कसरत

“अंकिता, उठलीस का?” शर्वरीने किचनमधून मोठ्याने हाक मारली आणि गॅस बंद केला. भाजीचा टोप खाली उतरला आणि कमलाबाईंकडे बघून म्हणाली, “तुम्ही घ्या पोळ्या भाजायला.” मग लगेच तिने धुवून ठेवलेला कांदा चिरायला घेतला आणि चिरता चिरता पुन्हा एकदा हाक मारली, “अंकू उठ पटकन, वाजले बघ किती” पण त्या हाकेलाही काहीच प्रतिसाद आला नाही तेव्हा ती घाईघाईने बेडरूम मध्ये आली. अंकिता उठून बसली होती पण पुन्हा बसल्या जागी डुलकी घेत होती. शर्वरीने कपाळावर हात मारला आणि तिला जाऊन हलवलं, “पुन्हा झोपलीस तू, उठ उठ आवर पटकन.” अंकिता डोळे चोळत चोळत उठली. तेवढ्यात आशिष खोलीत आला. त्याच्याकडे बघून शर्वरी वैतागून म्हणाली, “तुझं लक्ष कुठे असतं? निदान ती उठलीये की नाही एवढं तरी बघायचं ना.” “अगं मी अंघोळीला गेलो होतो, मला कसं कळणार.” आशिष केस विंचरत म्हणाला.

“अरे पण तिला उठवून मग जायचं ना. मला आतमध्ये कसं कळणार इथं काय चाललंय ते? वाजले बघ किती आता, तुझी निघायची वेळ होईल आता आणि अजून हिचं काहीच आवरलं नाहीये.”

“ठीक आहे, नाही आवरलं तर तू घेऊन जा एक दिवस.” आशिष शांतपणे म्हणाला.

“माझे आधीच ४ लेटमार्क झालेत आशिष. आता अर्धी रजा जाईल. त्यापेक्षा तूच थांब ना जरा १० मिनिटं.”

“नो वे.” आशिष जोरात मान हलवत म्हणाला, “माझी आज खूप महत्त्वाची मिटिंग आहे, उलट मला १० मिनिटं लवकरच पोचलं पाहिजे.”

“तुझ्या मिटिंगचं चालतं रे, एखादा दिवस ऍडजस्ट करू शकतोस.” शर्वरी त्याच्याशी बोलता बोलता अंकिताच्या दंडाला पकडून जवळजवळ ओढतच बाथरूमकडे घेऊन गेली.

“अगं कशी ओढतेयस तिला.” आशिष अंकिताचा हात तिच्या हातातून सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाला, “आणि प्रत्येक वेळी माझ्या कामाला कमी लेखत जाऊ नकोस हा. सकाळी सकाळी वाद नकोयत मला.”

“मलाही नकोयत.” शर्वरी म्हणाली आणि मग अंकिताकडे वळून पुन्हा ओरडली, “हात चालव गं पटपट, आधीच उशीर झालाय त्यात नुसती हळूहळू करतेय सगळं.” तेवढ्यात कसला तरी वास येतोय की काय असं तिला वाटलं. “अरे देवा दूध ठेवलंय मी.” असं म्हणून ती अंकिताचा हात सोडून जवळजवळ धावतच किचनकडे गेली. जाता जाता “तिचं जरा आवर रे पटकन” असं आशिषला सांगितलं.

अजूनही पेंगत असलेल्या अंकिताच्या गालावर हलकेच एक चापट मारून आशिष म्हणाला, “छकुली, चला चला डोळे उघडा, ब्रश करायचा ना.” असं म्हणून त्याने तिच्या ब्रशवर पेस्ट काढून दिली. “पप्पा मला झोप येतेय.” असं म्हणून ती त्याला बिलगली. “आता झोपायचं नाही बाबा, काकूंकडे जायचंय ना आपल्याला. तिकडे कोण कोण भेटणार मग, श्रेया, मानस, पूर्वा आणि कोण कोण?” आपल्या मित्रमैत्रिणींची नावं ऐकल्यावर अंकिताची कळी जरा खुलली आणि तिने बोलायला सुरुवात केली. “हो आज मानस मला नवीन गेम शिकवणार आहे.” “हो ना… मग चला पटकन ब्रश आणि अंघोळ आटपून घेऊया. चल चल पटकन.” असं म्हणून आशिष तिला बाथरूममध्ये घेऊन गेला.

