परफेक्ट क्लिक – Part 2

सूचना: या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 🙂 😛

“याच्यात दुसरा रंग आहे का?” अनिताने विचारलं. “हो यांच्यात अजून एक ब्लॅक कलर आहे. थांबा घेऊन येतो.” असं म्हणून सेल्समन ती आणायला गेला. “आपण तोपर्यंत जरा छोट्या पर्स बघूया.” असं साक्षीला म्हणून अनिता दुसऱ्या बाजूला वळली आणि समोर बघते तर आदित्य उभा. “अरे…. तू इथे? What a coincidence.” असं म्हणून तिला टाळी द्यायला त्याने हात पुढे केला. ती नुसतीच हसली आणि म्हणाली, “हा प्रश्न मी तुला विचारायला हवा पण मी नाही विचारणार कारण मला त्याचं उत्तर माहित आहे.” “म्हणजे?” त्याने विचारलं. काल रात्री आपण चॅट करत होते तेव्हा मीच तुला सांगितलं की आज मी इथे येणार आहे शॉपिंग साठी. म्हणून तू आलास.” ती अजूनही हसत होती. “चल काहीपण…. मी तर ते विसरूनच गेलो होतो. मी माझ्या शॉपिंग साठी आलोय इथे. तुला वाटलं मी तुझ्यासाठी आलोय? How sweet!! पण तू सांगितलं असतंस तुला कंपनी हवी आहे शॉपिंग साठी तर आलो असतो बरं का मी तुझ्यासोबत. पुढच्या वेळी येईन… If you want.” असं म्हणून तो पुन्हा तिच्याकडे बघून हसला. डोळ्यात तेच मिश्किल खोडकर भाव. ती काहीच बोलली नाही, तिने फक्त त्याच्याकडे एक अर्थपूर्ण कटाक्ष टाकला आणि म्हणाली “Are you sure तू flirt करत नाहीयेस?” त्याने काही उत्तर न देता नुसतंच हसून खांदे उडवले. 

बिल भरून त्या दोघी निघणार एवढ्यात अनिताचा फोन वाजला. फोन ठेवला आणि ती अस्वस्थ झाली. “काय ग काय झालं?” साक्षी ने विचारलं. “अगं आईचा फोन होता. तो पराग भेटायला येतोय आता इकडे. हिने मला न विचारताच त्याला सांगितलं की मी इकडे आली आहे शॉपिंगला आता तो इकडेच येतोय मला भेटायला. आता थांबावं लागणार आपल्याला. आई पण ना.. ” अनिताचा स्वर त्रासिक झाला होता. “ohh… अगं पण मला नाही थांबता येणार. आईची अपॉइंटमेंट आहे डॉक्टरची. मला जावंच लागेल.” साक्षी म्हणाली. “हं… बरोबर आहे. जा तू.” अनिता मान हलवत म्हणाली. “मी भेटेन आणि निघेन पटकन.” आतापर्यंत हे सगळं फक्त ऐकणाऱ्या आदित्यने शेवटी तोंड उघडलं, “कोण पराग?” “अजून एक स्थळ.” अनिता सुस्कारा टाकत त्रासिक स्वरात म्हणाली. 

आतापर्यंत अनिताची मस्करी करत, हसत खेळत असलेल्या आदित्यचा चेहरा हे ऐकल्यावर खाडकन उतरला. ‘स्थळ म्हणजे लग्नासाठी मुलगा. बापरे, ही मुलगे बघतेय लग्नासाठी. आता काय करावं?’ त्याचा गोंधळ उडाला. साक्षी उतरून निघून गेली आणि अनिताही फूड कोर्टच्या दिशेने चालायला लागली. पण आदित्य तिथेच उभा होता, गोंधळून. २-३ क्षण गेल्यावर तो भानावर आला आणि पटकन तिच्या मागे आला. “अं… ऐक ना. तुला कंपनी हवी तर मी थांबतो ना.” तो अनिताला म्हणाला. “कंपनी? मुलाला भेटायला कसली कंपनी?” ती हसून म्हणाली. “Generally अशा गोष्टींसाठी मुलं मुली एकटेच भेटतात, नीट बोलता यावं म्हणून.. माहित नाही वाटत तुला?” तिने विचारलं. “नाही… म्हणजे हो …. माहित आहे मला.” तो अडखळत म्हणाला. “कंपनी म्हणजे तशी नाही. म्हणजे तुम्ही बसा बोलत, मी बाजूच्या टेबलवर बसतो. म्हणजे जरा लांब बसतो. चालेल ना?” ती काहीच बोलली नाही, नुसतीच गालातल्या गालात हसली. तिच्या हसण्यालाच होकार समजून तो तिच्यासोबतच फूड कोर्टमधे गेला. 

अनिता आणि पराग बोलत बसले होते. आदित्य लांबून त्यांच्याकडे बघत होता. त्याच्या डोक्यात हजारो विचार एकाच वेळी चालले होते. ‘दिसतोय तर चांगला handsome. नाही नाही… handsome कसला. उगाच शायनिंग मारतोय नुसती. आणि… दिसण्यावर काय असतं. स्वभाव महत्वाचा ना. पण ही एवढी का हसतेय? हिला एवढी मजा येतेय का याच्यासोबत? नक्की काय बोलतायत? च्य्यायला… जवळचं टेबल पण मिळालं नाही, नाहीतर बोलणं ऐकू तरी आलं असतं. ही हो म्हणतेय की काय याला? हो म्हणाली तर मेलास तू आदि.’ असे एकापेक्षा एक विचार थैमान घालत होते त्याच्या डोक्यात. 

पण तेवढ्यात अचानक चित्र बदलायला लागलं. अनिताच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. तिच्या डोळ्यात राग, चीड दिसू लागली. त्या दिवशी आदित्यसोबत हॉटेलमध्ये असताना जशी दिसत होती तशीच. आणि मग हळू हळू आवाज पण चढला तिचा. आता आदित्यने कान टवकारले, पण तरीही त्याला नीट काही ऐकू येत नव्हतं. आणि शेवटी तो मुलगा.. पराग जागेवरून उठला आणि तरातरा निघून गेला. अनिता तिथेच बसलेली होती पण रागाने थरथरत होती. काहीतरी पुटपुटली तोंडातल्या तोंडात आणि मग तीही झटकन उठली आणि चालायला लागली. आदित्य पटकन त्याच्या जागेवरून उठला आणि तिच्याजवळ गेला. “झाली का मिटिंग?” त्याने अधीरपणे विचारलं. “हो झाली. तुला काय हवंय आता?” ती त्याच्या अंगावर ओरडून म्हणाली. तो दचकलाच. मग म्हणाला, “नाही काही नाही म्हणजे मी… मी फक्त म्हणजे… निघायचं का असं विचारत होतो.” तो भीत भीत अडखळतच बोलत होता. त्याला शब्द सुचत नव्हते. ती तरातरा चालत होती आणि तो तिच्या मागे. २-३ मिनिट ती तशीच चालली मग थांबली. एक दीर्घ श्वास घेतला तिने. आणि मग त्याच्याकडे बघून म्हणाली, “सॉरी…. मी तुझ्यावर उगाच चिडले. Actually… त्या मुलाचा राग तुझ्यावर निघाला पटकन.” 

“No No… thats fine.” तो म्हणाला. “पण तू एवढी का चिडली आहेस? म्हणजे नक्की काय झालं?”  

“काही नाही रे. नेहमीचंच. साले सगळे Male Chauvinist.” तिचा स्वर पुन्हा चिडका झाला. “यांना बायको नाही एक फुल टाइम मेड हवी असते घरात. मला विचारतो जेवण येतं का? मी म्हटलं नाही तर म्हणे घे शिकून. मी म्हटलं तुला येतं  का? तर म्हणतो मला कसं  येणार, मी मुलगा आहे ना. तिथेच माझ्या डोक्यात गेला होता तो. पण तरीही मी बोलणं पुढे चालू ठेवायचा प्रयत्न केला. पण याचे एक एक नवीन नवीन फंडे येतच होते. म्हणे तुझा जॉब कसाही असो, घरालाच पहिली priority द्यायची. घरातलं सगळं नीट केलंच पाहिजे. आणि सगळे सणवार उपवास पण जॉब सांभाळून करायलाच हवे. रात्री उशिरा घरी आलेलं नाही चालणार, जास्त बाहेर फिरलेलं नाही चालणार आणि अजून काय काय. असा संताप आला ना मला. मी त्याला म्हटलं, मग तू मला भेटण्यात इंटरेस्ट दाखवलासच का? तुला housewife हवी आहे ना तर तशी मुलगी शोधायची ना. मी तर माझ्या प्रोफाइल मध्ये लिहिलंय की मी आयटी मध्ये काम करते म्हणून. तर हा म्हणतो कसा नाही नाही, मला working बायकोच हवी आहे. मग तर माझ्या डोक्यात तिडिकच गेली. म्हणजे यांना superwoman हवी आहे. working woman यासाठी कारण तिचा पैसा हवा असतो आणि शिवाय बाहेर मिरवायला चार लोकात की माझी बायको आयटीमध्ये आहे. पण तरीही ती गृहकृत्यदक्ष असायलाच हवी. म्हणजे बाहेर कितीही challenging जॉब असला तरी तिने घरातली सगळी कामं एखाद्या गृहिणीसारखी सराईतपणे करायला हवी. काही अर्थ नसला तरी फालतूचे उपवास करायला हवेत. बाई म्हणजे मशीन वाटते का यांना. समजतात काय साले.” असं म्हणून तिने एक शिवी हासडली. 

आदित्य तिचा हा रुद्रावतार थक्क होऊन बघत होता, काय बोलावं त्याला कळत नव्हतं. पण ती मात्र तावातावाने बोलतच होती. “सगळी adjustment आम्ही मुलींनीच का करायची? का? लग्न हे दोघांचं असतं ना, संसार पण दोघांचा असतो ना मग दोघांचीही सामान जबाबदारी आहे ना. दोघांचंही आयुष्य बदलायला हवं. फक्त आमचंच का बदलणार? सगळे compromise आम्हीच का करायचे? म्हणे मला कसं येणार जेवण मी मुलगा आहे ना? कसं येणार म्हणजे? मुली काय आईच्या पोटातून शिकून येतात का स्वयंपाक? त्या जशा शिकतात तसे तुम्ही का नाही शिकू शकत? नाही… पण यांना ना ते करायचंच नाहीये. कारण ते बाईचंच काम आहे ना. पूर्वी बायका घरात होत्या त्यावेळी एकवेळ ठीक होतं. पण आता? आता मुली पण तेवढ्याच शिकतात, तेवढ्याच level चा जॉब करतात. त्यांनाही ऑफिसमध्ये तेवढेच तास काम करावं लागतं, तेवढ्याच जबाबदाऱ्या असतात, तेवढेच challenges असतात, त्या सुद्धा तुमच्याएवढंच कमावतात. बाहेर त्या तुमच्या खांद्याला खांदा लावून सगळी कामं करतात. मग तुम्ही घरात तिच्या खांद्याला खांदा लावून किचनमध्ये का नाही काम करू शकत? म्हणजे बाहेरचं करून येऊन ती कितीही दमलेली असली तरी घरात पुन्हा तिनेच राबायचं. आणि तुम्ही काय करणार? तंगड्या पसरून बसणार टिव्ही समोर आणि तिने आयता चहाचा कप आणून द्यायचा तुमच्या हातात. म्हणे बाहेर नाही जायचं जास्त. का?? हा सोडणार आहे का त्याच्या सगळ्या मित्रांना लग्नानंतर? मग मी का सोडू? काय या फालतू अपेक्षा? कोणत्या काळात जगतात ही माणसं I just don’t understand. काही नाही रे.. आपण नुसत्याच गप्पा मारतो मोठ्या मोठ्या, मुलगी शिकली प्रगती झाली, आता काळ बदललाय and all. पण काहीही बदललं नाहीये. साडीच्या जागी जीन्स आली फक्त पण विचार तेच आहेत सगळ्यांचे.” 

अनिता बोलतच होती. न थांबता. आणि आदित्य फक्त डोळे विस्फारून तिच्याकडे बघत होता. थोड्या वेळाने ती थांबली. बोलून धाप लागली होती तिला. “तू जरा शांत होतेस का?” आदित्य म्हणाला. “ये इकडे ये, आपण जरा बसुया.” असं म्हणून तो तिला जवळच्या एका टेबलवर घेऊन गेला. “पाणी आणतो मी.” असं म्हणून तो उठणार एवढ्यात तिने त्याला थांबवलं. “नको… आहे माझ्याकडे.” असं म्हणून तिने पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि तोंडाला लावली. काही क्षण असेच गेले. कोणीच काही बोललं नाही. आता ती बऱ्यापैकी शांत झाली होती. “Are you ok now?” त्याने हळूच विचारलं. “हो… I am fine now.” घसा खाकरत ती म्हणाली. “माझं हे असं होतं बघ नेहमी, एकदा का हायपर झाले ना की मग माझा स्वतःवर ताबाच राहत नाही.” 

