परफेक्ट क्लिक – Part 3

सूचना: या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 🙂 😛

अनिता आणि आदित्यची मैत्री तशीच होती, पहिल्यासारखी. साधी सहज. जे झालं त्यामुळे त्यात कोणताही अवघडलेपणा, awkwardness येणार नाही याची आदित्यने पुरेपूर काळजी घेतली होती. त्याने पुन्हा कधीच तो विषय तिच्याकडे काढला नाही, त्याची हलकीशी आठवणही करून दिली नाही. तो आधिसारखाच वागत होता तिच्याशी. गप्पागोष्टी, मस्करी शेअरिंग, रोज whatsapp वर चॅट, कधी कॉल्स आणि हो अधून मधून तिच्या डान्सच्या शोजचं शूटिंग करायलाही जायचा तो. कधी ती त्याच्या बॅडमिंटनच्या मॅचेस बघायला जायची. आणि त्या दोघांच्याही आवडीचं काम तर ते एकत्र करतच होते, फिरण्याचं. ट्रेक्स, टूर्स आणि ट्रिप्स.

अशाच एका wildlife टूरवरून दोघे ट्रेनने परत येत होते. ३०-३५ जणांचा ग्रुप होता तरीही रिझर्व्हेशन एकत्र न मिळाल्याने सगळ्यांच्या सीट्स वेगवगेळ्या आल्या होत्या. ३-४ जणांचे ग्रुप वेगवगेळे बसले होते. गाडी वाटेत एका स्टेशनवर थांबली. “हे जरा बरं स्टेशन दिसतंय, मोठं पण आहे बहुतेक. इकडे मिळेल जरा काहीतरी चांगलं.” असं म्हणून आदित्य सीटवरून उठला. “थांब मी पण येते, जरा पाय मोकळे होतील. अंग आखडलंय नुसतं.” असं म्हणून अनिताही त्याच्या मागोमाग उतरली. जवळ काहीच चांगलं दिसत नव्हतं म्हणून दोघे जरा लांब गेले चालत. दोघांनीही आपापल्या आवडीचं खाणं पॅक करून घेईपर्यंत ट्रेनने शिट्टी दिली पण ते दोघेही गप्पांमध्ये इतके रंगले होते की तो आवाज त्यांना ऐकूच आला नाही. खाणं पार्सल घेऊन दोघे परत येतात तर काय…. ट्रेन गेलेली होती. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. 

“ohh… my god. shitt shitt. आता काय करणार आपण?” अनिता घाबरलेल्या स्वरात म्हणाली. “असं कसं झालं यार? आपल्या लक्षात कसं नाही आलं ट्रेन निघतेय ते?” ती म्हणाली. 

“तरी मी सांगत होतो, पटकन होईल असं काहीतरी घे, डोसा व्हायला वेळ लागतो. पण नाही, तुला तेच हवं होतं ना.” 

“Hellooo….. वेळ फक्त डोश्याला नाही सॅन्डविचला सुद्धा लागतो. आणि माझा डोसा होईपर्यंत तुझं सॅन्डविचही नव्हतं झालं कळलं ना?” ती रागावून म्हणाली.” आणि तू तो फालतू जोक सांगत बसला नसतास तर ट्रेनची शिट्टी ऐकू आली असती आपल्याला.” 

“अरे… माझ्या जोकचा काय संबंध? म्हणजे तुला काय म्हणायचंय ट्रेन माझ्यामुळे गेली?” 

“मग काय माझ्यामुळे गेली का?” 

“OK OK… leave it.” आदित्य तिला शांत करत म्हणाला. “आपण असं भांडून काही ट्रेन परत येणार नाहीये. आता पुढे काय करायचं त्याचा विचार करायला हवा.” 

“आपण कोणालातरी सांगून यायला हवं होतं उतरताना, कसं लक्षात नाही आलं आपल्या.” अनिता उदास होत म्हणाली. 

“कसं सांगणार, सगळे वेगवेगळे बसले होते ना.” आदित्य म्हणाला. “आणि सांगितलं असतं तरी आपण जरा लांबच आलो होतो ना. ते बोलावणार तरी कसे?” 

“आपण आपल्या लीडला कॉल करूया ना, त्याला विचारूया पुढचा हॉल्ट कुठे आहे आणि तिकडे कसं पोचणार.” अनिताने सुचवलं. 

“हं.. तेच करतोय.” असं म्हणून आदित्यने फोन लावला. बराच वेळ बोलणं झालं आणि त्याने फोन ठेवला. मग तिच्याकडे येऊन म्हणाला, “कठीण आहे.” “म्हणजे?” तिने डोळे मोठे करत विचारलं. “आणि तू एवढा वेळ काय बोलत होतास?” 

“आधी तर ५ मिनिट त्यांनी तोंडसुख घेतलं माझ्यावर. असा कसा निष्काळजीपणा करता तुम्ही and all that blah blah. मग काय ऐकून घेतलं.” आदित्य म्हणाला. 

“OK… ते सोड, पण आता पुढे काय? इथून कसं जायचं पुढे आणि ट्रेन कशी पकडायची त्याचं काही सांगितलं का?” तिने अधीरपणे विचारलं. 

“आता इथून पुढे जो हॉल्ट आहे तू खूपच लांब आहे म्हणजे बाय रोड जवळजवळ १०० किलोमीटर तरी असेल. आणि मुख्य म्हणजे तिकडे जायला इथून कोणतीच गाडी नाहीये डायरेक्ट. “

“अरे बापरे, मग आता?” अनिताने काळजीच्या स्वरात म्हटलं. 

“बघू… दुसरा काही मार्ग आहे का शोधावं लागेल.” आदित्य म्हणाला. “बाहेर जाऊन चौकशी करतो एखादी कार मिळते का हायर करायला.”

दोघेही बाहेर पडले स्टेशनच्या. थोडी माहिती काढल्यावर कळलं की डायरेक्ट नाही पण थोड्या वाटेपर्यंत जाण्यासाठी ६ सीटर गाड्या असतात शेअरिंग वर. तिथून पुन्हा दुसरी एसटी करावी लागेल. दोघेही ६ सीटरची वाट बघत उभे होते. तेवढ्यात एक आली. त्यात ६ च्या जागी ८ जण बसले होते आणि अजून २ जण त्यात जाऊन कोंबून बसले. हा प्रकार बघून दोघांनीही चक्रावून एकमेकांकडे बघितलं. पण आदित्यने लगेच म्हटलं, “ठीक आहे ना, ही सोडूया आपण. दुसरी येईल त्यात बसून जाऊया.” असं म्हणून त्याने तिला दिलासा दिला. पण त्यानंतरच्या लागोपाठ ५-६ गाड्या आल्या त्यांची हीच अवस्था होती. दोघे वाट बघून कंटाळले. संध्याकाळचे ७ वाजत आले होते, आता मात्र दोघांनाही टेन्शन यायला लागलं होतं. “मला वाटत इथे कितीही वेळ थांबलो तरी आपल्याला हवी तशी गाडी नाही येणार.” अनिता हताश होऊन म्हणाली. “बहुतेक इकडे सगळे असेच जात असतील रोज. आपणही जाऊया, करूया अॅडजस्ट.”  ती त्याच्याकडे बघून म्हणाली. “अगं पण त्यात कसे कोंबतात बघितलंस ना? किती uncomfortable होणार आहे ते. असं म्हणून तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, “especially तुला खूप त्रास होईल.” “पण दुसरा काही पर्याय पण नाही ना, हे असं इकडे किती वेळ उभं राहणार?” ती म्हणाली. “आपल्याला गाडी वेळेत पकडायची आहे ना.” “बरं ठीक आहे.” तो नाईलाजाने म्हणाला. 

थोड्या वेळाने अजून एक गाडी आली. आधीच्यापेक्षा जरा तरी बरी होती. ते दोघे बसू शकतील एवढी तरी जागा होती. ती त्यांच्याजवळ येऊन थांबली. त्याने कुठे जायचंय ते सांगितलं. ड्रायव्हर बसा म्हणाला. आदित्यने तिला बसायची खूण केली पण मग त्याचं लक्ष आत बसलेल्या माणसांकडे गेलं. त्याने एकच क्षण विचार केला आणि पटकन म्हणाला, “थांब, मी आत जातो” असं म्हणून तो आत बसला. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. सगळे दाटीवाटीने बसलेले असल्यामुळे तिला बसायला जागा कमी पडत होती. ती जवळजवळ अर्धी बाहेर होती. “हे काय, मला जागाच नाहीये अजिबात, ब्रेक मारला ना तर बाहेर पडेन मी.” ती जरा वैतागून म्हणाली. “त्यापेक्षा मी आत बसले असते ना.” असं ,म्हणून तिने त्याच्याकडे बघितलं आणि तेव्हा तिचं लक्ष पहिल्यांदाच त्याच्या बाजूला बसलेल्या माणसाकडे गेलं. तो तिच्याकडेच बघत होता. त्याचे डोळे लालभडक होते आणि तो तोंडात काहीतरी चघळत होता. नंतर हळूहळू तिने बाकीच्या माणसांकडे बघितलं. तेही थोड्याफार फरकाने त्याच्यासारखेच दिसत होते. गाडीत तिच्याव्यतिरिक्त दुसरी कोणतीच बाई नव्हती. पूर्ण गाडीत एक कुबट वास भरून राहिला होता. त्या वासाने तिला कसंतरीच झालं. 

“थांब मी सरकतो.” असं म्हणून तो जरा पुढे सरकून बसला. “आता तू जरा मागे ये म्हणजे थोडी जास्त जागा मिळेल.” ती सरकली. त्याने तिच्या खांद्यामागुन हात टाकून तिच्या बाजूला असलेल्या वरच्या दांड्याला पकडलं. आता त्याचा हात तिच्या खांद्याला लागूनच होता. “आता नाही पडणार.” तो तिच्याकडे बघून हसत म्हणाला. तीही हसली पण तिने बघितलं की तो खूपच अवघडून बसला आहे. “अरे तुला कमरेला त्रास होईल असं बसून. आणि हातही दुखेल. थांब मी सरकते.” असं म्हणून ती सरकणार तोच त्याने मानेनंच तिला सांगितलं, “I am fine… Don’t worry.”  गाडी चालत होती. रस्ते खडबडीत असल्याने खूप धक्के बसत होते. अंधार पडायला लागला होता. त्याच्या बाजूचा माणूस अधूनमधून सारखा तिच्याकडे बघत होता. ती त्याची नजर चुकवत बाहेर बघण्याचा प्रयत्न करत होती. त्या वासाने तिचं डोकं भणभणायला लागलं होतं. “अजून किती वेळ लागेल?” तिने अस्वस्थ होऊन आदित्यला विचारलं. “येईल आता १० मिनटात.” तो म्हणाला. “आणि काका पोलीस स्टेशनमधून डायरेक्ट तिकडेच येतायत आपल्याला घ्यायला.” “कोण काका?” तिने गोंधळून विचारलं. “अगं माझे काका पोलिसात आहेत ते गं.” तो म्हणाला. ती अजूनही त्याच्याकडे गोंधळून बघत होती. त्याने हळूच तिचा हात दाबला आणि कुजबुजला. “Just say yes to whatever I am saying… don’t ask anything now.” तिने मान हलवली आणि म्हणाली, “अच्छा ते काका का. बरं बरं.” “खरं तर ते इकडेच येणार होते आपल्याला घ्यायला पण वाटेत काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणाले. कोणीतरी काहीतरी राडा केला वाटतं. जाम बडवलं त्याला म्हणे.” आदित्य इतका उत्तम अभिनय करत होता की अनिताला हसू आवरत नव्हतं. 

त्यांचं ठिकाण आल्यावर ते उतरले. गाडी निघून गेली. “तू ही आयडिया छान केलीस हा.” अनिता हसून म्हणाली. “सगळ्यांची तोंडं बघण्यासारखी झाली होती बरं का. Especially तो तुझ्या बाजूला बसलेला.” तिला अजूनही हसू आवरत नव्हतं. 

“मग.. तसा मी स्मार्टच आहे. जन्मापासून. हम है तो क्या गम है.” तो एकदम स्टाइलमध्ये आपली कॉलर उडवत म्हणाला. 

“हो हो माहित आहे माहित आहे.” ती त्याला चिडवत म्हणाली आणि मग एकदम काहीतरी आठवल्यासारखं करून म्हणाली, “ए पण तुला कसं कळलं की तो माझ्याकडे बघत होता? म्हणजे मी तर तुला काहीच….” ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाली. तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला, “सगळ्या गोष्टी सांगाव्या नाही लागत. तुला काय वाटलं मला खूप मजा येत होती तुला काठावर बसवायला?” ती काहीच बोलली नाही. दोघेही एकदम शांत झाले. मग ती म्हणाली, “पण आता पुढे काय?इथून पुढे कसं जायचं? एसटी आहे ना इथून?” 

“हो असंच सांगितलं होतं मला. बघतो मी विचारून.” असं तो म्हणाला आणि तेवढ्यात अचानक पाऊस पडायला लागला. दोघांची गडबड उडाली. पळत पळत दोघे एका दुकानाच्या आडोशाला जाऊन थांबले. 

“श्या… हे काय भलतंच. ही काय वेळ आहे का पावसाची?” ती अंगावरचं पाणी झटकत म्हणाली. 

