सिंगल

सूचना: या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 🙂 😛

मानसी आपल्या डेस्कवर येऊन बसली आणि तिने कानातला हेडफोन काढला. “हुश्श” असं म्हणून तिने एक सुस्कारा टाकला आणि बॅगेतून पाण्याची बाटली काढून तोंडाला लावली. तेवढ्यात तिचा मॅनेजर शेखर तिथे घाईघाईत आला आणि म्हणाला, “मानसी कालच्या मीटिंगमधला तो रिपोर्ट आपल्याला पुन्हा एडिट करून पाठवायचा आहे. मी तुला मेल केला आहे तो बघ आणि त्याप्रमाणे एडिट करून मला आत्ता पाठव.” “पण सर, काल तर त्यांनी तो approve केला होता ना, मग आता काय झालं अचानक?” तिने विचारलं. 
“ते सगळं मी नंतर सांगतो तुला.” शेखर म्हणाला. “आत्ता तो गॅरी माझ्या डोक्यावर बसलाय, त्याला लगेच नवीन रिपोर्ट हवा आहे. So please send it to me as soon as possible.” 
“हो सर. मी आत्ता लगेच पाठवते.” असं म्हणून मानसीने लगेच लॅपटॉप उघडला. ती पटापट रिपोर्ट एडिट करत होती तेवढ्यात राजन आला. “गुड मॉर्निंग.” त्याने तिच्याकडे बघून म्हटलं. “मॉर्निंग” तिने लॅपटॉप मधून डोकं बाहेर न काढताच त्याला उत्तर दिलं. “अजून कोणीच आलं नाही वाटतं.” तो इकडेतिकडे बघत म्हणाला. पण मानसीने त्याला काहीच उत्तर दिलं नाही. ती तिच्या कामात गढून गेली होती. “हॅलो, मी तुझ्याशी बोलतोय.” तो तिच्या डेस्कजवळ येत म्हणाला. “राजन मी खूप महत्वाच्या कामात आहे, आपण नंतर बोलूया प्लीज.” तिने त्याच्याकडे न बघताच उत्तर दिलं. त्याला ते थोडंसं खटकलं. पण तरीही चेहऱ्यावर न दाखवता तो म्हणाला, “ओके, फ्री झालीस की सांग.” तिने काहीच उत्तर दिलं नाही 

रिपोर्ट एडिट करून तिने शेखरला पाठवला. मग पुन्हा दोघांनी कालच्या मीटिंगबद्दल काही चर्चा केली. या सगळ्यात अर्धा तास निघून गेला. “थँक्स. एवढ्या पटकन सगळं केल्याबद्दल.” शेखर तिला म्हणाला. “आज तू नसतीस तर काही खरं नव्हतं. त्या गॅरीला सगळं किती परफेक्ट लागतं, माहित आहे ना. पण तुझ्याबद्दल मला खात्री होतीच की तू सगळं नीट हँडल करशील. Thanks again.” मानसी हसली आणि म्हणाली, “Most welcome Sir.” “बरं ऐक, पुढच्या आठवड्यातल्या रिलीजचे डिटेल्स आलेत. ते जरा बघून घे आणि काही Queries असतील तर लगेच document कर.” शेखर म्हणाला. “हो सर, मी करते पण…  If its not urgent,मी जरा फ्रेश होऊन येऊ का?” तिने विचारलं. “म्हणजे मघाशी मी आल्या आल्याच तुम्ही….” ती बोलता बोलता थांबली. “Ohh yes yes… of course.” शेखर म्हणाला. “माझ्या लक्षातच नाही आलं. सॉरी. आणि त्याची काही घाई नाही, पण संध्याकाळपर्यंत पूर्ण कर ते. आणि हो आलोकला सुद्धा घे तुझ्यासोबत.” “हो सर नक्की.” असं म्हणून ती पुन्हा आपल्या डेस्कवर आली. 

तोपर्यंत आलोक आणि बाकी सगळे पण आले होते. राजन तिच्याकडे बघत होता, वरपासून खालपर्यंत. अर्धवट बांधलेले केस, प्रवासामुळे जरासे विसकटलेले, मरून रंगाचा शर्ट, खाली काळी ट्राऊजर, हिल शूज. कपडे किंचित फिटिंगचे असल्याने तिच्या शरीराचे सगळे भाग उठून दिसत होते. राजनची नजर एका भागावर खिळली होती. “काय रे काय बघतोयस?” तिच्या प्रश्नाने तो भानावर आला. तो काही बोलणार एवढ्यात राजश्री म्हणाली, “ए मानसी, शर्ट छान आहे ग तुझा.” “अं… हो. मी पण तेच बघत होतो.” राजनला सांगायला आयतं कारण मिळालं. “मी तुला सांगणारच होतो, की शर्ट खूप छान आहे पण तेवढ्यात हीच बोलली.” तो हसून म्हणाला. “थँक्स.” मानसीने राजश्रीकडे बघून म्हटलं आणि राजनकडे न बघताच पुढे आलोकच्या डेस्कवर गेली आणि म्हणाली, “आलोक, आपल्याला पुढच्या आठवड्यातल्या रिलीजचे डिटेल्स बघायचेत, शेखर सरानी सांगितलंय. तू सुरुवात कर, मी तोपर्यंत आले फ्रेश होऊन.” ” हो ठीक आहे.” आलोक म्हणाला आणि क्षणभर तिच्याकडे बघत राहिला. “काय रे काय झालं?” तिने विचारलं. “अं… काही नाही.” त्याने लगेच नजर हटवली आणि म्हणाला, “हे इअररिंग्स छान आहेत.” ती हसायला लागली. “अरे हे तू मला जवळजवळ १० वेळा सांगितलं आहेस याच्या आधी. मला माहित आहे हे इअररिंग्स तुला खूप आवडतात.” तो ओशाळला. काय बोलावं त्याला कळत नव्हतं म्हणून त्याने लॅपटॉपमध्ये डोकं घातलं. मानसी हसून वॉशरूम कडे जाण्यासाठी वळली तेवढ्यात राजन म्हणाला, “झालीस का फ्री?” “काय काम आहे?” तिने रुक्ष स्वरात विचारलं. “नाही काम असं काही नाही, सहज.” तो हसून म्हणाला. “मघाशी खूप कामात होतीस, एवढं काय अर्जंट होतं?” त्याने विचारलं. “त्याबद्दलचा मेल पाठवलाय शेखर सरांनी सगळ्या टीमला. चेक कर म्हणजे कळेल.” ती म्हणाली. “अजून काही?” तिने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. ” नाही काही नाही.” तो म्हणाला. त्याचं उत्तर पूर्ण व्हायच्या आधीच ती वॉशरूमच्या दिशेने चालायला लागली होती. 

‘ऍटिट्यूड तर बघा किती. तो स्वतःशीच म्हणाला. ‘पण एवढ्या हॉट मुलींना थोडा तरी ऍटिट्यूड हवाच ना. असं म्हणून तो स्वतःशीच हसला. 

—————————————————————————————————————————————–

जेवणाची वेळ झाली. राजश्री, दीपाली आणि सुवर्णा आपापले डबे घेऊन उठल्या. “ए चल येतेस ना.” त्यांनी मानसीला विचारलं. “नाही ग, आमचं अजून थोडं बाकी आहे.” ती म्हणाली. “आणि तसंही मी डबा नाही आणलाय आज. सो तुम्ही व्हा पुढे. मी आणि आलोक जेवू नंतर.” आलोक तिच्या डेस्कवर तिच्या शेजारीच बसला होता. त्या तिघी जेवायला निघून गेल्या. आलोक आणि मानसी पुन्हा कामात दंग झाले. राजन तिच्या डेस्कजवळ येत म्हणाला, “मी पण नाही आणलाय आज डबा, चल कुठेतरी बाहेर जाऊया आज.” “नाही नको, काम खूप आहे आज. बाहेर जाऊन यायला उशीर होईल. मी खाईन काहीतरी कॅन्टीन मध्ये.” “अच्छा, चल मग जाऊया.” तो म्हणाला. “मी आताच त्यांना काय सांगितलं कळलं नाही का तुला.” ती त्रासिक स्वरात म्हणाली. “आम्हाला वेळ लागेल, तू जा पुढे.” त्याने काही क्षण विचार केला मग म्हणाला, “मी पण थांबतो तुमच्यासोबत. मलाही अजून तशी भूक नाही लागली.” मानसीने आता लॅपटॉपवरून मान पूर्ण वाळवून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, “ठीक आहे थांब तू, पण इथे नको तुझ्या डेस्कवर जा.” “म्हणजे?” त्याने गोंधळून विचारलं. “तुला पुढच्या महिन्याच्या रिलीजचे एस्टीमेट्स काढायला सांगितले आहेत ना सरांनी, ते झाले का?” तिने विचारलं. तो जरासा गडबडला. “अं.. नाही अजून नाही झालं.” “अरे मग कर ते.” ती म्हणाली. “उद्याच्या मीटिंगमध्ये त्यातलेच इनपुट्स लागणार आहेत. ते झालं की मग ये हा इकडे आमच्या सोबत.” तिच्या या वाक्यावर राजन निरुत्तर झाला आणि त्याच्या डेस्कवर गेला. काही वेळाने उठून जेवायला निघून गेला. 

आलोक आणि मानसी दोघे कँटीन मध्ये आले. “आज पण चांगलं काहीच नाहीये.” मानसी मेनूकडे नजर टाकत म्हणाली. “दाल राईसच घेते आता.” असं म्हणून ती काउंटरकडे वळणार एवढ्यात आलोक म्हणाला, “आपण माझा डबा शेअर करूया ना. मी थालीपीठ आणलेत.” “वाह, थालीपीठ.” मानसी आनंदाने म्हणाली. “मला खूप आवडतात. पण तुला कमी पडतील ना.” 
“अगं आहेत भरपूर, एवढा नको विचार करुस.” आलोक म्हणाला. “आणि समजा माझं पोट नाहीच भरलं तर मग घेऊ आपण कँटिनमधून काहीतरी.” तिने हसून मान हलवली आणि दोघेही खायला बसले. “आज डबा का नाही?” त्याने विचारलं. “अरे आज जरा उशीर झाला उठायला, त्यामुळे वेळ नाही मिळाला.” ती म्हणाली. “अच्छा… पण तुझ्या रूममेटनी काहीतरी बनवलं असेल ना, एक दिवस आणायचं त्यातलं.” तो म्हणाला. ती काहीच बोलली नाही त्यावर. “सॉरी म्हणजे, तुझ्या रूममेट्सना चालणार नाही का?” त्याने गंभीरपणे विचारलं. “मी आपलं असच सहज बोललो, सॉरी.” 
“अरे नाही नाही. सॉरी काय त्यात.” ती हसून म्हणाली. “actually माझ्या रूममेट्स जास्त काही बनवत नाहीत. बऱ्याचदा बाहेरूनच आणतात. मीच एकटी काय ते बनवते, मला जास्त नाही आवडत बाहेरचं खायला.” “हं.. चांगलं आहे.” तो म्हणाला. “बाहेरचं शक्यतो खाऊच नये.” “ए पण ही थालिपीठं खूपच मस्त झाली आहेत हा.” ती म्हणाली. “एकदम Delicious. काकींना सांग माझी कॉम्प्लिमेंट आणि थँक्स पण सांग.” त्याने हसून मान हलवली. 

