आठवणीतला गणपती बाप्पा

21055182_10155701212641079_663014707354395554_oगणपती बाप्पाच्या आगमनाने सगळंच कसं मंगलमय होऊन जातं. सगळीकडे ढोल ताशे, आरत्या, गणपतीची गाणी यांचे आवाज. अधून मधून गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष. सगळी मरगळ, सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो गणपती येणार म्हटल्यावर. गेली कित्येक वर्षं माझा गणपतीशी संबंध तुटल्यासारखाच झाला होता. म्हणजे दर्शन वैगेरे घ्यायचे सोसायटीतल्या गणपतीचं, कोणाकडे निमंत्रण असेल तर तिथेही जाऊन यायचं, पण अगदी उत्सवात रंगून जाणं वगैरे नाही. सगळं आपलं जेवढ्यास तेवढं. फॉर्मल. पण या वर्षी कसा माहित नाही, पण पुन्हा एकदा तो उत्सवाचा अनुभव घ्यावासा वाटला मला. कदाचित गणपतीची सुट्टी शुक्रवारी आल्यामुळे, ३ दिवसांचा ‘लॉंग वीकएंड’ आल्यामुळेही असेल. एकदम रिलॅक्स मूड होता, सुट्टीचा फील येत होता. बाप्पाचं आगमन नेहमीप्रमाणे झालं. दर्शनासाठी म्हणून खाली गेले, नमस्कार करून काही क्षण त्या सुबक रेखीव मूर्तीकडे बघत राहिले आणि अचानक जुन्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. बाप्पाचे ते रेखीव, बोलके डोळे जणू माझ्याशी बोलू पाहत होते, किंवा कदाचित माझ्याच आयुष्यातल्या जुन्या आठवणींचा पट मला उलगडून दाखवत होते. नमस्कार करून मी तिथून निघाले खरे, पण ते डोळे माझ्यासोबतच आले आणि अचानक मला १५-१६ वर्ष मागे घेऊन गेले.

मी शाळेत असतानाचे गणेशोत्सवाचे दिवस. महिनाभर आधीपासूनच गणपतीचे वेध लागायचे. आताच्या सीबीएस्सीच्या शाळांनी कंजूषपणे आणि उपकार केल्यासारखी दिलेली २ दिवसांची सुट्टी नव्हती तेव्हा, आम्हाला चांगली आठवडाभर सुट्टी असायची गणपतीची. त्यामुळे गणपती आणि सुट्टी असा दोन्हीचा मिळून उत्साह असायचा. सोसायटीमध्ये फार कोणाच्या घरी गणपती नव्हते त्यावेळी, त्यामुळे सोसायटीचा सार्वजनिक गणपती हाच आम्हाला आमच्या घरच्या बाप्पासारखा होता. आणि ज्यांच्या घरी गणपती यायचा ते सुद्धा सोसायटीच्या उत्सवात तेवढ्याच उत्साहाने सामील असायचे. गणपतीत वेगवेगळे कार्यक्रम असायचे, डान्स, फॅन्सी ड्रेस, नाटक, क्विझ शो, चित्रकला स्पर्धा आणि अजून बरंच काय काय. त्यामुळे ऑगस्ट मध्ये चाचणी परीक्षा संपली, की लगेच गणपतीच्या कार्यक्रमांचे वेध लागायचे. महिनाभर आधीपासून डान्सची तयारी सुरु व्हायची. कोणतं गाणं निवडायचं, त्यात कोणाला घ्यायचं, कोणी कुठे उभं राहायचं इथपासून ते मग कोणता ड्रेस घालायचा, मेकअप कोण करणार इथपर्यंत बऱ्याच गोष्टीवर चर्चा चालायची. त्यात मग कधी कधी वाद, भांडणं, कट्टी बट्टी होऊन एका ग्रुपचे ३-४ वेगवेगळे ग्रुप पण पडायचे. पण काही झालं तरी उत्साह मात्र कमी व्हायचा नाही. उलट असे ग्रुप झाल्यावर अजूनच चेव यायचा, आता तर आपलाच डान्स सर्वात छान व्हायला हवा, आता काही करून त्यांना हरवून आपणच पहिलं बक्षीस घ्यायला हवं अशी चढाओढ लागायची. या सगळ्यासाठी गाण्याची कॅसेट आणण्यापासून सुरुवात व्हायची. तेव्हा आतासारखी लगेच एका क्लिक मध्ये गाणी ‘फ्री डाउनलोड’ होत नव्हती. मग आधी कोणाकडे कॅसेट आहे का त्याची चौकशी व्हायची आणि अगदीच पर्याय नसेल तर मग सगळ्यांनी मिळून पैसे काढून ती कॅसेट विकत आणायची. डान्स बसवण्यासाठी कधी कधी सोसायटीमधल्याच मोठ्या ताई दादांची मदत घेतली जायची. महिनाभर कसून तयारी चालायची.