“तो काय आपला नोकर आहे का आपल्याला वेळ विचारून पडायला.” आदित्य म्हणाला. “आणि तसाही मे जवळजवळ संपलाय. दोनच दिवस आहेत. पाऊस कधीही येऊच शकतो आता.” थोडा वेळ ते तसेच थांबले पण पाऊस थांबायची काही लक्षणं दिसेनात. त्यांनी जवळच्या एका माणसाला विचारलं इथून एसटी डेपो किती दूर आहे. त्याने सांगितलं ५ मिनिटं चालावं लागेल. 

“जाऊया का चालत पटकन?” त्याने विचारलं. 

“पण आपल्याकडे काहीच नाहीये. छत्री, रेनकोट.”  ती म्हणाली. 

“डोक्यावर रुमाल टाकू आणि जाऊ. पाऊस कधी थांबेल माहित नाही आणि जर शेवटची एसटी गेली तर.” तो म्हणाला. “तसंही आता ही एसटी पकडूनही ट्रेन मिळेल का मला शंकाच वाटतेय.” 

“अरे बापरे, नको नको. मग चल जाऊया.” असं ती म्हणाली आणि ते दोघेही डोक्यावर रुमाल टाकून भिजत भिजत डेपोकडे निघाले. 

डेपोत पोचेपर्यंत दोघेही चिंब भिजले होते. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना जी हवी होती ती एसटी निघून गेली होती आणि आता पुढची एसटी २ तासांनी होती. आता मात्र आदित्यला खूप टेन्शन आलं होतं पण त्याने तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. तो अनिताजवळ आला. भिजल्यामुळे ती थंडीने कुडकुडत होती. सगळं सांगितल्यावर ती रडवेली होऊन म्हणाली, “आता? म्हणजे ट्रेन तर नाहीच मिळणार पण आता इथून डायरेक्टली मुंबईला जाण्यासाठी तरी कोणती एसटी आहे का?” तिने काकुळतीला येऊन विचारलं. “नाही. डायरेक्ट मुंबईसाठी तर सकाळीच आहे.” तो एक सुस्कारा टाकून म्हणाला. अनिता आता रडायचीच बाकी होती. तिची अवस्था बघून तो उसनं अवसान आणून म्हणाला, “अरे तू शांत हो. रडू नकोस प्लीज. आपण बघू काही करता येतंय का. तू ये इकडे बस.” असं म्हणून त्याने तिला जवळच्या बाकावर बसवलं. “तुला खूप थंडी वाजतेय मी चहा आणू का?” त्याने विचारलं. ती काहीच बोलली नाही. “आणतो मी, थांब तू इथेच. आणि प्लीज Don’t panic… don’t worry पोचू आपण घरी.” असं म्हणून तो चहा आणायला गेला. 

अनिता थंडीने कुडकुडत होती. तिचं डोकंही दुखायला लागलं होतं. मळमळत होतं. भिजल्याने सगळे कपडे अंगाला चिकटले होते. तिच्यापासून काही अंतरावर मुलांचा एक ग्रुप उभा होता. ते तिच्याकडे बघत होते आणि अचानक सगळे हसायला लागले. अनिताचं तिकडे लक्षच नव्हतं, ती तिच्याच विचारात गढली होती. तेवढ्यात आदित्य चहा घेऊन आला. त्याने त्यांचं हसणं ऐकलं. एक जळजळीत कटाक्ष त्यांच्या दिशेने टाकला. ते हसायचे थांबले पण तरीही अधूनमधून अनिताकडे बघत होते. त्याने चहाचे ग्लास बाजूला ठेवले. पाठीवरची सॅक काढली आणि त्यातून एक जॅकेट काढलं. “हे घे घाल… थोडी ऊब येईल.” तिच्या हातात जॅकेट देत तो म्हणाला. “नाही नको. मी ठीक आहे.” ती म्हणाली. “आणि हे वूलन जॅकेट आहे ना, मी भिजले आहे. ओलं होईल ते.” ती म्हणाली. 

“होऊ दे ओलं, पण आता घाल.” तो आग्रहाने म्हणाला. “नको आहे मला सांगितलं ना.” ती जरा वैतागून म्हणाली. “प्रत्येक वेळी तुझंच बरोबर असतं असं नाहीये.” तो जवळजवळ ओरडून म्हणाला. “कधीतरी दुसऱ्या माणसांचं ऐकत जा. सांगतोय तेवढं ऐक आणि हे घाल.” असं म्हणून त्याने तिच्या हातात ते जबरदस्तीने कोंबलं. त्याचा हा अवतार बघून ती भांबावूनच गेली. तिने पटकन ते घातलं. “हे खूप मोठं होतंय मला.” ती भीत भीत म्हणाली. “असू दे. नीट घाल आणि चेन पूर्ण लावून टाक.” त्याचा स्वर अजूनही चढलेलाच होता. तिने चेन लावली. ते जॅकेट इतकं मोठं होतं की ती पूर्णपणे झाकून गेली त्यात. जवळजवळ गुडघ्यापर्यंत आलं होतं ते. पण त्याबद्दल काहीही तक्रार करायची तिची हिंमतच नाही झाली, त्याचा राग बघून. 

त्याने तिच्या हातात चहाचा ग्लास दिला आणि स्वतः पण प्यायला. चहा पिऊन झाल्यावर ती म्हणाली, “इथे वॉशरूम कुठे आहे? मला जायचंय.” दोघेही वॉशरूमकडे आले. तो जाऊन आला तर ही आधीच बाहेर येऊन उभी होती. “झालं? चल आता.” असं म्हणून तो निघणार एवढ्यात ती म्हणाली, “नाही”. “काय?” त्याने विचारलं. “नाही गेले मी.” ती मान खाली घालून म्हणाली. “का?” त्याने आश्चर्याने विचारलं. “अगं तुलाच तर जायचं होतं ना?” “हो जायचं होतं पण ते खूपच घाण आहे. वास येतोय तिकडे.” ती कसातरीच चेहरा करत म्हणाली. 

“तू काय पहिल्यांदा प्रवास करतेयस का?एसटी डेपोमधली वॉशररूम्स कशी असतात हे वेगळं सांगायला नको तुला.” तो म्हणाला. मग जरा थांबून पुन्हा म्हणाला, “पण काय ग, आपण एवढ्या ट्रेकना जातो तिथेही गावात सगळे असेच वॉशरूम्स असतात, त्यामुळे तुला तर सवय आहे ना अशा ठिकाणी जायची. मग? आताच काय झालं?” त्याने विचारलं. “काही नाही, पण नको.” ती एवढंच म्हणाली. तो जरा गोंधळला. मग म्हणाला, “एक मिनिट… काही झालंय का? I mean… कोणी आलं होतं का? कोणी काही फालतुगिरी केली का?” त्याने विचारलं. “नाही.” ती म्हणाली. “मग काय झालंय? कोण आहे आत?” त्याने जरा चिडूनच विचारलं. “उंदीर.” ती खाली मान घालून म्हणाली. “काय? कोण?” त्याने पुन्हा विचारलं. “उंदीर आहे आत. आणि मला भीती वाटते, मी नाही जाऊ शकत आत.” ती अजूनही खाली मान घालूनच उभी होती. 

मग मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले. तो खो खो हसायला लागला. “हाहाहाहा…. उंदीर. तू उंदराला घाबरतेस?” तो हसत हसत म्हणाला. “हो घाबरते मी. त्यात काय?” तिने रागवून म्हटलं. “काही गुन्हा आहे का त्यात?” “नाही नाही… गुन्हा नाही पण… तू एवढी डॅशिंग, घरी सोडायला येऊ का तर नको म्हणतेस. म्हणे मला कराटे येतात And all आणि आता उंदराला… ” त्याला नीट बोलता पण येत नव्हतं इतकं हसू येत होतं. “अरे…. कराटेचा काय संबंध? कराटे माणसांपासून वाचण्यासाठी असतात, उंदरांशी काय संबंध त्याचा?” ती चिडून म्हणाली. “आणि तू प्लीज हसू नकोस हा. वाटते तर वाटते भीती.” ती त्याच्याकडे बघून चिडून म्हणाली. पण त्याचं हसणं थांबतच नव्हतं. खूप वेळ हसल्यावर तो शेवटी शांत झाला. “Ok ok…. I am sorry. Enough now.” असं म्हणून त्याने आपलं हसू आवरलं. “मग आता काय? इकडे हे एकच वॉशरूम आहे.” तो म्हणाला. “मग काय, नाही जात मी. बघू नंतर कधीतरी” ती म्हणाली. “नाही नाही असं नको. त्रास होईल.” तो म्हणाला. “तो तर आताही होतोच आहे.” ती म्हणाली. “म्हणजे?” त्याने विचारलं.  “माझं डोकं खूप दुखतंय आणि मळमळतंय मला.” तिने सांगितलं. “Ohh… अरे बापरे.” तो काळजीने म्हणाला. “बरं आधी आपण वॉशरूमचं काय ते बघू.” असं म्हणून ते दोघे बाहेर आले. 

पाऊस पण थांबला होता. त्याने डेपोपासून जरा लांब आडोशाची जागा शोधली. तिच्याजवळ जाऊन म्हणाला. “हे बघ, त्याच्यामागे जाऊन ये, मी बघून आलोय. कोणी नाहीये आजूबाजूला. आणि मी इथेच थांबतो, लक्ष ठेवतो. ती जरा अस्वस्थ झाली आणि तिथेच थांबली. तो तिच्याजवळ गेला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, “मी नीट बघून आलोय, खरंच कोणीही नाहीये जवळपास. अंधार आहे तिकडे त्यामुळे कोणीही येणार नाही. आणि मी आहे इकडे लक्ष ठेवायला. Trust me.” तिने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि होकारार्थी मान हलवली. ती जाऊन आली. दोघे पुन्हा येऊन डेपोत बसले. तिचं डोकं आता ठणकायला लागलं होतं, खूपच त्रास होत होता. आदित्यला ते कळलं. “काय होतंय?” त्याने विचारलं. “उलटी.. उलटी येईल बहुतेक.” ती कशीबशी म्हणाली आणि लगेच उठली. आदित्य पटकन उठला. त्याने तिला पकडलं आणि रस्त्याच्या कडेला घेऊन आला. तिला उलटी झाल्यावर त्याने पाणी दिलं. “बरं वाटतंय का आता?” त्याने काळजीने विचारलं. “हं.. थोडं ठीक आहे.” ती पाण्याचा घोट घेत म्हणाली. “कशामुळे हे असं?” मघाशी तर बरी होतीस.” त्याने विचारलं. अॅसिडिटी झाली.” ती म्हणाली. “खूप वेळ काही खाल्लं नव्हतं ना. शिवाय मघाशी तो गाडीतला वास आणि एकूणच सगळं टेन्शन त्यामुळे ती अजून वाढली. ती डोकं दाबत म्हणाली. “मला होतं असं कधीकधी. दोन जेवणात जास्त गॅप पडला तर. आणि त्यात मी मघाशी तो चहा घेतला ना.” “म्हणजे?” त्याने आश्चर्याने विचारलं. “अरे म्हणजे चहाने अॅसिडिटी अजून वाढते ना.” ती म्हणाली. “अगं पण तू मला तसं सांगायचंस ना की मला चहा नको. मी काय जबरदस्ती केली का तुला?” तो म्हणाला. ती त्याच्याकडे रोखून बघायला लागली. “मघाशी? मघाशी तू काही ऐकण्याच्या स्थितीत होतास का? नुसता ओरडत होतास माझ्यावर. म्हणून मी गपचूप घेतला चहा. नाहीतर पुन्हा त्यावरून ओरडला असतास माझ्यावर.” ती म्हणाली. “अगं ते मी ओरडलो ते वेगळं.” त्याचा गोंधळ उडाला. “बरं.. माझंच चुकलं. I am sorry.” तो म्हणाला. “आता काय? म्हणजे आता काही खायचंय का तुला? नाहीतर अजून वाढेल अॅसिडिटी.” तो म्हणाला. 

“हो खायचंय पण…” ती आजूबाजूला बघत म्हणाली.” आपण कधी निघणार आहोत इथून.” तिने विचारलं. तो काहीच बोलला नाही. तिने पुन्हा त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितलं. तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, “हे बघ अनु, म्हणजे शांतपणे ऐकून घे. मी मघापासून तोच विचार करतोय की आता काय करता येईल. तर मी असा विचार केलाय… म्हणजे मला असं वाटतं हा.. की आता ट्रेन तर गेलीच ती काही आता मिळणार नाही. डायरेक्ट मुंबईला जायला पण एसटी उद्या सकाळीच आहे. किंवा १-२ गाड्या बदलून जायचं म्हटलं तरी त्या गाड्या पण उशिराच आहेत. शिवाय आता पाऊस पडलाय म्हणजे त्या कदाचित अजून लेट होतील. त्यामुळे मला असं वाटत की आपण आता रात्रीचा प्रवास करण्यापेक्षा आजची रात्र इथेच राहावं.” असं म्हणून त्याने तिच्याकडे बघितलं. “इथे?” ती डोळे मोठे करून म्हणाली. “इथे कसं शक्य आहे? आपण इथेच जेवणार? आणि वॉशरूमचं काय? सारखं बाहेर जाणार का? आणि…” तिला मधेच थांबवत तो म्हणाला. “थांब थांब…. शांत हो. chill chill. ऐक माझं पूर्ण ऐक.” तो तिला हाताने शांत करत म्हणाला.  “इथे म्हणजे इथे डेपोमध्ये नाही म्हणत आहे मी. आपण इथे जवळच कुठेतरी एखादी रूम बघूया. तसंही तुझी तब्येत पण ठीक नाहीये. तुला आरामाची गरज आहे आणि इथे…” आजूबाजूला बघत तो म्हणाला, “इथे रात्रभर थांबणं बरोबर नाही. कसे लोक आहेत बघितलंस ना?” 