“हं… पण तू जे बोललीस त्यात काहीच चुकीचं नव्हतं, खरंच. मला एकूण एक गोष्टी पटल्या तुझ्या.” तो म्हणाला

“खरंच? की फक्त मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस?” तिने विचारलं 

“नाही नाही खरंच… अगदी मनापासून. आणि तुला असं का वाटलं की मी फक्त तोंडदेखलं म्हणेन?”

“कारण तू सुद्धा एक मुलगाच आहेस ना आणि सगळ्या मुलांची मतं थोड्याफार फरकाने सारखीच असतात. माझ्यासारख्या मुली आणि त्यांचे विचार झेपत नाहीत त्यांना.” असं म्हणून ती उपहासाने हसली. 

“नाही… असंच काही नाही.” तो म्हणाला. “म्हणजे I agree की बरीचशी मुलं असा विचार करतात पण त्यातही काही अपवाद असू शकतात… माझ्यासारखे. मला खरंच मनापासून पटलंय तुझं बोलणं. आणि ते सुद्धा तू आता बोललीस म्हणून नाही, माझे आधिपासून हेच विचार आहेत. मुलींनी त्यांचं career seriously घेतलंच पाहिजे. लग्नानंतरही. माझ्या बहिणीलाही मी हेच सांगतो कायम.”

“छान… पण उद्या बायकोलाही हेच सांगशील की नाही काय माहित? कारण generally मुलगी आणि सून यांच्यासाठीचे  नियम वेगवेगळे असतात ना.” तिचा स्वर अजूनही उपहासानेच भरलेला होता. 

“हो नक्की सांगेन. तुला म्हणून सांगतो, मी आतापर्यंत भेटलेल्या मुलींपैकी बऱ्यचशा मुली मी याच कारणामुळे नाकारल्या. कारण त्यांना स्वतःच्या आयुष्याबद्दल असं काही ध्येयच नव्हतं. फक्त लग्न करून संसार करायचा एवढंच. आणि दुसरं म्हणजे… ” तो पुढे बोलणार एवढ्यातच तिने त्याला थांबवलं. “सोड सोड… मला या विषयावर काहीच बोलायचं नाहीये.” ती म्हणाली. “खरं तर मला हे सगळं नकोच आहे पण आई बाबा ऐकत नाहीत म्हणून नाईलाजाने करावं लागतंय.” असं म्हणून तिने सुस्कारा सोडला. 

“काय नको आहे?” त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. 

“हेच… लग्न वगैरे. मला नाही पडायचं यात.” ती म्हणाली. 

“पण का? आपल्याला एखादा जोडीदार, साथीदार असावा ज्याच्यासोबत सगळं शेअर करता येईल असं नाही वाटत तुला?” 

“हाहाहाहा…. जोडीदार? साथीदार?” तिने हसत विचारलं. “वाटतं ना, खूप वाटतं. पण आपल्याकडे लग्न करून खरंच एक साथीदार मिळतो का?” तिने त्याच्याकडे रोखू बघत विचारलं. “म्हणजे?” तो काहीसा गोंधळला होता. “म्हणजे सगळं शेअर करायला, सुख दुःखात सोबत करायला, आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या पाठीशी असायला एक कोणीतरी माणूस हवं, आपलं हक्काचं. म्हणून लग्न करायचं हा हेतू असायला हवा ना?” तिने विचारलं. “Absolutely” तो म्हणाला. “पण आपल्याकडे ते सोडून बाकी सगळं बघतात. म्हणजे जात, धर्म, कुंडली, रंग, रूप, शिक्षण, पगार, घर, गाडी, पैसे वगैरे. माणसाचा स्वभाव, विचार बघण्यात कोणालाच रस नसतो. आणि मुलांच्या अपेक्षा तर या अशा. त्यांना सगळं घरकाम करायला एक मोलकरीण, त्यांच्या आई बाबांची सेवा करण्यासाठी एक नर्स आणि मुलांना सांभाळण्यासाठी एक बेबी सीटर अशा सगळ्या गोष्टी एकत्र मिळतील असं एक पॅकेज हवं असतं. हा.. आणि आजकाल मुली शिकतात, कमावतात म्हणून मघाशी मी म्हटल्याप्रमाणे पैसे आणि स्टेटस असलेली एक व्यक्ती. बस्स. आयुष्यभरासाठी जोडीदार, मैत्रीण वैगेरे असा विचार कोणी नाही करत. सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत. आणि मी या सगळ्यात बसत नाही. माझ्या अपेक्षा वेगळ्या आहेत. म्हणून मला यात पडायचं नाहीये” अनिताने खांदे उडवले. 

“OK… मग तुझ्या काय अपेक्षा आहेत.?” आदित्य अजूनही तिच्या डोळ्यात बघत होता. 

“मला माझ्या career बद्दल आदर असणारा माणूस हवाय. माझा जॉब खूप challaneging आहे, कामाच्या वेळा निश्चित नसतात. कधी १०-१२ तासही काम करावं लागतं, कधी सुट्टीच्या दिवशी सुद्धा. त्यामुळे तो मघाचा ठोंब्या म्हणत होता तसं काही सगळं करणं मला तरी शक्य नाही. दुसरं म्हणजे माझे जे passions आहेत त्यांचाही आदर करायला हवा. मला फिरायला, ट्रेकला जायला खूप आवडतं, डान्स तर आहेच. या गोष्टींवर बंधन नको आहेत मला. म्हणजे या सगळ्यातली आवड असलेला असला तर चांगलंच आहे पण जरी नसली तरी निदान मला त्यापासून अडवणारा नकोय.  वेगवेगळ्या गोष्टींची आवड असणारा हवा. वाचन, संगीत, फिल्म्स म्हणजे असं काही specific नाही पण काही ना काही hobby or passion हवं. त्याशिवाय जगण्याला मजा कशी येईल? काय?” असं म्हणून ती हसली. पण तो अजूनही तिच्या डोळ्यात बघत होता. “अजून?” त्याने विचारलं. “हाहाहा…. अरे अजून अजून म्हटलं तर तसं खूप आहे. संपणार नाही. थोडक्यात सांगायचं तर मी जशी आहे तशी माझ्यावर प्रेम करणारा हवा. मग त्यात माझं career, माझे passions, hobbies, माझे कपडे, माझ्या सवयी, माझा स्वभाव सगळंच आलं. ते बदलायला लावणारा नको, ते जसंच्या तसं ज्याला आवडेल ना, त्याच्याशी करेन मी लग्न.” असं म्हणून ती एक मिनिट थांबली आणि मग म्हणाली, ” पण असा कोणीच नाहीये मला माहितेय. म्हणूनच मला यात पडायचं नाहीये.” असं म्हणून ती खो खो हसायला लागली. 

“आहे.” तो तिच्या डोळ्यात बघतच म्हणाला. “काय?” तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. “अं… म्हणजे कोणीतरी असेलच ना असा” तो म्हणाला. अनिता हसली. “अजून तरी असा कोणीच भेटला नाहीये. सगळे असलेच नमुने भेटलेत.” “मिळेल… लवकरच.” तो अजूनही तिच्या डोळ्यात बघत होता. “म्हणजे?” तिने आश्चर्याने विचारलं. “अं… काही नाही.” असं म्हणत त्याने तिच्या डोळ्यावरून आपली नजर हटवली.  आणि म्हणाला, “काही खाणार का?” “नाही नको. उशीर होतोय, निघूया.” असं म्हणून ती उठली. आणि मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं करून त्याच्याकडे बघून म्हणाली, “पण तू हे सगळं का विचारत होतास?” “अं… काही नाही. असच सहज.” त्याने दुसरीकडे लांबवर बघितलं. “सहज? Are you sure?” ती मात्र त्याच्याकडे रोखून बघत विचारत होती. “Yes of course… just casually I asked.” असं खाली बघून म्हणाला आणि मग पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला, “कसं आहे ना, समजा तुझ्यासारखी एखादी मुलगी उद्या भेटली… भेटली म्हणजे अशीच कुठेही…. तर हे सगळं बोलून तिला impress करता येईल ना. म्हणून तुझ्याकडून जरा info काढून घेतली.” असं म्हणून तो पुन्हा नेहमीसारखा मिश्किल हसला. 

“नाही सुधारणार ना तू…. flirt….. Big time flirt.” असं म्हणून ती हसली. तोही हसला आणि दोघे बाहेर पडले. 

—————————————————————————————————————————————–

“आई, कांदे झालेत चिरून. अजून काही बाकी आहे का?” आदित्यने डोळे पुसत पुसत आईला विचारलं. “नाही आता काही नाही. जा तू आता तुझ्या कामाला.” असं म्हणून आईने त्याच्या समोरची कांद्याची प्लेट उचलली. “तू होतास म्हणून एवढं तरी झालं पटकन, नाहीतर किती वेळ लागला असता आज काय माहित. पण तू दमला असशील ना.” असं म्हणून आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. “आज नेहाला पण ऑफिसमध्ये जास्त काम आहे म्हणून उशीर होणार आहे तिला आणि ही बाई पण आजच सुट्टीवर गेली नेमकी. नाहीतर तुला नसतं सांगितलं.” आई बोलत होती. 

“Its ok गं आई. एवढा काही दमलो नाही. तुझ्यापेक्षा कमीच करतो मी काम. एवढ्याने काय दमायला होतं का? मी म्हणत होतो बाकीचं पण मी करतो पण तू ऐकतच नाहीस. अजूनही सांग ती भांडी विसळू का मी?” असं म्हणून तो उठला पण आईने तिथेच त्याला थांबवलं. “नको म्हणून सांगितलं ना एकदा. उद्या ती बाई येईल, तेव्हा घासेल, त्याची काही घाई नाही. जा तू जाऊन पड आता जरा.” “नक्की ना?” आदित्यने विचारलं. 

“हो नक्की.” आई म्हणाली आणि मग त्याच्याकडेच बघत बसली. “काय झालं? काय बघतेयस?” त्याने विचारलं. “काही नाही. बघतेय… तू किती मोठा झालास.” “हाहाहा… आई हा birthday च्या दिवशी म्हणायचा डायलॉग आहे.” तो हसून म्हणाला. “तसा मोठा नाही रे वेड्या.” आई म्हणाली, “आपली कामं आपण करायची, स्वावलंबी व्हायचं हे तुला कळावं म्हणून ही छोटी छोटी कामं तुला शिकवली. पण नंतर इतका शिकलास की आता अगदी माझ्या हाताशी आलायस. नेहा आणि तुझ्यात काही फरक नाही बघ, तिच्याइतकाच सगळी काम चांगली करतोस.” असं म्हणून तिने पुन्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. 

“फरक नसायलाच हवा. तूच शिकवलंयस ना आम्हाला. मुलगा मुलगी दोघे सामान असतात, कोणी कमी कोणी जास्त नाही. पुरुषाची बाईची अशी काही कामं वेगळी नसतात. आणि आई, तू आयुष्यभर नोकरी करून घर सुद्धा सांभाळलंस ना, मी तेच बघत मोठा झालोय. मग मला का नाही जमणार ऑफिसवरून येऊन घरी काम करायला?” 

“हो… नसतातच अशी वेगळी काम. घर म्हटलं की सगळ्यांचं असतं. सगळ्यांनी सगळी कामं करायची असतात. पडेल ते काम करायची सवय हवी.” फोडणी घालता घालता आई म्हणाली 

“पण आई, एक बरं झालं हा. मला स्वयंपाक येतो त्याचा अजून एक फायदा होणार आहे आहे मला.” आदित्य डोळे मिचकावत म्हणाला. 

“कोणता रे?” आईने विचारलं. 

“उद्या जर बायको माझ्याशी भांडली आणि म्हणाली मी जेवायला नाही बनवत जा.. तर मी माझं जेवण बनवून घेऊ शकतो. तिचा प्लॅन फ्लॉप होईल.” असं म्हणून तो खो खो हसायला लागला. 

“गॅप मेल्या… वात्रट कुठचा. काहीही असतं  तुझं.” असं म्हणून आई पण हसायला लागली. मग म्हणाली, “आणि तुझ्यापुरतं का? तू तिच्यासाठी पण बनव की. तिला म्हणावं नको बनवूस  तू, मी बनवतो. तू तुझ्या हाताने तिला करून खायला घातलंस ना तर ती तिचं भांडण, सगळा राग पण विसरून जाईल बघ.” 

“हो? नक्की विसरेल ?” त्याने विचारलं. 