चतुर्थीच्या दिवशी सगळेजण ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठून अंघोळ करून, नवीन कपडे घालून तयार असायचे. १० वाजल्यापासूनच मंडपाच्या आवारात सगळेजण जमायचे आणि आतुरतेने बाप्पाच्या येण्याची वाट बघायचे. त्यावेळी आतासारखे स्मार्टफोन नसल्यामुळे, बाप्पाला आणायला गेलेल्या लोकांशी संपर्क साधायची काहीच सोय नव्हती, त्यामुळे नेमकं ‘स्टेटस’ कळायचं नाही. फक्त गणपती आणायला गेलेत आणि आपण तो येईपर्यंत वाट बघायची एवढंच माहित असायचं. पण तरी त्याचा त्रास नाही झाला कधी, उलट त्या वाट बघण्यात, त्या आतुरतेत पण एक वेगळाच आनंद होता. जरा कुठे ढोल वाजवण्याचा आवाज आला, की आम्ही सगळे लगेच गेटजवळ पळायचो, आपला बाप्पा आलाय का ते बघायला. शेवटी एकदाचा आपला बाप्पा येताना दिसला, की मागच्या रस्त्यावरच जाऊन ट्रकला गाठायचो आणि मिरवणुकीत सामील व्हायचो. बाप्पाची मूर्ती बघितल्यावर जो आनंद व्हायचा ना, तो शब्दात सांगता न येण्यासारखा असायचा. रस्त्यापासून सोसायटीच्या आवारात येईपर्यंत आम्ही हळू हळू त्या ट्रकच्या मागे मागे चालत जायचो. ढोल ताशांच्या गजरात, “गणपती बाप्पा मोरया” च्या जयघोषात, लहानांसोबतच मोठेही भान हरपून नाचत असायचे. गेटमधून आत शिरताना फटाक्यांची माळ लावली जायची. मंडपा जवळ आल्यावर सगळ्या सुवासिनी काठापदराच्या साड्या नेसून, नथ घालून नटून थटून, हातात आरतीची ताटं घेऊन तयार असायच्या. सगळ्या आळीपाळीने बाप्पाला ओवाळायच्या. आणि मग यथावकाश बाप्पा आपल्या आसनावर विराजमान व्हायचे.

मग यायची आरतीची वेळ. आरती म्हणजे एक मोठा ‘इव्हेंटच’ असायचा आणि त्यासाठी कसला जोश असायचा सर्वांना म्हणून सांगू. “निढळावरी कर” च्या वेळी सगळ्यांचा जो आवाज लागायचा, तो माईकशिवायही शेवटच्या बिल्डिंग मधल्या सर्वात शेवटच्या घरात ऐकू जायचा. आरतीचे पुस्तक न बघता कोण जास्तीत जास्त अचूक आरती म्हणून दाखवतोय यासाठी आमच्यात स्पर्धा लागायची. “घालीन लोटांगण” च्या वेळी तर जणू सगळ्यांच्या अंगात वेगळंच वारं शिरायचं. त्या वेळी इतकी वर्षं, न चुकता नित्यनेमाने त्या आरत्या म्हटल्यात म्हणूनच की काय, ते इतकं पक्क बसलंय डोक्यात की, आता सुद्धा कधी अचानक झोपेतून उठवून कोणी अर्ध्यातूनच “आषाढी कार्तिकी भक्तजन येती” अशी सुरुवात केली ना, तरी आपोआप तोंडातून “चंद्रभागेमध्ये स्नाने जे करती” हे निघेलच. या आरत्या म्हणजे जणू माझ्या मेंदूचा एक अविभाज्य भागच होऊन बसलाय, ठरवून विसरायचं म्हटलं तरी विसरता नाही येणार.

