून घेत तिला? जे दुःख मला दिसतंय तिच्या डोळ्यात ते त्यांना का नाही दिसत कधी?’ आणि अचानक त्याला काहीतरी आठवलं. आईच्या डोळ्यात बघता बघता… त्याला अनिताचे डोळे आठवले. आईच्या डोळ्यात हे दुःख आहे, एक वेदना आहे. खूप काही सोसल्याची, सहन केल्याची, आपल्याला कोणी समजून न घेतल्याची. आणि अनिता???  त्याला जाणवलं की आईच्या आणि तिच्या डोळ्यात खूप साम्य आहे. म्हणजे आपण गेले इतके दिवस जो विचार करतोय, जे शोधतोय ते हेच आहे. आजही पूर्ण वेळ तिचे डोळे निरखून बघूनही आपल्याला जे कळलं नाही, ते हेच आहे. सगळे भाव दिसले तिच्या डोळ्यात पण तरीही अजून काहीतरी आहे, ते काहीतरी सांगतायत असं जे वाटत होतं पण नक्की काय ते कळत  नव्हतं. ते आत्ता त्याला कळलं. जे त्याच्या आईच्या डोळ्यात होतं. तेच दुःख, तीच वेदना, सगळं सोसून, सहन करून, सगळं पचवून पुन्हा हसणारे डोळे. सगळं दुःख आतल्या आत दाबून वरवर आनंदी असल्याचं दाखवणारे डोळे. अनिताचे डोळेही हेच सांगत होते. पण… पण तिच्या आयुष्यात असं काय घडलं असेल? असं कोणतं दुःख आहे जे तिचे डोळे लपवतायत?  याच विचारात कधी तरी डोळा लागला त्याचा. 

अनितालाही झोप येत नव्हती. ‘तो खरंच आपल्याला compliment देत होता का? की flirt करत होता? त्याच्याकडे बघून तर असं वाटत नाही की तो flirt मुलगा असेल. अशी मुलं लगेच ओळखता येतात. आणि जर flirt वाटत होता तर आपण त्याच्यासोबत इतका वेळ का घालवला? तो जात होता तरी का थांबवलं त्याला? नाही… flirt तर करत नव्हता. He seems to be genuine guy. त्याच्या डोळ्यात फसवणूक दिसत नाही. पण… पण नक्की काय चाललंय त्याच्या मनात तेही कळत नाही. त्याच्या डोळ्यात ते दिसतच नाही. आणि तो बोलत होता ते सगळं. मी खरंच सुंदर आहे? की इथे पण पुन्हा flirt करतोय? पण एक मात्र खरं, त्याची कंपनी आपल्याला आवडली. त्याच्यासोबत वेळ कसा गेला कळलंच नाही. Sense of humor खूप छान आहे त्याचा. किती हसवत होता.’ आणि ते आठवून ती स्वतःशीच खुद्कन हसली. ‘पण आपण जरा जास्तच स्पष्ट बोललो का? त्याला वाईट वाटलं असेल का? राग आला असेल का? राग आला तर पुन्हा बोलणार नाही आपल्याशी! पण नको बोलू दे ना. आपण का एवढा विचार करतोय त्याचा.’ असं म्हणून तिने सगळे विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्याचं बोलणं तिच्या कानात घुमत होतं. It’s not a matter of time, it’s a matter of Click.’ आणि मग तिला मनालीचं बोलणं आठवलं.”तुझं तुलाच click होईल.” या दोन्ही click चा अर्थ एकच आहे का? पण अचानक तिला विजेचा धक्का लागल्यासारखं झालं. तिचं दुसरं मन तिला सांगू लागलं. भित्रं मन. ‘काय करतेयस हे तू? त्याचा एवढा विचार का करतेयस? नको करुस. गुंतशील त्याच्यात. एकदा तोंडावर पडली आहेस. पुन्हा त्याच खड्ड्यात पडायचंय का? नको नको… नकोच ते. त्याचे विचार काढून टाक मनातून. आपल्याला त्या वाटेवर जायचंच नाही.’ असं म्हणून तिने मान हलवली. लाईट बंद करून झोपणार… पण त्याआधी तिने फोन हातात घेतला. whatsapp मधून त्याचा नंबर काढून त्याचा DP काढून बघितला. हसतमुख, प्रसन्न चेहरा आणि खोडकर डोळे. आणि मग तिच्या कानात एक आवाज आला. ‘तू खरंच खूप सुंदर आहेस.’ आणि तिच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटलं. बेडवरुन उठून ती आरशाजवळ गेली, स्वतःचं रूप न्याहाळू लागली. तिला पहिल्यांदाच तिचा चेहरा वेगळा दिसू लागला. काही वेळ तशीच उभी होती आरशासमोर. मग येऊन झोपली.  