“शंभर टक्के.” आई ठामपणे म्हणाली. “अरे बायकांच्या फार काही अपेक्षा नसतात रे, त्यांच्यावर भरभरून प्रेम करावं, त्यांची काळजी घ्यावी, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी, एवढीच अपेक्षा असते. ती मुलगी तिचं घरदार, तिची रक्ताची माणसं सोडून एका अनोळखी जगात येते, कुणाच्या भरोशावर? नवऱ्याच्या ना? ती त्यालाच आपला हक्काचा मानत असते. बाकी कोणाला काही वाटो, पण तो आपल्यासोबत असावा, त्याने आपल्याला support करावा, आपलं कौतुक करावं एवढंच वाटत तिला. एकवेळ ४ दागिने कमी घातलेस अंगावर तरी चालेल पण कौतुकाचे चार शब्द आयुष्यभर पुरतील तिला.” आई पुढे म्हणाली, “आणि तुझी बायको म्हणजे तर आताच्या काळातली नोकरी करणारी असणार. ती पण आमच्यासारखी बँकेची ९ ते ६ अशी नाही. आजकाल किती त्रास असतो नोकरीत माहित आहे ना. आपल्या नेहाचं बघ, रोज कशी वैतागून येते घरी. एवढं दमून आल्यावर पुन्हा ती सगळं जेवण बनवेल अशी अपेक्षाच ठेवू नकोस तू. म्हणून सांगतेय, तू जर असं स्वतःच्या हाताने बनवून दिलंस ना जेवण, तर लगेच राग पळून जाईल तिचा. मी तर म्हणते अधून मधून तूच बनव सगळं जेवण म्हणजे भांडणच होणार नाही कधी.” असं म्हणून आई मोठ्याने हसली. आदित्यही हसायला लागला. आई पुढे म्हणाली, “तुमचं ते काय कॅण्डल लाईट डिनर का काय ते असतं ना, त्या सगळ्याची काही गरज नाही. संसार चांगला करायचा असेल ना तर आधी बायकोला सगळ्या कामात मदत करायला शिक. काय?” त्याने हसून मान हलवली. 

आई पुन्हा कामात दंग झाली पण आदित्य तिच्याकडेच बघत होता. “काय रे काय झालं? काही हवंय का अजून?” आईने विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली आणि तो तिच्याजवळ गेला. तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, “आई I love you. तू जगातली सगळ्यात बेस्ट आई आहेस.” असं म्हणून त्याने हळूच तिच्या गालाची पापी घेतली. “चल… काहीतरीच. जा आता.” आई त्याच्या गालावरून हात फिरवत म्हणाली. 

—————————————————————————————————————————————–

 अनिता येऊन आपल्या जागेवर बसली. सेमिनार सुरु व्हायला अजून काही मिनिटं बाकी होती. तेवढ्यात पटकन जरा वॉशरूमला जाऊन येऊया असा विचार करून ती जागेवरून उठली. घाईघाईने जाताना तिचा कोणालातरी धक्का लागला. “Ohh… Sorry” असं म्हणून तिने वर पाहिलं तर आदित्य. “तू?” एकमेकांकडे बघत ती दोघंही म्हणाली. अनिता काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, “तू काय माझा पाठलाग करतेयस काय गं? जिथे जातो तिथे येतेस.” ती डोळे मोठे करत म्हणाली, “मी? मी पाठलाग करतेय? चोराच्या उलट्या बोंबा? तू येतोयस माझ्या मागे मी जाते तिथे आणि वर म्हणतोस….” पण तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच तिला तोंडात तो म्हणाला, “Hello…. मी काही तुझ्या मागे मागे येत नाही हा. मला तर माहित पण नव्हतं तू आज इकडे येणार आहेस ते.”

“Really?” तिने डोळे बारीक करत विचारलं. “मग तू का आलायस इथे? तू तर स्वतः शेअर मार्केट मध्ये एक्स्पर्ट आहेस ना? मग तुला काय गरज अशा सेमिनार ची?”

“हो मग आहेच मी.” तो म्हणाला. “पण मी सेमिनारला आलोच नाहीये. हे जे सेमिनार जो घेतोय ना वरुण तो माझा मित्र आहे. मीच तुला त्याच्याबद्दल सांगितलं होतं आणि त्याचा नंबर दिला होता. I hope you remember it.” तो आपल्या शर्टाची कॉलर नीट करत म्हणाला. 

“Yes of course I remember it.” ती म्हणाली, ” पण तरीही तू इथे का आलायस हे clear होत नाही त्यामुळे.”

“अरे का म्हणजे काय? माझा मित्र आहे, त्याला भेटायला मी कधीही येऊ शकतो. मला कोणाच्या परवानगीची गरज नाही त्यासाठी. मला वाटलं भेटावसं, मी आलो.” तो अजूनच जास्त स्टाईल मारत म्हणाला. 

“भेटावसं वाटलं? नेमकं आजचं?” आता अनिताच्या डोळ्यात मिश्किल भाव होते. “आजच म्हणजे काय, मित्राची आठवण काय अशी ठरवून येते का?” तो अजूनही त्याच स्टाईलमध्ये बोलत होता. “हं… हे सेमिनार अजून पुढचे २ weekend आहे. म्हणजे तेव्हाही तुला तुझ्या मित्राची अशीच आठवण येणार ना?” ती मिश्किल हसत म्हणाली. “अं… नाही असं काही नाही… म्हणजे ते मी आताच कसं सांगू? आठवण काय कधीपण येते त्याचं असं काही fix असतं का? आणि….” तो पुढे काही बोलणार एवढ्यातच तिने हाताने त्याला बस्स म्हणून सांगितलं. तिला हसू आवरत नव्हतं. 

अर्थातच त्या सेमिनारच्या पुढच्या सगळ्या सेशन्सना आदित्य हजर होताच. सेमिनार संपल्यावर त्याने पर्सनली वरुणशी तिची ओळख करून दिली. तिच्या शंकांना दोघांनी मिळून उत्तरं दिली, तिघांनी मिळून काही गोष्टी discuss केल्या. आणि अर्थातच अनिता आणि आदित्य दोघांच्याही खूप गप्पा झाल्या या काळात. थट्टा मस्करी सोबतच, एकमेकांच्या आवडी, फॅमिली, मित्रमैत्रिणी आणि अगदी काही सामाजिक राजकीय गोष्टींवरही चर्चा झाल्या दोघांच्या. जितका जास्त वेळ आदित्य तिच्यासोबत घालवत होता तितकी त्याला ती जास्त जास्त आवडायला लागली होती. आणि अनिता? ती मात्र अजूनही साशंक होती. तिला त्याची कंपनी आवडायची पण तरीही त्याच्या स्वभावाचा नीट अंदाज येत नव्हता. तो एकाच वेळी flirt आणि decent दोन्ही वाटायचा. तिचं एक मन त्याच्याकडे झुकत होतं पण दुसरं मन तिला मागे ओढत होतं. 

असंच एक दिवशी दोघे रस्त्यावरची पाणीपुरी खात उभे होते. तेवढ्यात बाजूने एक मुलगा आणि एक मुलगी धावतपळत गेले. मुलगी पुढे होती आणि तो मुलगा तिच्या मागे पळत होता. बहुतेक तिला थांबवत असावा पण ती ऐकत नव्हती. पुढे जाऊन दोघे मोठमोठ्याने बोलायला लागले, मधेच ती रडत होती मधेच तो चिडत होता असं काहीतरी चालू होतं. रस्त्यावरच्या बघ्यांना एक चांगला टाईमपास मिळाला होता. “गर्लफ्रेंड म्हटली की हे असे ताप आलेच डोक्याला.” सुकी पुरी तोंडात टाकत आदित्य म्हणाला. “त्यांचे हजार नखरे सहन करा, त्यांचे tantrums झेला आणि अजून काय काय.” तो हसून म्हणाला. 

“एक मिनिट… आपण त्या दोघांनाही ओळखत नाही त्यामुळे नक्की कोणाची चूक आहे हे आपण नाही ठरवू शकत. अनिता म्हणाली. “आणि दरवेळी काय मुलीचं tantrums throw करतात का? मुलं काय मोठी फार साधी सरळ असतात वाटत.”

“हो म्हणजे बरीचशी असतातच.” तो म्हणाला. “तुम्हा मुलींच्या ना फार अपेक्षा असतात, आमचं तसं काही नसतं. आणि आम्हाला ना..” पण त्याचं बोलणं तिने अर्धवट तोडलं आणि म्हणाली. “आमच्या काही अपेक्षा नसतात हा. आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला वेळ द्यावा, आपण त्याच्या आयुष्यात महत्वाचे आहोत हे त्याने दाखवून द्यावं. एवढ्याच माफक अपेक्षा असतात आमच्या. आणि त्याही पूर्ण करू शकत नसाल तर relationship मध्ये पडताच कशाला ना? राहा ना single. पण नाही मजा मारण्यासाठी गर्लफ्रेंड हवी असते ना, सगळे हक्क गाजवायची असतात तिच्यावर. पण तिने जरा तिचा हक्क मागितला की त्रास होतो तुम्हाला.” ती बोलतच होती. अजून खूप काही बोलली आणि शेवटी म्हणाली, “तुम्ही सगळी मुलं ना सारखीच असता.” असं म्हणून तिने एक शिवी दिली. 

एरवी तिचा राग शांत करणारा आदित्य आज मात्र शांत नव्हता. उलट तोही अजून चिडून म्हणाला, “बस्स झालं हा… ऐकून घेतोय म्हणजे काहीही बोलू नकोस. आम्ही सारखे असतो तरी तुम्ही काय वेगळ्या असता गं? तुम्हाला सतत काही ना काही गिफ्ट्स हवे, महागड्या हॉटेलमध्ये डेटवर जायला हवं, सतत काही ना काही surprises हवे. आम्ही आमची सगळी कामं बाजूला ठेवून सतत तुमच्याशीच बोलत बसायचं फोनवर किंवा चॅट करत राहायचं. समजून घ्या आणि वेळ द्या म्हणे. तुम्हा मुलींना ना प्रेमापेक्षा आमच्या पैशातच जास्त इंटरेस्ट असतो.” तो पण तावातावाने बोलत होता. 

दोघांचं भांडण वाढायला लागलं. ३-४ मिनिटं दोघेही भांडत होते. मग अचानक आदित्यच्या लक्षात आलं आणि तो एकदम आवाज खाली आणत म्हणाला, “Hold on…. आपण का भांडतोय? त्यांच्यासाठी?” असं म्हणून त्याने त्या बाजूला बघितलं तर ते मघाशी भांडणारं कपल तिकडे नव्हतंच. “अरे ते तर निघून पण गेले.” तो म्हणाला, “आणि आपण उगाच त्यांच्यासाठी आपल्यात वाद घालतोय.” असं म्हणून तो हसला. पण ती नाही हसली. “त्यांच्यासाठी नाही.. मी स्वतःसाठीच भांडत होते.” दूरवर बघत ती म्हणाली. “म्हणजे?” त्याने विचारलं. “म्हणजे मी जे सगळं बोलले ते खरंच होतं, मनापासून.” असं म्हणून ती चालायला लागली. तोही तिच्यासोबत चालत गेला. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग त्याने शांततेचा भंग करत विचारलं, “एक विचारू का?” “बोल.” ती म्हणाली. “तुझं breakup कधी झालं?” तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. “मला कसं कळलं?” तो म्हणाला.  “तू मघाशी म्हणालीस ना तुम्ही सगळी मुलं सारखीच असता त्यावरून. एखादी मुलगी हे असं काहीतरी बोलते तेव्हा नक्कीच तिला कोणत्या तरी मुलाकडून असा वाईट अनुभव आलेला असतो..” तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. 

“झाली २ वर्ष.” ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. “ohh… अच्छा.” त्याला अजून काहीतरी विचारायचं होतं पण त्याने मनाला आवरलं. आणि मग अचानक तीच बोलायला लागली. “खरं तर त्याच्याही आधीच व्हायला हवं होतं. कारण त्या relationship ला अर्थच नव्हता काही. relationship नव्हतीच ती असं वाटत मला कधी कधी. जे काही होतं ते फक्त माझ्याचकडून. त्याच्याकडून काही होतं की नाही काय माहित?” ती स्वतःशीच बोलत असल्यासारखी बोलत होती एकटीच. “सगळी adjustment मीच करायची, याला हवं तेव्हा मी माझी कामं सोडून याला भेटायला जायचं. हा कधीच माझ्यासाठी adjust करणार नाही, याच्यासाठी याची फॅमिली महत्वाची. आईने बोलावलं की हा असेल तसा धावत जाणार. No matter what situation I am going through. कधीतरी मलाही गरज असू शकते त्याची. कधीतरी फॅमिलीएवढा नाही पण थोडा तरी importance दे मला. चूक कोणाचीही असो, सॉरी नेहमी मीच म्हणायचं. मीच जायचं याच्या मागे मागे.” ती बोलतच होती. 

आदित्यला काय बोलायचं सुचत नव्हतं. तो फक्त तिच्या डोळ्यात बघत होता. आता हळूहळू त्यात पाणी जमा झालं होतं. “एक दिवस अंत झाला माझ्या सहनशक्तीचा. म्हटलं बस्स… आता अजून नाही. घेतला निर्णय आणि कायमची पाठ फिरवली.” ती म्हणाली. “हं… I can understand. Breakup होताना, तुटताना खूप त्रास होतो.” तो म्हणाला. “कधी कधी धरून ठेवल्याने जास्त त्रास होतो.” ती शून्यात बघत म्हणाली. “It’s better to let it go” असं तिने म्हटलं आणि मग अचानक भानावर आली. “अरे… मी हे सगळं तुला का सांगतेय. मी पण ना.. ” असं म्हणून ती स्वतःशीच हसली. “खूप बोअर केलं तुला, तू पण काय ऐकत बसलायस.” असं म्हणून तिने डोळे पुसले. 

