मोगरा

मोगरा मला प्रचंड आवडतो. त्याच्या सुगंधाने मन अगदी प्रसन्न होतं, सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. काल ट्रेन मध्ये मोगऱ्याचे गजरे विकणारी एक बाई पाहिली आणि मोह आवरला नाही. अर्धवट फुललेला तो मोगरा ओंजळीत घेऊन, त्याचा सुगंध श्वासात भरून घेताना, सहज सुचलेल्या या ओळी 🙂

IMG_20180220_141124_340मोगऱ्याचा सुगंध हा लागे जसा हाताला
तसा तुझ्या प्रेमाचा सुगंध माझ्या श्वासाला

एक एक कळी जशी गुंफलेली गाठीला
आठवणी तशा तुझ्या गुंतविती रातीला

मऊ मऊ पाकळ्या या सुखाविती मानेला
जसा तुझा स्पर्श शहारतो तना मनाला

दुरुनही दरवळ भुलवितो मनाला
तशी तुझ्या भेटीचीही ओढ लागे जीवाला

असलास किती जरी दूर दूर देशाला
सख्या तुझ्या प्रेमाचा सुगंध माझ्या श्वासाला

                                                          -अनुया

Advertisements