—————————————————————————————————————————————–

आलोक आणि राजन संध्याकाळी चहा पीत कॅंटीनमध्ये बसले होते. “काय मग, कसं झालं तुमचं आजचं काम?” राजनने विचारलं. “आणि तुमचं लंच?” असं म्हणून त्याने डोळे मिचकावले. “कसं म्हणजे? नेहमीसारखंच.” आलोक म्हणाला. “आज काय विशेष होतं का?” त्याने विचारलं. 
“विशेष म्हणजे, मानसी बरोबर रे.” राजन पुन्हा डोळे मिचकावत म्हणाला. “पण तू काही म्हण हा, तुझ्यावर जरा जास्तच मर्जी आहे तिची.” चहाचा घोट घेता घेता तो म्हणाला. “काय? कसली मर्जी? काय बोलतोयस मला काही कळत नाहीये.” आलोक म्हणाला. “मग, मर्जी नाहीतर काय?” राजन म्हणाला. “तुझ्या एकट्याबरोबरच काम करायचं होतं आज तिला आणि जेवायलाही तुम्हा दोघांनाच जायचं होतं. मला कसं कटवलं बघितलंस ना.” “असं काहीही नाहीये. उगाच काहीही बोलू नकोस.” आलोक म्हणाला. “त्या रिलीजवर आम्ही दोघांनी काम करायचंय असं शेखर सरांनीच तिला सांगितलंय, तिने स्वतः काही ठरवलं नाही. आणि तुला दिलेल्या कामाची आठवण करून दिली तर त्यात काय चुकलं तिचं? तू तेव्हा आमच्याबरोबर बसला असतास तर तुझं काम कधी केलं असतंस?” “तुला भारी पुळका आहे रे तिचा.” राजन म्हणाला. “आणि असणारच म्हणा, तुझ्यावर एवढी मर्जी आहे तिची म्हटल्यावर…. नाहीतर आम्हाला कोण भाव देतंय.” 
त्यावर आलोक काही बोलणार एवढ्यात मानसी तिकडे आली. “Can I join you guys?” तिने विचारलं. “Yes of course.” आलोक हसून म्हणाला. ती त्याच्या बाजूला बसली. “काय मग मानसी, वीकेंडचा काय प्लॅन?” राजनने विचारलं. “काही खास नाही.” ती म्हणाली. “म्हणजे अजून तरी काही ठरलं नाही.” “ग्रेट, मग ठरवूया. मुव्हीला जाऊया का?” असं बोलता बोलता त्याने तिच्या हाताला स्पर्श केला. तिने पटकन हात मागे घेतला आणि म्हणाली, “नाही नको, मला मुव्हीज बघायला जास्त नाही आवडत.” एवढ्यात तिचा फोन वाजला. “Excuse me” असं म्हणून ती उठून गेली. 
“बघितलंस? आता पण मला कसं कटवलं ते.” राजन म्हणाला. “आणि तुला खूप पुळका येतो तिचा.”
“पुळका नाही.” आलोक म्हणाला, ” ती कामाच्या बाबतीत खूप सिरिअस आहे एवढंच म्हणालो मी. सगळी कामं वेळच्या वेळी पूर्ण करायची असतात तिला. आणि तेवढीच हुशार पण आहे. मघाशी माझ्या नजरेतून सुटलेल्या बऱ्याच गोष्टी तिने लक्षात आणून दिल्या माझ्या. She is brilliant यार.” 
“तिच्यासोबत बसल्यावर गोष्टी नजरेतून सुटणारच ना.” राजन हसत हसत म्हणाला. “कारण नजर तिच्यावरच असते.”
“प्लिज हा… काहीही बोलू नकोस. असं काहीही नाहीये.” आलोक वैतागून म्हणाला. “माझं नीट लक्ष असतं कामात. तुझ्यासारखा मुली बघत नाही मी.”
“हो हो माहित आहे माहित आहे.” राजन म्हणाला. ” हुशार तर ती आहेच. पण घमेंडी सुद्धा.”
“म्हणजे?” आलोकने विचारलं. “अरे म्हणजे जरा जास्तच बोलते ना. स्वतःचा मुद्दा दुसऱ्याला पटेपर्यंत सोडत नाही. त्या दिवशी क्लायंटशी पण किती वाद घातला बघितलंस ना? आजवर एवढं कोणी बोललं होतं का त्याला?”  राजन म्हणाला. 
“वाद नव्हती घालत. ती फक्त तिचा मुद्दा पटवून देत होती ते पण शांतपणे, politely” आलोक म्हणाला. “आणि तो बरोबरच होता. आता ती प्रोसेस बदलल्यामुळे काम किती सोपं झालंय आपलं. खरं तर हे आपणच करायला हवं होतं आधी पण आपल्या कोणाच्या लक्षातच नाही आला तो पॉईंट. हेच मी म्हणतोय ना, ती हुशार आहे आपल्या सगळ्यांपेक्षा. ज्या गोष्टी आपल्या नजरेतून सुटतात त्या सुद्धा ती बरोबर पकडते.” 
“हं… बरोबर पकडायलाच पाहिजे.” राजन तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. “काय?” आलोकने विचारलं. “काही नाही” राजन म्हणाला. पण त्याची नजर अजूनही तिच्यावरच खिळली होती. ती कॅन्टीनच्या दुसऱ्या टोकाला फोनवर बोलण्यात दंग होती. आलोकची नजरही तिच्यावरच होती. ‘किती हुशार आहे ना ही. आपल्या कामात एकदम focused. झोकून देऊन काम करणारी. पण त्याचा कुठेही गर्व नाही. आणि आपल्यासोबतच दुसऱ्यालाही मदत करणारी. गेल्या ६ महिन्यात किती काय काय शिकलोय आपण तिच्याकडून. ती टीममध्ये आली आणि सगळं चेहराच बदलून गेला आपल्या टीमचा.’ तो तिच्याकडे कौतुकाने बघत होता. 

—————————————————————————————————————————————–

“पुढचे ३-४ दिवस हा असाच उशीर होणार आहे आपल्याला.” शेखर बोलत होता. “प्रॉडक्ट लॉंच होईपर्यंत रोज हे कॉल्स असणार. त्यामुळे घरी सांगून ठेवा की हा आठवडा तरी घरी यायला उशीर होईल.” मग तो सुवर्णाकडे वळून म्हणाला, “सुवर्णा, तू उद्यापासून नाही थांबलीस तरी चालेल. आज जो Overview दिला त्यावरून मानसीला जरा आयडिया आलीच असेल, त्यामुळे पुढचं सगळं तीच हँडल करेल आता. तू नेहमीच्या वेळेला निघू शकतेस.” “पण सर… मी थांबू शकते. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये.” सुवर्णा म्हणाली. “नाही पण नको त्याची काही गरज नाहीये, आणि काही डाउट असतील तर मानसी तुझ्याकडून क्लीअर करून घेईलच. तू कशाला उगाच उशिरापर्यंत थांबतेस, उगाच घरी प्रॉब्लेम होईल.” सुवर्णाने फक्त खाली मान घालून हो म्हटलं. पण तिच्या चेहऱ्यावरची नाराजी मानसीला जाणवली


२ दिवस असेच गेले. तिसऱ्या दिवशी, कॉल सुरु व्हायला जरा वेळ होता. सगळेजण आपापले रिपोर्ट बनवण्यात गुंतले होते. पण मानसी जरा अस्वस्थ होती. कामात लक्ष लागत नव्हतं. आलोकला ते जाणवलं होतं. काही वेळाने ती सुवर्णाच्या डेस्कवर गेली. ती निघण्याच्या तयारीत होती. “काय ग काही हवंय का?” सुवर्णाने विचारलं. “मला जरा तुझी मदत हवी आहे.” मानसी म्हणाली. “हो बोल ना काय झालं?” तिने विचारलं. “आज मला जरा लवकर जावं लागेल गं. तर माझा कॉल तू घेऊ शकशील का? म्हणजे फक्त आजचाच दिवस. माझा रिपोर्ट सगळा रेडी आहे, मी तुला पटकन समजावते सगळं. तेवढंच सांगायचं आहे फक्त कॉलवर.” मानसी विनवणीच्या सुरत म्हणाली. सुवर्णा क्षणभर विचारात पडली. मग म्हणाली, “नाही. मला पण नाही जमणार. मलाही जरा काम आहे.” मग म्हणाली. “आणि तसंही हे काम आता माझं कुठे राहिलंय? सरांनी सगळं तुझ्यावर सोपवलंय ना. मग तूच बघ आता सगळं.” असं म्हणून ती उठली. मानसी गोंधळून गेली. “अगं… तसं नाहीये ते. म्हणजे तू पण करू शकतेस.” ती तिला समजावत म्हणाली. “सॉरी मानसी मला नाही जमणार.” असं म्हणून सुवर्णा चालायला लागली. 

हताश होऊन मानसी आपल्या डेस्कवर आली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. “हो… मला वाटलं होतं काहीतरी ऍडजस्ट होईल. पण नाही जमलं. काय करू? हो मला माहित आहे अपॉइंटमेंट आहे पण मला नाही जमणार.” असं काहीतरी तिचं हळूहळू बोलणं चालू होतं. आलोकने ते ऐकलं. तिने फोन ठेवल्यावर तो तिच्या डेस्कवर आला आणि म्हणाला, “काही प्रॉब्लेम आहे का? मी काहीतरी अपॉइंटमेंट असं ऐकलं.” ती जरा गडबडली, २ मिनिट काहीच बोलली नाही मग म्हणाली, “अं… हो. म्हणजे मला जरा लवकर जायचं होतं घरी.” आलोकने विचारलं, “कोणाची अपॉइंटमेंट आहे?” “माझी” ती म्हणाली. “तुझी कसली? तुला काही होतंय का?” त्याने काळजीच्या स्वरात विचारलं. “अं… नाही. म्हणजे हो.” ती अडखळत बोलली. “माझा जरा दात दुखतोय, मला डेंटिस्ट कडे जायचं होतं. पण आता नाही जमणार. सुवर्णा पण गेली घरी. आता कोण घेणार माझा कॉल?” ती उदास स्वरात म्हणाली. “तुला चालणार असेल तर मी घेतो.” तो म्हणाला. “खरंच?” तिने आनंदाने विचारलं. “हो. तू फक्त रिपोर्ट तयार करून ठेव आणि मला मेल कर. किंवा नसेल झाला तरी चालेल, मी पूर्ण करतो.” तो म्हणाला. 
“नाही नाही. रिपोर्ट तयार आहे. मी करते तुला मेल.” ती म्हणाली. तिने पटकन त्याला रिपोर्ट पाठवला आणि सगळं आवरून निघाली. जाताना त्याला पुन्हा पुन्हा थँक्स म्हणाली. “No problem.” तो हसून म्हणाला. “जा लवकर And take care.” 
ती गेल्यावर राजन त्याच्याजवळ आला आणि म्हणाला, “काय रे, ही आज लवकर कशी गेली?” “अरे तिची डेंटिस्टची अपॉइंटमेंट होती म्हणून गेली. मीच म्हटलं जा, तुझे अपडेट्स मी देतो आज.” राजन हसायला लागला, “मस्त शेंडी लावून गेली तुला.” “म्हणजे?” आलोकने आश्चर्याने विचारलं. “अरे म्हणजे काय म्हणजे?” राजन हसून म्हणाला. “आज दिवसभर एकदा तरी असं वाटलं का की तिचा दात दुखतोय म्हणून. आताच अचानक दुखायला लागला? आणि अपॉइंटमेंट कधी घेतली? काहीही फेकत होती ती आणि तू लगेच पाघळलास.” 
“अरे तिची नसेल तर दुसऱ्या कोणाची तरी असेल घरात.” आलोक म्हणाला, ” आपल्याला काय करायचंय?”
“अरे कसलं घर?” राजन म्हणाला. “ती इथे पुण्यात एकटी राहते विसरलास वाटत. रूममेट्स सोबत. तिची फॅमिली इथे नाही आहे. अजून कोणाची अपॉइंटमेंट असणार? फिरायला जायचं असेल कुठेतरी, बहाणा करून गेली आहे. तुला उल्लू बनवून.” असं म्हणून तो पुन्हा हसायला लागला. “मला नाही तसं वाटत.” आलोक म्हणाला, “काहीतरी genuine कारण असणार त्याशिवाय ती जाणार नाही.” असं म्हणून तो पुन्हा कामात गर्क झाला. 