“कसे?” तिने विचारलं. तो काहीच बोलला नाही. “सांग ना” तिने परत विचारलं. 

“काय सांगू? तुला कळत नाहीये का? ही मुंबई नाहीये, गाव आहे. इथे रात्रभर आपण दोघांनी असं बाहेर..” बोलता बोलता तो थांबला. “OK… ऐक. मला सांगायचं नव्हतं पण आता सांगावं लागतंय. तू मघाशी पूर्ण भिजलेली होतीस तेव्हा तिकडे ती मुलं उभी होती ती तुझ्याकडे कशा प्रकारे बघत होती माहित आहे तुला? तुझं लक्ष नव्हतं कारण तू टेन्शनमध्ये होतीस पण मी बघितलं. आणि म्हणूनच तुला जबरदस्तीने ते जॅकेट घालायला लावलं. आता कळलं? आणि इथे जितका वेळ थांबशील तेवढे असेच लोक भेटणार आणि असेच अनुभव येणार आहेत. मघाशी गाडीमधला तो माणूस विसरलीस? प्रत्येक वेळी कोणती नवीन स्टोरी बनवणार आहोत आपण पोलीस काकांची? सांग आता मला तूच… काय करायचं ते.” तो वैतागून सगळं एका दमात बोलला. ती गप्प झाली. थोडा वेळ शांतता. मग ती हळूच म्हणाली, “जाऊया रूमवर.” दोघेही डेपोच्या बाहेर पडले. 

“१२०० म्हणजे जरा जास्तच आहेत.” ती त्याला बाजूला घेऊन म्हणाली. “आपण दुसरीकडे बघूया का?”

“आता अजून कुठे दुसरीकडे बघणार, आधीच ४ बघून झालेत. आता या भागातले सगळे संपले पण असतील बहुतेक.” तो वैतागून म्हणाला. “आणि ते कसे होते बघितलं ना. कसले लोक होते तिकडे. त्यातल्या त्यात हाच जरा बरा वाटतोय. फॅमिली टाईप जरा डिसेंट.” तो चारी बाजूला बघत म्हणाला, “पैशाकडे बघू नकोस. वेळ महत्वाची आहे.” 

“ठीक आहे.” ती नाईलाजाने म्हणाली. “घेऊया आता काय करणार.” असं म्हणाली तेवढ्यात तिच्या पायाजवळून एक उंदीर पळत गेला. “ई…” असं किंचाळून तिने त्याचा हात घट्ट धरला आणि मग काउंटर वरच्या माणसाकडे बघून म्हणाली, “रूममध्ये पण असतील का उंदीर?” “नाही मॅडम. ते कधीतरी एखाददुसरा असतो इकडे. रूम वरती आहे ना, तिकडे अजिबात काही नाही. चला.” असं म्हणून तो त्यांना वरच्या रूममध्ये घेऊन गेला. 

“अरे वाह.. सोफा पण आहे.” त्याने लाईट लावल्यावर म्हटलं. “हे बरं झालं. म्हणजे मी आता इथे झोपतो सोफ्यावर. तू झोप तिकडे बेडवर.” असं म्हणत त्याने सोफ्यावर बसून पाय पसरले. ती काहीच बोलली नाही. दोघेही फ्रेश झाले आणि येऊन बसले. “मला वाटतं आपण काहीतरी खाऊन यावं बाहेरून. नाहीतर तुझी अॅसिडिटी वाढेल पुन्हा.” तो म्हणाला. “आणि तसंही जेवायची वेळ झालीच आहे.” “हो चालेल.” ती म्हणाली. “आणि हो तिकडे नाक्यावर एक दुकान आहे तिकडून रात्री घालण्यासाठी कपडे घेऊया, रात्रभर अशा ओल्या कपड्याने नाही झोपू शकत.” तिने मान हलवली आणि दोघेही जेवायला बाहेर पडले.  

—————————————————————————————————————————————–

रूमवर परत आल्यावर तो जाऊन सोफ्यावर बसला. “चला झोपूया. Goodnight” त्याने म्हटलं. ती म्हणाली, “ऐक ना… मी काय म्हणतेय.” तो उठून तिच्याकडे बघायला लागला. “काय?” त्याने विचारलं. “मला काही झोप नाही आली. आणि तसंही संध्याकाळपासून इतकं टेन्शन चालू आहे की आता झोप येईल असं वाटत नाही. त्यामुळे मी अशीच बसून राहणार आहे. फक्त पाय जरा लांब करेन. so… ” असं म्हणून ती क्षणभर थांबली. “तू इकडे येऊन झोपू शकतोस. मी इथे साईडला बसेन. बेड तसा खूप मोठा आहे. काहीच प्रॉब्लेम नाही.” तो क्षणभर तिच्याकडे बघत राहिला. त्यालाही काय बोलावं सुचत नव्हतं. मग म्हणाला,” अगं नको कशाला, तू झोप ना comfortably. झोप नाही आली तरी निदान आडवी हो म्हणजे बरं वाटेल. मी झोपतो इथे मला चालेल. I am fine here.” 

“नाही तो सोफा खूपच लहान आहे. तिकडे अवघडायला होईल. आधीच मघाशी तू त्या गाडीत पण अवघडून बसला होतास ना.” ती म्हणाली. “आता इथे पण असाच. नको. तू ये झोप इथे. नाहीतर मलाच गिल्टी वाटत राहील.” ती खाली बघून म्हणाली. “अगं वेडी आहेस का? त्यात काय गिल्टी?” तो हसून म्हणाला. 

“नाही पण तू ये ना इथेच. आणि जेव्हा मला झोपायचं असेल तेव्हा मी सांगेन ना तुला. मग तेव्हा जा तू सोफ्यावर. पण आता सध्या तरी इकडे ये प्लीज.” ती अजीजीने म्हणाली. क्षणभर विचार करून तो म्हणाला, “ठीक आहे.” आणि तो तिच्या बाजूला येऊन बसला. “हे काय? तू झोपत नाहीयेस?” तिने विचारलं. “नाही मला पण झोप नाही आली.” तो म्हणाला आणि दोघे एकमेकांकडे बघून हसले. 

दोघे गप्पा मारत होते. पण तिचं डोकं काही दुखायचं थांबत नव्हतं. ती सतत ते धरून बसली होती. मध्ये मध्ये चेपत होती. “माझ्याकडे गोळी आहे. ती देऊ का?” त्याने विचारलं. “ती माझ्याकडे पण आहे. पण मला वाटतंय हे अॅसिडिटीचं आहे.” ती डोकं दाबून म्हणाली. “ती पूर्ण गेली नाही वाटतं अजून.” 

“ohhh…. मग आता?” त्याने विचारलं. “काही नाही, सहन करायचं.” ती म्हणाली. थोड्या वेळाने तिला पुन्हा उलटी येतेय असं वाटलं म्हणून ती वॉशरुमकडे जायला उठली आणि तिचा तोल गेला. “अगं हळू हळू.” असं म्हणून आदित्य पटकन धावला आणि त्याने तिला धरलं. “काय होतंय?” त्याने विचारलं. “काही नाही जरा अंधार…” ती एवढंच म्हणाली आणि तिने डोळे मिटले. तो एकदम गांगरून गेला, कावराबावरा झाला. तरी त्याला पटकन सुचलं आणि त्याने पाणी आणलं. “हे घे थोडं पाणी पी.” तिने अर्धवट शुद्धीत ग्लास तोंडाला लावला. तो घाबरून तिच्याकडे बघत होता. काही मिनिटं अशीच गेली. मग त्याने विचारलं. “जरा बरं वाटतंय?” आता तिने डोळे उघडले होते. तिने मान हलवून हो असं उत्तर दिलं. त्याच्या जिवात जीव आला. पण दोनच मिनटात ती पुन्हा उठली आणि वॉशरुमकडे धावली. तिला पुन्हा उलटी झाली. त्याने धरून आणून तिला बेडवर बसवलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तीच अंग गरम लागतंय. “तुला ताप आहे अनु.” तो काळजीने म्हणाला. “तू एक काम कर आता लगेच crocin घे.” असं म्हणून त्याने आपली बॅग उघडून त्यातून गोळी काढली. “अरे नको, मी ठीक आहे.” असं ती म्हणत होती पण त्याने डोळे मोठे केले आणि म्हणाला, “गप्प ऐकायचं.” तिने मुकाट्याने गोळी खाल्ली. 

‘ताप तर उतरेल पण हिला अशाच उलट्या होत राहिल्या तर कसं होणार?’ तो विचारात पडला. ‘अशा वेळी देण्यासाठी काहीतरी हवं पण ते कुठे मिळणार?’ त्याने घड्याळ पाहिलं तर १० वाजत आले होते. ‘इथे दुकानं लवकर बंद होत असतील तर नाही मिळणार. आणि मिळत असेल तरी कोण आणणार? मी हिला अशा अवस्थेत एकटीला सोडून नाही जाऊ शकत. काय करू?’ त्याने तिच्याकडे पाहिलं. ती डोळे मिटून शांत बसली होती. त्याने फोन करून रूम सर्विसच्या माणसाला बोलवून घेतलं. त्याला आणायला सांगितलं. आधी तो आढेवेढे घेत होता. मग आदित्यने त्याच्या हातात एक न सरकवली तेव्हा तो गेला. त्याने आणलेली ग्लूकोज पावडर पाण्यात मिसळून त्याने तिला प्यायला दिली. “आता बरं वाटतंय?” त्याने विचारलं. “हो.. I am fine now.” ती म्हणाली. त्याचा जीव भांड्यात पडला. “मळमळ तरी थांबली आहे पण डोकं दुखतंय अजूनही.” ती डोकं दाबून धरत म्हणाली. “मी चेपून देऊ का?” त्याने विचारलं. “चेपून थांबणार नाही ते.” ती म्हणाली. “हो.. पण तरी. ट्राय करून बघतो ना.” असं म्हणून त्याने तिचं डोकं चेपायला घेतलं. चेपता चेपताच दोघे पुन्हा गप्पा मारायला लागले. बोलता बोलता बोलता आदित्यचे डोळे पेंगायला लागले. बसल्या बसल्या कधीतरी त्याचा डोळा लागला.  

खूप वेळाने त्याला कधीतरी जराशी जाग आली. डोळ्यात अजूनही झोप होती, डोकं जड होतं. पण त्याला पायावर काहीतरी जड लागलं, म्हणून त्याने डोळे उघडले आणि खाली बघितलं. आणि बघतच राहिला. अनिताचं डोकं त्याच्या मांडीवर होतं. ती त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेली होती. तो चक्रावून गेला, क्षणभर त्याला कळेचना काय करावं. तो तिच्याकडे एकटक बघायला लागला. खूप शांत झोपली होती ती. एक प्रकारचा निरागसपणा दिसत होता तिच्या झोपलेलंय चेहऱ्यावरही. तिच्या केसांची बट झोपल्यानंतरही तशीच तिच्या डाव्या गालावर आली होती, त्याला आवडायची तशीच. तिच्यावरून नजर हटवुच नये असं त्याला वाटलं. असंच बघत राहावं, तासनतास… रात्रभर असं त्याला वाटलं. पुन्हा कधी तिला असं बघायला मिळेल? कितीतरी वेळ तो तसाच तिच्या शांत झोपलेल्या चेहऱ्याकडे बघत होता. नंतर भानावर आला. आता काय करावं? ही अशी झोपली आहे, आपल्याला इथून उठताच येणार नाही. पाय जरा जरी हलवला, तरी ती उठेल. नको, राहू दे, खूप वेळाने अशी शांत झोप लागली आहे. तिला आरामाची गरज आहे. झोपू दे, तिची ती स्वतःहून उठेपर्यंत वाट बघूया. असं म्हणून तो तसाच शांत बसला. तिच्याकडे बघत. हळूच त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. क्षणभर त्याला वाटलं, तिच्या कपाळाचं चुंबन घ्यावं. तो खाली वाकला… पण पुन्हा मागे आला. पुन्हा त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला, “झोप शांत झोप. बरं वाटेल तुला.” नंतर पुन्हा कधीतरी त्याचा डोळा लागला. 

काही वेळानंतर तिला जाग आली. तिने डोळे उघडले आणि तिच्या लक्षात आलं आपण त्याच्या मांडीवर झोपलोय. त्याचा हात अजूनही तिच्या डोक्यावरच होता. तिला का कोण जाणे पण एकदम हलकं वाटलं, कसलंतरी समाधान वाटायला लागलं. खूप शांत, रिलॅक्स वाटत होतं. क्षणभर तिला वाटलं असंच बसून राहावं, त्याच्या मांडीवर. उठूच नये. काही मिनिटं ती तशीच पडून राहिली डोळे मिटून. मग उठण्यासाठी तिने डोकं वर केलं आणि त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तर त्याने तो तसाच थोपटला आणि म्हणाला, “झोप शांत झोप. बरं वाटेल तुला.” तिने दचकून त्याच्याकडे बघितलं. त्याचे डोळे मिटलेलेच होते पण तरी तो हेच बोलत होता. तिला आश्चर्य वाटलं आणि हसूही आलं. ती उठून बसली पण त्याने झोपतच तिचा हात धरून ठेवला होता. तिने त्याच्याकडे पाहिलं. बसल्याबसल्या गाढ झोपला होता तो. शांत, लहान मुलासारखा. मान किंचित बाजूला झुकली होती. ती अवघडेल म्हणून तिने हळूच ती सरळ करण्याचा प्रयत्न केला. “झोप झोप.. वाटेल आता बरं.” तो पुन्हा एकदा झोपेत बोलला. ती त्याच्याकडे बघायला लागली. तिला आता काहीतरी वेगळंच वाटत होतं. नक्की काय ते तिलाही कळत नव्हतं. हे नक्की काय होतंय आपल्याला? त्याच्याकडेच का बघत राहावंसं वाटतंय? ही कसली अस्वस्थता आहे? हसूही येतंय आणि रडावंसंही वाटतंय. असं का होतंय? तिला काहीच कळत नव्हतं. पण आता त्याच्याबद्दल जे वाटत होतं ते याआधी कधीच वाटलं नव्हतं. त्याने तिचा धरलेला हात ती सहज सोडवून घेऊ शकली असती पण का कोण जाणे तिला तो सोडावासा वाटला नाही. तो तसाच धरून ठेवत ती नीट बसली. पुन्हा एकदा त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं आणि मग तशीच बसल्या बसल्या तीही झोपून गेली. 