“अं.. नाही नाही, असं काही नाही. बोअर काय त्यात. तू बोल अजून काही बोलायचं असेल तर.”  

“नाही रे सोड.” ती म्हणाली. “Are you alright?” त्याने विचारलं. “Yes yes I am absolutely fine.” असं म्हणून तिने एक मोठं smile दिलं. “आणि तू का एवढा सेंटी झालायस. अरे ए, relax.. chill.” ती त्याच्याकडे बघत हसून म्हणाली. “अं… नाही म्हणजे मी… ” तो अडखळतच होता, शब्द सापडत नव्हते. “अरे तू नको एवढा विचार करुस, ठीक आहे, होतं असं आयुष्यात. आणि हो sympathy तर अजिबात देऊ नकोस प्लिज.” ती म्हणाली. “sympathy… मी? कुठे?” त्याच्या तोंडून एवढेच शब्द आले आणि पुढे तीच बोलली. “तुम्हा मुलांना सवय असते लगेच sympathy द्यायची. मुलगी रडायला लागली की लगेच येतात सगळे डोळे पुसायाला. आधी डोळे पुसायचे आणि मग…. “तिने वाक्य अर्धवट सोडलं. “But I don’t need anyone’s sympathy, I can handle myself ok?” ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. “चल माझी बस आली.. निघते मी. bye.” असं म्हणून ती पटकन बसमध्ये चढली.  

आदित्य तिकडेच उभा होता थिजल्यासारखा. विचार करत. ‘एवढे दिवस मी जे शोधतोय ते हे आहे. हिच्या डोळ्यातलं दुःख, वेदना, खूप सोसल्याची, सहन केल्याची भावना. तिच्या डोळ्यातल्या काजळामागे लपलेलं दुःख या सगळ्याचं मूळ हे होतं तर. तिचा भूतकाळ. तिचं breakup.’  

रात्री बेडवर पडल्या पडल्या अनिता विचार करत होती. ‘आज आपण हे सगळं का बोललो त्याच्याजवळ. आपल्या आयुष्यातला तो भाग आपण खूप कमी लोकांजवळ बोललोय, अगदी मोजक्याच. मला नाही आवडत हे सगळ्यांना सांगायला. मग अगदी काही महिन्यांपूर्वीच ओळख झालेल्या या माणसाला आपण का सांगितलं हे? काय झालं होतं आज आपल्याला. मूर्खपणा केला आपण. आपली दुखरी बाजू अशी नवख्या माणसासमोर उघडी करायची नसते, ठरवलं होतं ना आपण. का केलं मग असं आपण?’ अशा विचारात असताना अचानक एक वेगळा विचार तिच्या मनात आला. ‘आपलं breakup झालंय म्हणून आपण म्हणालो की सगळी मुलं सारखीच असतात. पण तोही तेच म्हणाला की तुम्ही सगळ्या मुली सारख्याच असता. म्हणजे… म्हणजे त्यालाही कोणत्यातरी मुलीकडून असा अनुभव आला आहे की काय? त्याचाही काहीतरी भूतकाळ असेल? कदाचित त्याचंही आधी breakup? त्याने लगेच ओळखलं की आपलं breakup झालं असणार आणि आपल्याला विचारलं. पण आपण विचारलंच नाही त्याला की तुझंही असं काही झालंय का? आणि वर त्याच्याशीच rude वागलो आपण.’ या विचाराने तिला स्वतःचीच लाज वाटली. ‘आता विचारूया का त्याला whatsapp वर?’ पण तिने घड्याळ बघितलं तर एक वाजत आला होता.’नको राहू दे झोपला असेल, पुन्हा कधी विचारू.’ असं म्हणून तिने पांघरूण डोक्यावर ओढलं. 

—————————————————————————————————————————————–

“हं… तर असं सगळं आहे.” सुमित म्हणाला. “मला तर मागेच कळलं होतं जेव्हा तू बाकी सगळे सोडून फक्त तिचेच ३२ फोटो काढले होतेस तेव्हा. मला वाटलंच होतं कुछ तो गडबड है.” तो आदित्यकडे बघत डोळे मिचकावत म्हणाला. “अरे ते तर असंच रे, तेव्हा फक्त तिचे डोळे फोटोजेनिक वाटले होते म्हणून.” आदित्य म्हणाला. “हो आणि नंतर त्याच डोळ्यात हरवून गेलात ना आपण.” सुमित पुन्हा त्याला चिडवत म्हणाला. 

“हं… पण फक्त डोळ्यातच नाही. एकूणच तिच्यात. तिची personality वेगळीच आहे रे, इतर चार चौघींसारखी नाही. स्वतःचं बिल स्वतःच द्यायचंअसतं तिला. एकदम स्वाभिमानी. दुसऱ्या मुली कोणीतरी सोडायला यावं म्हणून चान्स शोधात असतात आणि हिला स्वतःहून सोडतो म्हटलं तरी नको म्हणते. फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा रस्त्यावरची पाणीपुरी आणि वडापाव चवीने खाते. खूप छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळतो रे तिला. कधी डान्सची एखादी स्टेप चांगली जमली म्हणून दिवसभर खुश असते तर कधी ऑफिसमधलं काम मनासारखं झालं म्हणून मला वडापावची पार्टी देते. आपल्या वाटेवर चालता चालताच दुसऱ्याला मदत करण्याची संधी पण सोडत नाही. चिडली की काही खरं नाही पण लगेच शांतही होते. सगळ्यात कहर म्हणजे सांगू का, त्या दिवशी आम्ही चाललो होतो तेव्हा वाटेत एक फुलवाली बाई बसली होती, तिला बघून ही जवळजवळ ओरडलीच. “ए सोनचाफा!!” असं म्हणून. धावत तिच्याकडे गेली आणि १० रुपयाची सोनचाफ्याची फुलं घेतली तिने. आणि त्याचा वास ती इतक्या प्रेमाने घेत होती जशी काही सगळ्या अंगात भरून घेत होती तो. म्हणते मला सोनचाफा खूप आवडतो, कधीपासून मी वाट बघत होते याचा सिझन कधी चालू होतोय त्याची. बाकीच्या मुली गुलाबासाठी हट्ट धरतात आणि ही सोनचाफा बघून वेडी होते. I mean…सोनचाफा??” आदित्य सुमितकडे बघून सांगत होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, कौतुक, आदर असे सगळे भाव एकत्र जमा झाले होते. “मला तिचं हे वेगळेपणच खूप आवडतं. I really like her.” तो म्हणाला. 

“मित्रा… Like नाही You love her.” सुमित हसत हसत म्हणाला. “तुझ्या डोळ्यात दिसतंय ते.” आदित्य काहीच न बोलता खाली बघून हसला. “अरे अरे… लाजतोयस काय असा?” सुमित हसायला लागला. “आणि एवढं सगळं जे मला सांगितलंस ते तिला जाऊन सांग ना. Tell her you love her. काय?” त्याने विचारलं. 

“नाही…. नको.” आदित्य गंभीर झाला. “तिचा एक past पण आहे. breakup झालं होतं तिचं. दुखावली गेली आहे ती आणि त्यामुळे सगळ्याच मुलांवर राग आहे तिचा.” तो पुढे म्हणाला. 

“ohh…. पण सगळीच मुलं अशी नसतात ना, तू तसा नाहीयेस हे दाखवून दे ना तिला. निदान प्रयत्न तर कर.” सुमित म्हणाला. “नाही यार… एकवेळ आधी मी असं केलं असतं तरी चाललं असतं पण आता तिच्या past बद्दल कळल्यानंतर मी जर तिला विचारलं तर तिला नक्कीच असं वाटेल की मी हे फक्त तिला sympathy  म्हणून करतोय.” आदित्य गंभीर स्वरात म्हणाला. “म्हणजे?” सुमितने गोंधळून विचारलं. तेव्हा त्याने त्या दिवशीचा सगळं प्रकार सांगितला. 

“अच्छा….. असं आहे तर.” सुमित विचार करत म्हणाला. “हो ना.” आदित्य एक सुस्कारा टाकत म्हणाला. “मग आता?” सुमितने विचारलं. “आता काही नाही. I think this is not a right time. थोडा वेळ वाट बघूया.”  

—————————————————————————————————————————————–

“ही सायली, ही दीप्ती, ही आकांक्षा, हा समीर, हा नीरज आणि हो अभिजित आणि श्रेयाला तर तू भेटली आहेसच आधी.” आदित्य सगळ्यांशी अनिताची ओळख करून देत म्हणाला. “आणि ही… ” पण त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच सगळे ओरडले, “ही अनिता, माहित आहे आम्हाला. hiiiieee” असं म्हणून सगळ्यांनी तिला छान smile दिली. तिने पण सगळ्यांना hi केलं. “तुम्हाला माझं नाव आधीच कसं कळलं?” तिने विचारलं. “अगं त्याने सांगितलं होतं आम्हाला आधीच की तू येणार आहेस या ट्रेकला म्हणून.” दीप्ती म्हणाली. “आणि तसंही तो इतर वेळीही खूप बोलत असतो तुझ्याबद्दल.” सायली बोलली, तेवढ्यात आदित्यने डोळे वटारून तिच्याकडे बघितलं आणि तिने जीभ चावली. “खूप बोलतो? म्हणजे?” अनिताने आश्चर्याने विचारलं. “अगं.. खूप म्हणजे. तू असतेसच ना almost सगळ्याच ट्रेकना त्याच्यासोबत, ते सांगतो तो. म्हणजे तू कशी regular trekker आहेस ना त्याच्यासारखीच म्हणून. आम्ही काय आजच आलोत ना.” असं म्हणून आकांक्षाने सावरून घेतलं. 

“अच्छा” अनिता हसली. “Actually नेहमी माझी अजून एक मैत्रीण असते माझ्यासोबत ट्रेकला पण आज नाही जमलं तिला, so आज मी एकटीच आहे.” अनिता म्हणाली. “एकटी कशाला, आम्ही सगळे आहोत की तुझ्यासोबत.” समीर म्हणाला.”हम है तो क्या गम है?” असं म्हणून त्याने टाळी द्यायला हात पुढे केला. अनिताने हसून टाळी दिली. “हो हो… तू आता आमच्याच गृपमधली झालीयेस. So no worries at all. Chill मार आता.” असं म्हणून आकांक्षाने तिच्या पाठीवर थोपटलं. 

थोड्या वेळातच अनिता त्या सगळ्यांमध्ये रमली. जणू काही ती त्यांना वर्षानुवर्षे ओळखतेय असेच ते सगळे वागत होते तिच्याशी. थट्टा मस्करी गप्पा गोष्टी सगळं चालू होतं. ट्रेक संपवून खाली आल्यावर सगळे चहा नाश्ता घेत होते. अनिताचं लक्ष होतं आदित्यकडे. तो नेहमीसारखाच २-४ मुलींशी गप्पा मारण्यात रंगला होता. अनिता विचार करत होती. ‘याचे बाकी मित्र तर चांगले आहेत एकदम डिसेन्ट. मग हाच कसा असा? एवढा का flirt करतो मुलींशी.’ तेवढ्यात तिच्या कानावर सायलीचं बोलणं पडलं. ती दीप्तीशी बोलत होती.  “finally…. आता आदि बऱ्यापैकी flirt करायला शिकला ना?” ती म्हणाली. “हं… ते शिकलाच पण त्यापेक्षा त्या सगळ्यातून बाहेर पडला हे चांगलं झालं.”दीप्ती म्हणाली. “हो ना…. त्याला असं हसत खेळत बघून किती बरं वाटतंय.” आकांक्षा म्हणाली. आता अनिताने कान टवकारले. समीरही आता त्यांना जॉईन झाला. “काय अवस्था झाली होती त्या मुलीमुळे याची. मला आठवलं तरी भीती वाटते आता. कधी कधी वाटायचं तिला पुन्हा घेऊन यावं हाता पाया पडून याच्या आयुष्यात. निदान त्यामुळे तरी हा पुन्हा पहिल्यासारखा होईल.” तो म्हणाला. 

“कशाला? काही नको.” नीरज चिडून म्हणाला. “तिच्या येण्यामुळेच सगळं बिघडलं होतं, गेली ते बरंच झालं. सुटला एकदाचा आपला मित्र.” 

“हो ना. कसला देवदास झाला होता तो.” सायली म्हणाली. “कोणाला भेटणं नाही की कोणामध्ये मिसळणं नाही. फक्त ऑफिस आणि घर. त्याशिवाय दुसरं आयुष्य नाही. इतका हसत खेळत मस्ती करत राहणारा मुलगा, ज्याच्यामुळे ग्रुपला अर्थ होता, जो ग्रुपची शान होता, तो असून नसल्या सारखाच वाटायला लागला होता.” सायली बोलत होती. “बरं आपल्याशी बोलत नाही ते नाही पण गिटार, गाणं, बॅडमिंटन तेही करायचं सोडलं होतं याने.  गिटार, कॅमेरा, रॅकेट सगळं माळ्यावर टाकून दिलं  होतं  याने धूळ खायला.” 