—————————————————————————————————————————————–

मानसी आलोकच्या डेस्क वर येऊन म्हणाली, “आलोक, कालच्या मीटिंगमध्ये कोणती strategy फायनल केली मला जरा सांगशील का? म्हणजे मी डॉक्युमेंट वाचलं पण तरी मला काही डाउट्स आहेत.” “हो ये बस सांगतो.” असं म्हणून त्याने तिला समजवायला सुरुवात केली. तेवढ्यात राजन तिकडे आला. “मी सांगू का?” तो मानसीला म्हणाला, “तसंही, ती strategy मीच सुचवली होती, त्यामुळे मी जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेन.” असं बोलता बोलता त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्पर्शाने ती चपापली आणि तिने खांदा हलवून त्याचा हात झटकला. आलोकलाही ते खटकलं. तिने त्याच्याकडे बघून जळजळीत नजर टाकली आणि म्हणाली, “नको. आलोक सांगेल मला, आणि तरीही नाही समजलं तर मी सरळ जाऊन शेखर सरांनाच विचारेन.” राजन गालातल्या गालात हसून म्हणाला, “ठीक आहे, As you wish”. आलोक आणि मानसीची चर्चा चालू असताना राजनचं त्यांच्यावर लक्ष होतं. तो नेहमीसारखाच तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत होता. ‘मुलगी आहे बाकी भारी. सुंदर, हुशार, स्मार्ट आणि हॉट. पण खूप भाव खाते. कितीही गोड बोललं तरी सरळ उत्तर देतच नाही. दुसरी एखादी असती तर आतापर्यंत आरामात जाळ्यात ओढली असती मी. हिच्यात का एवढा ऍटिट्यूड आहे काय माहित.’ असे सगळे विचार त्याच्या मनात चालले होते. 

थोड्या वेळाने मानसी पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली. राजन आलोकच्या डेस्कवर जात म्हणाला, “काय मग, समजली का strategy?” आलोकने काहीच उत्तर दिलं नाही. “काय रे, तुला पण भाव खायला शिकवलं का तिने?” राजन हसत हसत म्हणाला. आलोकने त्याच्याकडे रोखून बघितलं आणि म्हणाला, “तू मघाशी तिला असं टच करायला नको होतंस. तू तुझ्या लिमिट्स क्रॉस करतोयस असं नाही वाटत का तुला?” “अरे, तुला काय झालं एकदम?” राजन हसत हसत म्हणाला. “काय झालं म्हणजे?” आलोक चिडून म्हणाला, “आधी तू बाकीच्या मुलींना बघायचास तोपर्यंत ठीक होतं, पण आता तू आपल्याच टीममधल्या मुलींच्या बाबतीत असं वागणार असशील तर हे खूप चुकीचं आहे.” “मुलींच्या नाही रे, एकाच मुलीच्या.” राजन डोळे मिचकावत म्हणाला, “बाकी कोण आहे तिला सोडून टीममध्ये.” “म्हणजे?” आलोकने विचारलं. “अरे म्हणजे या सगळ्या राजश्री, दीपाली, सुवर्णा या तर सगळ्या मॅरीड आहेत ना.” “मॅरीड असण्याचा काय संबंध?” आलोकने विचारलं. “तू कसा आहेस मला चांगलं माहित आहे, सगळ्या मुलींकडे तू एकाच नजरेने बघतोस.” राजन मान हलवत म्हणाला, “नाही नाही नाही, अजिबात नाही हा. मॅरीड बायकांच्या वाट्याला आपण जात नाही. अरे दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला कशाला हात लावू मी?” आलोक त्याच्याकडे संतापाने बघत होता. “तुला काहीच लाज वाटत नाही माहित आहे मला.” तो म्हणाला. “पण तुला शेवटचं सांगतोय, मानसी पासून लांब राहा.” 

“अरे बापरे, एवढा राग.” राजन डोळे मोठे करत म्हणाला. “ती काय तुझी प्रॉपर्टी आहे की काय?” आलोक काहीच बोलला नाही. “एक मिनिट एक मिनिट.” राजन त्याच्या जवळ येऊन त्याच्याकडे रोखून बघत म्हणाला, “प्रेमाबिमात पडलायस की काय तिच्या.” आलोक काहीच न बोलता लॅपटॉपकडे वळला आणि काम करायला लागला. “अरे ए वेड्या, अरे असल्या मुलींच्या प्रेमात नसतं पडायचं बाबा. खुळा की काय तू?” “असल्या म्हणजे?” आलोकने त्याच्याकडे रोखून बघत विचारलं. “अरे असल्या म्हणजे ही अशी, सतत काम काम करणारी, हुशार, वाद घालणारी, आपले मुद्दे पटवून देणारी, रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणारी. ऍटिट्यूड किती आहे तिला बघितलं?” राजन बोलत होता. “अरे अशा मुली चांगल्या बायका कधीच होत नाहीत. They are not marriage material. बायको कशी हवी, शांत, सोज्वळ, घरकामात रमणारी, आपल्या सुखातच स्वतःच सुख मानणारी. या अशा मुली फक्त ऑफिसमध्ये बऱ्या वाटतात, घरात नाही. टाईमपास पुरत्या ठीक आहेत, प्रेमाबिमात नसतं पडायचं त्यांच्या. काय तू पण.” असं म्हणून राजन हसायला लागला. आलोक त्याच्याकडे अजूनही रोखून बघत होता, त्याच्या डोळ्यात खाऊ का गिळू असे भाव होते. पण तरीही त्याने रागाला आवर घालत म्हटलं, “तुझ्या या असल्या विचारांची ना, मला फक्त कीव करावीशी वाटते. आणि तुझी जी काही मतं असतील ना ती असू देत पण तिच्यापासून लांब राहा एवढंच सांगतोय.” यावर राजन काही बोलणार इतक्यात तिकडे मॅनेजर शेखर आला आणि म्हणाला, “चला मीटिंगची वेळ झाली. पटकन भेटा मिटिंग रूम मध्ये.” त्यांचं बोलणं तिथेच थांबलं आणि सगळे मिटिंग रूमकडे निघाले. 

—————————————————————————————————————————————–

“तर आपण ही strategy उद्यापासून Implement करतोय.” शेखर म्हणाला. “सर एक मिनिट.” त्याला थांबवत मानसी म्हणाली, “सॉरी मी काल आले नव्हते त्यामुळे हे सगळं मला आज कळलं. पण मला असं वाटत की यासाठी अजून एक दुसरा approach आपण ट्राय करायला हवा.” 

“पण ही strategy already approve झाली आहे आणि त्यासाठी क्लायंट ने appreciation पण दिलंय.” राजन म्हणाला. “हो मला माहित आहे सर.” ती त्याच्याकडे न बघताच शेखरकडे बघून म्हणाली, “पण कदाचित हा दुसरा approach जास्त effective होईल आणि त्यात वेळही वाचेल. एकदा ऐकून तरी घ्या.” “Go ahead” शेखरने परवानगी दिल्यावर मानसीने बोलायला सुरुवात केली. तिचा approach शेखर सहित सगळ्यांनाच पटला. “Wonderful” शेखर म्हणाला, “This is brilliant idea. आपल्या कोणाच्याच हे आधी कसं लक्षात नाही आलं? मानसी एक काम कर, मला पुढच्या एका तासात ही strategy डॉक्युमेंट करून मेल कर, मी लगेच क्लायंटला पाठवतो. I am sure he will love this.” “Sure sir, I’ll do it now.” मानसी हसून म्हणाली आणि सगळे उठले. राजन आतल्या आत धुमसत होता पण वरवर त्यानेही हसून तिचं कौतुक केलं. 

आलोकला बॅग भरताना बघून मानसीने विचारलं, “अरे आज लवकर निघतोयस?” “हो आईला जरा हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचंय.” आलोक म्हणाला. “Ohh… anything serious?” तिने विचारलं. “हो म्हणजे थोडंसं.” तो म्हणाला, “मागच्या आठवड्यात ईसीजी काढला होता तो नॉर्मल नव्हता. कदाचित हार्टचा काही प्रॉब्लेम असू शकतो.” “अरे बापरे.” ती म्हणाली. “बरं ऐक, तू त्यांना कोणाकडे घेऊन जातोयस मला माहित नाही पण माझ्या माहितीतले एक खूप चांगले हार्ट सर्जन आहेत. मी तुला त्यांचा नंबर देते, लगेच अपॉइंटमेंट घे. आणि हो माझ्या चांगले ओळखीतले आहेत ते गेल्या खूप वर्षांपासून, माझं नाव सांग लगेच मिळेल अपॉइंटमेंट. नाहीतर खूप दिवस लावतील.” असं म्हणून तिने त्याला एक नंबर दिला. “थँक्स अ लॉट.” तो आनंदाने म्हणाला. “अरे थँक्स काय त्यात, मित्रांसाठी एवढं तर करूच शकतो ना आपण.” ती म्हणाली. 

निघताना तो राजनच्या डेस्कजवळ येऊन म्हणाला, “तुझ्या So called टाईमपास मुलीने जेवढी आस्था दाखवली ना तेवढी दुसऱ्या कोणी नाही दाखवली आपल्या टीममध्ये माझ्या आईबद्दल.” राजनने मानेला झटका दिला आणि म्हणाला, “कळेल तुला लवकरच, कोण कसं आहे ते.” आलोक त्याच्याकडे बघून हसत म्हणाला, “तुझा प्रॉब्लेम काय आहे माहित आहे राजन, ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे आणि आजही तुझ्या strategy पेक्षा तिची strategy सरांना जास्त आवडली हे तुला सहन होत नाहीये. You are jealous.” असं म्हणून आलोक निघून गेला. 

राजन मनातल्या मनात चरफडत होता. ‘काय समजते काय ही स्वतःला? माझ्या strategy ला चॅलेंज देते काय. अरे काल परवा आलेली ही मुलगी. शेखरपासून क्लायंट पर्यंत सगळ्यांनाच आवडायला लागली आहे. म्हणजे माझी एवढ्या वर्षांची मेहनत फुकट? त्यात अजून मला जराही भाव देत नाही. अरे हिच्यासारख्या छपन्न पोरी पटवल्यात मी. ही काय चीज आहे. बघतोच हिला आता.’