रात्री ३ वाजता तिला पुन्हा जाग आली. तिने बघितलं तर…. तिचं डोकं त्याच्या खांद्यावर होतं. त्याचा दुसरा हात तिच्या खांद्यावर होता, म्हणजे ती जवळजवळ त्याच्या कुशीत झोपली होती. तोही गाढ झोपला होता. हे असं कधी झालं? ती विचारात पडली. आपण तर फक्त बसून झोपलो होतो. क्षणभर तिला वाटलं की त्याचा हात काढून टाकावा, हे बरोबर नाही. पण क्षणभरच वाटलं किंवा कदाचित ते वाटणंच खोटं होतं, फक्त वरवरचं. आतमध्ये खोल कुठेतरी एक वेगळाच आनंद होता, एक वेगळंच समाधान होतं. ती सुखावली होती, ते सुख तिला अजून अनुभवायचं होतं. ते तसंच राहू द्यायचं होतं, त्यात आकंठ बुडून जायचं होतं. हे असं का वाटत होतं, काय वाटत होतं तिला काहीच कळत नव्हतं. फक्त आता आहे तो क्षण खूपच सुंदर आहे आणि तो तसाच राहू दे एवढंच तिला वाटत होतं. तिच्याही नकळत ती त्याच्या अजून जवळ सरकली. आता तिचं डोकं त्याच्या छातीवर होतं, त्याच्या हृदयाची धडधड तिला ऐकू येत होती. त्याचे गरम श्वास तिला स्पर्श करत होते, सुखावत होते. तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित उमटलं आणि तिने डोळे मिटले. 

थोड्या वेळाने त्याला जाग आली आणि त्याने बघितलं तर त्याचा श्वासच थांबला क्षणभर. आपण स्वप्नात तर नाही ना असं वाटलं त्याला क्षणभर. त्याने डोळे २-३ वेळा उघडबंद केले आणि पूर्ण जागा झाला. नाही, हे स्वप्न नाही, त्याची खात्री पटली. पण हे कसं झालं? ही तर मांडीवर झोपली होती मग हे कसं काय? तो खूपच गोंधळून गेला. तिने त्याचा दुसरा हात घट्ट धरला होता आणि ती गाढ झोपली होती. एक विलक्षण समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. कित्येक दिवसात, महिन्यात लागली नसेल अशी शांत झोप लागली आहे असे भाव होते चेहऱ्यावर. डोळ्यावर आलेली केसांची बट त्याने हळूच मागे सारली आणि तो काही वेळ तसाच बघत राहिला तिच्या चेहऱ्याकडे. मग त्याने स्वतःला सावरलं. हळूहळू आपला हात तिच्या हातातून सोडवून घेतला. अत्यंत हळुवार आणि काळजीपूर्वक तिच्या डोक्याखालचा हात काढून घेतला. ती थोडीशी हलली, बहुतेक जागी होईल असं त्याला वाटलं पण नाही, ती तेवढ्यापूर्ती हलली आणि पुन्हा गाढ झोपली. त्याने हळूहळू तिचं डोकं खाली ठेवलं. स्वतः बेडवरुन उठला आणि तिच्या अंगावर पांघरूण घातलं. पुन्हा एकदा डोळे भरून तिच्या झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मग तो सोफ्यावर जाऊन झोपला. 

आकाशात पौर्णिमेचा चंद्र खूप सुंदर दिसत होता. शांत, थंड, प्रसन्न.  

—————————————————————————————————————————————–

तिला जाग आली तेव्हा उजाडलं होतं. सूर्याची किरणं खिडकीतून आत आली होती. तिने हळूहळू डोळे उघडले आणि दुसऱ्या कुशीवर वळली. बाजूला कोणीच नव्हतं. आणि मग अचानक तिला काल रात्रीचं सगळं आठवलं आणि ती दचकून उठली. आजूबाजूला बघितलं तर आदित्य सोफ्यावर झोपला होता. काल रात्रीचा शेवटचा प्रसंग तिला आठवत होता, तेव्हा तर आपण याच्या जवळ झोपलो होतो, हातात हात घेऊन. मग आता हा इथे कसा? की ते स्वप्न होतं? नाही… स्वप्न नक्कीच नव्हतं. मग? ती हळूहळू बेडवरुन उठली. वॉशरूमला जाऊन फ्रेश होऊन आली. तरीही तो झोपलेलाच होता. तिला वाटलं त्याला उठवावं, पण मग वाटलं नको. ती खिडकीत गेली आणि तिने पडदा थोडासा उघडला. सूर्याची किरणं अंगावर घेतली, जरा बरं वाटलं. तेवढ्यात डोळ्यावर उजेड पडल्याने त्याला जाग आली. डोळे किलकिले करून त्याने आजूबाजूला बघितलं. तिला बघून त्यालाही अचानक कालची रात्र आठवली. “तू कधी उठलीस?” त्याने विचारलं. “आताच… १०-१५ मिनिटं झाली.” ती मान खाली घालून म्हणाली. “मी माझं आवरलंय, तू पण फ्रेश हो.” ती बाहेर बघतच म्हणाली. ती त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. काल रात्रीबद्दल बोलावं की बोलू नये तिला कळत नव्हतं. आणि बोलायचं तरी काय? त्याचीही तीच अवस्था झाली होती. सगळं आवरेपर्यंत दोघेही एकमेकांशी जुजबीच बोलत होते, जेवढ्यास तेवढं. एक अवघडलेपण आलं होतं दोघांमध्ये. शेवटी तिनेच चाचरत विषय काढला. 

“काल रात्री मी…. चुकून अशीच झोपले.” ती डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे बघत म्हणाली. “माझं डोकं दुखत होतं ना….कळलंच नाही कधी झोप लागली ते.” एवढं बोलून ती थांबली. पुढे काय बोलावं तिला कळेना. “हो हो…. तेच ना. आणि मला पण कधी बसल्या बसल्या डोळा लागला माहित नाही.” तोही अडखळत म्हणाला. “नंतर मला जाग आली तेव्हा बघितलं तर…” असं म्हणून तो २-३ क्षण थांबला. कोणीच काही बोलेना. मग तोच पुन्हा म्हणाला, “म्हणजे मी बघितलं तर तू झोपली होतीस ना. मग मी उठलो आणि इथे सोफ्यावर येऊन झोपलो.” असं म्हणून तो उगाचच हसला. “अं… हो ना. तेच. काय ना… झोप कशी लागते कळतच नाही.” असं म्हणून तीही उगाच हसली. “चल, निघूया का?” तो म्हणाला, “गाडी आहे ९ची. वाटेत काहीतरी नाश्ता पण करूया.” “हो हो… हे काय झालंच माझं.” असं तिने म्हटलं आणि दोघांनीही आपापली बॅग आवरायला घेतली. विषय टाळला तरी दोघानांही कळलं होतं मनात नक्की काय चाललंय ते. 

नाश्ता करून दोघांनी मुंबईची बस पकडली. नशिबाने जास्त गर्दी नव्हती. बसायलाही जागा नीट मिळाली. दोघेही शांतच बसले होते. थोडंफार बोलणं होत होतं पण फक्त दाखवण्यापुरतं, जुजबी. काय बोलावं कोणालाच कळत नव्हतं. आपण काय बोललो तर समोरची व्यक्ती काय विचार करेल याचीच धास्ती दोघांनाही आतून वाटत होती. थोडा वेळ असाच गेला. मग हळूहळू आदित्यनेच नेहमीप्रमाणे बोलायला सुरुवात केली. जणू काही झालंच नाही अशा थाटात तो बोलत होता. नेहमीसारखे जोक करत होता, तिची मस्करी करत होता. मग अनितालाही जरासं हलकं वाटायला लागलं. ती पण मोकळेपणाने बोलायला लागली. दुपारच्या जेवणानंतर दोघांनाही सुस्ती आली होती. आणि त्यात गाडीच्या वेगामुळे आणि खिडकीतून येणाऱ्या हवेमुळे पेंग येत होती. आदित्य डोळे मिटून शांत बसला होता. अनिता खिडकीतून बाहेर बघत होती. मध्येच तिने आदित्यकडे पाहिलं. त्याचा झोपलेला चेहरा शांत, निरागस वाटत होता, अगदी काल रात्री होता तसाच. ती स्वतःशीच हसली आणि मग तिने हळूच त्याचा हात हातात घेतला. त्याने डोळे मिटले होते तरी तो जागाच होता. त्याने पटकन डोळे उघडले आणि विचारलं, “काय झालं?” “काही नाही.” ती म्हणाली. तिने अजूनही त्याचा हात तसाच घट्ट धरलेला होता. “काय झालं? इकडे पण उंदीर दिसला की काय तुला?” त्याने डोळे मिचकावले आणि तो सीटच्या खाली बघायला लागला. “नाही.” असं म्हणून तिने मान हलवली. “मग?” त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. ती त्याच्याकडेच बघत होती, त्याच्या डोळ्यात. इतकं रोखून तिने आजवर कधीच पाहिलं नव्हतं त्याच्याकडे. त्याला आज पहिल्यांदाच काहीतरी वेगळे भाव दिसत होते तिच्या डोळ्यात, यापूर्वी कधीही न पाहिलेले. त्याने पुन्हा डोळ्यांनीच विचारलं, काय? “काही नाही, असंच… हात धारावासा वाटला तुझा.” ती त्याच्याकडे बघत म्हणाली. तो नुसताच हसला. “मला खूप झोप येतेय.” ती पुढे म्हणाली. “झोप मग.” तो म्हणाला. “हो झोपायचं आहे… पण काल रात्री सारखं.” असं म्हणून ती त्याच्या जवळ सरकली. त्याला हे सगळं खूपच अनपेक्षित होतं. तो आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. “म्हणजे?” त्याने डोळे विस्फारत विचारलं. “म्हणजे काय ते तुला माहित आहे.” असं म्हणून तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्याच्याही नकळत मग त्याने आपला हात तिच्या खांद्यामागुन टाकला आणि तिला जवळ घेतलं. त्यानंतर कोणी काहीच बोलत नव्हतं, कारण शब्दांची गरजच नव्हती. 

गार वारा कानाला सुखावत होता, मध्येच हलका पाऊस पडत होता. बस मुंबईच्या रस्त्याला लागली होती. 

उतरल्यावर कोणीच काही बोलत नव्हतं. काही वेळ असाच गेला. मग तिनेच शांततेचा भंग करत विचारलं, “निघूया का?” 

“हो हो चल.” तो म्हणाला. “तुला तिथून बस मिळेल ना.” त्याने विचारलं. 

“हो.” असं ती म्हणाली आणि थांबली. “काय झालं?” त्याने विचारलं. 

“तू… तू येतोयस का मला सोडायला?” हे बोलताना तिने त्याच्या नजरेला नजर दिली नाही. क्षणभर त्यालाही काय उत्तर द्यावं कळलंच नाही. तो नुसताच आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. “काय? काय म्हणालीस तू? इकडे बघ.” त्याने विचारलं. ती खाली बघून हसत होती, खरं तर लाजतच होती. मग तिने वर बघितलं आणि म्हणाली, “म्हणजे तुला यायचं असेल तर येऊ शकतोस असं म्हणायचं होतं मला.” ती न हसण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. 

“मला यायचं असेल तर?” त्याने पुन्हा तिच्याकडे रोखून बघत विचारलं. ती पुन्हा खाली बघायला लागली. मग म्हणाली, ‘ए सोड जाऊ दे…. जाते मी.” असं म्हणून ती निघाली. “ए थांब थांब… येतोय मी. येतोय तुला सोडायला.” असं म्हणून हसत हसत तो तिच्याबरोबर चालायला लागला. 

—————————————————————————————————————————————–

“पण हा चमत्कार कसा झाला?” मनालीने विचारलं. “तुला तर त्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं ना?” 