“जाऊ दे ना सोडा आता.” आकांक्षा म्हणाली. “नंतर झालं ना सगळं ठीक. त्याने काढलं ना सगळं माळ्यावरून परत खाली. मग आता कशाला त्या वाईट आठवणी परत काढताय?”

“Yes…. we got our friend back.” समीर म्हणाला. “आणि आता तो मस्त लाईफ एन्जॉय करतोय ना. बस्स तेवढंच हवय आपल्याला. तसंही असं एका मुलीच्या मागे देवदास बनून राहण्यापेक्षा सगळ्यांशी थोडं थोडं flirt केलं तर काय बिघडलं?” त्याने विचारलं आणि ग्रुपमध्ये एकच हशा पिकला. 

ती आदित्यकडे बघत होती. मुलींशी गप्पा मारणारा, हसणारा आदित्य. त्या दिवशीचा सगळं प्रसंग तिच्या डोळ्यासमोर आला. “तुम्ही मुली पण सारख्याच असता. फार अपेक्षा असतात तुमच्या. गिफ्ट्स, महागडी हॉटेल्स.” त्याच्या सगळ्या बोलण्याचा तिला आता उलगडा होत होता. त्याचे डोळे काहीतरी खोटं बोलतायत असं जे वाटत होतं ते हे होतं. त्याच्या डोळ्यात वरवर मिश्किल भाव दिसतात पण त्याच्या मागे त्याने दुःख लपवलंय. त्याचाही एक भूतकाळ होता, आपल्यासारखाच. दुःख आणि वेदनेने भरलेला. त्यानेही तेच सोसलंय जे आपण सोसलंय. आणि म्हणून तो आता असा?’ ती खूप गंभीर झाली होती. 

“चला चला आवरलं का? निघायची वेळ झाली.” असं ट्रेक लीडने म्हटलं. सगळ्यांनी पटापट आपापल्या बॅग्स उचलल्या आणि बसमध्ये जाऊन बसले. अनिताने खिडकीजवळची सीट पकडली. आणि आपली बॅग ठेवल्यावर लगेच आदित्यची बॅगही वर टाकली, आपल्याच बॅगच्या शेजारी. “हे काय? तूच ठेवलीस?” त्याने विचारलं.” हो माझी ठेवत होते मग तुझीही ठेवली. नाहीतरी तू इथेच बसतोयस ना?” तिने विचारलं. “अं… नाही म्हणजे मी तिथे…” तो बोलताना अडखळला. तिचं हे वागणं त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. “ohh… तुला दुसरीकडे बसायचं होतं का?” अनिता जराशी नाराज होऊन म्हणाली. “सॉरी… मी देते तुझी बॅग काढून.” असं म्हणून ती बॅग काढायला उठली पण त्याने थांबवलं. “नाही नाही… बसतो. मी इथेच बसणार होतो.” तो म्हणाला आणि तिच्या बाजूला बसला. तिच्या चेहऱ्यावर एक गोड smile आलं. तोही हसला. गाडी परतीच्या प्रवासाला निघाली. 

—————————————————————————————————————————————–

 “काय सालसा?” सगळ्यांनी एका सुरत मोठ्याने विचारलं. “अरे हो हो हळू… एवढं ओरडायला काय झालंय?” आदित्य म्हणाला. “काय झालं? तू विचारतोयस काय झालं?” नीरज म्हणाला. “अरे मित्रा, तुझा आणि डान्सचा काहीतरी संबंध आहे का या जन्मात तरी?” त्यावर समीर म्हणाला. “ए नाही हा… गणपती विसर्जनाचा डान्स चांगला करतो तो. असं नाही बोलायचं हा.” यावर सगळे जोरजोरात हसायला लागले. “ए गप्प बसा.. गप्प बसा रे.” आदित्य सगळ्यांना शांत करत म्हणाला. “मला मान्य आहे मला डान्स वैगेरे काही नाही जमत, पण शिकवलं तर शिकेन ना मी. आता जे लोक चांगले डान्स करतात ते काय जन्मापासूनच डान्सर असतात का? नाही ना.. ते पण कुठून तरी शिकतात ना कधीतरी. आणि ट्राय करून बघायला काय हरकत आहे म्हणतो मी?” आदित्य

“मान्य आहे ते लोक पण शिकतात. पण त्यासाठी मुळातच थोडं तरी In built skill असावं लागतं. आपल्याकडे ते आहे का?” दीप्ती म्हणाली. “उगाच स्वतःच हसं करून घेशील तिच्यासमोर आणि सगळ्यांसमोर सुद्धा. कशाला इज्जतीचा फालुदा करायला निघाला आहेस. तिला सांग मला नाही जमणार.”

“पण मुळात हे सालसाचं फॅड आलं कुठून तुझ्या डोक्यात?” आकांक्षा विचारात पडली. 

“माझ्या नाही गं तिच्या डोक्यात आलं.” आदित्य म्हणाला. “१ महिन्याचा क्लास आहे सालसाचा. तिला तो करायचाय पण पार्टनर मिळत नाहीये कोणी तिला. म्हणून तिने मला विचारलं. आता तिच्यासोबत वेळ घालवायची आलेली आयती संधी मी कशाला सोडू? म्हणून मी हो म्हटलं.”

“आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.” समीर म्हणाला “माझं ऐक अजूनही नाही म्हणून सांग तिला. तुझा डान्स बघून ती पटायचे तर विसरूनच जा पण तुझ्याशी friendship पण नाही ठेवणार. पळून जाईल ती.” समीरच्या या वाक्यावर सगळे पुन्हा खो खो हसायला लागले. 

“नाही… आता एकदा हो म्हणून सांगितल्यावर मी पुन्हा मागे नाही हटणार. बघू… जे होईल ते होईल.” आदित्य ठामपणे म्हणाला. 

“ALL THE BEST” सगळे एकसुरात म्हणाले. 

—————————————————————————————————————————————–

  “Co ordination is the most important thing in salsa. And for that, you need trust” सालसा क्लासच्या १५व्या  दिवशी ट्यूटर सांगत होता. “मी पहिल्या दिवसापासून हेच सांगतोय, जोपर्यंत तुम्ही तुमच्या पार्टनरवर पूर्ण विश्वास ठेवून डान्स करत नाही तोपर्यंत तुमच्या स्टेप्स परफेक्टली होणारच नाहीत” तो सगळ्या हॉलमध्ये फिरत प्रत्येक जोडीजवळ जाऊन सांगत होता. “Come on let’s start again. 1 2 3 4” असं म्हणून त्याने सुरुवात केली. सगळ्या जोड्या नाचत होत्या. पण त्याचं लक्ष एकाच जोडीवर खिळलं होतं. आदित्य आणि अनिताच्या. Perfect Movements, perfect moves,एकही बीट miss होत नव्हती. “Wonderful fantastic.” तो मधेच ओरडला आणि सगळे शांत झाले. त्याच्याकडे बघायला लागले. “you…  you both” त्यांच्याजवळ  येत तो म्हणाला. “तुम्हालाच म्हणालो मी. You are doing perfectly” आणि मग सगळ्यांकडे बघून तो म्हणाला, “Everyone of you, just have a look at them.” असं म्हणून त्याने फक्त त्या दोघांनाच डान्स करायला लावला. ते नाचत होते, पाय तालावर थिरकत होते, एकत्र पडत होते दोघांचेही पाय, हातात हात होते. दोघेही सगळं भान विसरून नाचत होते. त्यांचा डान्स संपल्यावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.  “मी हेच सांगतोय कधीपासून. पार्टनरवर विश्वास ठेवून डान्स करा. विश्वास ठेवा आणि झोकून द्या. And that’s what they are doing. Very well done.” असं म्हणून त्याने दोघांच्याही पाठीवर थोपटलं. 

“आज मजा आली ना?” हॉलमधुन बाहेर पडताना अनिता त्याला म्हणाली. “सरांनी आपलं कौतुक केलं आणि सगळयांना आपलं example दिलं. Wowwww… I am sooo happyy.” ती जवळजवळ नाचत म्हणाली.” “Yes me too.” तो पण खुश होत म्हणाला. “पण याचं सगळं क्रेडिट तुला जातं. तू म्हणालीस म्हणून मी हे करण्याचा निदान प्रयत्न तरी केला. नाहीतर माझा उभ्या आयुष्यात कधी डान्सशी संबंध आलेला नाही.” असं म्हणून तो हसला. 

“हं… पण डान्सबरोबरच दुसरी एक गोष्ट आहे जिला क्रेडिट जातं .” ती म्हणाली. “कोणती?” त्याने विचारलं. “विश्वास, Trust.” असं म्हणताना तिने त्याचा हात दाबला. “पार्टनरवर पूर्ण विश्वास ठेवून झोकून द्यायचं असतं. तेव्हाच परफेक्ट डान्स होतो. हो ना?” तिने त्याच्याकडे बघत विचारलं. त्याने हसून होकारार्थी मान हलवली. 

“चल निघूया… ” ती म्हणाली. “आता २ दिवस सुट्टी आहे क्लासला. So आता आपण डायरेक्ट मंगळवारीच भेटू.”

“मंगळवारी काय आहे?” त्याने विचारलं. “अरे असा काय तू? आकांक्षाचा birthday नाही का?” ती म्हणाली. 

“अरे हो हो.. विसरलोच मी.” त्याने हसून म्हटलं. “ठीक आहे मग, भेटू तेव्हाच.” असं म्हणून दोघे निघाले. 

—————————————————————————————————————————————–

 आकांक्षांच्या birthday पार्टीमध्ये आदित्य आणि अनिता सालसा करत होते. सगळेजण त्यांचा डान्स बघून चकित झाले होते खासकरून आदित्यचा ग्रुप. डान्स संपला आणि सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. “क्या बात क्या बात” असं म्हणत आकांक्षा आली आणि तिने दोघांनाही एकत्र मिठी मारली. “Brilliant dance यार, Mind blowing.” ती म्हणाली. “तुला माहितेय आमच्या या ठोंब्याला आम्ही आजपर्यंत कधीही इतका चांगला डान्स करताना पाहिलं नव्हतं. In fact जेव्हा त्याने सांगितलं होतं की तो सालसा च्या क्लासला जाणार आहे तेव्हा आम्ही त्याला वेड्यात काढलं होतं कारण आम्हाला खात्री होती की त्याला काही हे जमणार नाही. But you proved us wrong.” असं म्हणून तिने त्याच्या पाठीवर थाप मारली. “आणि याचं सगळं क्रेडिट तुला जातं हा अनिता.” ती म्हणाली. अनिता म्हणाली, “नाही नाही असं काही नाही, आमचे सरच खूप चांगले होते त्यांनी छान शिकवलं आणि मुख्य म्हणजे आदित्यने स्वतः खूप मेहनत घेतली आहे ते शिकण्यासाठी.” त्याच्याकडे बघत ती म्हणाली. “हो पण मुळात जॉईन कोणामुळे केलं तुझ्याचमुळे ना?” समीरच्या या प्रश्नावर दोघेही नुसतेच हसले. 

केक कापून झाल्यावर सगळेजण पब मध्ये गेले. म्युझिक जोरात वाजत होतं. सगळेजण नाचायचा मूड मध्ये होते. थोडा वेळा नाचल्यावर सगळ्यांनी आपापल्या ड्रिंक ची ऑर्डर दिली आणि जागेवर येऊन बसले. 

“अगं हो तुला एक सांगायचं होतं.” ड्रिंकचा घोट घेता घेता आदित्य म्हणाला. “मी पुढच्या गुरुवारपासून १० दिवस इथे नाहीये.”

“ohh.. कुठे चालला आहेस? ऑफिसचं काम?” 

“नाही… एक वर्कशॉप आहे. Wildlife photography वर. राजस्थान मध्ये आहे. आणि You know who is conducting it?” त्याने विचारलं. तिने डोळ्यांनीच कोण असं विचारलं. “शिवम वर्मा.” त्याने डोळे मोठे करून सांगितलं. “One of the best wildlife photographers in india. Actually he is among the topmost photographers in the world. आणि माझ्यापुरतं म्हणशील तर, He is god for me. जेव्हापासून कॅमेरा हातात घेतलाय तेव्हापासून. त्याची पुस्तकं, त्याचे ब्लॉग्स वाचून, त्याचे interview, videos बघून बघून इथवर आलोय मी. आणि आता प्रत्यक्ष त्याच्यासोबत राहून शिकायची संधी मिळतेय. तो फार कमी वर्कशॉप्स arrange करतो अशी, त्यामुळे त्यात एन्ट्री मिळणं खूपच कठीण असतं.” तो बोलत होता. 