—————————————————————————————————————————————–

“बघीतलंस ना”, मिटींग रूममधून बाहेर पडताना राजश्री दिपालीला म्हणाली, “या quarter चा सुद्धा Best team member चा award मानसीलाच.” “हो ना” दिपाली म्हणाली, “बाकी कोणी काही काम करतच नाहीत वाटतं, आम्ही काय झक मारतो काय”. “आपलं पण जाऊदे ग” राजश्री म्हणाली, “पण सुवर्णाने किती मेहनत घेतली होती. तिला तरी द्यायला हवा होता ना”. “काही नाही गं, ही उशिरापर्यंत थांबते ना ऑफिस मध्ये म्हणून मिळालंय हे सगळं. आणि तिला थांबायला काय. सिंगल तर आहे. याना काय कामं असतात घरी जाऊन. आपल्यासारखे हजार व्याप थोडेच आहेत यांच्या डोक्याला.” दीपाली बोलत होती. “हो ना.” राजश्री म्हणाली. “हिला काय जेवण बनवायला नको की मुलांना सांभाळायला नको. कुठून तरी मागवतात जेवण. जेवायचं आणि झोपायचं. त्यात ही तर इकडे एकटी राहते म्हटल्यावर आई बाबांचाही धाक नाही. कधीही जा ऑफिसला कधीही या, कोण अडवणार.” “तेच ना, लग्न झाल्यावर कळेल, कसं असतं ते.” दीपाली म्हणाली. “काय कसं असतं?” मानसीच्या आवाजाने दोघीही दचकल्या. “तू?” दोघीनी एका सुरात विचारलं. “हो मीच. अजून कोण.” मानसी हसून म्हणाली. “तू काही ऐकलंस का?” राजश्रीने भीत भीत विचारलं. “हो ऐकलं ना.” मानसी म्हणाली. “लग्न झाल्यावर कळेल कसं असतं ते, असं काहीतरी बोललात ना तुम्ही. तेच विचारतेय, काय कसं असतं?” “अच्छा, तेवढंच ऐकलंस ना.” सुटकेचा निश्वास टाकत दीपाली म्हणाली. 

तेवढ्यात शेखर तिच्या डेस्क वर आला आणि म्हणाला, “मानसी जरा मिटिंग रूम मध्ये ये, तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय.” त्याच्या मागोमाग मानसी गेली. “काय काय चाललंय काही कळायला मार्ग नाही बघ.” राजश्री म्हणाली. “म्हणजे?” दिपालीने विचारलं. “अगं म्हणजे या दोघांच्या आजकाल जरा जास्तच मिटींग्स होतायत असं नाही वाटत तुला? फक्त या दोघांच्याच असतात हं. One to one.” असं म्हणून तिने डोळे मिचकावले. “अच्छा… हं.” दीपाली डोळे मोठे करत म्हणाली, “आता मला कळलं सगळे अवॉर्ड्स हिलाच कसे मिळतात ते.” “या अशा बायकांचं बरं असतं बघ. म्हणूनच एवढाली वयं झाली तरी लग्न करत नाहीत.” राजश्री म्हणाली. “हो ना. मी पण तोच विचार करतेय, ही एवढी ३० वर्षाची झाली तरी अजून सिंगल कशी.” दीपाली म्हणाली, “मी तर ३० ची होते तेव्हा मला आमचा शुभम झाला होता.” “अशांना लग्नाची काय गरज?” राजश्री मानेला झटका देत म्हणाली, “लग्न न करताच सगळं मिळतंय की.” असं म्हणून दोघीनी एकमेकींना टाळी दिली. 

—————————————————————————————————————————————–

“मानसी तुझ्यावर एक खूप मोठी जबाबदारी देतोय मी.” शेखर बोलत होता. “नोव्हेंबर मध्ये होणारं जे प्रॉडक्ट लॉंच आहे त्याची सगळी जबाबदारी तू हॅण्डल करायची आहेस. आणि मला खात्री आहे तू ती नीट पार पडशील.” “पण सर.” मानसी म्हणाली, “मला वाटतं सुवर्णाने त्यासाठी जास्त मेहनत घेतली आहे, आणि मी जॉईन व्हायच्या आधीपासून ती या प्रॉडक्ट वर काम करतेय त्यामुळे तिला जास्त नॉलेज आहे या सगळ्याचं. So, i think, she should handle this.” “No no… not at all.” शेखर म्हणाला. “हे तिचं कामच नाही. तुला माहित आहे ना मागच्या वेळचं प्रॉडक्ट लॉंच कसं होतं. हे त्यापेक्षाही खूप जास्त कठीण आहे. रात्री उशीरपर्यंत थांबायचं, कधी कधी वीकेंडचे दोन्ही दिवस काम करावं लागेल. Its a tough job. आणि ती मॅरीड आहे आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे तिला हे सगळं नाहीच जमणार. तिने मध्येच सुट्टी घेतली किंवा अर्धं काम झाल्यावर Back out केलं तर I can’t afford it. एवढी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत.” “पण सर, एकदा तिच्याशी बोलून तरी बघूया तिला जमणार आहे का ते?” मानसी म्हणाली. “मला फक्त एवढंच सांग तुला जमणार आहे की नाही?” शेखरने तिच्याकडे रोखून बघत विचारलं. “सर मला जमेलच आणि आवडेलही पण… पण I think she deserves it आणि मला तिच्याकडून हे…” तिचं वाक्य मध्येच तोडत शेखर म्हणाला, “Don’t be emotional मानसी. This is corporate world. इथे भावनांना अजिबात जागा नाहीये. प्रॅक्टिकली विचार कर. तुझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि कदाचित तुझा performance क्लायंटला आवडला तर तुला लंड्नलाही जायला मिळेल. कळतंय तुला?” 

“हो सर I agree पण… ” मानसी अडखळली. “मला फक्त एवढंच सांग तू हे करणार आहेस की नाही? Tell me ye or no.” शेखरने करड्या आवाजात विचारलं. “पण सर..” मानसीला त्याने पूर्ण बोलूच दिलं नाही. “Yes or no?” त्याने विचारलं. दोन मिनिट थांबून तिने उत्तर दिलं, “Yes” “Great” शेखर आनंदाने ओरडत म्हणाला. “चल मग, आजपासूनच कामाला लाग. I have very high expectations from you.” असं म्हणून तो मिटिंग रूममधून बाहेर पडला. मानसी काही वेळ तिकडेच उभी होती, खोल विचारात. 

—————————————————————————————————————————————–

“ए पण आईची तब्येत सुधारतेय ना आता.” कॉफीचा घोट घेता घेता मानसी म्हणाली. “हो हो बऱ्यापैकी.” आलोक म्हणाला. “Thanks to you. तू एवढ्या चांगल्या डॉक्टरांकडे जायला मला सांगितलं नसतंस, तर हे सगळं झालाच नसतं.” तो म्हणाला. “बस कर रे तुझं थँक्यू स्पीच.” मानसी त्याच्या हातावर चापटी मारत म्हणाली. “पण आता तिचं नवीनच सुरु झालंय.” आलोक म्हणाला. “म्हणे, माझ्या तब्येतीचा काही भरोसा नाही आता. मला लवकर सून दाखव.” मानसी हसायला लागली. “मग कर की लग्न. की ऑलरेडी मुली बघायला सुरुवात केलीस?” तिने विचारलं. “हं… तसा बघतोय, पण कोणी आवडली नाही अजून.” तो म्हणाला. “का रे?” तिने विचारलं. “कशी मुलगी हवी आहे तुला? शोधूया आपण.” तो काही बोलला नाही, तिच्याकडे बघत राहिला. “काय? काय झालं?” तिने विचारलं. “सांग ना.” “तुझ्यासारखी.” तो म्हणाला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. ती गंभीर झाली. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग तो हसायला लागला आणि म्हणाला, “अगं गंमत करतोय मी. तू किती सिरिअस झालीस. तोंड बघ तुझं आरशात.” मग ती पण हसली. “तू पण ना… काहीही बोलत असतोस.” ती म्हणाली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. “चल निघूया, उशीर होतोय असं म्हणत तिने फोन उचलला आणि ती लांब गेली. आलोक तिच्याकडेच बघत होता. ‘कसं सांगू तुला, तुझ्यासारखी नाही. तूच हवी आहेस.’ तो स्वतःशीच म्हणाला.

—————————————————————————————————————————————–

रात्रीचे ११.३० वाजले होते. मानसी आपल्या लॅपटॉपवर काम करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिने बघितलं तर राजनचा होता. ती वैतागली. याचं काय काम असेल आता एवढ्या रात्री? पण कदाचित ऑफिसबद्दल काही असेल म्हणून तिने नाईलाजाने तो उचलला. 

“Hello… whatsup baby?” राजनने विचारलं. 

“तू बोल. काय काम होतं?” तिने कोरड्या स्वरात विचारलं. 

“काम असं काही नाही… सहजच.” तो हसून म्हणाला. 

“रात्री ११.३० वाजता तू सहज फोन केला आहेस? आणि हे सांगताना तुला काहीच वाटत नाही?” ती चिडून म्हणाली. 

“Come on… चिडू नकोस. तुझी आठवण आली म्हणून केला कॉल. आज निघायला खूपच उशीर झाला ना तुला. म्हटलं बघूया, नीट पोचलीस की नाही, तब्येत वैगेरे ठीक आहे ना.”

“मी कितीही उशिरा निघाले तरी ऑफिसची कॅब असते मला नीट घरी सोडायला त्यामुळे तुला त्याची काळजी करायची काहीच गरज नाहीये. आणि तुझी फालतू बडबड झाली असेल तर मी फोन ठेवतेय.” 

“अगं थांब थांब.. एवढी काय चिडतेस.” असं तो म्हणाला तेवढ्यात तिच्या मागून कोणाचा तरी आवाज आला. “चल आटप, वाजले बघ किती.” राजनने कान टवकारले. तो आवाज पुरुषाचा होता. “तू कुठे आहेस?” त्याने विचारलं. 

“आता एवढ्या रात्री मी घरीच असणार ना राजन.” ती वैतागून म्हणाली. “हा काय प्रश्न आहे? चल मी फोन ठेवतेय आता.” असं म्हणून तिने फोन कट केला. पण फोन ठेवण्या आधी पुन्हा त्याला तोच आवाज आला, त्याच पुरुषाचा. “लवकर ये आता इकडे.” आणि नंतर तिच्या हसण्याचा आवाज. राजन विचारात पडला. ‘ही जर घरीच आहे तर मग सोबत कोण आहे हिच्या? कोणाचा आवाज होता तो? 