इकडे शर्वरी धावत किचनमध्ये आली. “दूध वर आलं होतं म्हणून गॅस बंद केला मी.” कमलाबाई तव्यावरची पोळी उलटत म्हणाल्या. “बरं झालं बाई. नाहीतर अजून एक काम वाढलं असतं माझं. थँक्यू.” शर्वरी म्हणाली.  कमलाबाई हसल्या. शर्वरीने पटापट कांदा चिरला आणि फोडणीला घातला. तोपर्यंत कमलाबाईंच्या पोळ्या करून झाल्या होत्या. डबे भरता भरता शर्वरी दुसरीकडे पोहे करत होती. तेवढ्यात आशिष बाहेर आला आणि त्याने विचारलं, “डबा तयार आहे का? आणि नाश्त्याचं काय?” “हो डबा झालाय, पोहे होतायत ५ मिनिटात. तेवढा चहा ओतून घे जरा.” शर्वरी म्हणाली. पोहे प्लेटमध्ये काढून देत असतानाच अंकिता बाहेर आली. “अरे हे काय, तिचे केस नाही बांधलेस तू?” शर्वरी आशिषकडे बघून म्हणाली.

“नाही गं. बाकीचं सगळं केलंय, तेवढे केस तू बांध आता. मला आधीच उशीर झालाय.”

“म्हणजे तू नाहीच घेऊन जाणार आहेस का तिला?”

“सांगितलं ना मला उशीर झालाय.”

“अरे मलाही उशीर झालाय, मी मघाशी म्हटलं ना माझे लेटमार्क संपलेत. अजून माझा नाश्ताही बाकी आहे.”

“हो पण मी तरी काय करू. मलाही वेळेत जायला हवं. क्लायंटला वेळ दिली आहे मी.”

“इतकी काही वेळ पाळायची गरज नाही. एखादा दिवस चालतं. तसंही मिटिंगमधून काही निघत तर नाही.” शर्वरी वैतागून म्हणाली.

“हे बघ तू आता पुन्हा सुरु करू नकोस, मी मघाशीच म्हटलं मला सकाळी वाद नकोयत.” आशिष पोहे संपवत उठला. “तुझं वेळेत नाही आटपत तर जरा लवकर उठत जा ना.” बोलता बोलता त्याने पायात बूट सुद्धा घातले.

शर्वरीने काहीच प्रत्युत्तर दिले नाही फक्त हताशपणे एक सुस्कारा सोडला आणि अंकिताचे केस बांधायला घेतले. “या रविवारी ना जाऊन आपण केस छोटे करून टाकूया.” ती म्हणाली. “ए मम्मी नाही गं, मला  नाही कापायचेत केस. माझ्या सगळ्या फ्रेंड्स २ वेण्या घालतात, मीच एकटी पोनी बांधते. मला पण त्यांच्यासारखे मोठे केस हवेत.” अंकिता म्हणाली.

“मग स्वतःचे स्वतः बांधायला पण शिक.” शर्वरी म्हणाली. “अजून नीट पोनी नाही बांधता येत, आणि म्हणे वेण्या घालायच्या आहेत.”

“त्यांना तरी कुठे येतात बांधायला, त्यांची मम्मी घालून देते वेण्या.”

“त्यांच्या मम्मी कोणी ऑफिसला जातात का? नाही ना, घरीच असतात, त्यांना असतो वेळ खूप. मला नाहीये.”

“मग तू तरी का जातेस, तू पण थांब ना घरी.”

“बस्स झाली बडबड, आवर आता पटकन. दूध पिऊन घे आणि बॅग बघ नीट भरली आहेस का ते.” असं म्हणून शर्वरी उठली आणि नाश्ता वाढून घ्यायला किचनमध्ये गेली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की८ वाजलेत. आता अजून उशीर करून नाही चालणार. तिने पटकन आपला आणि अंकिताचा डबा उचलून बाहेर आणला. केसावरून फणी फिरवली आणि पटकन तयार झाली. तोपर्यंत अंकिताही तयार झाली होती. सगळं सामान घेऊन ती बाहेर पडली आणि घराला कुलूप घातलं.