“मग? तुला मिळाली की नाही?” तिने कुतूहलाने विचारलं. “मिळाली ना, म्हणून तर जातोय.” तो आनंदाने म्हणाला, “कसं कसं करून मिळवली ते माझं मलाच माहित. But this is golden opportunity for me. I am so excited.” त्याचा चेहरा आनंदाने फुलला होता. 

“Thats great.. congrats and all the best.” ती म्हणाली. “Enjoy” “Yes absolutely.. cheers” असं म्हणून त्याने आपला ग्लास तिच्या ग्लासला लावला. 

तेवढ्यात त्याचं लक्ष डान्स फ्लोअर कडे गेलं. एक मुलगा जरा जास्तच जोरात नाचत होता. इतका की त्याचा धक्का आजूबाजूच्या लोकांना लागत होता. विशेषतः मुली त्याच्यापासून जरा लांबच जात होत्या. पण तरीही तो पुन्हा पुन्हा त्यांच्या जवळ जाऊन नाचत होता. सगळ्यांना कळत होतं तो मुद्दाम करतोय पण कोणीच काही बोलत नव्हतं. शेवटी एक मुलगी चिडून त्याला बोलली, “जरा देखके डान्स करो ना, धक्का लग राहा है.” तर तो उलट तिचीच चूक असल्यासारखा तिला ओरडायला लागला. “क्या… देखके क्या. ये डान्स फ्लोअर तुम्हारा है क्या? मैने भी पैसे भरे है, मै कही भी नाचूंगा.” असं म्हणून तो अरेरावी करायला लागला. ती मुलगीच एकटी त्याच्याशी भांडत होती, बाकी सगळे फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे होते. आदित्य आणि अनिता हे सगळं बघत होते. दोघांनाही चीड आली होती. अनिता काहीतरी बोलणार एवढ्यात आदित्य झटकन जागेवरून उठला आणि डान्स फ्लोअर वर गेला आणि फाडकन त्याच्या मुस्काटात लावून दिली. तो हडबडला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या अंगावर धावून आला. 

हे सगळं बघून आदित्यचे सगळे मित्र धावले, थोडीशी हमरीतुमरी झाली. आता वातावरण चांगलंच तापलं होतं. तेवढ्यात पबचा मॅनेजर तिकडे आला. त्याने दोघांनाही थांबवलं. “ये सब नाही चलेगा यहा. मारामारी करनी है तो बाहर जाओ.” तो रागाने म्हणाला. आदित्यने त्याला सांगितलं जे काय झालं ते. तिकडे उभ्या असलेल्या मुलींनीही त्याला दुजोरा दिला. मॅनेजरने त्या मुलाला बाहेर हाकललं. सगळं पुन्हा शांत झालं. पण आता सगळ्यांचाच मूड गेला होता आणि उशीरही झाला होता त्यामुळे सगळे निघाले. “Are you ok now?” तिने त्याला विचारलं. “Ya… i am fine.” तो म्हणाला. 

“तुला पहिल्यांदाच इतकं हायपर होताना बघितलं मी.” ती म्हणाली. “हं… actually मुलींशी अशी फालतुगिरी कोणी केलेली नाही सहन होत मला. डोकंच फिरतं.” तो म्हणाला. “आणि त्यापेक्षा जास्त राग कसला आला माहितेय? की सगळ्यांना सगळं दिसत असूनही कोणीच काही बोलत नव्हतं त्या मुलाला.” तो वैतागून म्हणाला. “हं… असच असतं. लोक जिथे बोलायला पाहिजे तिथे बोलत नाहीत. पण जाऊ दे विसर ते सगळं आता आणि just relax.” ती त्याला शांत करत म्हणाली. मग पुन्हा त्याच्याकडे बघून म्हणाली, “By the way…. तुला हे बघून राग आला म्हणजे आश्चर्यच आहे ना.” “म्हणजे?” त्याने विचारलं. ती हसत हसत म्हणाली, “म्हणजे तू तर सतत flirt करत असतोस ना मुलींशी म्हणून म्हटलं.” 

“What do you mean?” तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. “तुला काय म्हणायचंय मीही त्याच्यासारखाच आहे?” त्याचा आवाज आता चढला होता. “नाही… म्हणजे exactly तसंच म्हणायचं नव्हतं मला.” ती अडखळत म्हणाली.  “मी flirt करतो, त्यांना नको तिथे टच करत नाही, अंगचटीला येत नाही. flirt करणं आणि cheap वागणं यात खूप फरक आहे.” तो तिच्याकडे रोखून बघत होता. “माझ्याही मैत्रिणी आहेत या सगळ्या” तो पुढे म्हणाला, “आणि मलाही एक बहीण आहे, त्यामुळे मुलींशी कसं वागायचं हे कळत मला.” असं म्हणून तो गप्प झाला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. मग ती म्हणाली, “Sorry…. म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. मी फक्त जरा मस्करी करत होते तुझा मूड ठीक व्हावा म्हणून. I really didn’t mean to hurt you.” 

“Its ok.” तो म्हणाला. “मला माहित आहे तुझा माझ्याबद्दल काय समज आहे ते”. “अरे नाही नाही…. माझा अजिबात तसा समज नाहीये. मी तर फक्त… ” अनिता त्याला समजावत म्हणाली. पण तिला नक्की काय बोलायचं ते कळत नव्हतं. आदित्य म्हणाला,”सोड… जाऊ दे. मला आता काही बोलायचं नाहीये. चल… जाऊया घरी. उशीर होतोय.” त्याचा चेहरा बघून अनिता निःशब्द झाली 

—————————————————————————————————————————————–

दीप्तीच्या बहिणीचं लग्न होतं. हॉल माणसांनी भरला होता. सगळ्यांची लगबग चालली होती. स्टेजवर विधीला सुरुवात झाली होती. सगळ्या बायका नटून थटून मिरवत होत्या. स्टार्टर्स सर्व्ह केले जात होते, सोबत कोल्ड्रिंक पण होते. आदित्य आणि त्याचा सगळा ग्रुप आला होता तयार होऊन. मजा मस्ती मस्करी सगळं चालू होतं. आदित्य स्वतःचा कॅमेराही घेऊन आला होता, wedding shoot करण्यासाठी. पण त्याचं तिकडे लक्षच लागत नव्हतं. कारण अनिता अजून आली नव्हती. ‘कधी येणार आहे ही. मघाशी मेसेज केला की निघाली आहे पण त्याला आता जवळजवळ एक तास होईल. इतका वेळ लागतो का रिक्षाने यायला. विधी सुरु पण झाले, अजून किती उशीर करणार आहे? नक्की येणार आहे ना ही? की माझा पोपट केला?’ असे अनेक विचार येत होते त्याच्या मनात. बेचैनी वाढत होती. अस्वस्थ वाटत होतं. एक एक मिनिट एका वर्षासारखं वाटत होतं. 

आणि तेवढ्यात ती आली. फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरी घातली होती. हलकासा मेकअप. डोळ्यात तेच नेहमीचं काजळ आणि अजून थोडा मेकअप त्यामुळे डोळे सर्वात जास्त उठून दिसत होते. आणि मोकळ्या सोडलेल्या केसांची एक बट तिच्या डाव्या डोळ्यावर येत होती. अगदी आदित्यला आवडायची तशीच. त्याने तिला बघितलं आणि बघतच राहिला. ती सगळ्यांना hi hello म्हणत होती, हळू हळू पुढे येत होती. पण त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. तिला डोळे भरून पाहत होता, डोळ्यात साठवून घेत होता. हळू हळू ती त्याच्याजवळ आली आणि तिने हसून त्याला hi म्हटलं. पण त्याचं लक्षच नव्हतं, तो अजूनही तिलाच बघत होता. तिने त्याच्या डोळ्यासमोर हात हलवला आणि पुन्हा एकदा hi म्हटलं तेव्हा तो दचकला. “अं… काय?” त्याने विचारलं. “मी २ वेळा hi म्हटलं तुला, लक्ष कुठे आहे?” तिला बोलताना हसू आवरत नव्हतं. “अं.. हो हो. Hi.” तो अजूनही गोंधळलेलाच होता. “तुला इतका उशीर का झाला? कधीपासून वाट बघतोय, एक तास झाला.” त्याने विचारलं. 

आधी ती काहीच बोलली नाही नुसतीच हसली. “अगं हसतेस काय? मी काय विचारतोय?” तो जरासा वैतागून म्हणाला. “अरे हो… आता झाला उशीर, होतो असा कधीतरी.” ती अजूनही हळू हळू हसत होती. मग म्हणाली, “आणि तसंही तुझ्या या नजरेसाठी एक तास उशीर म्हणजे काहीच नाही ना?” तिने ओठांचा चंबू करून त्याच्याकडे रोखून बघत म्हटलं. “काय?” त्याने चमकून तिच्याकडे बघत विचारलं. “काय म्हणालीस?” आता मात्र ती खाली बघून हसायला लागली. मग पुन्हा हसू रोखून म्हणाली, “मी म्हटलं की… तू आता माझ्याकडे जसा बघत होतास, त्या नजरेसाठी एक तास उशीर म्हणजे काहीच नाही… One hour is worth it.. come on तयार व्हायला वेळ लागतोच ना.” असं म्हणून ती पुन्हा खाली बघून हसायला लागली… गालातल्या गालात. आदित्यचं मात्र तोंड उघडून बघतच होता. “काय? म्हणजे तू… माझी नजर म्हणजे? तू माझ्यासाठी… I mean…” त्याला शब्दच सापडत नव्हते. “तुला काय म्हणायचंय नक्की?” तो श्वास रोखत म्हणाला. “काही नाही.” ती पुन्हा खोडकर हसत म्हणाली. “तू कॅमेरा तिकडे फिरव आणि शूटिंगवर लक्ष दे, लग्न तिकडे आहे.” असं म्हणून तिने स्टेजकडे बोट दाखवलं. “शुभलग्न सावधान” भटजी म्हणाले आणि सगळ्यांनी वधूवरांवर अक्षता टाकल्या.  

आदित्य शूटिंग करायला वळला खरा पण अधून मधून त्याचं तिच्याकडे लक्ष जात होतं. ती सुद्धा त्याच्याकडे बघत होती. दोघे नजरेतून एकमेकांशी बोलत होते. सगळे जेवायला गेले तरी ती त्याच्यासाठी थांबली होती आणि त्याचं जेवून झाल्यावरही तिचं होईपर्यंत त्याने आईस्क्रिम खाल्लं नाही. दोघे नेहमीसारखेच वागत बोलत होते पण तरीही नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं होत होतं. 

सगळ्यांनी खूप मजा केली, फोटो, सेल्फी सगळे काढले आणि शेवटी सगळे निघाले. 

तो: तू कशी जाणार आहेस?

ती: रिक्षाने 

तो:मी सोडू का. मला माहित आहे तुला कराटे येतात. Safety साठी नाही म्हणत मी, तुझ्यासोबत अजून थोडा वेळ घालवता येईल म्हणून म्हणतोय. चालेल का?

ती हसली, मग म्हणाली, “चालेल.” “आज मी कार आणली आहे म्हणजे तुला comfortable वाटेल.”  तो म्हणाला. “अरे वा.. सगळं प्लँनिंग आधीच करून ठेवलं होतंस वाटत.” तिने विचारलं. तो नुसताच हसला. “तू ये बाहेर, मी कार काढतो तोपर्यंत.” 

—————————————————————————————————————————————–

तिच्या बिल्डिंगच्या गेटजवळ कार थांबली. २ मिनिट कोणीच काही बोललं नाही. मग ती म्हणाली, “चल.. bye, Thanks for dropping.” असं म्हणून ती कारचा दरवाजा उघडणार तोच तो म्हणाला, “थांब… काहीतरी सांगायचंय.”

ती: बोल ना 

तो: तू आज खूप सुंदर दिसतेयस. हा रंग छान शोभून दिसतो तुला

ती: हे आता सांगतोयस? दिवस संपल्यावर? Anyways.. thanks आणि हो, तुला पण हा कुर्ता छान दिसतोय. 

तो: Thanks a lot. Bye the way मी तुला सकाळीच सांगितलं की तू छान दिसतेयस. 

ती:कधी? 

तो: तू आलीस तेव्हाच. फक्त बोलून नाही.. डोळ्यांनी

ती काहीच बोलली नाही, फक्त खाली बघून हसली. पुन्हा काही क्षण शांतता. “ही शांतता नाही आवडत मला.” शांततेचा भंग करत तो बोलला. “मग बोल काहीतरी.” ती म्हणाली. “तुला माझ्याशी बोलायचं होतं म्हणून मला सोडायला आलास पण अख्खा प्रवासभर काही बोललाच नाहीस.” तरीही तो गप्पच. पुन्हा काही मिनिटं अशीच गेल्यावर ती म्हणाली, “चल… निघू मी?” 