अनिता हसली आणि म्हणाली, “हो हे खरं आहे की मी आधी त्याला नकार दिला. पण नंतर नंतर मी त्याला अजून जास्त ओळखायला लागले, त्यानंतर मला तो आवडायला लागला. तुला माहित आहे मनू, त्याला माणसांची खूप किंमत आहे. स्वतःची ध्येयं, स्वतःची स्वप्न, यापेक्षा त्याला त्याची माणसं, नाती जास्त महत्वाची वाटतात हे जेव्हा मला दिसलं ना, तेव्हा माझा त्याच्याबद्दलचा आदर अजून वाढला.” ती पुढे म्हणाली. “पण… पण तरीही माझं मलाच कळत नव्हतं. मनात अजूनही शंका होती की त्याचं खरंच माझ्यावर प्रेम असेल का? Should I go ahead with this relationship? पण त्या दिवशी ट्रेन चुकल्यानंतर आम्ही जो वेळ एकत्र घालवला ना, त्यांनतर सगळं बदललं. त्याने ज्या प्रकारे मला सांभाळलं, माझी काळजी घेतली, दुसऱ्या कोणी नसतं केलं एवढं. त्याने सगळं माझ्या सोयीने केलं, शक्य त्या सर्व प्रकारे मला comfortable वाटेल याचा पुरेपूर प्रयत्न केला. मला बरं वाटेपर्यंत रात्री जागला.” बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. “तेव्हा माझी खात्री पटली, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्यावर कोणीच करू शकणार नाही, मनातल्या सगळ्या शंका दूर झाल्या. माझं मला कळलं की हाच तो माणूस आहे ज्याच्यासोबत मला माझं सगळं आयुष्य घालवायचं आहे.” 

“हं… म्हणजे शेवटी सगळं जुळलं म्हणायचं.” मनाली हसत हसत म्हणाली, “चला, छान झालं.” 

“पण आता दुसरा जो प्रॉब्लेम झालाय त्याच काय?” अनिता म्हणाली. “कसला प्रॉब्लेम?” मनालीने विचारलं. “मला आजच कळलंय की मला onsite मिळालंय. पुढच्या महिन्यात जायचंय US ला.” अनिता काहीशा नाराजीनेच म्हणाली. 

“अगं मग ही तर किती आनंदाची गोष्ट आहे.” मनाली हसून म्हणाली. “तू कधीपासून या संधीची वाट बघत होतीस ना, शेवटी ती मिळाली. तुला आनंद व्हायचं सोडून प्रॉब्लेम का वाटतोय त्यात?” 

“माहित नाही.. पण आनंद नाही झालाय.” अनिता म्हणाली. “अस्वस्थ वाटतंय. का ते कळत नाही.” 

“मला कळतंय.” मनाली म्हणाली. “आताच नवीन नवीन प्रेमात पडली आहेस आणि म्हणूनच तुला जावंस वाटत नाहीये, त्याच्यापासून दूर, त्याला सोडून. म्हणून ही सगळी अस्वस्थता आली आहे. बाकी काही नाही.” ती म्हणाली. 

“पण मग मी काय करू आता?” 

“काही नाही, त्याला जाऊन सांग सगळं आता म्हणजे हलकं वाटेल तुला आणि जाण्यासाठी उत्साह येईल.”

“हं… तसंच करते आता.” 

“आणि हो… ही संधी सोडायचा विचारही करू नकोस. त्याला सांगितल्यावर तो काय म्हणेल ते म्हणून दे पण तो काहीही म्हणाला तरी तू US ला जाते आहेस कळलं?” 

“हं….” अनिता विचारात पडली. 

—————————————————————————————————————————————–

“तुला काहीतरी सांगायचंय.” कॉफीचा घोट घेत अनिता म्हणाली. 

“हो बोल ना.” आदित्य म्हणाला. अनिता गप्पच होती. “बोल ना काय झालं?” त्याने विचारलं. “कसं सांगू कळत नाही.” हे बोलताना तिची अस्वस्थता त्याला जाणवली. “नक्की काय झालंय? Anything serious?” आदित्यने गंभीरपणे विचारलं. पुन्हा काही क्षण असेच गेले. मग ती म्हणाली, “मला onsite जायचंय पुढच्या महिन्यात, म्हणजे US ला. आजच कळलं.” असं म्हणून ती पुन्हा गप्प झाली. 

“Woowww… thats great यार. Congratttsss.” आदित्य आनंदाने ओरडत म्हणाला. “ही तर आनंदाची गोष्ट आहे, मग तू एवढ्या टेन्शन मध्ये का दिसतेयस?” त्याने आश्चर्याने विचारलं. ती गप्पच होती. “तुला आनंद नाही झालाय का?” त्याने तिच्याकडे बघून विचारलं. 

“नाही असं नाही…” ती म्हणाली. मग पुन्हा थांबली. “तुला झालाय का आनंद?” तिने त्याला विचारलं. 

“Of course.” तो हसत म्हणाला. “तू किती मेहनत घेतली होतीस या संधीसाठी. कधीपासून तू याची वाट बघत होतीस आणि आज तुला ते मिळालं. तुझं स्वप्न पूर्ण होतंय मग मला का नाही आनंद होणार?” त्याने विचारलं. 

“तसं नाही… ” ती बोलता बोलता अडखळली. “कसं सांगू तुला? तुला खरंच कळत नाहीये का?” तिने विचारलं. त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग म्हणाली, “OK… Let me tell you. I love you आदित्य.” तो तिच्याकडे बघायला लागला. त्याच्या नजरेत आनंद आणि मिश्किल हसू भरून राहिलं होतं. तिने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली, “मला वाटलं त्या दिवशी परत येताना जे घडलं त्यानंतर तुला कळलं असेल मला काय म्हणायचंय ते. पण..” तिचं बोलणं मध्येच थांबवत तो म्हणाला, “कळलं होतं, सगळं कळलं होतं. पण तुझ्या तोंडून ऐकायचं होतं.” असं म्हणून तो मिश्कीलपणे हसला. 

तिने हलकेच त्याच्या हातावर चापटी मारली आणि हसली. तो तिच्याकडेच बघत होता. “पण ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, मग तू इतकी अस्वस्थ का आहेस? माझ्या प्रेमात पडल्याचा पश्चाताप होतोय का तुला?” त्याने डोळे मिचकावत विचारलं. “नाही रे… काहीही काय.” ती म्हणाली. “अगं मग हस जरा. आणि तयारीला लाग. US ला जायचं म्हणजे खूप शॉपिंग करावी लागेल ना.” त्याने हसून म्हटलं. पण ती पुन्हा गंभीर झाली. “पण मला जावंस वाटत नाहीये.” ती दूरवर बघत म्हणाली. “काय? पण का?” त्याने डोळे मोठे करत विचारलं. “मी गेले तर कसं होणार?” तिने विचारलं. “कशाचं कसं होणार?” त्याने गोंधळून विचारलं. “हेच.. आपलं कसं होणार? आपली relationship कशी राहील?” ती म्हणाली. 

अगं कशी राहील म्हणजे काय? तू काय कायमची जाते आहेस का तिकडे? येशील ना परत ६ महिन्यांनी किंवा वर्षाने.” त्याने हसत हसत म्हटलं. 

“हो येणार आहे मी ६ महिन्यांनी, पण तोपर्यंत?” 

“तोपर्यंत काय?” 

“मला तुझ्यापासून दूर नाही जायचंय. आता कुठे सगळं जुळून आलंय. आताच सुरुवात झाली आहे आपल्या नव्या नात्याला आणि आताच जर लगेच मी गेले तर? सगळं विस्कटेल. खूप कठीण होतील सगळ्या गोष्टी. नाही.. नकोच ते. मी नाही म्हणून सांगते उद्या.” ती सगळं एका दमात बोलली. 

“अगं हो थांब थांब.” तो तिला शांत करत म्हणाला, ” काय विस्कटेल असं वाटतंय तुला? आणि तू फक्त शरीराने लांब जाणार आहेस. मनाने तर आपण जवळ असूच की. come on.. तू १८व्या शतकात असल्यासारखं काय बोलतेयस? आजकाल किती सगळे ऑप्शन्स आहेत एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, टेक्नॉलॉजी मुळे जग इतकं जवळ आलंय. जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या माणसाशी फक्त एका क्लिक मध्ये संवाद साधता येतो आणि आपल्या दोघांच्याही प्रोफेशनमध्ये हेच चालतं की. US, UK मध्ये असलेल्या क्लायंटशी रोज बोलतो आपण. आणि एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचा बिझनेस त्यावरच चालतो ना. अशी काय तू?” असं म्हणून त्याने तिच्या हातावर थोपटलं. 

“तो बिझनेस असतो. बिझनेस आणि नात्यामध्ये खूप फरक आहे आदित्य.” ती गंभीरपणे म्हणाली. “जग जवळ आलेलं असलं तरी माणसं दूर जातात. आणि दोन माणसांच्या मनातलं अंतर वाढलं ना की कोणतीही टेक्नॉलॉजी त्यांना जवळ नाही आणू शकत.” यावर आदित्य काही बोलणार एवढ्यात तिने त्याला थांबवलं आणि पुढे म्हणाली, “मी गेलेय यातून आधी. सिद्धार्थ पण गेला होता परदेशी. मलाही तेव्हा असंच वाटलं की आता एवढी टेक्नॉलॉजी आहे आपण राहू एकमेकांच्या टच मध्ये आणि त्यानेही जाताना तशीच खात्री दिली होती.” बोलता बोलता ती शून्यात हरवली. “पण तो गेला आणि मग सगळंच बदललं…. नाही बघडल. वेळच मिळायचा नाही बोलायला. वेगवगेळ्या time zone मुळे वेळ जुळूनच यायची नाही. किती किती दिवस बोलायचो नाही आम्ही. त्यात तिकडे गेल्यावर त्याच्यावरच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या होत्या, त्याचा खूप ताण असायचा त्याला. आणि त्याचा सगळा राग माझ्यावर निघायचा. नंतर नंतर बोलणं कमी आणि वादच जास्त व्हायला लागले. गैरसमज वाढले आणि सगळंच विस्कटलं. हातातून निसटत चाललं होतं सगळं पण नक्की कुठून कसं सावरायचं तेच कळत नव्हतं.” बोलता बोलता ती थांबली आणि मग त्याच्याकडे बघून म्हणाली, “आमच्या स्वभावात खूप तफावत होती आणि आणखीही बरीच कारणं होती आमच्या ब्रेकअप ची पण त्या सगळ्याची सुरुवात या गोष्टीने झाली. आणि जे एकदा झालं ते मला पुन्हा होऊ द्यायचं नाहीये. I don’t want a long distance relationship… because it never works.I don’t want to lose you.” ती त्याचा हात घट्ट धरत म्हणाली. 

“रिलॅक्स.” त्याने तिचा हात दाबत म्हटलं.” आता जरा माझं ऐकून घे. मला माहित आहे आधी आलेल्या अनुभवामुळे तुझ्या मनात या गष्टीबद्दल खूप भीती बसली आहे आणि ते सहाजिकच आहे. माझ्याही मनात मुलींबद्दल, relationship बद्दल असच सगळं बसलं होतं. पण तुला भेटल्यावर मला जाणवलं की तू तशी नाही आहेस. त्यामुळे जे तिच्या बाबतीत घडलं ते तुझ्या बाबतीत घडणार नाही याची मला खात्री वाटायला लागली. तूही तीच खात्री बाळग ना. जसं तो तुझ्याशी वागला, तसं मी नाही वागणार, विश्वास ठेव माझ्यावर.” तो तिच्याकडे बघून म्हणाला. पण ती अजूनही गप्पच होती. तो पुढे म्हणाला, “ऐक… आपण दोघेही आधी वाईट अनुभवातून गेलोय. We suffered a lot but we learned a lot too हे लक्षात घे. आपला वाईट अनुभव आपण चांगलं घडवण्यासाठी वापरूया. आधी केलेल्या चुका आता पुन्हा करायच्या नाही असं ठरवूया. आधी वाईट घडलंय म्हणजे आताही घडेलच असं नाही. कधी कधी वाईटानंतर चांगलं घडतं. जसं आम्हा फोटोग्राफर्सच्या भाषेत, २-३ वाईट क्लिक नंतर एक परफेक्ट क्लिक होतो. 

“पण हे सगळं कशाला? कशाला एवढी रिस्क घ्यायची आहे? पुन्हा का तोच खेळ खेळून बघायचा? त्यापेक्षा मी नाहीच जात ना, इतकं काही महत्वाचं नाहीये ते. जाईन पुन्हा. मला काही प्रॉब्लेम नाहीये.” ती म्हणाली. 

“पण मला आहे.” तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. “तुला काय आहे?” तिने विचारलं. तो म्हणाला,”तुला आठवतंय, मी मागे तुला म्हणालो होतो की तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. तुझ्या आवडीनिवडी, तुझा स्वभाव, तुझ्या सवयी या सगळ्यासहित. आणि तुझ्या करिअर सहित सुद्धा. मी तुला म्हटलं होतं की तुला तुझ्या करिअर मध्ये कोणतीच तडजोड नाही करावी लागणार, मी तशी तुला खात्री दिली होती. आणि मला माहित आहे तू तुझ्या करिअर बद्दल किती सिरिअस आहेस. onsite जायला मिळावं हे तुझं स्वप्न होतं आणि त्यासाठी तू प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहेस. आणि त्याचं फळ तुला मिळायलाच हवं. You deserve this opportunity. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळत. You should just grab it without giving a second thought.” तो बोलत होता आणि अनिता फक्त थक्क होऊन त्याच्याकडे बघत होती. 

“आणि काय गं… कालपर्यंत या संधीसाठी जीव तोडून मेहनत करणारी, रात्री उशीरपर्यंत थांबून काम करणारी तू, आज अचानक हे तुझ्यासाठी इतकं महत्वाचं नाहीये? हे तू बोलत नाहीयेस मला माहित आहे. हे माझ्या प्रेमात गुंतलेली, हळवी झालेली, घाबरलेली अनिता बोलतेय. माझी अनिता तर अशी नाहीच आहे. ती स्वतःच्या करिअरच्या बाबतीत खूप सिरिअस आहे. स्वतःवर विश्वास असणारी, स्वतःच्या मतांशी ठाम असणारी, स्वतंत्र विचारांची आणि Confident मुलगी आहे. आणि मी याच अनितावर प्रेम केलंय. मला ही अशी भित्री, फिल्म मधल्या हिरोईनसारखी इमोशनल होणारी अनिता अजिबात नाही आवडत. मला माझी अनिता परत हवी आहे. काय?” त्याने तिच्याकडे बघत म्हटलं. 