—————————————————————————————————————————————–

मानसी घाईघाईने कॅब मध्ये येऊन बसली. आज पण उशिराच झाला होता. १० वाजले होते. आता घरी कधी पोचणार या विचारात असतानाच अचानक तिच्या बाजूला राजन येऊन बसला. “तू इथे?” तिने आश्चर्याने विचारलं.” तुझा रूट तर दुसरा आहे ना.” “हो पण आज मला या बाजूला जायचंय.” तो हसून म्हणाला. “म्हणून ही कॅब पकडली.” ती काहीच बोलली नाही. पण मनातून तिला प्रचंड राग आला होता. त्याच्याशी बोलायला लागू नये म्हणून तिने हेडफोन्स कानात घातले. पण तरीही तो बोलतच होता. ती कमीत कमी उत्तर देऊन त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होती. तिचा स्टॉप आल्यावर ती उतरली. तिच्या मागोमाग तोही उतरला. त्याला बाय करून ती आपल्या मार्गाने चालायला लागली. पण तो तिच्या मागे आला. “अगं थांब… एवढ्या घाईने कुठे चाललीस.” 

“कुठे म्हणजे घरी. आधीच उशीर झालाय.” 

“हो पण जरा थांब. मला बोलायचंय तुझ्याशी.” 

“बोल पटकन” असं म्हणून ती थांबली. “पटकन कसं बोलणार, थोडा वेळ तर लागेल ना.” असं म्हणून तो तिच्या जवळ सरकला. ती दोन पावलं मागे गेली. “आता तू एवढ्या मोठ्या प्रोजेक्टची लीड आहेस, एवढं जीव तोडून काम करतेयस. रात्री उशिरापर्यंत थांबतेस, रविवारी पण काम करतेस. मग त्याचे तुला मनासारखे रिटर्न्स पण मिळायला हवेत ना.” तो तिच्या जवळ येत म्हणाला. “म्हणजे?” तिने त्याच्याकडे रोखून बघत म्हटलं. “अगं म्हणजे तुला क्लायंट ला भेटायला लंडनला जायची संधी मिळायला हवी ना. तर या सगळ्याचा उपयोग आहे.” तो हसत हसत बोलत होता. “हे बघ ती संधी मिळेल तेव्हा मिळेल. सध्या मला हे प्रॉडक्ट लॉंच नीट पार पाडायचं आहे आणि तेवढंच माझ्या डोळ्यासमोर आहे. बाकी कशाचाही मी विचार करत नाहीये.” ती म्हणाली. “पण मी करतोय ना.” तो तिच्या आणखी जवळ येत म्हणाला.”तुझ्या प्रोजेक्टचा, तुझ्या मेहनतीचा, तुझा…” असं म्हणून त्याने तिचा हात हातात घेतला. “काय करतोयस तू.” असं म्हणून तिने रागाने त्याचा हात झटकला. “लिमिट मध्ये राहा.” तिने त्याच्याकडे रोखून बघत म्हटलं. “नाही ना राहता येत लिमिट मध्ये.” तो हसून म्हणाला. “खूप प्रयत्न केला लिमिट मध्ये राहण्याचा पण जमतच नाही. आणि माझं जाऊ दे, पण तुला तुझ्या कामाचा योग्य मोबदला मिळायला हवा की नको. तुला जर लंडनला जायचं असेल तर त्यासाठी काही ट्रिक्स आहेत, ज्या फक्त मीच तुला सांगू शकतो. पण त्यासाठी तुला माझं जरा ऐकावं लागेल.” असं म्हणून त्याने पुन्हा तिचा हात हातात घेतला. आता मात्र ती तिच्या सहनशक्तीचा अंत झाला. तिने त्याला जोरात ढकललं, त्याचा तोल गेला पण त्याने स्वतःला सावरलं. तो पुन्हा तिच्याकडे येणार एवढ्यात ती ओरडली, “खबरदार पुढे आलास तर. हे बघ, माझं काम मी पूर्ण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करतेय. त्याचा मला जो मोबदला मिळायचा तो मिळेलच याची मला खात्री आहे. आणि जरी नाही मिळाला ना तरी त्यासाठी या अशा ट्रिक्स वापरायची आणि त्याही तुझ्यासारख्या माणसाकडून घ्यायची मला गरज नाही. चालता हो इथून.” असं म्हणून ती चालायला लागली. 

त्याने पुन्हा तिचा हात पकडला. “Relax baby relax.” तो एकदम हळू आवाजात म्हणाला. “किती चिडतेस. तुझा हा राग आणि हा ऍटिट्यूडच खूप आवडतो मला.” तिने पुन्हा त्याचा हात झटकला. तरी तो बोलतच होता. “हे बघ तू इथे नवीन आहेस, तुला इथल्या सगळ्या ट्रिक्स आणि पॉलिटिक्स माहित नाही. म्हणून मी फक्त तुला मदत करतोय. आणि त्याच्या बदल्यात थोडीशी मजा केली तर काय प्रॉब्लेम आहे? हे बघ तू अजिबात घाबरू नकोस, हे फक्त आपल्या दोघातच राहील. I promise कोणालाही कळणार नाही. आणि उद्या तू लंडनला निघून गेल्यावर तर काय कोणाला कळण्याचा प्रश्नच येत नाही. तोपर्यंत थोडंसं को ऑपरेट कर.” असं म्हणून तो पुन्हा तिच्या जवळ आला. तिने फाडकन त्याच्या थोबाडीत वाजवली. “आताच्या आता इथून चालायला लाग, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन.” तिच्या डोळ्यात निखारे फुलले होते. “आतापर्यंत माझा कलीग म्हणून, माझ्याच टिममधला म्हणून खूप गय केली तुझी. पण तू आज सगळ्या मर्यादा ओलांडल्यास. तू इतक्या खालच्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं मला. आता जातोस की चपलेने बडवून काढू तुला.” ती मोठ्याने ओरडली. तो रस्ता निर्जन असला तरी तुरळक लोक येत जात होते. त्यातल्या काही जणांनी तिचं ओरडणं ऐकलं आणि त्यांच्याकडे बघायला लागले. तिचा हा अवतार बघून राजन भांबावला आणि मागे वळला. जवळजवळ पळतच गेला. मानसी कितीतरी वेळ तिकडेच रागाने थरथरत उभी होती.

—————————————————————————————————————————————–

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मानसी नेहमी प्रमाणेच वागत होती. जणू काही झालंच नाही अशा अविर्भावात. फक्त ती राजनशी बोलत नव्हती. शक्य तितकं त्याला टाळून त्याच्याशी न बोलता जेवढं काम होईल तेवढं ती करत होती. राजनही तिच्या नजरेला नजर देत नव्हता. मध्ये थोडा वेळ ती काही कारणामुळे डेस्क वर नव्हती तेव्हा राजन हळूच उठून आलोकच्या डेस्कवर आला आणि म्हणाला, “मी तुला मागे बोललो होतो ना, हिचं काही खरं नाही.” आलोकने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तरी राजन बोलतच होता. “ही दिसते तेवढी साधी नाहीये, काहीतरी झोल आहे.” आलोक आपल्या लॅपटॉपवरून नजर न हटवताच म्हणाल, “किती जळशील रे तिच्यावर, किती? तिचा एवढा विचार करण्यापेक्षा थोडं लक्ष कामात दिलं असतंस ना तर खूप बरं झालं असतं.” “तुला आता नाही पटणार माझं.” राजन म्हणाला. “मी जेव्हा पुरावे आणेन ना तेव्हा पटेल. हिचं नक्की काहीतरी लफडं चालू आहे आणि ते मी शोधून काढणार.” “लफडं?” आलोक हसायला लागला. “हो लफ़डंच.” राजन ठामपणे म्हणाला. “त्या दिवशी मी हिला फोन केला होता रात्री, तेव्हा कोणीतरी पुरुषासोबत होती ती. मला आवाज आला.” आता मात्र आलोक हसायचा थांबला. “काय?” त्याने जरा चमकून विचारलं. “हो मग, आणि ही हसत खिदळत होती त्याच्यासोबत.” राजनच्या या वाक्यानंतर आलोकचा चेहरा गंभीर झाला. पण दुसऱ्याच क्षणी तो म्हणाला. “अरे कोणीतरी असेल भाऊ वैगेरे आला असेल तिला भेटायला.” राजन हसायला लागला. “भाऊ?” तो म्हणाला, “अरे भावासोबतचं बोलणं वेगळं असतं मित्रा, तू लहान बाळ आहेस अजून. तुला नाही कळणार. ती ज्याप्रकारे हसत होती ना.” “सोड ना तुला काय करायचंय.” असं म्हणून आलोक पुन्हा कामाला लागला पण आता त्याचं कामातून लक्ष उडालं होतं. ‘हा बोलतोय ते खरंच असेल का? कोणासोबत असेल ती? भाऊ आला असता तर तिने नक्कीच आपल्याला सांगितलं असतं. तेवढी तर मैत्री आहे आपली. पण भाऊ नव्हता तर कोण होता तो?’ असे अनेक विचार त्याचं डोकं पोखरायला लागले. 

—————————————————————————————————————————————–

मानसी बसमधून उतरली आणि चालायला लागली. राजन तिच्या मागावरच होता. काही अंतर गेल्यावर ती थांबली एका जागी. थोड्या वेळाने तिकडे बाईकवरून एक माणूस आला आणि तिच्याजवळ थांबला. दोघे काहीतरी बोलत होते, हसत होते. मग ती त्याच्या मागे बसली. आणि दोघे निघून गेले. त्यानंतर काही दिवस राजनचं हेच चालू होतं, रोज ती ऑफिस मधून निघाली की तो तिचा पाठलाग करायचा. तिचं घरही त्याला आता माहित झालं होतं. अधून मधून ती त्या बाइकवरच्या माणसाला भेटायची, त्याच्यासोबत कुठेतरी जायची. कधी कधी तो कारमधून यायचा. काही वेळा दोघेही एकत्र तिच्या घरी गेलेले त्याने पाहिले. कधी त्याच्यासोबत दुसरे लोकही असायचे, त्यांच्याशीही ती हसून खेळून वागायची. कधी कधी ते लोकही तिच्या घरी जायचे तिच्या सोबत. त्याला या सगळ्याचा अर्थ नीट कळत नव्हता पण तरीही त्याने पाठलाग करणं सोडलं नव्हतं. 

एक दिवस ऑफिसमध्ये शेखरने सगळ्यांना सांगितलं, की मानसीच्या कामावर क्लायंट खुश आहे आणि त्यामुळे तिला त्याला भेटायला लंडनला जाण्याची संधी मिळाली आहे. सगळ्यांनी तिचं अभिनंदन केलं. मानसी आनंदून गेली, तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं होतं. आलोकही खूप खूष होता. त्यानंतर २-३ दिवसांनी तिचा पाठलाग करता करता राजन एका पबजवळ जाऊन पोचला. ती पबच्या बाहेर कोणाची तरी वाट बघत उभी होती. थोड्या वेळाने तो माणूस आला, जो बऱ्याचदा तिच्यासोबत असायचा. त्याच्यासोबत आणखीही काही लोक होते. त्यात मुली पण होत्या. सगळे हसत हसत पबमध्ये गेले. राजनही त्यांच्या मागोमाग गेला. सगळे नाचत होते, ड्रिंक्स घेत होते एकमेकांशी काहीतरी बोलत होते. पण राजन त्यांच्यापासून काही अंतरावर असल्यामुळे आणि आतल्या म्युझिकच्या आवाजाने त्याला त्यांचं बोलणं काही ऐकू येत नव्हतं. मानसी नाचता नाचता त्या माणसाच्या गळ्यात पडत होती, मध्येच मिठी मारत होती. खरं तर सगळेच एकमेकांच्या खूप जवळ होते. थोड्या वेळाने ते सगळे बाहेर पडले. राजनही त्यांच्या मागोमाग गेला. ते सगळे तिच्या घरी गेले. राजन दबक्या पावलांनी तिच्या घराच्या बाहेर जाऊन उभा राहिला आणि आत काय चाललंय याचा कानोसा घेऊ लागला. आतून हसण्या खिदळण्याचे आवाज येत होते. कोणाचा तरी आवाज आला, “मानसी, तू गेल्यावर कसं होणार माझं. तू जाऊच नको ना त्यापेक्षा.” त्याच्या आवाजातून त्याने खूप दारू प्यायली असावी असं वाटत होतं. तेवढ्यात मानसीचा आवाज आला, तसाच जड जड, “काय कसं होईल. सगळं ठीक होईल. हे सगळे आहेत ना तुझ्यासोबत.” 