त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “अनिता, I Love you.” ती त्याच्याकडे बघायला लागली. “मला हे कधीपासून तुला सांगायचं होतं पण.. पण जमत नव्हतं. हो हे खरं आहे की सुरुवातीला मी तुझ्याशी flirt केलं जसं सगळ्या मुलींशी करतो तसं. तुझा तर्कही खरा होता की मी तुझा पाठलाग करत होतो. पण मी तुला जितका जास्त वेळा भेटत गेलो, तुला जितका जास्त ओळखत गेलो तितकी तू मला जास्त आवडायला लागलीस. आणि मग तुला अजून भेटावं, तुझ्याशी अजून बोलावं, तुला जाणून घ्यावं असं वाटायला लागलं. आणि मग माझं मलाच कळलं नाही मी तुझ्यात इतका कधी गुंतत गेलो.” तो बोलता बोलता थांबला. ती काहीच बोलत नव्हती फक्त शांतपणे ऐकत होती. थोडंस थांबून तो पुन्हा बोलायला लागला, “मला हे तुला खूप आधीच सांगायचं होतं पण तेवढ्यात मला तुझ्या breakup बद्दल कळलं. तू खूप दुखावली होतीस आणि मला वाटलं की आता जर मी तुला हे सांगितलं तर तुला वाटेल की मी हे फक्त तुला sympathy देण्यासाठी करतोय, दया दाखवण्यासाठी. म्हणून मी तेव्हा बोललो नाही. पण माझ्यावर विश्वास ठेव मला ते सगळं कळायच्या आधीपासूनच तू आवडतेस, आणि जशी आहेस तशीच आवडतेस. तुझी लग्नाबद्दलची मतं मला मनापासून पटतात. तुला वाटत होतं ना की तुला हवा तसा मुलगा या जगात नाहीये, पण तसं नाहीये. मी आहे… मी अगदी तुला हवा तसाच आहे. आणि I assure you की तुला कोणतीच adjustment, compromise नाही करावी लागणार. तुझं करिअर, तुझा डान्स, तुझे ट्रेक आणि अजूनही तुला जे काही करायचं असेल आयुष्यात ते सगळं तू कर, तुला हवं तसं जग तू. मी कधीच अडवणार नाही. I promise.” असं म्हणून त्याने तिचा हात हातात घेऊन दाबला. तरीही ती काहीच बोलत नव्हती, शांत होती. 

“काय झालं? बोल ना काही.” तो म्हणाला. “तुला माहित आहे, माझा आणि डान्सचा काहीच संबंध नाही, मला सगळे खूप हसतात डान्सवरून. पण… पण तू डान्स करतेस हे जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून मी खूप genuinely प्रयत्न करतोय डान्स शिकण्याचा. म्हणूनच मी तुझ्यासोबत सालसा क्लास पण लावला. आणि अजून तुला जे काही आवडतं ते सगळं मी घेईन शिकून खरंच. तुझ्या बरोबरीचा, तुझ्या इतकाच चांगला होऊन दाखवेन मी.” असं म्हणून तो जरा थांबला. मग म्हणाला,”मला माहित नाही तुला माझ्याबद्दल काय वाटत, म्हणून माझी आतापर्यंत हिम्मत नाही झाली तुला हे सांगयची. पण आज.. आज दिवसभर आपण जसे वागत होतो त्यावरून मला असं वाटलं की… May be… May be You like me too. म्हणून मी आता धीर करून हे बोललो. कदाचित माझा अंदाज चुकला असेल. पण पण… हरकत नाही तुझा नकार असेल तरीही माझी काही तक्रार नाही. पण आपण चांगले मित्र तर आहोतच ना? आणि तुझं उत्तर काहीही असलं तरी I don’t want to lose our friendship. मला तू माझी जवळची मैत्रीण म्हणून आयुष्यभर हवी आहेस. राहशील ना तशीच?” त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. “आणि हो तुला वाटतो तितका मी flirt किंवा cheap माणूस नाहीये, trust me… ” 

पण त्याचं बोलणं अर्धवट तोडत ती म्हणाली, “आदित्य.. मला माहित आहे ते. तू cheap नाहीच आहेस.” ती त्याच्याकडे बघून म्हणाली. “आणि तू सुरुवातीपासूनच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोयस हे काय मला माहित नाही असं वाटलं का तुला? मला सगळं कळत होतं. तू डान्सही माझ्यासाठीच शिकलास हेही माहित आहे मला. पण तुला हे सगळं करायची काहीच गरज नाही. मी असं कधीच म्हटलं नाही की जे सगळं मला येतं किंवा मला आवडत तेच सगळ्यांना आवडायला हवं. आणि ते ज्यांना येईल तीच माणसं चांगली. असं मी कधी म्हटलं? प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, प्रत्येकाचं कौशल्य वेगळं असत. तुला डान्स नसला येत म्हणून काय झालं. तू किती छान फोटो काढतोस, गिटार किती चांगलं वाजवतोस, तुझा आवाज किती गोड आहे. हे सगळं मला कुठे येतं? म्हणून मी वाईट किंवा तुझ्याहून कमी ठरते का? तू तुझ्या जागी बेस्ट आहेस आणि मी माझ्या जागी. आणि तू जसा आहेस तसाच मला आवडतोस.” त्याचा चेहरा आनंदाने खुलला. “काय? खरंच?” त्याने विचारलं. “हो खरंच, मलाही तू आवडतोस.. पण” असं म्हणून ती थांबली. “पण काय?” त्याने अधीरपणे विचारलं. “पण… relationship मध्ये असण्याइतका नाही.”ती सुस्कारा टाकून म्हणाली. “म्हणजे? म्हणजे काय?” तो चक्रावून गेला होता. 

तिने पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. “Ok… let me tell you in detail. तू बोलतोस ते सगळं मला पटलं पण तरीही आपली relationship workout होईल की नाही I really don’t know. तुला मी माझ्या Past बद्दल सांगितलं त्या दिवशी. It was really very very complicated And I suffered a lot in it. मी तुला शब्दात सांगूही नाही शकत आहे की मी काय काय सहन केलंय तेव्हा. मला खूप त्रास झाला होता तेव्हा. आणि त्यानंतर मी जवळजवळ डिप्रेशन मध्ये गेले होते, कदाचित मी जीवाचं काही बरं वाईटही करून घेतलं असतं. I am thankful to god की मी त्यातून बाहेर आले आणि पुन्हा एक नवीन सुरुवात केली. पण तरी त्या जखमांचे व्रण अजून तसेच आहेत माझ्या मनावर, माझ्या आयुष्यावर. प्रेम, relationship, commitment आणि एकूणच सगळी मुलं यांच्याबद्दल माझ्या मनात एक भीती बसली आहे. पुन्हा त्या वाटेवर जायचं नाही असा मी निश्चय केला होता माझ्या मनाशी.” एवढं बोलून ती थांबली. तो अजूनही गोंधळेलेलाच होता. ती पुढे म्हणाली, “हो तुझ्याबद्दल माझं मत आधी वाईट होतं, पण नंतर बदललं. मला तुझी कंपनी आवडायची, अजूनही आवडते. तू मला हसवतोस, तुझ्यासोबत मी माझं दुःख विसरते And I am really thankful for that. मी कबूल करते की मी सुद्धा अधून मधून थोडं flirt केलं तुझ्याशी, अगदी आजही. पण ते फक्त असंच गम्मत म्हणून. मला वाटलं तू ही असच करत असशील म्हणून मी पण तुला तसाच response दिला. त्यामुळे तुझा गैरसमज झाला असेल तर I am really sorry. पण या सगळ्याचा सिरिअसली विचार करण्याचं नाहीये माझ्या मनात. खरंच.” असं म्हणून ती थांबली. 

आदित्य बोलायला लागला, “मला कळतेय तुझी अवस्था आणि तू किती सहन केलं असशील याचीही मला कल्पना आहे कारण मीही गेलोय त्यातून. माझंही breakup झालं होतं. मलाही त्रास झाला होता आणि माझ्याही मनात सगळ्याच मुलींबद्दल असाच तिरस्कार आणि भीती भरून राहिली होती. पण का कोण जाणे, मला तू वेगळी वाटलीस. आणि तुला भेटल्यावर आयुष्यात पुन्हा एकदा जुने रंग नव्याने भरायला लागले. तेच रंग भरून मला माझं चित्र पूर्ण करायचंय अनिता. तुझ्या सोबतीने उरलेलं आयुष्य जगायचंय. आणि ऐक ना… तो माणूस कसा होता मला नाही माहित पण प्रत्येकजण तसाच असेल असं नाही ना. म्हणजे आता आपण एकमेकांना चांगले ओळखतो तर… ” त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच अनिता म्हणाली. “आम्ही त्याच्या आधी ४ वर्ष एकमेकांना चांगले मित्र म्हणून ओळखत होतो आदित्य. He was one of my closest friends. सगळं शेअर करायचो आम्ही एकमेकांशी. पण relationship मध्ये पडल्यावर सगळं चित्रच बदललं. एक वेगळाच माणूस आला माझ्या समोर, जो माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता, त्याचा हा चेहरा मी आधी कधीच बघितला नव्हता. नक्की कोणाचं काय चुकलं मला माहित नाही पण जे झालं त्याचा परिणाम म्हणजे प्रेम तर संपलंच पण आमची मैत्रीही संपलीच. I lost one of my very good friend.” असं बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती पुढे बोलायला लागली. “ज्या माणसासोबत मी ४ वर्ष होते, ज्याला मी इतकी चांगली ओळखतेय असं मला वाटत होतं त्याच्याशी सुद्धा relationship workout नाही झाली. मग आपली कशी होईल सांग? आपण तर फक्त गेले काही महिनेच ओळखतोय एकमेकांना. मला नाही वाटत की आपण अजून एवढे चांगले फ्रेंड्स झालोय की आपण अजून एक पाऊल पुढे टाकावं. जर टाकलं तर दोघेही खाली पडू… कदाचित पुन्हा उठता न येण्यासारखे.आणि पुन्हा एकदा डिप्रेशन मध्ये जायची माझी ताकद नाही आता” असं म्हणून तिने एक उसासा टाकला. 

“नाही.. असं नाही होणार. Trust me.” आदित्य तिचा हात हातात घेत म्हणाला, “तुला मी इतका वाईट वाटतो का? तुझा विश्वास नाही माझ्यावर?” त्याने तिच्याकडे रोखून बघितलं. “माझा माझ्या स्वतःवर विश्वास नाहीये आता आदित्य. मी कोणासोबतही relation टिकवू शकेन की नाही याचीच आता मला खात्री वाटत नाही.” मग जरा थांबून म्हणाली “आणि दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आल्या म्हणजे ते नातंही चांगलंच होईल असं खात्रीने नाही सांगू शकत ना?” यावर तो काही बोलणार एवढ्यातच ती पुढे म्हणाली, ” नाही आदित्य… मला नाही वाटत आपली फ्रेंडशिप अजून इतकी झाली आहे की आपण relationship चा विचार करावा. आपण अजून ओळखत नाही एकमेकांना नीट. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे, I am not ready for a relationship right now.” ती ठाम स्वरात म्हणाली. “मला तू मित्र म्हणूनच आवडतोस आणि आपण मित्र म्हणूनच राहूया.”

ठीक आहे, As you wish, तुला पुढे नाही जायचं ना, मग नको जाऊया आपण. आपण इथेच थांबू. ठीक आहे? आपण सध्या तरी एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोतच ना, अजून चांगले होऊ. Let’s try to become best friends of each other आणि त्यासाठी जेवढा लागेल तेवढा वेळ देऊ, OK? Take your own time मला काही घाई नाहीये.” असं म्हणून तो गोड हसला. तिने पण smile दिलं. “Thanks.” ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. “मला समजून घेतल्याबद्दल. चल.. निघू का आता? उशीर होतोय.” “हो हो निघ.” तो म्हणाला. क्षणभर थांबून म्हणाला, “अनिता, आजचा दिवस खूप छान होता, मी कधीच नाही विसरणार.” “Same here.” ती हसून म्हणाली आणि गाडीतून उतरली. 

ती दिसेनाशी होईपर्यंत तो पाहत राहिला. ‘कधीतरी तुला पटेल की मी त्याच्यासारखा नाहीये. आणि आपण दोघेच एकमेकांसाठी perfect आहोत हे तेव्हा तुला click होईल. आणि मी त्या वेळेची वाट बघेन.’ तो स्वतःशीच बोलला. मग त्याने गाडी चालू केली आणि घरी निघाला. 

अष्टमीचा अर्धा चंद्र ढगात लपत होता. 

—————————————————————————————————————————————–

“हं… असं आहे तर.” मनाली विचारात पडलेली होती. “पण म्हणजे आता नक्की तुमचं स्टेटस काय आहे?” तिने अनिताला विचारलं. “Friends…. We are just friends… good friends.” अनिता म्हणाली. त्यावर मनाली म्हणाली, “पण तू लगेच असं नाही म्हणून तोडायला नको होतंस असं मला वाटतं. म्हणजे तुलाही तो आवडतो ना, मग एकदा चान्स घ्यायला काय जातंय? Why don’t you just give it a try?”

