माझा देव

परवा आमच्या ओळखीतल्या एक काकू दादर स्टेशन जवळ भेटल्या. कपाळा वरचा लाल टिका पाहून त्या सिद्धिविनायकाला जाउन आल्या असणार असा मी अंदाज बांधला. बोलता बोलता कळलं की त्यांच्या मोठ्या मुलाचा मध्यंतरी अपघात झाला होता आणि गंभीर दुखापत झाली होती. पण त्याचं नशीब बलवत्तर म्हणून वाचला. भोज्याला शिवूनच आला होता म्हणा ना. “आम्ही तर बाई आशाच सोडली होती. पण मी सिद्धिविनायकाला नवस बोलले होते. हवं तर मला घेऊन जा म्हटलं. पण माझा बाप्पा नवसाला पावला बंर का. अमित ला स्वतः च्या पायावर उभं राहिलेलं पाहिलं आणि भरून पावले मी. देवाचे किती आभार मानू आणि किती नको असं झालंय मला. तोच नवस फेडायला आले होते आज.” त्यांच्या पाणावलेल्या डोळ्यातुन आनंद आणि देवाबद्दलची कृतज्ञता ओसंडून वाहत होती. त्यांच्या मुलाबद्दल समाधान व्यक्त करून आणि इतर चौकशी करून मी त्यांचा निरोप घेतला. पण डोक्यात एक विचार सुरु झाला. “देव पावला, देवाचे उपकार झाले” म्हणजे नक्की कोणाचे उपकार झाले? देवाने कुठून आणि कशी मदत केली? काकू नवस फेडायला ज्या देवळात गेल्या तिथल्या मूर्ती मधल्या देवाने वाचवलं त्यांच्या मुलाला? देव पावतो म्हणजे नक्की काय?

त्या काकू आणि त्यांच्या सारख्या अनेक लोकांच्या श्रद्धेचा, भावनांचा मी आदर करते. देवाचं अस्तित्व मी कधीच नाकारले नाही, तो आहेच आणि तोच सगळ घडवून आणतो यात शंकाच नाही. पण ते तो आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, वावरणाऱ्या लोकांच्या रूपाने घडवून आणतो असं मला कायम वाटत आलंय. मूर्तीत, मंदिरात असलेला देव हे फक्त त्याचं एक प्रतीकात्मक रूप आहे. पण खरं तर तो तुमच्या आमच्या सारख्या माणसांच्या रूपानेच आपल्याला भेटत असतो. काकूंच्या मुलाच्या बाबतीत तो त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर च्या रूपाने भेटला ज्यांनी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आणि प्रयत्नांची शर्थ करून त्याला वाचवलं. त्याची शुश्रुषा करणाऱ्या नर्स आणि आया, त्याची काळजी घेणारे त्याचे कुटुंबीय, या परिस्थितीत त्यांना आर्थिक किंवा इतर कोणतीही मदत करणारे त्यांचे नातेवाईक किंवा मित्र या सगळ्यांचाच त्याला बरं करण्यात वाटा आहे. त्या त्या वेळी देव त्या सर्वांच्या रूपाने त्याला मदत करत होता आणि त्याची काळजी घेत होता. खरं तर अपघात घडल्या नंतर त्याला वेळेवर हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणाऱ्या व्यक्तीच्या रूपाने तो सर्वात आधी भेटला. त्याला जर उशीर झाला असता तर सगळंच संपलं असतं. नवस फेडण्या बरोबरच या सर्वच व्यक्तींचे आभार मानायला हवेत.

असं म्हणतात की देव प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आपल्यासोबत राहू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. अगदी खरं आहे ते. आपली जीवापाड काळजी घेणारी, स्वतःच्या आधी आपला विचार करणारी आई म्हणजे देवाचेच रूप आहे. पण फक्त आईच नाही तर आपल्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक माणसात, प्रत्येक नात्यात देव आहे. तो सगळीकडे आपल्यासोबत राहू शकत नाही म्हणूनच त्याने सर्व नाती निर्माण केली आणि माणसाला माणसाशी जोडलं. त्या प्रत्येक नात्यात त्याने आपला अंश ठेवलाय जो वेळोवेळी आपल्याला भेटतो, आपली काळजी घेतो,आपल्याला मदत करतो. त्या प्रत्येक नात्याचे आणि माणसाचे आपण आभार मानायला हवेत आणि त्यांची आठवण ठेवायला हवी.

