My first blog

नमस्कार,

माझा पहिला मराठी ब्लॉग ‘मनमोकळं ‘ सुरू करताना खूपच छान वाटतंय. ( ‘मनमोकळे’ नाही ‘मनमोकळं’ च आहे ते. ब्लॉग title मराठीतून ठेवायची सोय अजून झाली नाही आणि इंग्लिश मध्ये लिहायचे तर दोनच प्रकारे लिहू शकते manmokle किंवा manmokla. त्यातल्या दुसऱ्या पर्यायाचा उच्चार काही धेडगुजऱ्या लोकांनी ‘मनमोकळा’  असा करू नये म्हणून नाईलाजाने manmokle हे नाव ठेवावे लागले. तरी सूज्ञ वाचकांनी ते ‘मनमोकळे’ नसून ‘मनमोकळं’ च आहे हे समजून घ्यावे. इंग्लिश भाषा आपल्या मायमराठी एवढी समृद्ध नाही बिचारी त्याला काय करणार?)   असो. तर  या ब्लॉग बद्दल मी वेगळं काही सांगायची गरज नाही कारण नावातच सगळा अर्थ सामावलाय. ‘मनमोकळं’ मधून मी फक्त मन मोकळं बोलणार आहे.  माझ्या मनातल्या गोष्टी, विचार, माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे माझ्या दृष्टीकोनातून केलेलं चित्रण हे सर्व यात मी लिहिणार आहे. थोडक्यात या ब्लॉग च्या माध्यमातून मी व्यक्त होणार आहे. This blog is to express myself. ज्यांना ‘व्यक्त’ सारखे शब्द फार कठीण वाटतात आणि मराठी पेक्षा इंग्लिश मधून सांगितलेलं जास्त चांगल्या प्रकारे कळतं अशांसाठी हे वाक्य मुद्दाम इंग्लिश मधून लिहिलंय.

तर, ब्लॉगच लिहायचा होता तर तो इंग्लिश मधून का नाही सुरु केला असा प्रश्न पडलेल्या सर्वांना मी सांगू इच्छिते की आपल्या मनातलं नेमक्या शब्दात व्यक्त करण्यासाठी आपल्या मातृभाषेपेक्षा जास्त चांगलं मध्यम कोणतं असू शकतं असं मला नाही वाटत. याचा अर्थ माझं इंग्लिश फार चांगलं नसावं असा अर्थही काही महाभाग घेतील, घेऊ दे. त्यांना कोणतेही स्पष्टीकरण देण्यात किंवा त्यांच्याशी वाद घालण्यात मला काडीचाही रस नाही. कारण इंग्लिश येत नसेल किंवा ते फार चांगलं नसेल तरच मराठी किंवा इतर भारतीय भाषांमध्ये बोललं पाहिजे या मताची मी अजिबात नाही आणि माझ्या मातृभाषेत बोलायची मला लाजही वाटत नाही. असो, तर मुद्दा असा की आपल्या मनातलं बोलण्यासाठी मला आजही मराठीपेक्षा दुसरी कोणती भाषा जवळची वाटत नाही म्हणूनच मराठीतून ब्लॉग लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न. “चार गोष्टी खरडल्या की अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे लोक लगेच स्वतःला लेखक समजायला लागतात” अशी टीका कोणी करण्याआधीच मी हे नम्रपणे सांगून टाकतेय की मी काही उत्कुष्ट लेखिका वगैरे आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही. मनात आलेलं कधी कधी कागदावर लिहून काढते एवढंच. या ब्लॉग द्वारे मी माझी लिहिण्याची हौस ( काही लोक याला ‘खाज’ही म्हणू शकतात) भागवून घेतेय असं म्हटलं तरी चालेल. तसंच मी काही professional blogger सुद्धा नाही त्यामुळे काही चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पदरात घ्या एवढीच विनंती

अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, यात मी माझे विचार मांडणार आहे त्यामुळे ते तुमच्या सर्वांच्या विचारांशी मिळते जुळते असतीलच असं नाही, तसा माझा अट्टाहासही नाही. जे पटेल ते घ्या, इतरांना सांगा, शेअर करा. जे नाही पटत ते सोडून द्या.  मी काही इथे सगळ्यांना उपदेश द्यायला किंवा देशात क्रांती घडवून आणायला बसले नाहीये. जे भल्या भल्यांना नाही जमलं ते माझ्या सारख्या पामराला काय साधणार म्हणा. हा हा हा

असो, नमनालाच घडाभर तेल झालंय. प्रस्तावना आवरती घेते आता. वाचत राहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा. मी जेव्हा आणि जसं जमेल तसं प्रत्येकाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन

अनुया

Advertisements