“अगं त्याच्यापेक्षा मला क्लायंटची काळजी आहे.” एक अनोळखी आवाज

“ए हो, हे मात्र खरं हा, तू गेल्यावर आपले क्लायंट काय करतील. याचा बिझनेस तर बंदच पडेल.” अजून एक अनोळखी आवाज आणि त्यावर सगळ्यांचे हसण्याचे आवाज. 

“खरंच हा.. तुझ्याइतकं चांगलं कोणी नाही हॅण्डल करू शकत क्लायंट ना.” अजून एक अनोळखी आवाज “कसल्या भारी ऑफर्स देतेस तू. किती डिस्काउंट देतेस.” 

“ए पण आता नाही मिळणार डिस्काउंट. मानसी गेली की डिस्काउंट बंद.” अजून एक अनोळखी आवाज आणि त्यावर सगळे पुन्हा हसले. 

राजनला या सगळ्याचा काही अर्थबोध होत नव्हता. अजून नीट ऐकण्यासाठी त्याने कान दाराच्या आणखी जवळ नेला पण तेवढ्यात वरच्या मजल्यावरून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली आणि त्याने धूम ठोकली. 

—————————————————————————————————————————————–

“तू चल माझ्यासोबत.” राजन आलोकला जवळजवळ ओढत नेत म्हणाला. “अरे पण कुठे?” आलोकने विचारलं. राजन त्याला कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात घेऊन गेला जिथे आसपास कोणीच नव्हतं. “मी तुला सांगितलं होतं ना, तिचा काहीतरी झोल आहे.” राजन त्याला म्हणाला. “फायनली मला कळलंय नक्की काय आहे ते.” “म्हणजे?” आलोकने विचारलं. “ती मुलगी बरोबर नाही, character बद्दल बोलतोय मी.” राजन म्हणाला. “What rubbish? काहीही बोलू नकोस.” आलोक चिडून म्हणाला. “मला माहित होतं, तू माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. म्हणून प्रूफ आणलंय तुझ्यासाठी.” असं म्हणून त्याने त्याचा फोन बाहेर काढला आणि एक एक फोटो दाखवायला लागला. “हे बघ. ही रोज वेगवेगळ्या मुलांसोबत असते ऑफिस सुटल्यावर. कुठे कुठे जातात काय काय करतात.” आलोक आश्चर्य चकित होऊन ते सगळे फोटो बघत होता. “पण हे सगळे तिचे मित्रही असू शकतात ना.” आलोक म्हणाला. “किती रे भोळा आहेस तू.” राजन म्हणाला. “अरे मित्र असे रोज वेगवेगळे असतात का? ठराविकच मित्र असतात ना आपले. आणि बरं ते सगळं जाऊ दे. काल मी जे बघितलं आणि ऐकलं त्यानंतर तर तुला शंका घ्यायला जागाच उरणार नाही.” असं म्हणून त्याने आदल्या दिवशीचे तिचे पब मधले फोटो दाखवले. “आता सांग, मित्रांसोबत कोणी अशा अवस्थेत असतं का? कशी चिकटली आहे बघ त्याला, गळ्यात काय पडली आहे, मिठी काय मारतेय.” आलोकचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. मग त्याने त्याला आपण काय ऐकलं ते सांगितलं सगळं आणि म्हणाला, “क्लायंट, डिस्काउंट या शब्दांचा अर्थ कळतोय ना तुला?” आलोकचं डोकं बधिर झालं होतं. त्याला काय बोलावं काय करावं काहीच सुचत नव्हतं. राजन बोलतच होता, “आणि तरीही तुला माझं खोटं वाटत असेल तर मला सांग, तिने कधी तुला तिच्या या मित्रांबद्दल सांगितलं? तुम्ही तर चांगले मित्र आहात ना रोज एवढं बोलता. मग? तुला का नाही सांगितलं? आणि ती बऱ्याच वेळा कॉल आला की उठून लांब का जाते? सगळेच कॉल्स पर्सनल असतात का? आपल्यासमोर कधीच बोलू शकत नाही? इतकं काय असतं? तूच विचार कर ना. अरे ते सगळे तिचे या क्लायंटस चे कॉल्स असणार.” आलोकच्या डोळ्यात हळू हळू पाणी जमा झालं होतं. “तरी मी तुला सांगत होतो बाबा अशा मुलींच्या प्रेमात वगैरे नसतं पडायचं. टाईमपास पुरत्या ठीक आहेत. या अशा जास्त चुरुचुरु बोलणाऱ्या मुलींच्या अशाच भानगडी असतात.” 

आलोकने त्याला हाताने गप्प राहायला सांगितलं आणि तो संथ पावलांनी चालत आपल्या डेस्क वर येऊन बसला. त्याने मानसीच्या डेस्ककडे बघितलं तर ती डेस्कवर नव्हती. कॉरिडॉरच्या टोकाजवळ फोनवर बोलत होती. आलोकला काय वाटलं कुणास ठाऊक, तो पटकन आपल्या जागेवरून उठला आणि हळू हळू चालत तिच्या जवळ गेला. तिच्यापासून मागे काही अंतरावर उभा राहिला. तिला कळलं नाही की तो तिच्या मागे उभा आहे पण आता त्याला तिचं बोलणं ऐकू येत होतं. “नाही सर, एवढे नाही कमी करू शकत. तुम्ही जुने क्लायंट म्हणून तुम्हाला आधीच डिस्काउंट दिलाय मी पण आता यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. सर आम्हाला पण परवडायला हवं ना, जरा विचार करा.” तिचे शब्द ऐकून त्याच्या पायातलं उरलं सुरलं त्राण गेलं होतं. “ठीक आहे मग आज संध्याकाळी भेटू सर, उरलेली अमाऊंट तेव्हाच घेईन मी. ओके. बाय.” असं म्हणून तिने फोन ठेवला आणि मागे वळली. आलोकला बघून ती गडबडली क्षणभर. पण लगेच काही घडलंच नाही अशा थाटात तिने त्याला विचारलं, “अरे आलोक तू इथे काय करतोयस?” त्याने तिच्याकडे रोखून बघत विचारलं,”कोण क्लायंट? कोणाकडून उरलेली अमाऊंट घेणार आहेस तू?” त्याच्या या प्रश्नाने ती एकदम गोंधळून गेली, तिला काय उत्तर द्यावं सुचेना. “अं… मला जरा काम आहे मी आलेच. नंतर बोलू आपण.” असं म्हणून ती घाईघाईने तिथून गेली. आलोक जागच्या जागी खिळल्या सारखा उभा होता. 

त्या दिवशी दिवसभर तो तिच्याशी बोलला नाही. तिला कामात कोणतीही मदतही केली नाही. तिला खूप चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. तिने खूपदा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो तिला टाळतच होता. त्याचं कामातही लक्ष नव्हतं. बरं वाटत नसल्याचं सांगून तो ऑफिसमधून लवकर निघाला. 

—————————————————————————————————————————————–

दुसऱ्या दिवशी मानसीची Send off party होती. आलोक सोडून बाकी सगळे आनंदात दिसत होते. केक आणला आणि मानसी तो कापणार एवढ्यात राजन बोलायला लागला. “एक मिनिट एक मिनिट. केक कापण्याआधी मला थोडंसं बोलायचंय. आज आपल्या मानसीची Send off party. पुढच्या २-३ दिवसातच ती लंडनला जाणार. तिच्याएवढी हुशार स्मार्ट टॅलेंटेड मुलगी मी आजवर बघितली नाही, म्हणजे आपण कोणीच बघितली नाही. काय Dedication आहे कामात, कसला जबरदस्त फोकस आहे. वाह वाह.” असं म्हणून त्याने टाळ्या वाजवल्या. मानसीचा चेहरा गंभीर झाला होता. राजन पुढे बोलायला लागला, “तिची इथली हुशारी, इथलं टॅलेंट आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आणि त्यामुळेच तिला आज ही एवढी मोठी संधी मिळते आहे. पण… पण त्याबरोबरच तिचं अजून एक टॅलेंट आहे. Hidden talent जे आपल्याला कोणालाच माहित नाही, मला सुद्धा माहित नव्हतं हा. मला पण हल्लीच कळलंय. म्हणून मी आज ते तुमच्या सगळ्यांसमोर आणणार आहे.” सगळे त्याच्याकडे कुतूहलाने बघत होते. “कोणतं टॅलेंट?” राजश्रीने विचारलं. राजन मोठ्याने हसला आणि म्हणाला, “क्लायंट ना डिस्काउंट देऊन पटवायचं टॅलेंट.” “कसले क्लायंट? आणि कसला डिस्काउंट?” दिपालीने विचारलं. “कॉल गर्ल चे क्लायंटस.” राजनच्या या वाक्यावर सगळे आश्चर्य चकित होऊन त्याच्याकडे बघायला लागले. मानसीने रागाने त्याच्याकडे बघितलं, तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. “राजन Are you out of your mind?” शेखर संतापून म्हणाला, “तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते, दारू पिऊन आलायस का?” राजन मोठमोठ्याने हसायला लागला, “नाही नाही… अहो सर ते टॅलेंट पण हिच्याकडे आहे. दारू प्यायची पण आणि क्लायंटस ना पाजायची पण. तुम्हाला बघायचेत हिच्या टॅलेन्टचे नमुने. हे बघा.” असं म्हणून त्याने सगळे फोटो दाखवायला सुरुवात केली. सगळ्यांचे डोळे आश्चर्याने इतके मोठे झाले होते की जणू काही बाहेरच येतील.

“हा हिचा पार्ट टाइम बिझनेस आहे बरं का.” राजन म्हणाला. “म्हणजे फुल्ल टाइम तर आपलं हे ऑफिस, पण इथून सुटल्यावर तो बिझनेस सुरु होतो. रोज वेगवेगळ्या क्लायंट ना भेटायचं. त्यांना घरी घेऊन यायचं आणि डिस्काउंट द्यायचा. आणि हो तो अजून एक मेन क्लायंट आहे बरं का. त्याच्याकडूनच अजून वेगवेगळे क्लायंट येतात बहुतेक. पण हा तिचा सगळ्यात आवडता क्लायंट असावा, बघा ना कशी गळ्यात पडली आहे त्याच्या बघा.”

“राजन खूप झालं तुझं, Enough is enough now.” मानसी ओरडून म्हणाली. “बंद कर तुझे हे घाणेरडे चाळे.”