ते पाच दिवस आम्ही सगळेच दिवसभर मंडपातच पडलेले असायचो. खेळ असो की भांडण, सगळं मंडपातच, बाप्पाजवळ. फक्त जेवण आणि झोपण्यापुरतंच काय ते घरात जायचो. त्यासाठी आईबाबांचा इतका ओरडा खाल्लाय, पण काही फरक पडायचा नाही. खेळाबरोबरच तिथल्या मोठ्यांनी सांगितलेली सगळी कामं सुद्धा तेवढ्याच उत्साहाने आणि आनंदाने करायचे सगळेजण. कधी दर्शनाला आलेल्यांना प्रसाद दे, कधी फुलं आणून दे, कधी प्रसादासाठी आणलेले मोठे लाडू फोडून त्याचा भुगा करा आणि अजून बरंच काय काय. काम कोणतंही असो, पण ते बाप्पाचं आहे, आपण बाप्पाचं काहीतरी काम करतोय याचाच एवढा अभिमान वाटायचा. आणि कितीही कामं केली किंवा कितीही दमलो तरी दोन्ही वेळची आरती मात्र कधीही चुकवायचो नाही. मंडपातून पाय निघायचाच नाही. रात्रीच्या कार्यक्रमांसाठी लवकर जेवण आटपून यायचं आणि पुढची जागा पकडायची. ज्या दिवशी आपला डान्स असेल तेव्हा तर बघायलाच नको. संध्याकाळपासूनच तयारीला सुरुवात व्हायची, ड्रेस घाला, साडी नेसवा, केसांचं गंगावन लावा, मेकअप करा. आपण डान्स करणार त्याचा उत्साह, ती हुरहूर, स्टेजवर गेल्यानंतर वाटणारी किंचितशी भीती, पण मग नाचायला सुरुवात केल्यानंतर येणारी मजा, तो संपल्यावर होणारा टाळ्यांचा कडकडाट, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं आपल्याबद्दलचं कौतुक, या सगळ्यात एक वेगळीच मजा होती, एक नशा होती. ते पाच दिवस जणू सगळेच जण एका वेगळ्याच विश्वात असायचे, सगळं वातावरणच एकदम भारावलेलं, मंत्रमुग्ध झालेलं असायचं.

पाचवा दिवस उजाडायचा तोच जड अंतःकरणाने. बाप्पा जाणार हा विचारच सहन व्हायचा नाही, पोटात कसंतरीच व्हायचं. असं वाटायचं, दिवस संपूच नये, वेळ जागच्या जागी थांबून राहावी. संध्याकाळची शेवटची आरती झाल्यावर तर खूपच भरून यायचं. प्रत्यक्ष विसर्जनाला जरी गेलो नाही तरी जशी येताना सोबत करायचो तसेच जातानाही ट्रकच्या मागेमागे जायचो आम्ही, अगदी तो पार हायवेला लागेपर्यंत आम्ही मिरवणुकीत सामील असायचो. प्रत्यक्ष विसर्जनाला मी एकदाच गेले होते पण तेच पहिलं आणि शेवटचं. मला वाटतं ८वीत असेन मी त्या वेळी. मोठया उत्साहाने गेलो होतो आम्ही सगळे विसर्जनाला, पण त्या ठिकाणी बाप्पाला प्रत्यक्ष पाण्यात बुडताना बघून डोळ्यात पाणीच आलं. थोड्या लहान मुली होत्या त्या तर तिकडेच रडायला लागल्या. आम्ही थोड्या मोठ्या होतो म्हणून तिकडे नाही रडलो, पण घरी आल्यावर बाथरूम मध्ये जाऊन गपचूप अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर पुन्हा कधी विसर्जनाला जायचं नाही म्हणून मी जे ठरवलं ते आजतागायत पाळलंय. मला कोणी लहान म्हणा किंवा काहीही म्हणा, पण आज एवढी मोठी झाले तरीही बाप्पाला असं पाण्यात बुडावताना बघून मला रडूच येतं. “पुढच्या वर्षी लवकर या” असं म्हणणं खूप सोपं असतं पण प्रत्यक्ष बाप्पाला निरोप देणं खूप कठीण. तो गेल्यावर मग पुढचे काही दिवस तो सुना सुना झालेला मंडप बघणं ही एक शिक्षाच असायची, जिवावर यायचं ते. गेल्या ५ दिवसातली सगळी मजा पुन्हा पुन्हा आठवत राहायची आणि त्या आठवणींनी मन अस्वस्थ व्हायचं. जणू काही आपल्या घरातलाच कोणीतरी माणूस दूर गेलाय असं वाटायचं. २ दिवस फार दुःखात जायचे, मग पुन्हा हळूहळू सगळं नॉर्मल व्हायला सुरुवात व्हायची. After all, show must go on.  त्या पाच दिवसातल्या सगळ्या आठवणी मनात साठवून सुट्टी संपल्यावर आम्ही शाळेत जायचो,  कारण शाळेत पुन्हा एकमेकांना आपापल्या गणपतींची मजा सांगायची असायची, गणेशोत्सवावर निबंध लिहिताना तेच सगळं लिहायचं असायचं.