“एकदा try करून झालंय माझं मनाली आणि तेव्हा काय झालं हे ही तुला चांगलंच माहित आहे.” अनिता म्हणाली, “आणि तू बघितलंयस माझी काय अवस्था होती त्या वेळी ते.” 

“अगं पण जे एकदा झालं तेच प्रत्येक वेळी होईल असं नाही ना? तो माणूस वाईट होता, तुला नाही समजून घेऊ शकला. पण म्हणजे जगातली सगळीच मुलं तशीच असतील अशी ठाम समजूत का करून घेतली आहेस तू?”

“पण तसं आता होणारच नाही याची तरी तू खात्री देऊ शकतेस का? हा समजून घेईल, हा तसा वागणार नाही याची काय guarantee?”

“हे बघ अनू, guarantee कशाचीच नसते आयुष्यात. माणसं म्हणजे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू नाहीत guarantee आणि warranty कार्ड सोबत घेऊन यायला. माणसाबरोबर आपण जितकं राहतो, जितका जास्त वेळ घालवतो, तसा तसा तो कळत जातो आपल्याला. काही गोष्टी चांगल्या घडतात, काही नाही घडत. जे होईल त्याला तोंड द्यावं लागतं. तू अशीच घाबरत राहिलीस तर कधीच कोणतीच गोष्ट नाही करू शकणार. आयुष्यात चान्स घ्यावेच लागतात अनू.” त्यावर अनिता काहीतरी बोलणार होती पण तिला हातानेच थांबवत मनाली पुढे म्हणाली. “ऎक, तू मागे मला काय म्हणाली होतीस, की तुला हे Arranged marriage नाही समजत. अनोळखी माणसाला फक्त काही वेळा भेटून आयुष्याचा निर्णय कसा घ्यायचा वगैरे म्हणाली होतीस तू आठवतंय?” अनिताने मान हलवली. “आणि तू आज याला नकार दिलास, उद्या अजून कोणालाही देशील. म्हणजे सगळ्यांनाच देशील, कारण तुला आधी आलेल्या वाईट अनुभवामुळे तुझा प्रेम, relationship या सगळ्यांवरचा विश्वास उडालाय. मग मला सांग, तू जर असा सगळ्यांनाच नकार देत राहिलीस तर तुझ्याकडे Arranged marriage करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय राहणार आहे का? तुला हे ही नको आहे आणि तेही नको आहे मग नक्की काय हवंय?” अनिता विचारात पडली. 

“त्यापेक्षा तू असा विचार कर ना. हे बघ नाहीतरी Arranged marriage मध्ये तू एका अनोळखी माणसाला भेटणार, काही भेटीत निर्णय घेणार, सगळं अंदाजपंचे. त्यापेक्षा हा मुलगा काय वाईट आहे? तू आता त्याला गेले कितीतरी महिने ओळखतेयस, तुम्ही चांगले मित्र आहात. म्हणजे Arranged marriage मध्ये मिळतो त्यापेक्षा नक्कीच खूप जास्त वेळ मिळाला आहे तुला त्याच्यासोबत, त्याला जाणून घ्यायला, ओळखून घ्यायला. हवं तर अजून थोडा वेळ घे पण निदान try तर करून बघ ना. असं समज की तू त्यादिवशी जे बोललीस ते देवाने ऐकलंय. देव म्हण किंवा नियती जे काही आहे, त्याने तुला एक संधी दिली आहे, पुन्हा प्रेमात पडायची आणि आपण स्वतःच आपल्या आयुष्याचा साथीदार निवडायची. काय?” अनिता अजूनही विचारातच होती. 

“एकाच सांगते अनू.” मनाली म्हणाली. “मी जशी आहे तशीच माझ्यावर प्रेम करणारं एक माणूस होतं माझ्याजवळ पण मी माझ्या हातानेच त्याला दूर लोटलं ही खंत आयुष्यभर मनाला लागून राहण्यापेक्षा एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? एक चान्स दे. त्याला, स्वतःला आणि तुमच्या नात्याला.” 

अनिता खोल विचारात गढली होती. 

—————————————————————————————————————————————–

सारखा फोन चेक करून करून अनिता कंटाळली होती. ‘२ तास होऊन गेले अजून कसा reply आला नाही. बरं फोन केले एवढे तरी फोन पण उचलत नाही म्हणजे काय? माहित आहे उद्या निघायचंय, पॅकिंग करण्यात बिझी असणार पण तरीही… एक फोन उचलायला किती वेळ लागतो. असा काय हा?’ ती वैतागली होती. तेवढ्यात फोन वाजला, आदित्यचाच होता. तिने पटकन उचलला. “काय हे आहेस कुठे तू, किती वेळा कॉल करायचा?” ती चिडून म्हणाली. “अगं  हो हो… सॉरी फोन नाही उचलता आला मला. Actually जरा एक प्रॉब्लेम झालाय.” तो म्हणाला. तिचा आवाज पटकन खाली आला. “काय झालं?” “अगं.. सुमितच्या आईची तब्येत बिघडली अचानक, त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलंय. मी त्याच गडबडीत होतो म्हणून फोन उचलता आला नाही.” आदित्यने सांगितलं. “अरे बापरे…. असं अचानक काय झालं?” अनिता काळजीच्या स्वरात म्हणाली. “कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत सांग मी येते पटकन.” ती म्हणाली. “नाही नाही आता लगेच काही यायची गरज नाही, आता तसं ठीक आहे. तू हवं तर उद्या सकाळी ये. विनायक हॉस्पिटल मध्ये आहेत.” त्याने सांगितलं. “अरे म्हणजे जवळच आहे ना, येते मी पटकन. आल्यावर बोलू तिकडेच.” असं म्हणून तिने फोन ठेवला. 

ICU च्या बाहेर सुमित बाकावर बसला होता. चेहरा साफ उतरला होता.  बाजूला त्याचे वडील होते, रडवेल्या चेहऱ्याने बसले होते. सोबत आदित्य आणि बाकी सगळा ग्रुप होता. अनिताने सुमितच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, “काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.” त्याने फक्त मान हलवली. आदित्य तिला घेऊन बाजूला गेला. “काय झालं नक्की?” तिने विचारलं. “अचानक चक्कर आली आणि खालीच कोसळल्या, डोळे फिरवले. कसंतरी धावपळ करून आणलं हॉस्पिटलमध्ये तर लगेच ICU मधेच ऍडमिट करून घेतलं डॉक्टरांनी. ऍडमिट केल्यावरच मला पण कळवलं त्याने. मी इथे येईपर्यंत काही टेस्ट्स झाल्या होत्या त्यावरून कळलं की मेंदूत गाठ झालीये.” “अरे बापरे मग आता?” अनिता काळजीने म्हणाली. “बहुतेक ऑपरेशन करावं लागेल असं म्हणतायत डॉक्टर. सध्या तरी २४ तास Under observation ठेवायचं म्हणून सांगितलंय.” असं म्हणून त्याने एक उसासा टाकला. काही वेळ असाच गेला. सगळे सुमितला समजावत होते, मधेच डॉक्टर येऊन काहीतरी चिट्ठी देत होते, कोणीतरी जाऊन ती आणून देत होतं. 

थोड्या वेळाने आदित्यचा फोन वाजला, बहुतेक घरून असावा. “हं… अजून तरी ठीकच आहे म्हणायचं. काही सांगू शकत नाही. बघू उद्याच काय ते कळेल आता.” आदित्य बोलत होता. “आणि हो ते सगळे कपडे पुन्हा ठेवशील का कपाटात? कारण मला यायला किती वाजतील सांगू शकत नाही, कदाचित येणारही नाही मी, उद्या सकाळीच येईन. तोपर्यंत पसारा तसाच नको ना.” त्याचं हे बोलणं ऐकून तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. त्याने फोन ठेवल्यावर तिने विचारलं, “सकाळी घरी म्हणजे? अरे तुझी उद्या दुपारची फ्लाईट आहे ना? रात्री घरी जावंच लागेल त्याशिवाय झोप कशी पूर्ण होणार?” 

“मी जाणार नाहीये म्हणूनच आईला पॅक केलेले कपडे पुन्हा कपाटात ठेवायला सांगितले ना.” आदित्य म्हणाला. 

“काय?” तिने आश्चर्याने विचारलं. “तू जात नाहीयेस?” 

“Of course अनिता. तू बघतेयस ना काय परिस्थिती आहे. उद्यापर्यंत सगळंच अनिश्चित आहे. मी कसा जाऊ शकतो या अशा situation मध्ये?”

“अरे हो मला कळतंय… पण तुझं ते वर्कशॉप. I mean it was your dream. तू कधीपासून वाट बघत होतास या संधीची आणि तूच म्हणाला होतास ना Its a golden opporurnity आणि…” तिला मध्येच थांबवत आदित्य म्हणाला, “हो हो …. ते सगळं खरं आहे आणि मला जायचंच होतं. It is still my dream. पण कोणतंही स्वप्न किंवा संधी ही माणसापेक्षा मोठी नसते ना? सुमित माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे, एकत्र वाढलोय आम्ही. काकी मला माझ्या आईसारख्याच आहेत. त्याचं घर हे माझं दुसरं घरच आहे. देव न करो पण हीच वेळ माझ्या आईवर आली असती तर मी गेलो असतो का तिला असा ICU मध्ये सोडून? मग? सुमितची काय अवस्था झालीयेस बघितलिस ना? त्याला गरज आहे आता माझी, आमच्या सगळ्यांचीच. आणि अशा वेळी मी त्याला एकट्याला सोडून जाऊ?” 

“पण आम्ही सगळे आहोत ना इथे, म्हणजे धावपळ करायला माणसं आहेत, Don’t you worry.” अनिता त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. 

“पण माझं लक्ष लागेल का तिकडे? माझा पाय नाही निघणार या अशा परिस्थितीत.” आदित्य म्हणाला. 

“पण तू त्याचे काहीतरी advance पैसे आधीच भरले असशील ना? ते परत मिळतील का?” अनिताने विचारलं. 

“माहित नाही आणि सध्या माझ्या डोक्यात तो विचारही नाही. नंतर करेन मी चौकशी त्याची.” तो म्हणाला. “आता सध्या मला एवढंच कळतंय की माझं इथे राहणं गरजेचं आहे आणि मी राहणार आहे. आणि जरी ते पैसे नाही परत मिळाले तरी चालेल मला. कारण गेलेला पैसा पुन्हा मिळवता येतो गं, पण माणूस नाही मिळत परत.” हे बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. “Don’t worry” त्याचा हात हातात घेत अनिता म्हणाली, “काकींना काही नाही होणार, त्या एकदम ठणठणीत बऱ्या होतील बघ.” “I hope so” तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला. 

तिने घरी फोन लावला आणि कळवलं की तिला यायला उशीर होईल किंवा कदाचित सकाळही होईल. “अगं… तू कशाला थांबतेस? आम्ही आहोत ना सगळे.” दीप्ती म्हणाली. “का? मी का नको थांबू?” तिने विचारलं, “तू सुद्धा आमच्याच गृपमधली झालीस आता असं तुम्ही सगळे पहिल्याच दिवशी म्हणाला होतात ना? मग मला इथे थांबायचा हक्क आहे. आहे ना?” तिच्या या प्रश्नावर सगळ्यांनीच फक्त मान हलवून होकार दिला आणि ते करताना सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलं होतं.

डॉक्टर जी औषधं सांगत होते ती सगळी आदित्य लगेच आणून देत होता, मध्ये मध्ये सुमितच्या पाठीवर थोपटत होता. ती त्याच्याकडेच बघत होती. बघता बघता २ वर्षांपूर्वीचा प्रसंग तिला आठवला. “मला खरंच अजिबात बरं वाटत नाहीये आज. थोड्या वेळासाठी भेट ना. प्लीज प्लीज.” तिने जवळजवळ १० वेळा त्याला मेसेज करून सांगितलं होतं. पण त्याने दुर्लक्ष केलं होतं. शेवटी तिने कंटाळून त्याला फोन केला. “ठीक आहे भेटू नाही शकत तर निदान फोनवर तरी बोल.” ती केविलवाण्या सुरात म्हणाली. “अगं मी इथे आता लग्नात आहे, सगळे आहेत आजूबाजूला, कसं बोलू?” तो वैतागून म्हणाला. “आणि मी फोन उचलत नव्हतो म्हणजे कळत नाही का तुला, मी नाही बोलू शकत आता. काय लहान मुलासारखी करतेस?” तो जवळजवळ ओरडून म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. माझी तब्येत बरी नसतानाही त्याला लग्नात मजा करणं जास्त महत्वाचं वाटत होतं.’ आणि मग तिने आदित्यकडे पाहिलं. ‘आणि हा माणूस, मित्राची आई आजारी आहे म्हणून आयुष्यातली इतकी चांगली संधी सोडून, पैशावर पाणी सोडून इथे थांबलाय.’ त्याच्याकडे बघता बघता तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ओठावर हसूही. कितीतरी वेळ ती त्याच्याकडेच बघत होती 


To be continued…….

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s