चंद्राची कोर त्या दोघांकडेही बघत होती, बघताना हसत होती, मधेच ढगात लपत होती. 

 —————————————————————————————————————————————-

आदित्य आणि अनितासहित सगळा ग्रुप तिकोना गडाच्या दिशेने चालत होता. दम लागल्यावर मधेच थांबत, काही मिनिट अराम करत, मधेच एखादा चांगला स्पॉट आला तर तिथे फोटो घेत सगळे हळू हळू पुढे चालले होते. मध्ये एका स्पॉट वर फोटो काढताना:

तो: राहू दे ना तसंच, केस मोकळे ठेवूनच चांगला येतोय फोटो

ती: काहीही काय…. भुतासारखे वाटतायत ते. बांधू दे थांब

तो: नाही ग, खरंच मोकळेच चांगले वाटतात. ती बट येते ना डोळ्यांवर, छान दिसते 

तिने केस तसेच ठेवले आणि त्याने फोटो काढला. “Perfect Click” असं म्हणून त्याने अंगठा दाखवला. “तुझे फोटो खरंच खूप छान येतात अशा candid mood मध्ये” तो म्हणाला. 

“हं… हे तू सगळ्याच मुलींना बोलतोस ना.” ती उपहासाने हसत म्हणाली. “म्हणजे?” त्याने डोळे मोठे करून तिच्याकडे बघितलं

“म्हणजे काय ते तुला चांगलंच माहितेय.” ती म्हणाली. “आज सकाळी बस मध्ये चढल्यापासून तुझं हेच चाललंय. मुलींनी गाणी म्हणायला मागे बोलावल्यावर लगेच मागे गेलास. मघाशी त्या मुलीचा पाय मुरगळला तर तिला फिजिओथेरपि काय देत होतास, नंतर तिची बॅग घेतलीस. आणि फोटो तर सगळ्याच मुलींचे काढलेस की. कोणाचे बांधलेले केस तुला चांगले वाटत होते तर कोणाचे सोडलेले. कोणाचे डोळेच छान तर कोणाची म्हणे smile गोड आहे. सगळ्याच मुली छानच दिसतात की तुला. मी पण त्यातलीच एक, तशीच कॉम्प्लिमेंट मला पण दिलीस. मी त्या दिवशी बोलले ना तेच खरं होतं. You are a big flirt” 

“आयला…. यात flirting काय केलं मी? सकाळी सकाळी फ्रेश मूड मध्ये गाणी म्हणावीशी वाटली म्हणून गेलो मागे. तू पण यायचं होतंस ना.. तुला कोणी अडवलं होतं का? आणि मी स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मला थोडीफार फिजिओथेरपि माहित आहे म्हणजे मुरगळणे लचकणे यावर तात्पुरते उपाय माहित आहेत मला म्हणून केले मी. आपल्याच ग्रुप मधल्या लोकांना मदत करणं गुन्हा आहे का? उलट ट्रेकला तर अनोळखी माणसांना पण मदत करायची असते. आणि फोटोचं म्हणशील तर, मी फोटोग्राफेरच आहे त्यामुळे कोणाचा फोटो कसा चांगला येईल हे मला लगेच कळतं. And as I told you that day, मला सगळेच सुंदर वाटतात त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांमुळे.”