फायनल इयर च्या रिझल्ट नंतर जॉब इंटरव्यू साठी सतत कुठे न कुठे फिरावे लागायचे. असंच एकदा एके ठिकाणी मी जात होते. तो भाग माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता, तिथे मी कधी गेले नव्हते. मनात थोडी धाकधूक होती, पण म्हटलं बघू, शोधु. बस मध्ये कंडक्टरला स्टॉपची माहिती विचारत असताना माझ्या पुढच्या सीट वर बसलेल्या एका बाईने स्वतःहून मला माहिती सांगायला सुरुवात केली. नंतर मला म्हणाली मी पण त्याच स्टॉप वर उतरणार आहे, माझ्यासोबत उतर. मला जरा बंर वाटलं, थोडीफार माहिती तरी मिळाली होती. बाकी थोडं विचारत विचारत जाऊ. पण त्या बाईने उतरल्या नंतर सुद्धा मला सोबत केली. कुठून कसं डावी उजवीकडे वळायचं ते सांगितलं, एवढंच नाही तर मला रिक्षा मिळेपर्यंत ती माझ्यासोबत थांबली आणि रिक्षावाल्याला पण सांगितलं मला नक्की कुठे सोडायचं ते. पत्ता शोधण्यासाठी कोणतेही कष्ट घ्यावे लागले नाहीत मला, मी व्यवस्थित त्या जागी पोचले. कोण कुठली ती बाई, ना गणगोताची ना ओळखीची पण मुंबई सारख्या शहरात जिथे प्रत्येक जण आपल्याच घाईत असतो, तिथे तिने स्वतः चा काही वेळ माझ्यासारख्या अनोळखी व्यक्तीला मदत करण्यासाठी दिला. वाट चुकलेल्या आणि गोंधळलेल्या मला मार्ग दाखवण्यासाठी देव त्या वेळी तिच्या रूपाने भेटला मला.

२-३ वर्षांपूर्वी आमच्या घराचे रिनोवेशन चे काम काढले होते आणि ते पूर्ण होईपर्यंत काही दिवसांसाठी आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. अर्धे काम झाल्यावर ज्याला हे काम दिले होते त्याची तब्येत बिघडली. असे एका आर्कीटेक्ट ने अर्धवट केलेले काम सहसा दुसरे कोणी पूर्ण करायला घेत नाही. आमची भाड्याच्या घरात राहायची मुदत संपत आली होती पण घराचे काम खूप बाकी होते. तिथे राहायला जाणे शक्यच नव्ते. आम्ही सगळेच खूप चिंतेत होतो. पण सुदैवाने बाबांच्या मित्राच्या ओळखीचा एक माणूस हे काम करायला तयार झाला. तो डिग्री घेतलेला आर्कीटेक्ट नव्हता पण खूप कुशल कारागीर होता. त्याने त्याच्या हाताखालची सगळी माणसं दिवस रात्र कामाला लावली. स्वतः सुद्धा खूप राबला पण दिलेल्या वेळेत आमचे काम पूर्ण करून दिले आणि आमची चिंता दूर केली. योगायोग असा की त्याचे नाव गणपती होते. योगायोगाचा भाग सोडा, पण त्या वेळी तो खरंच देवासारखा येउन उभा राहिला आमच्या साठी. बाबा तर त्याला म्हणाले सुद्धा “तू नावाप्रमाणेच वागलास, गणपती हा विघ्नहर्ता आहे. तू पण अशा वेळी येउन आमचे विघ्न दूर केलेस”. त्याने ही गोष्ट हसण्यावारी नेली. पण माझ्या दृष्टीने त्या वेळी देवच त्याच्या रूपाने येउन आम्हाला मदत करून गेला होता.