“पण आदित्य तरीही…” तिला मध्येच थांबवत तो म्हणाला, “तू माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या गोष्टीत compromise करायची काहीच गरज नाहीये. मला नाही आवडणार ते. आणि तू फक्त काही दिवसांसाठी लांब जातेयस इतक्या क्षुल्लक कारणावरून मी तुला त्रास होईल असं वागेन का? इतका immature वाटलो का मी तुला? तू मला अजून ओळखलंच नाहीस अनिता.” असं म्हणून त्याने एक उसासा टाकला. 

“नाही नाही… मला तसं नव्हतं म्हणायचं.” ती त्याचा हात हातात घेत म्हणाली. “पण आधी झालेल्या गोष्टींमुळे माझ्या मनात तसं आलं. I am sorry…I am really sorry.” ती म्हणाली. “तेच सांगतोय मी. आधीच्या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक. आपण एक नवी सुरुवात करूया.” तो म्हणाला. “आपल्यात काही वाद, गैरसमज होणार नाहीत. trust me.” त्याने तिचा हात दाबला आणि तिच्या डोळ्यात बघितलं. ती गप्पच होती. “माझ्यावर विश्वास आहे ना?” त्याने पुन्हा विचारलं. तिने मानेने हो म्हटलं आणि त्याने तिला जवळ घेतलं. “चला…. तयारीला लागूया मग.” त्याने तिला थोपटत म्हटलं. 

—————————————————————————————————————————————–

सकाळी अनिताला जाग आली पण उठावंसं वाटत नव्हतं. ती विचार करत होती, गेल्या काही दिवसात, ती US ला आल्यापासूनचे सगळे दिवस आठवत होती. ‘आपण मनात आधीच किती चुकीचे अंदाज बांधून ठेवले होते ना. त्या एका व्यक्तीमुळे आपण जगातल्या सगळ्याच मुलांबद्दल मत बनवून ठेवलं होतं. पण आदित्य किती वेगळा आहे. कितीतरी वेळा आपल्याला कामामुळे त्याच्याशी बोलायला मिळत नाही, कधी कधी तर ३-४ दिवस मेसेजचा रिप्लाय सुद्धा देत नाही आपण. पण त्याने कधीच या गोष्टीचा इशू केला नाही, एका शब्दानेही आपल्याला जाब विचारला नाही. किती छान समजून घेतलं त्याने. दिवस कितीही हेक्टिक गेला तरी माझ्याशी बोलण्यासाठी रात्री जागतो. नेहमीच. मला मात्र उगाच भीती वाटत होती की Long distance relationship कशी होईल, नीट होईल की नाही, भांडण होईल. पण इतका समजूतदार बॉयफ्रेंड असल्यावर का भांडण होईल? सगळं नीटच होणार आहे आता पुढेही.’ या विचाराने ती सुखावली आणि तिने फोन हातात घेतला. whatsapp उघडलं. 

नीरजच्या बर्थडेची पार्टी चालू होती. सगळे खाण्यापिण्यात दंग होते. “आम्ही तर गृहीत धरलं होतं की तू येणारच नाहीस.” सायली म्हणाली. “मी सुद्धा.” आदित्य म्हणाला. “मला वाटलं, आधिसारखंच तुमच्यापासून लांब जावं लागेल, तुमच्यासोबत जास्त वेळ नाही घालवता येणार. तिला आवडणार नाही. विशेषतः आता ती इकडे नाहीये त्यामुळे आम्हाला आधीच खूप कमी वेळ मिळतो एकमेकांसाठी. त्यातला पण वेळ पार्टीमध्ये घालवायचा म्हणजे.” तो बोलता बोलता थांबला. मग हसून म्हणाला, “पण ती जेव्हा म्हणाली ना आपल्या मित्राचा बर्थडे, तेव्हा मनावरचं सगळं ओझं उतरलं. किती सहजपणे तिने माझ्या मित्रांना, तुम्हाला सगळ्यांना आपलं मानलं. हे खरं तर पहिल्या दिवशीच कळलं होतं, जेव्हा ती एकदम सहजपणे सगळ्यांमध्ये मिसळून गेली होती तेव्हा. नाहीतर आधी मला सतत किती टेन्शन असायचं. सौम्याला सगळ्यांशी प्रॉब्लेम असायचा. ती स्वतः तर नाहीच मिसळायची पण मलाही नाही जाऊ द्यायची तुमच्यासोबत. सारखं आपण दोघे आपण दोघे. तिच्यामुळे सुमितशी पण भांडलो होतो मी.” असं म्हणून त्याने सुमितकडे पाहिलं. सुमितने हसून त्याच्या पाठीवर थाप मारली. “खरंच प्रेमात इतका आंधळा झालो होतो मी. आणि ही मुलगी… इथे नाहीये तरी पार्टीसाठी टिप्स देते आणि म्हणते मला live telecast दाखवा पार्टीचा.” तो स्वतःशीच म्हणाला. 

“जाऊ दे कशाला जुन्या गोष्टी पुन्हा आठवतोय आपण.” नीरज म्हणाला. “आता ती नाहीये ना आयुष्यात, तर कशाला तिचा विचार? आता फक्त अनिताचा विचार करायचा.”

‘मी किती लकी आहे तिच्यासारखी मुलगी आली माझ्या अयुष्यात.’ अशा विचारात असताना मध्येच त्याचा फोन वाजला. त्याने बघितलं तर तिचाच मेसेज होता. “Love you. miss you “. मेसेज बघून त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. Love you 2 3 4 ……… n” त्याने रिप्लाय केला. 

—————————————————————————————————————————————–

अनिता परत आल्यानंतर आज पहिल्यांदाच ते दोघे भेटत होते. आदित्य खूप उत्साहात होता. पण अनिताला उशीर झाला होता. वाट बघून तो कंटाळला होता. तेवढ्यात ती आली. 

“किती उशीर. मी कधीची वाट बघतोय.” तो म्हणाला. 

“ट्रॅफिक होतं त्याला मी काय करू? हवेतून उडून येऊ का?” ती चिडून म्हणाली. “आणि एवढा उशीर झाला होता तर जायचं होतंस तू निघून.”

“अगं एवढी का चिडतेयस? मी फक्त सहज बोललो.” 

“सहजच बोलतोस तू नेहमी. मला माहित आहे, तुला हेच सारखं दाखवून द्यायचं असतं की नेहमी माझ्यामुळे उशीर होतो.” ती अजूनही चिडलेलीच होती. 

“अगं मी कुठे असं म्हणालो?” तो पुरता गोंधळून गेला होता. “बरं माझं चुकलं. I am sorry बस्स. आता शांत हो आणि एक मस्त smile दे बघू.” तो तिच्याकडे बघून हसत म्हणाला. पण ती शांतच होती, हसली नाही. 

तुझं नाही चुकलं माझंच चुकलं. माझंच चुकतं नेहमी. कसंही वागा, सगळ्यांना माझीच चूक दिसते. मीच काय सारखं सगळ्यांना समजून घ्यायचं. मला कोणीच समजून नाही घेत. ऑफिसमध्ये त्या मॅनेजरची कटकट आणि घरी सुद्धा जरा पण शांती नाही. सगळे मलाच बोलतात.” ती एकटीच बोलत होती. त्रासलेल्या चिड्लेलंय स्वरात. आदित्य पटकन तिच्याजवळ गेला आणि त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवलं. “शू:… गप्प बस एकदम गप्प.” ती एकदम गोंधळून त्याच्याकडे बघायला लागली. त्याने पटकन तिला जवळ घेतलं, घट्ट मिठीत. क्षणभर तिला कळलंच नाही काय झालं. पण मग नंतर एकदम शांत वाटायला लागलं. एकदम हलकं हलकं. सगळा ताण, सगळा भार एकदम उतरल्यासारखा वाटायला लागला. 

“Feeling better now?” त्याने विचारलं. “हो.” ती म्हणाली

“हं… आता सांग हळूहळू नक्की काय झालंय? कशामुळे एवढी चिडचिड होतेय? आधी बस इथे शांत.” असं म्हणून त्याने तिला खुर्चीवर बसवलं. खूण करून वेटरला बोलवलं आणि कॉफीची ऑर्डर दिली. “हं.. बोल आता.” तो म्हणाला. तिने पटापट सगळं बोलायला सुरुवात केली. ऑफिसमधलं, घरातलं सगळं. त्याने शांतपणे ऐकून घेतलं. सगळं संपल्यावर तिने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने तिला नीट समजावलं. मग तिची चिडचिड हळूहळू कमी झाली. 

“तू कसं एकदम सगळं सोप्प करून टाकतोस.” त्याच्याकडे बघून ती म्हणाली.”कसं काय जमतं रे तुला हे?” 

“सगळं सोप्पच असतं. पण आपणच ते कठीण आणि किचकट करून टाकतो.” तो हसून म्हणाला. “आणि ते अजून किचकट होतं चिडल्याने, जशी तू मघाशी चिडली होतीस. काय गरज होती इतकं हायपर व्हायची? आणि मुळात बाकीचे लोक चुकीचं वागत असतील तर त्यासाठी तू चिडचिड करून काय होणार आहे? का उगाच स्वतःला त्रास करून घेतेस?” 

“हं… मघाशी मी जरा जास्तच हायपर झाले. Actually आज दुसरा दिवस आहे ना, या दिवसात होतं मला असं, खूप mood swings होतात, उगाच चिडचिड होते. त्यात दिवसभर इतकं सगळं झालं होतं. त्या सगळ्याचा राग तुझ्यावरच निघाला. सॉरी.. खरंच सॉरी.” 

“Ohhh…अगं मग तू आलीस कशाला एवढ्या लांब? तू अराम करायचास ना घरी. मला आधी माहित असतं तर मी तुला येऊच नको सांगितलं असतं.” 

“अरे असं कसं? मी आल्यापासून भेटलोच नव्हतो आपण. पण मघाशी तू जादूकी झप्पी दिलीस ना, त्यानंतर एकदम बरं वाटायला लागलं.” ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली,” मला नेमकं काय हवंय हे कसं कळलं तुला?” 

“तसा मी जन्मापासूनच स्मार्ट आहे.” तो आपली कॉलर सरळ करत म्हणाला. “तुला माहित आहे का, कधी कधी १०० शब्द बोलूनसुद्धा जे होत नाही, ते एका मिठीने होतं.” आणि पुन्हा तिच्या जवळ येऊन म्हणाला, “मघाची ती मिठी तुझ्या बिघडलेल्या मूडसाठी होती. पण आता मला कळलं की तुझा आजचा हा painful दिवस आहे, मग त्याच्यासाठी तर अजून खूप जादूच्या झप्प्या द्यायला हव्यात ना.” असं म्हणून त्याने पुन्हा तिला जवळ घेतलं.

—————————————————————————————————————————————–

“सांग ना काय गिफ्ट हवंय?” आदित्यने विचारलं. “आल्यापासून १० वेळा तरी हेच विचारून झालंय पण तू काहीच सांगत नाहीस.” 

“अरे पण मला काही नकोच आहे तर काय सांगू?” अनिता हसत म्हणाली. 

“असं कसं?” तो म्हणाला. “आपण रिलेशनशिप मध्ये आल्यानंतर पहिलाच बर्थडे आहे तुझा, तो किती स्पेशल व्हायला हवा. मी किती एक्सायटेड आहे आणि तुला अजिबातच इंटरेस्ट नाहीये. माझं सगळं प्लॅनिंग बहुतेक फुकट जाणार.” तो नाराजीने मान हलवत म्हणाला. 

“कसलं प्लँनिंग?” तिने आश्चर्याने विचारलं. “नक्की काय करणार आहेस तू?” 

“आधीच गिफ्ट नको म्हणून माझा पोपट केला आहेस. आता अजून उद्या काय surprise आहे ते पण सांगून टाकतो म्हणजे माझा पूर्ण प्लॅनच फ्लॉप होईल.” त्याचा चेहरा पूर्ण उतरला होता. 

“अरे तसं नाही, रागवू नको प्लीज.” ती म्हणाली. पण तो तसाच चेहरा पडून बसला होता. जरा वेळ थांबून ती म्हणाली, “बरं ऐक  ऐक. माझं जरा ऐकून तर घे.” “हं बोल.” तो तिच्याकडे न बघताच म्हणाला. ती बोलायला लागली, “हे बघ मला काही तुझा प्लॅन फ्लॉप वैगेरे करायचा नव्हता आणि तुला वाईट वाटेल असंही काही करायचं नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचंय की उगाच खर्च कशाला?”

“तुला खर्चाशी काय करायचंय?” तो वैतागून म्हणाला. “उद्याचा दिवस स्पेशल होणं महत्वाचं आहे. त्यासाठी किती खर्च येईल ते मी बघेन ना.” 

“अरे हो दिवस स्पेशल व्हायलाच हवा.” ती म्हणाली. “पण स्पेशल करण्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो असं कुठे आहे? आपण करूया ना उद्याचा दिवस स्पेशल.” 

“म्हणजे?” त्याने गोंधळून विचारलं. 