“हो हो माहित आहे माहित आहे…. फिल्मी डायलॉग मारू नकोस. आणि तू स्पोर्ट्स मध्ये आहेस? काहीही फेकू नकोस हा..” 

“अरे खरंच. मी खूप चांगलं बॅडमिंटन खेळतो आणि कबड्डी सुद्धा. आणि मला मुळातच फिटनेसची आवड आहे त्यामुळे…”

“चल काहीही…”

“OK… पुढच्या वेळी तुला दाखवायला सगळे मेडल्स आणि सर्टिफिकेट घेऊन येईन माझे स्पोर्ट्स मधले म्हणजे विश्वास बसेल तुझा.”

अनिताने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. “पण… मला एक कळत नाहीये तुला या सगळ्याचा एवढा राग का येतोय. Are you jealous?” तो तिच्याजवळ येत डोळे मिचकावत म्हणाला. “Ohh…. please. Why should I? तू काय माझा बॉयफ्रेंड आहेस का?” अनिताने विचित्र हावभाव करत म्हटलं. “ते मला काय माहित? पण कुठून तरी जळायचा वास येतोय खरा.” तो पुन्हा मिश्कीलपणे हसत म्हणाला. “Please…. Are you out of your mind? मी काही जळत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की त्या दिवशी मी तुझ्याबद्दल जो अंदाज केला होता तोच खरा होता. You are a flirt.” ती ठाम स्वरात म्हणाली. त्यावर तो नुसताच हसला. 

“अगं आपण पण अशा Haversack घ्यायला हव्या ग.” साक्षी अनिताला म्हणाली. “हो मी मागच्या आठवड्यात त्या शॉपमध्ये विचारलं होतं पण सध्या स्टॉक संपलाय म्हणाला तो. काय माहित कधी येईल.” अनिताच्या या वाक्यावर आदित्यने कान टवकारले आणि जिच्याशी बोलत होता त्या मुलीला सोडून तो अनिता आणि साक्षीजवळ आला. “ओबेरॉय मॉल मध्ये मिळेल VIP मध्ये.” त्याने सांगितलं. “तू?? तू मधेच कसा इथे आलास? तू तिच्याशी बोलत होतास ना?” ती दचकून म्हणाली. “हो बोलत होतो पण आता तुझ्याशी बोलतोय.” त्याच्या डोळ्यात पुन्हा तसेच मिश्किल भाव होते. तिने त्यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही आणि पुढे चालत राहिली. आणि तो पुन्हा दुसऱ्या मुलींशी बोलण्यात दंग झाला. पण दुसऱ्यांशी बोलत असतानाही तो तिच्या आजूबाजूलाच चालत होता आणि तिच्या बोलण्याकडे त्याचे कान होते

“शेअर्स मधलं कळत नाही ना, नाहीतर नक्की केली असती त्यात इन्व्हेस्टमेंट.” साक्षी अनिताला सांगत होती. “कोणीतरी चांगला तज्ञ् हवा सुरुवातीला गाईड करण्यासाठी.” ती पुढे म्हणाली. तेवढ्यात आदित्य पुन्हा त्यांच्या जवळ येत म्हणाला, “मला बरचसं कळतं शेअर्स मधलं. I can guide you.. if you don’t mind.” आणि त्याने हळूच अनिताकडे बघितलं. “तू काय चोरून आमचं बोलणं ऐकतोयस काय रे?” तिने चिडून विचारलं. “चोरून कशाला, तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलताय की ऐकू येतंच. आणि तसंही मी साक्षीला सांगतोय. तू का चिडतेयस?” तो तसाच मिश्कीलपणे खांदे उडवत म्हणाला. मग पुन्हा साक्षीकडे बघत म्हणाला, “By the way साक्षी, माझा एक मित्र आहे जो शेअर मार्केट वर सेमिनार्स घेतो regularly. म्हणजे प्रत्येक महिन्यात ३-४ सेमिनार्स तरी असतात त्याची. मी त्याला विचारून सांगतो त्याचं पुढचं सेमिनार कुठे आणि कधी आहे ते.” “हो हो नक्की सांग.: साक्षी म्हणाली. अनिताने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तो मात्र कायम तसाच मिश्किल हसत होता.