वर्षांमागून वर्षं सरली, शाळा संपली, कॉलेज सुरु झालं. आता आपण मोठे झालो म्हणून हळूहळू कार्यक्रमात भाग घेणं कमी झालं, नंतर तयारी मध्ये सुद्धा भाग घ्यायला वेळ मिळेनासा झाला. सगळे आपापल्या करिअरच्या मागे लागले, कोणी सायन्स, कोणी कॉमर्स, कोणी एमबीए. आणि नंतर सगळे आपापल्या व्यापात इतके गढून गेले की नंतर नंतर तर दुसऱ्यांचे डान्स बघण्यासाठी सुद्धा यायला वेळ मिळेनासा झाला. की त्यातला इंटरेस्ट संपला काय माहित? गणपतीचं सगळं उत्साहाने करणारी ती आमची शेवटची पिढी होती की काय कोण जाणे? आमच्यातले सगळे आता आपापल्या नोकरी धंद्यात छान सेटल झालेत. अनेकांची लग्नं झाली, बरेच जण आई बाबा पण झालेत. बरेच जण इथून सोडून दुसरीकडे राहायला गेले, जे उरलेत माझ्यासारखे, तेही आपल्याच विश्वात इतके गढलेले की असून नसल्यासारखेच.

हो… मी स्वतःलाही त्यात धरतेय कारण आज इतक्या वर्षांनी मंडपात कार्यक्रम बघायला गेल्यावर मला माझ्याच सोसायटीत नवख्यासारखं वाटत होतं. खूपसे अनोळखी चेहरे दिसत होते. आणि मग अचानक आठवलं, की गणपती फक्त एक देव किंवा उत्सव नव्हता, तो एक मार्ग होता लोकांना भेटण्याचा, ते एक निमित्त होतं एकमेकांशी संवाद साधण्याचं. एकाच सोसायटीत राहूनही आपण बऱ्याचदा खूप लांब असतो एकमेकांपासून. अशा उत्सवांच्या निमित्ताने लोक भेटतात, बोलतात, सुख दुःख बोलली जातात, नवीन लोकांच्या ओळखी होतात. गेल्या अनेक वर्षात मी या उत्सवात सामील होणंच सोडलं होतं, त्यामुळेच की काय, माझा पूर्ण सोसायटीशीच संबंध तुटल्यासारखा झालाय. कोण नवीन लोक राहायला आले, कोण गेले, कोणाची मुलं किती मोठी झाली, मला काहीच माहित नव्हतं. तरीही मी म्हटलं, बघूया थोडा वेळ थांबून, लहान मुलांचे काय कार्यक्रम आहेत ते.