“म्हणजे तू विचारत होतास ना मला काय हवंय? आता मी सांगते. ऐक. माझ्या नेहमीच्या आवडीच्या ठिकाणी मला पाणीपुरी खायला घेऊन जायचं आणि तिकडे मी मला हव्या तेवढ्या प्लेट्स पाणीपुरी खाणार. त्यानंतर आपण मरिन ड्राइव्ह वर जायचं, एकत्र वॉक करायचा, तिकडे बसून खूप गप्पा मारायच्या. आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप सगळी सोनचाफ्याची फुलं हवी आहेत.” ती हसून म्हणाली. 

तो चक्रावून तिच्याकडे बघत होता. “तू मस्करी करतेयस ना?” त्याने विचारलं. ” नाही अजिबात नाही. I am very serious.” ती गंभीरपणे म्हणाली. “पण तुला असं का वाटतंय की मी मस्करी करतेय?” 

“मस्करी नाहीतर काय?” तो म्हणाला. “बर्थडे पार्टी, ती सुद्धा मुलीची, अशी असते का?” “मग कशी असते?” तिने विचारलं. “आता तरी सांग तुझा प्लॅन काय होता?”

“मी.. मी फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये टेबल बुक केलं होतं कॅण्डल लाईट डिनर साठी. मोठा केक आणि मग त्यानंतर खूप सगळे गिफ्ट्स. पण नक्की काय गिफ्ट्स द्यायचे ते कळत नव्हतं म्हणून तर तुला विचारत होतो.” तो म्हणाला. “अरे बापरे… एवढं सगळं?” तिने डोळे मोठे करत विचारलं. “म्हणजे किती हजाराला फटका?” त्याने रागाने तिच्याकडे बघून म्हटलं, “आलीस ना पुन्हा खर्चावर?”

“OK… सॉरी सॉरी.” ती जीभ चावून म्हणाली. “पण मला सांग, तू हे सगळं का ठरवलंस? म्हणजे मी तुला कधी बोलता बोलता चुकून असं काही म्हणाले होते का की ज्यामुळे तुला वाटलं की मला हे सगळं हवंय म्हणून?”

“नाही… तू नाही म्हणालीस पण मला वाटलं. म्हणजे जनरली असच असतं ना.. म्हणून मी केलं.” तो म्हणाला. ती थोडावेळ त्याच्याकडे बघत राहिली मग म्हणाली, “तुला वाटलं कारण आधी तू हे असंच सगळं करायचास ना?” तो काहीच बोलला नाही आणि लांब कुठेतरी बघायला लागला. त्याचा चेहरा पुन्हा आपल्याकडे वळवत ती म्हणाली, “सॉरी मला तुझ्या past चा विषय काढून तुला दुखवायचं नव्हतं. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला खरंच या सगळ्याची गरज नाही वाटतं. तू एवढा सगळा खर्च करणार, पण मी जे मागतेय ते त्याहीपेक्षा महाग आहे की नाही?” 

“म्हणजे?” त्याने विचारलं. 

“अरे म्हणजे तुझा वेळ.” ती हसून म्हणाली. “तुझा वेळ सगळ्यात जास्त मौल्यवाअन आणि precious आहे माझ्यासाठी. म्हणजे तुझाच असं नाही, कोणाचाही वेळ हा खूपच किमती असतो. खर्च केलेले पैसे पुन्हा कमावता येतात, दिलेल्या वस्तूही जुन्या होतात, मग आपण त्या टाकून देतो. पण वेळ? आपण एखाद्यासोबत जो वेळ घालवतो ना, तो आपल्याला कधीच परत मिळत नाही. ती एक सुंदर आठवण बनून कायम आपल्याकडेच राहते. ती जुनी होत नाही, टाकून देता येत नाही आणि आपल्याकडून कोणी परत घेऊ शकत नाही. ती आयुष्यभर आपल्यासोबत राहणार आणि आपल्यासोबतच जाणार. मग सांग ती जास्त किमती आहे की नाही?”

आदित्य फक्त तिच्याकडे बघत होता. आश्चर्याने, कौतुकाने. ती पुढे म्हणाली,” आणि दिवस स्पेशल करायचा आहे ना, मग मला सांग माझ्यासाठी सगळ्यात स्पेशल काय आहे?” त्याने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं. “तू. अजून कोण.” ती हसून म्हणाली. “माझ्या आयुष्यातला सगळ्यात स्पेशल माणूस माझ्यासोबत असणं, त्याच्यासोबत वेळ घालवणं यापेक्षा जास्त स्पेशल दुसरं काय असू शकतं माझ्यासाठी? मग तो वेळ मी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घालवला किंवा बाहेर रस्त्यावर घालवला काय फरक पडतो? माणूस तर तोच आहे ना. तू काय दोन ठिकाणी वेगवेगळा असणार आहेस का?” 

तो अजूनही तिच्याकडे फक्त बघत होता. “काय बघतोयस? बोल ना काहीतरी.” ती म्हणाली. “बघतोय आणि विचार करतोय की मी इतका कसा वेडा होतो.” तो म्हणाला. “म्हणजे?” तिने आश्चर्याने विचारलं. “म्हणजे मी किती चुकीच्या व्यक्तीसोबत आयुष्यातला अमूल्य वेळ वाया घालवलाय. आणि त्यातून किती चुकीच्या गोष्टी डोक्यात घेतल्या आहेत. बर्थडे किंवा कोणताही क्षण स्पेशल बनवण्याची ही कल्पना कधीच माझ्या डोक्यात कशी नाही आली? मला कसं नाही सुचलं हे आधीच? तिच्यासोबत राहून मीही तिच्यासारखाच विचार करायला लागलो होतो. तिला ना…” पण त्याला अनिताने मध्येच थांबवलं. “सोड ना… जाऊ दे. आपलं काय ठरलंय, आपल्या ex बद्दल काहीच बोलायचं नाही, ते सगळं विसरायचं आणि मुख्य म्हणजे त्यांच्याशी सारखी तुलना नाही करायची. पण तरीही तू माझी तुलना केलीसच ना तिच्याशी.” तिने रागावल्यासारखा चेहरा केला. “अगं नाही नाही.. अजिबात नाही. मी तर फक्त सहज बोललो.” त्याने तिला समजावयाला सुरुवात केली. 

ती हसायला लागली. “अरे मस्करी केली. मी काही खरंच चिडले नाही. बरं मघाशी अजून एक सांगायचं राहिलं हा, मला अजून एक गिफ्ट हवं आहे तुझ्याकडून.”

“हो बोल ना काय हवंय?” त्याने विचारलं. 

“माझ्यासाठी गिटार वाजवून एक गाणं म्हणायचंस.” ती म्हणाली. 

“आपका हुकूम सर आखो पर.” असं म्हणून त्याने मान झुकवली

—————————————————————————————————————————————–

अनिता बस स्टॉपवर बसची वाट बघत उभी होती. तेवढ्यात मागून आवाज आला. “अनिता.” तिला आवाज ओळखीचा वाटलं म्हणून तिने मागे वळून पाहिलं तर समोर सिद्धार्थ उभा होता. तिला क्षणभर वाटलं तिला भास होतोय की काय. तिचा विश्वासच बसेना. “तू?” ती एवढंच बोलू शकली. 

“हो… कशी आहेस?” त्याने विचारलं. 

“मी मजेत.” तिने निर्विकार चेहऱ्याने उत्तर दिलं. ती काहीतरी बोलेल म्हणून तो वाट बघत होता पण ती काहीच बोलली नाही. “मी कसा आहे विचारणार नाहीस.” त्याने विचारलं. “मला नाही त्याची गरज वाटत.” तिचा चेहरा अजूनही निर्विकारच होता. 

“मी काल तुझ्या ऑफिसजवळ आलो होतो संध्याकाळी. तुझा वाढदिवस होता ना. तुला भेटायचं होतं.” तो चाचरत म्हणाला. 

“मी आता त्या ऑफिसमध्ये नाहीये सिद्धार्थ, तुला माहित नसेल कदाचित पण…. ” तिचं वाक्य त्याने मध्येच तोडलं. “माहित आहे, तिकडे नाहीच. तू ती कंपनी सोडलीस ते कळलं मला. तुझ्या आताच्या ऑफिसजवळच आलो होतो मी. पण तू दिसलीच नाहीस.” तो म्हणाला. 

“वाह.. माझ्याबद्दल बरीच माहिती गोळा केली आहेस तू.” अनिता उपहासाने म्हणाली. “by the way  मी काल सुट्टीवर होते.”

“का? कुठे बाहेर गेली होतीस का?” त्याने विचारलं. तिने त्याच्याकडे विचत्र नजरेने बघितलं. “excuse me… I am not answerable to you anymore सिद्धार्थ. मी कुठे होते आणि कुठे नव्हते हे मी तुला का सांगू?” असं म्हणून तिने त्याच्याकडे पाठ फिरवली आणि ती बसच्या दिशेने पाहायला लागली. 

“ऐक ना.. मला माहित आहे तू माझ्यावर रागावली असणार, म्हणूनच मला तुझ्याशी बोलायचं आहे. आपण कुठेतरी बसून बोलूया का?” त्याने तिच्या जवळ येत विचारलं. 

ती दोन पावलं मागे झाली. “नाही मला तुझ्यासोबत कुठेही यायचं नाहीये. जे बोलायचं ते इथेच बोल. आणि तसंही आपल्यामध्ये आता बोलण्यासारखं काय आहे?” ती त्याच्या नजरेला नजर देत म्हणाली. 

“माझं चुकलं अनु, खरंच चुकलं. मी तुला कधीच समजून घेऊ शकलो नाही, तुला खूप दुखवलंय. मला तेव्हा काय झालं होतं माझं मलाच कळलं नाही. तुला किती त्रास झाला असेल याचा मी जराही विचार केला नाही.” अनिताने त्याला मध्येच थांबवलं आणि म्हणाली, “ठीक आहे, तुझं तुला कळलं ना बस्स झालं. तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली हेच खूप आहे.”

“पण ते कसं कळलं ते विचार ना.” तो म्हणाला. “मला ते जाणून घेण्यात खरंच इंटरेस्ट नाहीये सिद्धार्थ.” अनिता त्रासिक स्वरात म्हणाली. 

“पण मला सांगायचंय.” तो म्हणाला. “जेव्हा मलाही तुझ्यासारखाच त्रास झाला ना तेव्हा.”

“म्हणजे?” तिने आश्चर्याने विचारलं. 

“मला त्या वेळी खूप गर्व होता स्वतःचा की, मला काय अशा ५६ मुली मिळतील. पण माझ्या एक लक्षात नाही आलं की त्या ५६ मुली तुझ्यासारख्या नसतील. तुझ्याएवढी माझी काळजी घेणारी, मला समजून घेणारी नाही मिळणार कोणी. जरी माझं चुकलं तरी तूच समजून घ्यायचीस, तूच सॉरी म्हणायचीस. मला या सगळ्याची इतकी सवय झाली होती की मी तुला गृहीत धरायला लागलो होतो. मी कसाही वागलो तरी तू मला समजून घेशील असंच वाटायचं मला. त्या दिवशीही मला असंच वाटलं की तूच येशील मला पुन्हा समजवायला. पण.. तू नाही आलीस आणि नंतर खूप एकटेपणा जाणवायला लागला, काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलं. अशाच सैरभैर अवस्थेत, तुझी जागा घेऊ शकले अशी एक मुलगी माझ्या आयुष्यात आली. म्हणजे ती तुझी जागा घेऊ शकेल असं मला वाटलं पण ते चूक होतं. तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकणार. मी तुझ्याशी जसं वागायचो ना तशी जेव्हा ती माझ्याशी वागली तेव्हा मला जाणवलं की मी तुझ्याशी किती वाईट वागलोय. तुला किती त्रास झाला असेल हे मला तेव्हा कळलं. माझ्या सगळ्या कृत्यांची मला शिक्षा मिळाली. म्हणून मी तुझी माफी मागायला आलोय. मला माफ कर.”

“Its OK सिद्धार्थ, मी ते सगळं कधीच विसरले आहे. माझा तुझ्यावर आता कसलाच राग नाही.” अनिता म्हणाली. 

“थँक्स… थँक्स अ लॉट.” तो तोंडभर हसून म्हणाला. “मला माहित होतं मी कधीही आलो तरी तू मला समजून घेशीलच. आता मागचं सगळं विसरून आपण पुन्हा एक नवीन सुरुवात करूया.” असं म्हणून त्याने तिच्या हाताला हात लावला. तिने पटकन हात मागे घेतला. “काय करतोयस तू?” तिने विचारलं. “मी तुला माफ केलं याचा अर्थ असा नाही की मी पुन्हा तुझ्यासोबत येईन. तू माझ्याबद्दल एवढी माहिती काढलीस तर तुला हे कळलं नाही का की लवकरच माझं लग्न होणार आहे.” 

“कळलं ना.” तो म्हणाला. “म्हणूनच तर तुला भेटायला एवढ्या घाईघाईने आलोय. अनु… मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तुझ्यापेक्षा चांगली जोडीदार नाही मिळू शकत हे मला कळलंय. मी खूप चुकीचं वागलोय, त्यासाठी तू मला हवी ती शिक्षा दे. पण… पण मला सोडून जाऊ नकोस. मला एक चान्स दे. मी पुन्हा असं नाही वागणार.” तो काकुळतीला येऊन बोलत होता. 