पण अनिताच्या डोक्यातले विचार थांबत नव्हते. ‘म्हणजे मी आधी जो अंदाज बांधला होता तोच खरा होता. हा flirt मुलगा आहे. आणि त्या दिवशी मोठे मोठे डायलॉग मारत होता. मला पण खरेच वाटले त्या दिवशी. मी पण सिरियसली विचार करायला लागले होते त्याच्या बोलण्याचा. काय मी पण. अशी कशी त्याच्या बोण्यात गुंतले लगेच. याच्यापासून जरा लांबच राहिलेलं बरं.  

अजून एका ट्रेकच्या आठवणी कॅमेऱ्यात आणि मनात घेऊन सगळे परतले. 

—————————————————————————————————————————————–

अनिता तिच्या मित्राच्या लग्नाला आली होती. सगळे गप्पा गोष्टी करत होते, मस्करी चालू होती, स्टार्टर्स खाणं चालू होतं आणि अचानक तिचं लक्ष गेलं. शूटिंग करणाऱ्या माणसाच्या बाजूलाच आदित्य उभा होता. हा इथे कसा हा विचार करत असतानाच त्यानेही तिला पाहिलं आणि तोंडभरून smile दिलं. ‘अरे यार… आता हा इथेही पकवणार.” ती स्वतःशीच पुट्पुटली. तेवढ्यात तो तिच्याजवळ आला. “Hi…. What a pleasant surprise.” तो म्हणला, “तू इथे कशी?” त्याने विचारलं. “लग्नाला आलेय माझ्या मित्राच्या.” ती म्हणाली. “Ohh… अमित तुझा पण मित्र आहे?” त्याने आश्चर्याने विचारलं. “हो आम्ही एकाच ऑफिस मध्ये होतो आधी.” ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. “तुझा पण मित्र आहे का?” तिने विचारलं. “Not exactly….. पण आता झालाय.” त्याने हसून म्हटलं. “म्हणजे?” तिचा प्रश्न. “म्हणजे माझ्या मित्राचा मित्र आहे तो. त्याने सांगितलं मला या लग्नाचं शूट कर म्हंणून.” “अच्छा तू शूट करतोयस का?” तिने विचारलं. ” नाही… म्हणजे मी मेन फोटोग्राफेरला assist करतोय. शिकायला मिळतं ना अशा गोष्टीतून.” तो म्हणाला. “चल… मी जातो पुन्हा शूट करायला. नंतर भेटूच. Till then you enjoy.” असं म्हणून तो गेला. 

त्यानंरही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो तिच्याशी येऊन बोलायची संधी सोडत नव्हता. तिलाही चांगलंच कळत होतं की तो flirt करतोय पण तरीही तीही त्याला टाळत नव्हती. का कोण जाणे, तिलाही मजा येत होती, त्याच्याशी बोलायला. हळूहळू गर्दी कमी व्हायला लागली, शेवटी सगळ्या मित्रांची गॅंग उरली. तेवढ्यात अमितच्या एका मित्राने सगळ्यांना एकत्र बोलावलं, बहुतेक हा तोच… दोघांचा common friend आहे तोच असावा. असा अनिताने अंदाज बांधला. त्याने आदित्यला जवळ बोलावलं. “ऐका ऐका…. हा माझा मित्र आदित्य.” तो सगळ्यांना उद्देशून म्हणाला. “आणि हा खूप चांगलं गिटार वाजवतो आणि गातो पण.” आदित्य जरा दचकला, त्याला हे अनपेक्षित असावं. “अरे… काय तू, नाही नाही…” असं काहीतरी तो म्हणत होता पण त्याने त्याला बोलूच दिलं नाही. “तर आता… आजच्या या special occasion साठी, तो आपल्यासाठी एक special performance देणार आहे.” “वाह, वाह.” असं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. “ए नाही नाही…. मी नाही.” असं म्हणून आदित्य आढेवेढे घ्यायला लागला. पण आता सगळेच हट्टला पेटले होते तेव्हा तो तयार झाला आणि गिटार घेऊन आला. गिटारची पहिली तार छेडली आणि सगळ्यांकडे बघितलं. बघता बघता त्याची नजर अनितावर खिळली आणि त्याने सुरुवात केली. “सावली सी एक लडकी, धडकन जैसे दिलकी.” “वाह वाह…” सगळ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. तो पुढे गाऊ लागला. गाता गाता तो सगळ्यांमधून फिरत होता, मधेच एखाद्या मुलीजवळ जाऊन थांबायचा आणि एक ओळ गायचा. पण त्याची नजर मात्र पूर्णवेळ अनितावरच होती. तिलाही हे कळत होतं आणि त्यावर ती गालातल्या गालात हसत होती. तो तिच्याजवळ येऊन एखादी ओळ म्हणाला की तीही इतरांसारखीच त्यावर दाद देत होती. गाणं संपलं आणि सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून दाद दिली. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. 