असे अनेक प्रसंग आहेत ज्या वेळी मला सतत या गोष्टीची प्रचीती येत राहते की देव कोणत्या ना कोणत्या माणसाच्या रूपाने आपल्याला भेटत असतो. कधी प्रत्यक्ष रुपात मदत करणारी व्यक्ती भेटते तर कधी कोणी एखादा मोलाचा सल्ला देऊन जाते ज्यामुळे आपली अडचण दूर होते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर, आपले काही जवळचे मित्र-मैत्रिणी असतात. जे सगळ्या सुख दुःखात आपल्या सोबत असतात. कधी आपल्या मनात साचलेलं सगळं आपण भडाभडा त्यांच्याजवळ बोलून मोकळं होतो तर कधी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडून घेतो. कधी कधी सगळं जग आपल्या विरोधात आहे असं वाटत असताना एखाद्या मित्राने विश्वासाने आपल्या खांद्यावर हात ठेवून म्हटलेले “काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे” हे शब्द, तर कधी एखाद्या आघातामुळे कोलमडून पडल्यावर “तुला यातून स्वतःला सावरावंच लागेल आणि एक नवीन सुरुवात करायची आहेस.” हे मित्राचे प्रेमाने दरडावलेले शब्दच आपल्याला एक नवीन मार्ग दाखवतात, जगण्याची उभारी देतात. या मित्रांच्या रूपाने देवच तर बोलत असतो आपल्याशी. कधी कधी आयुष्यात काही लोक अशा वळणावर भेटतात जणू काही वाळवंटात पाण्याचा झरा सापडावा. याला योगायोग ही म्हणू शकतो, पण तरी…. कुठेतरी याचा संबंध त्या वरच्याशी जोडलेला असतो असं मला मनापासून वाटत. त्याला कळतं…. कोणत्या वेळी आपल्याला कशाची, कोणाची गरज आहे, आणि तो त्या व्यक्तीला आपल्याला भेटवतो…किंवा त्या व्यक्तीच्या रूपाने स्वतःच येउन भेटतो.

आपल्या जवळच्या या अशा व्यक्ती, किंवा ज्यांनी कधी ना कधी कोणत्या न कोणत्या कारणाने आपल्याला मदत केली आहे अशा सर्व व्यक्तिंबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. पण आपण कधी कळत नकळत आपल्या माणसांना दुखावतो. कधी मदत केलेल्यांना विसरतो. देवाच्या बाबतीतले सगळे नियम काटेकोरपणे पाळतो. मग माणसांच्या बाबतीत का नाही ? जर आपण हे तत्व कायम लक्षात ठेवले की आपल्या जवळची सगळी माणसं म्हणजे देवाचीच रूपं आहेत तर आपण त्यांचा तेवढाच आदर करू, त्यांना दुखावणार नाही , विसरणार नाही. जसं आपण देवाची पूजा करतो किंवा मंदिरात जातो, तसंच थोडा वेळ आपल्या जवळच्या माणसांची आठवण काढण्यात किंवा त्यांच्यासाठी काही करण्यात घालवला तर ते देवपुजा किंवा देवाचं नामस्मरण केल्यासारखचं होइल नाही का?

शेवटी देव हा अमुक एका स्वरूपात असतो किंवा अमुक एका रूपातच कोणाला दर्शन देतो हे कोणाला नक्की माहित आहे? कोणी पाहिलय त्याचं खरं रूप? पण निदान आपल्याला भेटणाऱ्या देवाचे तरी आपण आभार मानू शकतो ना? आणि ते करता करता कदाचित आपल्याला आपल्यातला देवही सापडेल किंवा दुसऱ्या कोणाला आपल्यात देव सापडेल. अशा वेळी या ओळी अगदी सार्थ वाटतात

“शोधिसि मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी”

Advertisements