“का?” ती हसून म्हणाली, “तुला तर माझ्यासारखी मुलगी नकोच होती ना, Ohh.. sorry sorry. I mean तुला चालली असती पण तुझ्या घरी चालणार नव्हती ना. त्यांना घर सांभाळणारी, सणवार करणारी, एक so called संस्कारी मुलगी हवी होती ना. आणि तुलाही माझं उशीरपर्यंत ऑफिसमध्ये थांबणं आवडायचं नाही, मित्रांसोबत जास्त फिरणं आवडायचं नाही. काय म्हणाला होतास तू, हा ‘तुझ्यासारखी मुलगी मैत्रीण म्हणून ठीक आहे पण बायको म्हणून नाही. मग आता तीच मुलगी तुला पुन्हा का हवी आहे तुझ्या आयुष्यात? तुझ्या घरच्यांना हवी तशी एखादी मुलगी सांग त्यांना शोधायला, मिळेल तुला. 

“ते सगळंच चुकलंय माझं अनु, मी मान्य करतो.” तो म्हणाला. “माझ्या अपेक्षाच चुकीच्या होत्या. पण आता मला तुझ्या कोणत्याच गोष्टीचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि मी घरच्यांनाही समजावेन, तू त्याची काळजी नको करुस. तू फक्त हो म्हण, मी सगळं ठीक करतो पुन्हा.” 

“आता खूप उशीर झालाय सिद्धार्थ.” ती म्हणाली. “माझीही अवस्था फार वाईट होती त्यानंतर. पण नंतर मी स्वतःला सावरलं, त्यातून बाहेर आले. एक नवी सुरुवात केली. मलाही असंच वाटायचं की तुझी जागा घेणारं माझ्या आयुष्यात कोणीच येणार नाही, खरं तर मला कोणीच नको होतं माझ्या आयुष्यात. पण… मी चुकीचा विचार करत होते. तुझी जागा घेणारा माणूस आला माझ्या आयुष्यात. माझ्या कोमेजलेल्या आयुष्यात त्याने पुन्हा रंग भरले. मला पटवून दिलं की प्रेम हे खूप सुंदर आहे, नाती खूप सुंदर आहेत. त्याच्यासोबत माझ्य जगण्याला एक नवा अर्थ आला. मी आयुष्यावर पुन्हा प्रेम करायला लागले, ते भरभरून जगायला लागले. मी आता खूप पुढे गेलेय सिद्धार्थ, आणि तू म्हणतोयस तुला पुन्हा एक चान्स देऊ?” 

“त्याच्याबद्दल इतकं बोलतेयस? असा कितीसा वेळ घालवलास त्याच्यासोबत? इतकं चांगलं ओळखायला लागली आहेस का त्याला?” त्याने विचारलं. 

“कधी कधी काही वर्षात होत नाहीत त्या गोष्टी काही दिवसात होतात सिद्धार्थ.” ती हसून म्हणाली. “आणि कधी कधी काही क्षणात सुद्धा. मला मान्य आहे मी खूप थोडा वेळ घालवलाय त्याच्या सोबत. पण आपल्या ४ वर्षांच्या ओळखीत जे झालं नाही ना ते या काही महिन्यांच्या ओळखीत झालंय. तू एवढा वेळ माझ्यासोबत घालवूनही मला ओळखू शकला नाहीस आणि कदाचित मीही तुला नाही ओळखू शकले मी मान्य करते. पण एवढ्या थोड्या काळातही आम्ही खूप चांगलं ओळखलंय एकमेकांना आणि महत्वाचं म्हणजे आम्ही जसे आहोत ना तसं स्वीकारलंय आम्ही एकमेकांना. या वेड्या, चिडणाऱ्या, भांडणाऱ्या आणि हो तुझ्या भाषेत सांगायचं तर कधी कधी बालिश वागणाऱ्या अनितावरच प्रेम केलंय त्याने. मी चिडले की तो शांत राहतो आणि समजून घेतो, माझ्यापेक्षा जास्त मोठा आवाज करून ओरडत नाही. मी बालिश वागले की तो मोठ्या माणसा सारखा सांभाळून घेतो आणि मुख्य म्हणजे मी चुकले ना तरी तेवढ्यावरून मला सोडून जात नाही. मला कधी काय हवंय त्याला न सांगताच कळतं. त्याने मला बदलायला लावलं नाही. स्वतःसाठी तर नाहीच पण घरच्यांसाठीही नाही. मला कोणतीही तडजोड करायला भाग न पाडता स्वीकारलंय त्याने आणि त्याच्या घराने सुद्धा.”

“पण जर तो आता नसता तुझ्या आयुष्यात तर? मग तर एक चान्स दिलाच असतास ना?” त्याने विचारलं. 

“त्याच वेळी तू पुन्हा आला असतास तर कदाचित मी तुला चान्स दिलाही असता.” ती म्हणाली. “पण आता? तुला आता ३ वर्षानंतर पश्चाताप होतोय? या ३ वर्षात तुला माझी कधीच आठवण नाही आली? एकदाही विचारावंस नाही वाटलं मी कशी आहे? जिवंत आहे की मेली? काहीच नाही. आणि आताही तुला माझी आठवण आली कारण दुसऱ्या कोणीतरी तुला लाथाडलं, जसं तू मला लाथाडलं होतंस तसं. आता तुझ्यासोबत कोणीच नाहीये म्हणून तुला परत यावंसं वाटलं. आणि तुला काय वाटलं तू कधीही परत येशील आणि मी तशीच बसले असेन तुझी वाट बघत? तू आलास की लगेच तुझ्यासोबत येईन हसत हसत? Sorry.. but you are totally wrong. आणि मी हे फक्त यासाठी बोलत नाहीये की आता माझ्या आयुष्यात दुसरं कोणीतरी आहे म्हणून. जरी तो नसता ना.. तरीही मी तुझ्यासारख्या माणसाकडे परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. ज्याच्या आयुष्यात मी फक्त एक ऑप्शन म्हणून आहे अशा व्यक्तीच्या आयुष्यात राहण्यात मला काहीच रस नाहीये. आता राहिला प्रश्न तुला शिक्षा करण्याचा तर मला नाही वाटत मला तो अधिकार आहे. तुला द्यायची ती शिक्षा देवाने आधीच दिली आहे. अजून मी काय देऊ? जसं मी मघाशी बोलले की मी ते सगळं खूप आधीच विसरले आहे. त्यामुळे तू पण विसर आणि एक नवीन सुरुवात कर. तुलाही एक चांगली मुलगी मिळेल.”

“तू पुन्हा एकदा विचार केलास तर कदाचित…” अर्धवट बोलून सिद्धार्थ थांबला. 

अनिता हसली आणि म्हणाली, “तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, आदित्य म्हणजे माझा होणारा नवरा, फोटोग्राफर आहे. खूप छान फोटो काढतो तो. तो ना, एक चांगला परफेक्ट क्लिक येईपर्यंत ३-४ क्लिक करत राहतो. चांगला क्लिक येईपर्यंत समाधान होत नाही त्याचं. त्यासाठी वेगवगेळ्या अँगलने तो फोटो काढत असतो. मी एकदा त्याला म्हटलं की एवढा त्रास कशाला घेतोस? आजकाल फोटोशॉप आणि दुसरे पण वेगवेगळे ऍप्स वापरून आणि फिल्टर वापरून फोटो हवा तसा सुंदर करता येतो. मग परफेक्ट क्लिक येईपर्यंत वाट का बघायची? त्यावर तो मला म्हणाला की, असे फिल्टर वापरून आणि एडिट करून सुंदर केलेले फोटो ना कृत्रिम वाटतात. म्हणजे मूळच्या चांगल्या आलेल्या फोटोमध्ये जे नैसर्गिक सौंदर्य असतं ना, ते अशा एडिट केलेल्या फोटोत नाही येत. ते कृत्रिमच वाटत राहतात. म्हणून कायम एक चांगला, परफेक्ट क्लिक होईपर्यंत वाट बघावी. त्याला वेळ लागेल, त्रास होईल पण शेवटी येणारा फोटो इतका सुंदर असतो ना की त्यापुढे तो त्रास फिका वाटतो. आणि महत्वाचं म्हणजे, असे एडिट केलेले फोटो आपण हुबेहूब ओरिजनल फोटोसारखे सुंदर बनवले ना, तरी त्याने आपण जगाला फसवू शकतो, स्वतःला नाही. लोकांना असे फोटो खूप आवडतील, सोशल मीडियावर त्याला खूप लाईक्स येतील. पण आपलं आपल्याला माहित असेल की हा ओरिजिनल फोटो नाहीये, हा ओढून ताणून सुंदर बनवलेला फोटो आहे, हे आपल्या मनाला ठाऊक असणार. आपल्या नात्याचंही असंच झालं होतं सिद्धार्थ. ते कधीच परफेक्ट नव्हतं. आपण एकमेकांसाठी योग्य नव्हतो. तो एक wrong click होता, एक चुकलेला फोटो. पण तरीही मी त्याला बरोबर बनवण्याचा प्रयत्न करत होते, फिल्टर वापरून, एडिट करून, जबरदस्तीने सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत होते. पण तसं करून ते कधीच मुळातच सुंदर असलेल्या नात्यासारखं नाही होणार, हे मला तेव्हा कळलंच नाही. पण आता कळलंय. हे असं नातं जगाला दिसताना सुंदर दिसेल कदाचित पण आपल्याला स्वतःला आतून माहित असणार की हे खरं नाही. दिखाऊ आहे, वरवरचं आहे. आणि मला माझं आयुष्य किंवा आयुष्यातलं कोणतंही नातं, असं दिखाऊ कृत्रिम किंवा लोकांना दाखवण्यापुरतं नाही ठेवायचंय. मला स्वतःला त्यातून आनंद आणि समाधान मिळणार असेल, तरच त्याला अर्थ आहे. त्यामुळे तू जे म्हणतोयस ते शक्यच नाही.” असं म्हणून ती निघाली. 

मग पुन्हा थांबली आणि त्याच्या जवळ येऊन म्हणाली. “आणि अजून एक गोष्ट जी मी अर्थातच आदित्यकडूनच शिकलेय. एकदा का त्याच्या मनासारखा क्लिक त्याला मिळाला ना, की त्याच्या आधीचे सगळे wrong clicks तो delete करून टाकतो. प्रत्येक चांगल्या फोटोमागे असे ३-४ तरी wrong clicks असतात. खरं तर हे सगळे फोटो पूर्णपणे Useless आणि Unnecessary असतात. कारण आपल्याला स्वतःला बघायला आणि दुसऱ्यांना दाखवायलाही ते परफेक्ट क्लिक झालेले फोटोच लागतात, या सगळ्या wrong clicks चा काहीच उपयोग नसतो. पण तरीही हे सगळे useless फोटो मेमरी कार्डवर खूप जागा व्यापतात, मेमरी कार्ड अगदी फुल्ल करून टाकतात. त्यामुळे मग कधी कधी परफेक्ट क्लिक झालेले फोटो ठेवायलाही जागा उरत नाही. फोन स्लो होतो, कधी कधी हँग सुद्धा होतो. म्हणून हे सगळे Useless आणि unnecessary असलेले wrong clicks योग्य वेळीच delete करून टाकायला हवे. म्हणजे मग चांगल्या फोटोंसाठी भरपूर जागा उरते आणि आपला फोनही नीट चालतो. मीही तेच केलंय. wrong click असलेल्या आपल्या नात्याच्या सगळ्या आठवणी मी delete केल्यात. त्यामुळेच परफेक्ट क्लिक साठी पुरेशी जागा झाली आणि माझं हँग झालेलं आयुष्य पुन्हा नीट चालायला लागलं. तूही हेच कर,सगळ्या unnecessary गोष्टी delete कर आणि एक नवी सुरुवात कर. मला खात्री आहे तुझा परफेक्ट क्लिक तुला नक्की सापडेल. All the best” असं म्हणून ती चालायला लागली. 

ती दिसेनाशी झाली तरी सिद्धार्थ त्याच दिशेला बघत होता. 

—————————————————————————————————————————————–

लग्नाचा हॉल खूप सुंदर सजवलेला होता. सगळीकडे अत्तराचा सुगंध पसरला होता. नटलेल्या बायकांची इकडून तिकडे लगबग चालली होती. स्टार्टर्स आणि कोल्ड्रिंक सर्व्ह होत होते. स्टेज फुलांनी सजवलेलं होतं आणि त्यात मधोमध फुलांनीच लिहिलं होतं. “Aditya weds Anita”. 

त्यांचे सगळे मित्र मैत्रिणी ग्रुप सेल्फी घेण्यात दंग होते. 

आणि आदित्य आणि अनिता?

“आता या बाजूने या आणि खांद्यावर हात ठेवा.” फोटाग्राफर त्यांना सांगत होता. “जरा इकडे बघा, बस्स बस्स… जास्त नाही. हा…. आता smile करा.” 

“अहो मघापासून ही एकच पोज देतोय आणि तुम्ही किती वेळा काढून झालाय फोटो.” अनिता कंटाळून म्हणाली. “आता smile करून करून गाल दुखायला लागले माझे. करा पटकन.” 

“पटकन कसं करणार मॅडम.” फोटोग्राफर हसत म्हणाला. “फोटो नीट यायला हवा की नाही तुमचा. चांगला फोटो म्हणजे जरा वेळ लागणारच ना. ३-४ wrong clicks नंतरच एखादा परफेक्ट क्लिक येतो की नाही. जरा पेशन्स ठेवा, झालंच.” 

त्याच्या या वाक्यावर ते दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि फोटोग्राफरने लगेच तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला. “परफेक्ट क्लिक.” असं म्हणून त्याने अंगठा दाखवला. 
 

 

Advertisements