सगळे निघण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात आदित्य तिच्या जवळ आला. “निघतेयस?” त्याने विचारलं. “हो.. म्हणजे सगळे एकत्रच निघू.” ती म्हणाली. “Bye the way… You sing really well.” ती त्याच्याकडे बघत म्हणाली. “आवाज छान आहे तुझा.” “Thank you.. thanks a lot” तो तोंडभरून हसत म्हणाला. “चक्क तू मला compliment दिलीस म्हणजे… आश्चर्यच आहे.” तो खोडकर हसत म्हणाला. “म्हणजे काय?” तिने विचारलं. “तू काय माझा शत्रू आहेस का? जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणते मी.” “चला…. जिच्यासाठी म्हटलं तिला आवडलं तरी.” तो हसून म्हणाला. “Excuse me?” तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून बघितलं. “काय म्हणालास तू?” “तेच जे तू ऐकलंस. मी तुझ्यासाठीच म्हटलं होतं ते गाणं.” तो तिच्याकडे बघत खोडकर हसत म्हणाला. ती हसायला लागली. मग म्हणाली, “तुझ्याकडे प्रत्येक वेळी नवीन tricks असतात हा flirt करायच्या. I appreciate it” असं म्हणून ती पुन्हा हसायला लागली. “अरे.. flirt काय? खरंच मी तुझ्यासाठीच म्हटलं होतं ते गाणं.” तो म्हणाला. “हो का? मग सगळ्या मुलींकडे बघून का हसत होतास?” तिने विचारलं. “मला माहित आहेत रे तुझ्यासारखी मुलं. प्रत्येक लग्नात प्रत्येक मुलीला तुम्ही हेच म्हणता. तू खूप सुंदर आहेस वगैरे वगैरे. तू फक्त गाणं गाऊन ते सांगितलंस एवढंच.” असं म्हणून ती पुन्हा हसायला लागली. 

“मी सगळ्यांकडे बघत हसत होतो पण तरीही मी तुझ्याकडेच बघत होतो, तुला कळलं नसेल कदाचित.” तो जरासा गंभीर होऊन म्हणाला. “आणि सुंदर दिसण्याबद्दल बोलशील तर, मी आजही हेच म्हणेन जे त्या दिवशी म्हणालो होतो, तू खरंच सुंदर आहेस. especially तुझे डोळे.” तो तिच्या डोळ्याकडे रोखून बघत म्हणाला. ती अजूनही हसतच होती. “तुला एक विचारू?” त्याची नजर अजूनही तिच्या डोळ्यांवर रोखलेली होती. “काय?” ती हसतच म्हणाली. “तू नेहमीच काजळ लावतेस ना डोळ्यांत, कुठेही जाताना.” त्याने विचारलं. ती जरा गोंधळलेली वाटली. मग लगेच म्हणाली. “हो लावते. मला खूप आवडतं काजळ. का त्यात काय झालं?” “नाही… काही झालं नाही. फक्त एवढंच सांगायचं होतं की, काजळ लावूनही डोळ्यातलं दुःख लपत नाही.” ती हसायची थांबली आणि विचित्र नजरेने बघायला लागली. “काय? कसलं दुःख?” तिने विचारलं. “माहित नाही, पण काहीतरी दुःख आहे तुझ्या डोळ्यात, जे तू काजळ लावून लपवायचा प्रयत्न करतेस, पण तरीही ते दिसतंच. ” तो तसाच रोखून बघत म्हणाला. 

