मुंबई लोकल…. अशीही

आजचा दिवसही नेहमीसारखाच उजाडला. नेहमीप्रमाणेच सकाळी धावत पळत स्टेशनवर यायचं, सगळ्या धुमश्चक्रीतून कसंबसं आत चढून सीट मिळवायची, चौथ्या सीटवर अवघडून बसायचं आणि बाजूच्या बाईची उठण्याची वाट बघत येणाऱ्या जाणाऱ्यांचे धक्के खायचे. त्यातच अधून मधून घड्याळाकडे बघत आज ट्रेन वेळेवर पोचेल की उशीर होईल, आपले किती लेटमार्क बाकी आहेत याचा विचार करायचा. तेच ते रोजचं कंटाळवाणं जगणं, तोच वैतागवाणा प्रवास असं सगळं वाटत असतानाच कधी कधी एखादी गोष्ट अशी घडते, ज्यामुळे नकळत ओठांवर आनंदाचं आणि समाधानाचं हसू पसरतं. आजही तसंच काहीसं झालं.

ट्रेनमध्ये चढणं आणि सीट मिळवणं हे मुंबईत एखाद्या युद्धपेक्षा कमी नाही. आणि त्या युद्धात सामिल होण्यासाठी रोज कंबर कसून तयार असणारे मुंबईकर, विशेषतः बायका, इतर वेळी सगळ्यांना धक्के मारून, शिव्या देऊन, भांडून कोणाचीही पर्वा न करणाऱ्या, पण कधी कधी खूपच अनपेक्षित वागतात आणि सुखद धक्का देतात. आज एक बाई सकाळी गर्दीच्या वेळी एका लहान मुलाला घेऊन आमच्या खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये चढली. साधारण ६-७ वर्षांचा असेल. बहुदा तिचा मुलगा असावा. ट्रेनमध्ये नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होती, त्यातच ती जुनी ट्रेन असल्यामुळे, लहान डबे असल्याने गर्दी अजूनच जास्त भयानक वाटत होती. बायका अक्षरशः एकमेकींना चेपत उभ्या होत्या, त्यातच चढत होत्या, उतरत होत्या. त्या गर्दीत हळूहळू सरकत तो मुलगा आतल्या बाजूला आला. पण त्याची आई मात्र तिथेच दरवाजाजवळ उभी होती.

हळूहळू गर्दी इतकी वाढली की ते दोघे एकमेकांना दिसेनासे झाले. तरी त्यातून पण तिने मध्येच हाक मारून तो तिथेच जवळपास असल्याची खात्री करून घेतली. त्यावरून आजूबाजूच्या बायकांना अंदाज आला की गर्दीमुळे ते दोघे लांब गेलेत. काही जणींनी नेहमीप्रमाणे तिला सल्ले दिले की अशा गर्दीच्या वेळी लहान मुलाला घेऊन कशाला चढायचं वगैरे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एरवी दरवाजात उभ्या राहणाऱ्या बायकांवर भरपूर तोंडसुख घेणाऱ्या बायकांनी या बाईला मात्र एका शब्दानेही नावं ठेवली नाहीत. उलट काही बायकांनी तिला थोडी जागा करून दिली जेणे करून ती निदान त्याच्या थोडीफार जवळ उभी राहू शकेल आणि तिला तो दिसू शकेल.

इकडे दुसरीकडे तो मुलगा ज्या सीटजवळ उभा होता, तिथल्या बायकांनी हळू हळू जागा करत त्याला आतमध्ये सरकवला, म्हणजे निदान २ सीटच्या मध्ये त्याला नीट उभं राहता येईल आणि येणाऱ्या जाणाऱ्यांचे धक्के लागणार नाहीत. माझ्या सीटवर मी आणि माझी मैत्रीण बसलो होतो. तिच्या बाजूची सीट रिकामी झाल्यावर तिने त्याला आपल्या बाजूला नीट बसवून घेतलं. ते बघून त्याची आईही सुखावली होती. तिनेही त्याला नजरेनेच काळजी करू नको, बसून घे म्हणून सांगितलं.  पण मुख्य प्रश्न हा होता, की एवढ्या गर्दीतून ती बाई त्याला घेऊन उतरणार कशी? आणि या गोष्टीचं टेन्शन त्याच्या आईपेक्षा जास्त बाकी सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर होतं. तो मुलगाही नाही म्हटलं तरी जरा बावरलाच होता.

थोड्या वेळाने माझ्या समोरची बाई उठली आणि म्हणाली, ” मी पण लोअर परेललाच उतरणार आहे, मी घेऊन येईन त्याला पुढे.” आणि मग त्याच्याकडे बघून गोड हसून म्हणाली, “बस तोपर्यंत, उतरवेन मी तुला आईसोबत.” तेवढ्यात दाराच्या थोडं मागे असलेली एक बाई पण म्हणाली, “हो आतापासून नको उभं राहायला, इथे खूप गर्दी आहे. आम्ही थोडं पुढे सरकलो ना की मग या तुम्ही त्याला घेऊन.” माझ्यासहित आजूबाजूच्या सगळ्या मुली आणि बायकांचं लक्ष पूर्णपणे त्याच्यावर आणि त्याच्या आईवर केंद्रित झालं होतं. हळूहळू लोअर परेल स्टेशन आलं. कितीही नाही म्हटलं तरी त्या बाईला थोडी काळजी तर वाटत असणारच, तिचं सतत त्याच्यावर लक्ष होतं. पण आजूबाजूच्या बायकांनी तिला दिलासा दिला की तुम्ही उतरून घ्या आम्ही येतो त्याला घेऊन मागून. आणि त्याप्रमाणे त्या बाईने त्याला सांभाळून पुढे दारापर्यंत नेलं, आजूबाजूच्या बायकांनीही अजिबात धक्के न मारता त्याला उतरू दिलं. आणि शेवटी तो आणि त्याची आई सुखरूपपणे प्लॅटफॉर्म वर उतरले. माझ्यासारख्या आतमध्ये बसून काळजी करणाऱ्यांनी खिडकीतून डोकावून पहिलं, ते नीट उतरले की नाही ते. आम्हाला बघून त्या दोघांनीही एक गोड स्माईल देऊन आम्हाला हात हलवून निरोप दिला.

माणूस स्वार्थी आणि आत्मकेंद्रित बनत चाललाय, आजकाल कोणाला कोणाची फिकीर नाही वगैरे गोष्टींवर आपला विश्वास ठाम होत चाललेला असतानाच अशा काही गोष्टी घडतात आणि माणसातल्या चांगुलपणाचं दर्शन घडतं. एरवी एकमेकांना शिव्या देत, कचाकचा भांडणाऱ्या ट्रेनमधल्या बायका, ज्या चढताना आणि उतरताना दुसऱ्याची एखादी वस्तू पडली किंवा ती व्यक्ती जरी पडली तरी पर्वा न करता आपली सीट पकडायला जाणाऱ्या या बायकांनी आज एका अनोळखी बाईला आपुलकीने जी मदत केली, त्यावरून खात्री पटली की अजूनही माणसातली माणुसकी कुठेतरी जिवंत आहे. कितीही घाईगडबडीत असले तरी आपल्या वाटेवर चालता चालताच दुसऱ्यालाही मदत करायची वृत्ती आजही खऱ्या मुंबईकरामध्ये जिवंत आहे. आणि नकळत ओठांवर ओळी आल्या,

“ए दिल है मुशिकल जिना यहा, जरा बचके जरा हसके ये है मुंबई मेरी जान.”

 

Advertisements