अंकिताला घेऊन शर्वरी घाईघाईने पाळणाघरात पोचली. “आली का अंकू, आज उशीर झाला वाटतं.” जोशीकाकू हसत हसत म्हणाल्या. “हो आज जरा उशीरच झाला.” हातातलं सामान त्यांच्या हातात देत शर्वरी म्हणाली. “बरं काकू, त्या छोट्या पिशवीत एक सफरचंद आहे, ते तिला १० वाजता द्या. आणि आज कोबीची भाजी आहे तर जरा नाटक करेल ती खायला, पण सगळं संपवायला लावा तिला.”

“हो मी बरोबर खायला लावेन सगळं, तुम्ही नका काळजी करू.” काकू मान हलवत म्हणाल्या.

“आणि हो बाकीच्या मुलांच्या नादाने फ्रिजचं पाणी बिणी पिऊ देऊ नका हा, काय आहे ना कालपासून जरा खोकतेय. तिला ना थंड अजिबात सहन होत नाही.”

“तुम्ही नका हो काळजी करू, बघते मी सगळं.” काकू दिलासा देत म्हणाल्या. “माझं नीट लक्ष असतं सगळ्यांवर. जा तुम्ही निवांत.”

“हो ते झालंच. तुम्ही आहात म्हणून काळजी नाही.” शर्वरी म्हणाली आणि तिने अंकिताकडे वळून म्हटलं, “चल येऊ मी? काकूंना त्रास देऊ नकोस हा. आणि आधी उरलेला होमवर्क पूर्ण कर, मग खेळायचं हा.” अंकिताने मान डोलावली पण तिचं लक्ष तिच्या मित्रमैत्रिणींना शोधण्यात गुंतलं होतं. “चल मम्मीला बाय कर.” असं काकूंनी म्हटल्यावर तिने पुढे येऊन शर्वरीला मिठी मारली, तिच्या गालावर पापी दिली. शर्वरीनेही तिच्या गालावर आपले ओठ टेकले आणि मोठ्या कष्टाने तिच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेतलं. “बाय मम्मी, संध्याकाळी लवकर ये हा” अंकिता असं म्हणेपर्यंत तिच्या मैत्रिणीने तिला खेचतच आपल्यासोबत नेलं. “बाय सोन्या, येईन हा लवकर.” असं म्हणून शर्वरी निघाली.

तिने घड्याळात पाहिलं, ८.२० झाले होते. १० मिनिटात कसंही करून स्टेशन गाठायलाच हवं, ही ट्रेन जर का चुकली तर काही खरं नाही. तिने पटकन रिक्षा पकडली. ट्रॅफिकमुळे थांबत, रडतखडत स्टेशनला पोचायला उशीरच झाला. ती रिक्षातून उतरली तेव्हा ट्रेन सुटायला फक्त एक मिनिट बाकी होतं. सगळं बळ एकवटून ती धावत सुटली, भराभर पूल चढली उतरली, गर्दीतून वाट काढत ट्रेनच्या डब्यापर्यंत पोचली. आतमध्ये पाऊल ठेवते न ठेवते तोच ट्रेन सुरु झाली. दरवाजाजवळ नेहमीप्रमाणेच गर्दी असल्याने तिला जेमतेम दारातून आत शिरायला मिळालं. कशीबशी गर्दीतून ती आतमध्ये जागा करत उभी राहिली.

मग मात्र अचानक तिला सगळ्याचा ताण जाणवायला लागला. रात्रीचं जागरण, अपुरी झोप, सकाळपासूनची धावपळ, त्यात नाश्ता केला नव्हता, सकाळी उठल्या उठल्या एक कप चहा आणि २ बिस्किटं एवढ्यावरच आतापर्यंत निभावलं होतं. सगळ्याचा थकवा अचानक जाणवायला लागला. थोड्या वेळाने चौथ्या सीटवर जेमतेम टेकण्यापुरती जागा मिळाल्यावर तिथेच तिला डुलकी लागली. स्टेशन आल्यावर तिने घड्याळात बघितलं, तर ट्रेन आज १० मिनिटं लेट झाली होती. ‘एवढी धावपळ करूनही शेवटी लेटमार्क होणारच.’ तिने निराशेने एक उसासा टाकला आणि ऑफिसच्या दिशेने चालायला लागली.