क्षणभर निःशब्द झाली, काय बोलावं तिला सुचेना. त्याने तिच्या दुखऱ्या भागावर अचूक बोट ठेवलं होतं. पण तरीही तिला त्याला ते कळू द्यायचं नव्हतं म्हणून तिने दुसऱ्याच क्षणी पुन्हा स्वतःला सावरलं आणि हसून म्हणाली, “हा अजून एक नवीन डायलॉग? वाह वाह…. Good one” असं म्हणून तिने हलक्याच टाळ्या वाजवल्या. “तू प्रत्येक वेळी नवीन ट्रिक, नवीन डायलॉग मारून प्रयत्न करतोस. पण खरंच रे, माझ्यावर नाही परिणाम होणार या सगळ्याचा. Really sorry” असं म्हणून तिने चुकचुक केलं. “दुसऱ्या कोणावर तरी ट्राय कर हे सगळं. All the best.” असं म्हणून ती पुन्हा हसायला लागली. तेवढ्यात तिचा ग्रुप तिकडे आला आणि सगळे निघाले. सगळ्यांचा निरोप घेऊन तीही निघाली. निघताना तिने मागे वळून बघितलं, तो तिथेच उभा होता आणि तिच्याकडे बघून मिश्कीलपणे हसत होता. 

—————————————————————————————————————————————–

“हाहाहाहा….. तू त्याला सांगितलंस की तुला कराटे येतात.” मनाली फोनवर खो खो हसत होती. “किती थापा मारायच्या त्याला काही लिमिट?”

“मग काय? मुलं हे असे चान्स शोधतच असतात, मुलींच्या जवळ येण्यासाठी. घरी सोडायला येतो and all that. मला चांगल्या पाठ आहेत या अशा सगळ्या tricks.” अनिता म्हणाली. 

“हो ते माहित आहे मला. पण सगळे तसेच असतील असं नाही ना. तू आधीच का ठरवतेयस? तो कदाचित चांगला मुलगा असेल.” मनाली म्हणाली. 

“नाही हा….. अजिबात चांगला नाहीये तो.” असं म्हणून तिने ट्रेकची सगळी हकीकत मनालीला सांगितली. “हं…. अच्छा.” मनाली म्हणाली. “अगं काही मुलांना असते अशी सवय. उगाच मुलींमध्ये shining मारायची. That doesn’t mean he is bad guy. आणि त्याने तुझ्यासाठी एवढं गाणं म्हटलं… How sweet.” मनालीच्या या वाक्यावर अनिता वैतागलीच. “अगं माझ्यासाठी नाही गं म्हटलं त्याने. मी सांगितलं ना तुला, तो सगळ्याच मुलींशी असा वागत होता.” ती वैतागून म्हणाली. 

“Ok Ok… relax” मनाली तिला समजावत म्हणाली.”आणि मी काय म्हणतेय, तो flirt करतोय बाकी मुलींशी तर करू दे. तू का एवढा विचार करतेयस? तू त्याच्याकडे फक्त मित्र म्हणून बघ ना. म्हणजे तुझे बाकीचे मित्र आहेत तसंच. कदाचित तोही तुझ्या बाकीच्या मित्रांसारखा चांगला मित्र होईल. बाकी जास्त विचार करू नकोस. सोडून दे.”

“हं…. May be.” अनिताने म्हटलं.

“तो flirt असेल किंवा नसेल मला माहित नाही.” मनाली पुढे म्हणाली, ” पण एक गोष्ट तर त्याने खरीच सांगितली ना.” 

“कोणती गं?” अनिताने विचारलं. 

“तुझ्या डोळ्यातल्या काजळाची.” मनाली म्हणाली. 

अनिता विचारात पडली.  


To be continued….

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s