स्टेजवर आत्मविश्वासाने कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी मुलं बघून मी पुन्हा एकदा फ्लॅशबॅक मध्ये गेले. ही सगळी मुलं माझ्यापेक्षा जवळजवळ 10-12 वर्षांनी लहान, आमच्या समोर जन्माला आलेली, ज्यांचे एकेकाळी लाडाने गाल ओढायचो, कडेवर घेऊन फिरवायचो, ती ही सगळी छोटी छोटी पिल्लं, आज आत्मविश्वासाने कार्यक्रमाची सगळी सूत्र सांभाळत होती. कधी मोठे झाले हे सगळे? कधी निघून गेली ही मधली वर्षं? किती पटकन निघून जातो ना वेळ, कळतच नाही. पण एकीकडे त्यांचं कौतुक वाटत असतानाच, दुसरीकडे मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमात भाग घेणाऱ्या मुलांकडे बघून भ्रमनिरास झाला. मुळात भाग घेणाऱ्यांची संख्याच खूप कमी होती. आमच्या वेळी इतके लोक असायचे की ११-११.३० झाले तरी कार्यक्रम संपायचेच नाहीत. आणि आता तर मुश्किलीने 4-5 डान्स परफॉर्मन्स होते. आणि असं नाही की मुलं नाहीयेत किंवा कमी आहेत. एरवी मी बघते ना खेळताना, खूप आहेत लहान मुलं पण तरी इथे भाग घेणाऱ्यांची संख्या कमी का? जे थोडेफार होते त्यांना सुद्धा टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायला त्यांचे मित्र मैत्रिणी फार कोणी नव्हते, मुळातच प्रेक्षक खूप कमी होते. का व्हावं असं?

या ४-५ दिवसांत मी सगळा उत्सव पुन्हा एकदा नीट बघितला, बऱ्याच वर्षांनी. आणि मग जाणवायला लागलं की खूप काही बदललंय. आताच्या मुलांना या सगळ्यात रस का उरला नाही? त्यांना का नाही वाटत आपण सजावट करायला मदत करावी, छोट्या मोठ्या सगळ्या कामात पुढे पुढे करावं, डान्समध्ये भाग घ्यावा, स्पर्धा करावी. का नाही वाटत? त्यांना सुट्टीनंतर शाळेत जाऊन आपल्या मित्रमैत्रिणींना गणपतीच्या गमती जमती सांगाव्याशा नसतील का वाटत? आणि मग मला पटकन आठवलं की आताच्या कॉन्व्हेंट आणि सिबीएससी आयसीएस्सी वगैरेंच्या शाळांना मुळात गणपतीची सुट्टीच नसते आमच्या सारखी आठवडाभर. मग उत्साह कुठून येणार? आणि मुळात गणेशोत्सव म्हणजे काय, टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु केला वगैरे गोष्टी त्यांना शिकवत असतील का शाळेत, हाच प्रश्न आहे. निबंध वगैरे लिहायचा प्रश्नच येत नाही कारण आताच्या मुलांना शाळेत ‘प्रोजेक्ट’ करायला देतात, ज्याची माहिती ते आयती इंटरनेटवरून शोधून काढतात. इथे प्रत्यक्ष अनुभव मंडण्याची गरजच नाही आणि घेण्यात तर अजिबातच रस नाही. कारण प्रत्यक्ष अनुभव घेण्यापेक्षा इंटरनेट आणि यू ट्यूब वरचे व्हिडिओ बघण्यात त्यांना जास्त आनंद वाटतो. निदान प्रसाद मिळतो म्हणून तरी आरतीला जावं असं वाटण्याची यांना गरजच नाही कारण लहानपणापासूनच पिझ्झा आणि बर्गरची चव चाखलेल्या यांना, बुंदीचे लाडू, गूळ खोबरं, गोड शिरा आणि लाह्यांची मजा कशी कळणार? डान्स आणि नाटक किंवा चित्रकलेत बक्षीस मिळवावं असं यांना वाटत नाही कारण फक्त अभ्यासात मार्क मिळवून,वर्गात पाहिलं यायचं हेच ध्येय आहे त्यांच्यासमोर. सगळे रेसमध्ये धावणारे घोडे. पण या स्पर्धेच्या जगात धावताना आपण किती छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाला मुकतोय हे कोण सांगणार त्यांना? त्या दिवशी प्रेक्षकांमध्ये जी काही थोडीफार लहान मुलं बसली होती, त्यातलीही अर्धी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींना प्रोत्साहन द्यायचं सोडून मोबाईल वर गेम खेळताना बघितली ना, तेव्हा एका क्षणाला वाटलं की, आताची मुलं खरंच स्मार्ट झालीयेत की त्यांच्यातला निरागसपणाच हरवलाय? आरती बद्दल तर बोलायलाच नको. मराठी आईबापांच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा जी मुलं अडखळत मोडकी तोडकी मराठी बोलतात त्यांच्याकडून “अच्युतम केशवम रामनारायणम्” म्हणण्याची तर मी अपेक्षाच करत नाही. पण हल्ली “निढळावरी कर” चे सुद्धा सूर ऐकू येत नाहीत, आजकाल आरती सुद्धा ‘कस्टमाईज्ड’ करून आपल्या सोयीने जेवढी जमेल तेवढीच म्हणतात की काय कोण जाणे? सोसायटी तीच, मंडप तोच, बाप्पाची मूर्तीही तीच. पण उत्सव मात्र तो राहिला नाही. त्यात पूर्वीसारखा सळसळता उत्साह दिसत नाही, एक प्रकारची मरगळ दिसते, उदासीनता दिसते. दिव्यांची रोषणाई असते पण ते पाच दिवस मंडप लहान मुलांनी गजबजल्यावर त्याला जी झळाळी येते ना, ती दिसत नाही, कारण कोणी गर्दीच करत नाही.