“अरे वा.. चोराच्या उलट्या बोंबा.” राजन हसून म्हणाला. “चाळे कोण करतंय ते दिसतंय की या फोटोमध्ये. तू आणि तुझा स्पेशल क्लायंट.”

“तोंड सांभाळून बोल राजन.” मानसी रागाने थरथरत म्हणाली, “त्याच्याबद्दल मी काहीही ऐकून घेणार नाही.” 

“बघा… मी बोललो होतो ना, स्पेशल क्लायंट आहे म्हणून.” राजन म्हणाला. 

“हो… आहे तो स्पेशल क्लायंट माझा.” मानसी ओरडून म्हणाली. “आणि तोच एकमेव क्लायंट आहे माझा कारण….. नवरा आहे तो माझा.” 

आता पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसला. डोळे विस्फारून सगळे तिच्याकडे बघत होते. आलोक सुद्धा. राजन पुन्हा हसायला लागला, “वाह वाह, आता अजून एक नवीन गोष्ट. म्हणे नवरा आहे. कधी आला हा नवरा तुझा? आत्ता लगेच तुला सुचला म्हणून आला का? की या दोन दिवसात केलंत लग्न पटापट पळून जाऊन.” असं म्हणून तो पुन्हा मोठमोठ्याने हसायला लागला. 

“नाही.. दोन वर्षांपूर्वी केलं.” मानसीचा स्वर आता कापरा झाला होता. “मानसी, तू काय बोलतेयस? तू तर इथे ८ महिन्यांपूर्वी जॉईन झालीस ना?” शेखर आश्चर्याने म्हणाला, “म्हणजे तू …” 

“हो.. मी खोटं बोलले सर.” मानसी म्हणाली. “इथे जॉईन होण्यापूर्वीच माझं लग्न झालं होतं.” 

“पण का?” शेखरने विचारलं. “का लपवलंस  तू हे?”

“मग अजून काय करणार होते मी सर?” मानसी कळवळून म्हणाली. “मला हवी तशी संधी मिळत नव्हती. खूप प्रयत्न केले, किती ठिकाणी इंटरव्यू दिले. प्रत्येक ठिकाणी हा एक ठरलेला प्रश्न असायचा, Are you married? आणि त्याचं उत्तर हो असं दिल्यावर समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर खूप मोठं नुकसान झाल्यासारखे भाव असायचे. कितीतरी ठिकाणी तर आधीच फोनवर विचारायचे की लग्न झालंय का? कारण आम्हाला मॅरीड वूमन नको आहेत. उशीरपर्यंत काम करावं लागणार म्हणून. या दोन गोष्टींचा काय संबंध होता मला अजूनपर्यंत कळलं नाही. माझ्याकडे नॉलेज कमी असेल, माझा अनुभव कमी असेल किंवा जर मला तुमच्या प्रश्नांची नीट उत्तर देता नाही आली तर खुशाल करा मला रिजेक्ट. पण सगळं जुळून येऊनही फक्त माझं लग्न झालंय म्हणून मला रिजेक्ट केलं जात होतं. का? लग्न करणं हा गुन्हा आहे का? आणि ते सुद्धा फक्त बाईलाच? असे प्रश्न पुरुषांना कधीही विचारले जात नाहीत. त्यांचं लग्न झालेलं असो किंवा नसो, ते दिलेलं काम नीट पूर्ण करतीलच अशी सगळ्यांना खात्री असते. मग बाईच्याच बाबतीत ही शंका का? लग्न केल्यावर त्या बाईचं कामातलं नॉलेज कमी होतं का? की तिचा अनुभव कमी होतो? तरीही तिच्या कर्तृत्वावर शंका का घेतली जाते? लग्नानंतर तिच्यावर जबाबदाऱ्या येतात म्हणून ऑफिसमध्ये तेवढा वेळ देता येत नाही असं स्पष्टीकरण देतात काही जण. पण मला सांगा, जबाबदाऱ्या दोघांवरही येतात ना. लग्नानंतर पुरुषांच्याही जबाबदाऱ्या वाढतात, पण तरीही ते आपलं काम चोख करतील पण बाई कमी पडेल असं गृहीत का धरलं जात? रात्री उशिरापर्यंत थांबण्याचा प्रॉब्लेम हा लग्न झालेल्या बाईलाच असतो आणि सिंगल मुलींना नसतो हे कुठलं लॉजिक आहे सर? मला मान्य आहे की काही घरांमध्ये बाईवर अशा मर्यादा घातल्या जातात लग्नानंतर आणि त्यांना नाही तेवढा वेळ देता येत कामासाठी. पण म्हणून सरसकट सगळ्याच बायकांबद्दल असं मत बनवणं किंवा गृहीत धरणं चूक आहे ना सर. कित्येक मुली आणि बायका अशा आहेत ज्या लग्नानंतरही आणि मुलं झाल्यानंतरही तेवढ्याच dedication ने आपलं काम करतात. त्यांचा कामावरचा फोकस अजिबात कमी झालेला नाहीये, त्या तेवढीच मेहनत घेतात. त्यांचं उदाहरण आपण का नाही समोर ठेवत? मला तर लग्न व्हायच्या आधीही कित्येक ठिकाणी इंटरव्यू मध्ये असं विचारलं जायचं की लग्न ठरलंय का किंवा लवकरच होणार आहे का? त्याचं कारण असं दिलं जायचं की मुली लग्नांनंतर शिफ्ट होतात आणि मग ती जागा ऑफिसपासून लांब असली की त्यांच्या तक्रारी सुरु होतात किंवा मग त्या सोडून जातात. पण मला सांगा सर, शिफ्ट होणं ही गोष्ट फक्त मुलीच्या लग्नाच्याच बाबतीत आहे का? कोणताही माणूस मग तो मुलगा असो किंवा मुलगी कधीही कोणत्याही कारणामुळे एक घर सोडून दुसऱ्या घरी शिफ्ट होऊच शकतात. ही फार सर्वसाधारण गोष्ट आहे जी जगात कोणाच्याही बाबतीत घडू शकते, मग तिला फक्त मुलीच्या लग्नाशीच का जोडलं जातं? मुलगे सुद्धा कधी कधी लग्नानंतर शिफ्ट होतात. वेगळं घर घेतात. मग त्यांच्या बाबतीत हा मुद्दा येत नाही का? आपल्या या सगळ्या सिस्टीमचा राग आला होता मला, सतत रिजेक्शन ऐकून हैराण झाले होते. आणि त्यातच एकदा, आपल्या कंपनीकडून कॉल आला. इतक्या मोठ्या कंपनीत आणि तेही मला हव्या त्याच डोमेन आणि पोजीशनवर काम करायची संधी मिळतेय हे ऐकून मी आनंदून गेले. पण इथेही मला पुन्हा तोच प्रश्न विचारला गेला. मला ही संधी घालवायचची नव्हती म्हणून मग मी माझं लग्न लपवायचं ठरवलं.”

सगळेजण आवाक होऊन ऐकत होते. ती जरा वेळ थांबली आणि मग बोलली, “पण आता वाटतंय चूक केली. लग्न झालंय असं सांगून गळ्यात मंगळसूत्र घालून आले असते तर निदान या राजनसारख्या वखवखलेल्या जनावरांपासून तरी सुटका झाली असती माझी. ज्यांना अजूनही वाटतं, की बाईने नेहमी दबून असावं, पुरुषांचं सगळं गपचूप ऐकावं, त्यांच्या चुका दाखवून देऊ नये, त्यांच्याशी वाद घालू नये. त्यांच्यापेक्षा वरचढ होऊ नये. शांत, सुशील, सोज्वळ असावं. सगळी priority आधी घराला द्यावी, त्यातून वेळ उरला तर ऑफिस आणि करिअर. आणि ज्या मुली त्यांचे हे सो कॉल्ड नियम तोडतात, त्या यांच्या दृष्टीने आगाऊ असतात, उठवळ आणि उथळ असतात. करिअर मध्ये सिरिअस असणारी मुलगी कधी चांगली बायको होऊ शकत नाही म्हणे, घर सांभाळू शकत नाही. अशा मुली प्रेम करण्यासाठी नसतात, फक्त टाईमपास करण्यासाठी असतात. माझ्यासारख्या मुलींचं करिअर मध्ये सिरिअस असणं, हुशार असणं, स्पष्टवक्त असणं, रात्री उशिरा पर्यंत ऑफिसमध्ये थांबणं हे सगळं म्हणजे यांच्या दृष्टीने टाईमपास करण्याचं लायसन्स असतं. अशा मुली यांच्यासाठी Easy target असतात. काय म्हणाला होतास रे तू, मॅरीड बाईकडे मी बघत पण नाही. दुसऱ्याची प्रॉपर्टी असते ती. मग सिंगल बाई म्हणजे काय तुझ्या बापाची प्रॉपर्टी असते काय रे? की पब्लिक प्रॉपर्टी असते? या असल्या पुरुषांच्या दृष्टीने जोपर्यंत बाईसोबत पुरुष आहे तोपर्यंत ती त्याची. एकदा का ती एकटी पडली की मग ती सगळ्यांची, सार्वजनिक होते. कोणीही यावं आणि हात मारून जावं. तुझ्यासारखे पुरुष अख्ख्या मानवजातीला कलंक आहेत. यांच्यासारख्या पुरुषांमुळेच आपल्या समाजात ही मानसिकता आहे की जोपर्यंत बाईचं लग्न होत नाही तोपर्यंत ती असुरक्षित. म्हणून मग लग्न करून गळ्यात security चा अलार्म बांधायचा. याचा सुरुवातीपासूनच माझ्यावर डोळा होता, याने खूप प्रयत्न केले माझ्या जवळ येण्याचे पण मी ते सगळे हाणून पडले. मुळातच बाई, त्यात आपल्यानंतर जॉईन झालेली, ती आपल्या पुढे जाते, आपल्यापेक्षा सरस ठरते हे सहन नाही झालं याला. जळत होता हा माझ्यावर. आणि त्यातून मी याला भाव देत नाही म्हटल्यावर याचा सगळा पुरुषी अहंकार दुखावला गेला. याने त्यादिवशी अक्षरशः माझ्या मागे लागून माझ्या अंगचटीला येण्याचा प्रयत्न केला पण तिथेही मी याची डाळ शिजू दिली नाही. मी याची तक्रार शेखर सरांकडे किंवा HR कडे जाऊन करेन अशी याला भीती वाटत होती. त्याच्याआधी आपणच असं काहीतरी करावं की ज्यामुळे हीच बाई वाईट चालीची आहे हे सिद्ध होईल असा याने विचार केला. म्हणजे मग आपण आपोआप सुटू. म्हणून त्याने माझा पाठलाग करून हे सगळे फोटो काढले आणि माझी ही अशी बदनामी करण्याचा प्रयत्न केला.” 

मग ती राजश्री आणि दीपलीकडे वळून म्हणाली, “आणि तुम्ही? तुम्ही बायका असून पण काय उपयोग? स्वतः बाई असूनही दुसऱ्या बाईच्या चारित्र्यावर संशय घेता? का? तर मी तुमच्या पुढे गेले म्हणून. त्याचा काय अर्थ लावलात तुम्ही? की माझे आणि शेखर सरांचे काहीतरी संबंध आहेत म्हणून मला हे यश मिळतंय? आमच्या मिटींग्स दिसल्या तुम्हाला पण मी दिवस रात्र केलेली मेहनत नाही दिसली? आणि काय म्हणालात तुम्ही? सिंगल आहे तिला काय कामं असतात? प्रत्येक वेळी मॅरीड असण्याचं एवढं उदात्तीकरण का केलं जातं? आपण लग्न करून जगावर खूप मोठे उपकार केल्यासारखा भाव का असतो तुमच्यासारख्या मॅरीड बायकांच्या चेहऱ्यावर? आम्ही मॅरीड म्हणजे आम्हाला एवढं करावं लागतं तेवढं करावं लागतं आणि सिंगल लोकांना काहीच कामं नसतात असं गृहीत का धरता तुम्ही? माझी बहीण, २६ वर्षांची, सिंगल आहे. पण ती ऑफिस करून सुद्धा घरातली बरीचशी कामं करते. कारण माझ्या आईला गुडघ्याचा त्रास आहे, तिला काम झेपत नाही. ती सिंगल असूनही माझ्यापेक्षा जास्त काम करते घरात. मुळात मॅरीड म्हणजे जबाबदार आणि सिंगल म्हणजे स्वच्छंदी अशी विभागणी का? आणि ती करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? जरा तुमचे जुने दिवस आठवा. तुम्हीही लग्ना आधी आईला मदत करतच असाल, त्यांची जबाबदारी होतीच ना तेव्हाही तुमच्यावर. आणि समजा एखाद्या बाईने केलंच नाही कधी लग्न तर काय तिचे आईबाबा तिला आयुष्यभर बसून खायला घालणार आहेत का? लग्न नाही केलं तरीही एका ठराविक वयानंतर प्रत्येकावर जबाबदाऱ्या येतातच आणि त्याला त्या पार पाडाव्याच लागतात. एवढे दिवस मी रात्री उशिरापर्यंत थांबत होते ते घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळूनच. आणि तुम्ही किती घाणेरडा अर्थ घेतलात माझ्याबद्दल? ३० वर्षांची झाली तरी अजून लग्न केलं नाही याचं कारण माझं चारित्र्य वाईट आहे? मुळात अमुक एक वय लग्नाचं असे नियम का आहेत? आणि त्या वयापर्यंत त्याने लग्न नाही केलं तर त्या व्यक्तीचं चारित्र्याच वाईट आहे असा अर्थ लावायचा? स्त्री पुढे जात असेल तर प्रत्येक वेळी तिच्या चारित्र्यावर संशय का घेतला जातो? पुरुषावर नाही कधी कोणी संशय घेत. स्त्रीच स्त्रीची शत्रू असते म्हणतात त्याचा जिवंत पुरावा आहेत तुम्ही दोघी.” 

त्या दोघीही खाली मान घालून ऐकत होत्या. मग ती आलोक कडे वळून म्हणाली, “या सगळ्यामध्ये मी तुलाच एक सेन्सिबल आणि genuine माणूस समजत होते. माझा खूप जवळचा मित्र समजत होते. मला कळलं होतं तुझ्या मनात माझ्याबद्दल काय आहे ते, मैत्रीच्या पलीकडचं होतं ते. माझ्या लग्नाबद्दल लपवण्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या गेल्या मला माहित आहे आणि त्याबद्दल मी तुझी माफीही मागते. मला जेव्हा हे कळलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल असं काही आहे तेव्हा मी तुला त्यापासून दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, आणि माझ्याकडून तुला कधीच कोणताच चुकीचा मेसेज जाणार नाही याची काळजी घेतली. पण…. तू सुद्धा या नालायक माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास? तो काय लायकीचा माणूस आहे हे तुला माझ्यापेक्षा जास्त आधीपासून माहित होतं, तरीही तू त्याच्यावर विश्वास ठेवलास? तू इतक्या हलक्या कानाचा असशील अशी मी कल्पना केली नव्हती. सगळ्यात जास्त दुःख मला तुझ्या वागण्याचं झालंय.”

सगळे शांत झाले होते. कोणीच काहीच बोलत नव्हतं. मानसीचे डोळे रडून लाल झाले होते. थोड्या वेळाने तिने स्वतःला सावरलं आणि म्हणाली, “एवढं सगळं झाल्यावर आता माझी ना लंडनला जायची इच्छा आहे ना या कंपनीत काम करायची. एवढ्या मोठ्या कंपनीतले लोक इतक्या खालच्या दर्जाचे असतील अशी मी अपेक्षा नव्हती केली. मी आजच माझा राजीनामा देतेय सर. पुढची प्रोसेस लवकर चालू करा आणि मला मोकळं करा इथून.” “नाही मानसी.” शेखर म्हणाला, “बाकी सगळं काहीही असलं तरी या संधीवर तुझाच हक्क आहे. हे यश तू स्वतःच्या मेहनतीवर मिळवलं आहेस आणि स्वतःला सिद्ध करून मिळवलं आहेस. त्यामुळे ही संधी सोडू नकोस.” 

“बरोबर आहे तुमचं सर.” मानसी म्हणाली. “हे मीच मिळवलेलं आहे. पण मी मिळवलं कारण मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली गेली. जी मी कदाचित मॅरीड असते हे सांगितलं असतं तर मिळालीच नसती.” “म्हणजे?” शेखरें विचारलं. “मी तुम्हाला मागे पण बोलले होते सर, की सुवर्णाने या प्रोजेक्ट साठी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे लीड करायची संधी तिला मिळायला हवी. पण तुम्ही ती नाही दिलीत. का तर तिचं लग्न झालंय म्हणून. तिची झोकून देऊन काम करण्याची तयारी होती, रात्री उशिरापर्यंत थांबण्याचीही  तयारी होती. पण ती हे करूच शकणार नाही असा तुम्हीच शिक्का मारून टाकलात. तिच्याशी न बोलताच, तिला न विचारताच. का तर म्हणे तिने सुट्टी घेतली किंवा नंतर backout केलं तर काय? आता ही गोष्ट सुद्धा कधीही कोणाच्याही बाबतीत घडू शकते, पण इथेही पुन्हा याचा संबंध लग्न झालेलं असण्याशी आणून जोडला तुम्ही. तिला स्वतःला सिद्ध करण्याची संधी सुद्धा दिली नाहीत. आता तुम्हाला पटलं ना की मी माझं लग्न का लपवलं ते? जर मी सांगितलं असतं की मी मॅरीड आहे तर आज ही संधी मलाही मिळाली नसती कारण मीही आज सुवर्णाच्याच जागी असते. खरं तर याच्यावर तिचाच हक्क होता पण मी मध्येच आले. कदाचित तिचेच तळतळाट लागले असतील म्हणून हे सगळं झालं. मला लाभलं नाही हे यश.” असं म्हणून तिने डोळे पुसले. 

काही वेळ असाच गेल्यावर आलोक तिच्याजवळ आला आणि म्हणाला, “माझं चुकलं. मी पण चुकीचा अर्थ घेतला. पण माझा आधी विश्वास नव्हता. पण जेव्हा मी तुला फोनवर बोलताना ऐकलं तेव्हा मला… ” त्याला तिने मधेच थांबवलं आणि म्हणाली,”तेव्हा तुला वाटलं की मी कॉल गर्ल आहे. क्लायंट, डिस्काउंट, बिझनेस हे सगळे शब्द त्या एकाच अर्थाशी निगडित असतात का? तुला असं नाही वाटलं की मी कदाचित दुसरा कोणता बिझनेस करत असेन आणि त्या संदर्भात हे बोलणं चालू असेल. ठीक आहे तुला माहित नव्हतं माझं लग्न झालंय ते. पण फोटोमधला तो पुरुष माझा बॉयफ्रेंड असू शकतो असं का नाही वाटलं तुला? तू तोच घाणेरडा अर्थ का घेतलास?” आलोक खाली मान घालून उभा होता. ती पुढे म्हणाली, ” खरं तर आता हे सांगून काहीच उपयोग नाही पण तरीही, आता विषय काढलास तू म्हणून सांगते. माझ्या नवऱ्याचा बिझनेस आहे, आणि तो कधी कधी शहरात नसला की तो बिझनेस मी सांभाळते. ते सगळे त्याचे क्लायंटस आहेत म्हणजे आमच्या बिझनेस चे क्लायंट आहेत. याने जे फोटो दाखवले ते सुद्धा आमच्या क्लायंट सोबतचे होते. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो मला त्यांना भेटायला घेऊन जायचा, त्यांच्याशी चांगली ओळख व्हावी म्हणून आणि मला बिझनेस अजून चांगला हॅण्डल करता यावा म्हणून. आणि त्यादिवशी पब मध्ये आम्ही सगळे मित्र मैत्रिणी जमलो होतो. ते आमचे खूप जवळचे मित्र आहेत. इथे पुण्यात सेटल व्हायला त्यांनी खूप मदत केली आम्हाला. आणि त्या दिवशी ते सगळे मला send off  देण्यासाठी भेटले होते. त्यांच्यात काही कपल्सही होते म्हणून त्या सगळ्या तशा पोज दिसतायत फोटो मध्ये. आम्ही आधी पब मध्ये पार्टी केली आणि नंतर सगळे घरी गेलो. हो दारू प्यायलो होतो आम्ही पण फक्त दारू हे character मोजण्याचं परिमाण नाही असू शकत ना?” तिने सगळ्यांकडे बघून विचारलं. सगळे मान खाली घालून उभे होते. कोणी काहीच बोललं नाही. तिने डोळे पुसले, समोरच्या ग्लासातलं पाणी प्यायली आणि खोलीतून निघून गेली.

काही वेळ असाच गेला. मग सुवर्णा म्हणाली, “आपण तिला थांबवायला हवं” आणि ती घाईघाईत खोलीतून बाहेर पडली. मानसीच्या डेस्कवर आली पण ती तिकडे नव्हती. तिची बॅग किंवा कोणतंच सामान नव्हतं. फक्त तीनच गोष्टी होत्या. तिचा लॅपटॉप, डेस्कफोन आणि तिच्या नावाची प्लेट-“मिस मानसी शिरोडकर.” 

Advertisements

7 thoughts on “सिंगल

 1. अर्धी वाचून झालीये गोष्ट.. संध्याकाळी वाचेन सगळी पण म्हटलं फीडबॅक द्यावा आत्तापर्यंतच्या इम्पॅक्टवर. खूप आवडतंय लिखाण. मानसी, आलोक आणि राजन अगदी डोळ्यांसमोर उभे राहिलेयत. डीटेलमध्ये लिहिनच पूर्ण वाचून झालं कि 🙂

  Like

 2. धन्यवाद 🙂 पूर्ण वाचून झाल्यावर पुन्हा एकदा फीडबॅक दे. वाट बघतेय 🙂

  Like

 3. झाली की नाही पूर्ण वाचून? 😉 की कंटाळलास म्हणून अर्ध्यातच सोडलीस? 😛 😀

  Like

 4. सुंदर शब्दांमध्ये समाजमनाचा आरसा उभा केला. गुंतवून ठेवणारे लिखाण…. खूप छान संदेश… असेच उत्तम लिहत रहा.. 🙂

  Liked by 1 person

 5. मनापासून धन्यवाद ☺️🙏 तुमच्यासारख्या वाचकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अजून लिहायचा उत्साह येतो. वाचत राहा, प्रतिक्रिया देत राहा 🙂🙂

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s