समोर “आ रे प्रीतम प्यारे” वर चाललेला डान्स बघून क्षणभर मला वाटलं की आपणच जावं स्टेजवर आणि ६वीत असताना केलेला “सनईचा सूर” गाण्यावरचा डान्स करावा. पण आता मला जमेल का? जिच्यासोबत मी तो केला होता ती माझी सगळ्यात जवळची मैत्रीणही आता इथे नाही. आम्हाला प्रोत्साहन देणारेही नाही आणि चिडवण्यासाठी टिवल्या बावल्या करणारेही नाही. मुळात तेव्हा जी होते, ती माझी मीच आता राहिले नाही. माझ्यातला तो निरागसपणा हरवलाय. कदाचित, माझ्या वयाच्या, माझ्या बरोबरीच्या, सगळ्यांमधलाच तो निरागसपणा हरवलाय. की कदाचित या सगळ्या गणेशोत्सवामधलाच निरागसपणा हरवलाय? कोण जाणे.

५ दिवसांनी बाप्पा नेहमीप्रमाणे निघून जाईल, पण आता नेहमीसारखी हुरहूर लागणार नाही, अस्वस्थ वाटणार नाही. कारण ते सगळं तर तो आल्या दिवसापासूनच वाटतंय, ती हुरहूर आणि अस्वस्थता बाप्पाच्या जाण्याची नाही तर तो येऊनही कसलाच उत्साह नसल्याची आहे. “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना अजून एक सांगावंसं वाटतंय तुला बाप्पा. पुढच्या वर्षी येताना आमच्यासाठी आमचं बालपण पुन्हा घेऊन येशील का रे? पुन्हा एकदा तुझ्यासाठी सजावट करायची आहे, पुन्हा एकदा जोरजोरात तुझ्या आरत्या म्हणायच्या आहेत, दिवसभर दमेपर्यंत तुझ्या मंडपाजवळ खेळायचंय, महिनाभर डान्सची तयारी करून दुसऱ्या ग्रुपला हरवायचंय, तुला निरोप देताना पुन्हा एकदा खूप खूप रडायचंय. पुन्हा एकदा लहान व्हायचंय. जमेल का रे तुला आम्हाला परत लहान करायला? आणि ते नाहीच जमलं तर निदान या आताच्या मुलांना आमचा तो निरागसपणा देशील का रे? जेणे करून ती मुलं पुन्हा तीच सगळी मजा करतील जी आम्ही केली होती. निदान त्यांना बघून तरी आम्ही आमचं बालपण पुन्हा जगू, आमच्या आठवणीतला गणपती, तो गणेशोत्सव पुन्हा एकदा अनुभवू. करशील का रे बाप्पा एवढं??

Advertisements

2 thoughts on “आठवणीतला गणपती बाप्पा

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s