तिच्या डेस्कवर येऊन जरा सेटल होते न होते तोच बॉस हजर. “काल दिलेल्या दोन्ही फाईल्सचं काम झालंय का पूर्ण?” त्याने विचारलं.  

“अं…. एक झालीये सर, दुसरी बाकी आहे.” शर्वरी म्हणाली. “कालच पूर्ण व्हायला हवी होती ती, अजून किती वेळ लागणार आहे?” बॉसने विचारलं.

“आज…. आज संध्याकाळपर्यंत नक्की देते सर.” शर्वरी म्हणाली.

“तसं तर कालही तुम्ही जरा जास्त वेळ थांबला असतात तर झालं असतं. त्यात आजही उशिरा आलात. रोज असंच होत राहिलं तर कधीच पूर्ण होणार नाहीत. तुम्हाला जमणार नसेल तर तसं सांगा, मी दुसऱ्या कोणाला तरी देतो.

“नाही सर, तसं काहीच नाही.” शर्वरी अडखळत म्हणाली. “आज नक्की करते पूर्ण सर, मी थांबेन हवं तर.”

“ठीक आहे, बघू.” बॉस कोरडेपणाने म्हणून निघून गेला. शर्वरी खाली बसली आणि तिने एक दीर्घ श्वास घेतला. मग पटापट फाईल उघडून कामाला सुरुवात केली.

तासभर असाच गेला, ती कामात पूर्ण गढुन गेली होती. जवळपास साडेदहाच्या सुमारास तिला एकदम थकल्यासारखं वाटायला लागलं. भुकेची जाणीव तीव्रतेने झाली. पटकन बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊया असा विचार केला. तेवढ्यात तिची कलीग दीपिका आली आणि म्हणाली, “सरांनी मिटिंग रूममध्ये बोलवलंय, चल पटकन.”

“आता लगेच जायचंय का?” शर्वरीने विचारलं. “मी जरा पटकन काहीतरी खाऊन घेईन म्हणत होते.”

“ओह…. तू नाश्ता नाही केलास का आज?” दीपिकाने विचारलं. शर्वरीने नकारार्थी मान हलवली. “ओह…. पण मिटिंग तर आता लगेच आहे गं, मला काही प्रॉब्लेम नाही गं, पण तो खडूस माहितेय ना. उगाच नंतर तणतण करेल.”

“हं….. खरं आहे.” शर्वरी निराशेने म्हणाली. “तू हो पुढे, मी आलेच.” दीपिका गेली. शर्वरीने ड्रॉवर उघडला आणि शोधाशोध सुरु केली, सुदैवाने २ दिवसांपूर्वीचा बिस्कीटचा पुडा तसाच पडून होता. तिने त्यातली २-३ बिस्किटं पटापट तोंडात टाकली, वरून पाण्याचे ३-४ घोट घेतले आणि धावतपळत मिटिंग रूममध्ये गेली. मिटिंग संपेपर्यंत १२ वाजून गेले होते. डेस्कवर येऊन बसल्या बसल्या शर्वरीने फोन हातात घेतला आणि जोशीकाकूंचा नंबर फिरवला. “हॅलो काकू, हो मघाशी फोन करायचा राहूनच गेला, एक महत्वाची मिटिंग होती ना. खाल्लं का तिने सफरचंद? सगळं संपवलं ना? बरं बरं. आणि अभ्यास केला का, की सगळा वेळ खेळतच होती? जरा द्या ना तिला फोन.”

“हॅलो मम्मी, मी सगळा होमवर्क केला.”

“अरे वा, तू आहेसच गुड गर्ल. बरं आता डबा सगळा संपवून टाकायचा हा. खाणार ना?”

“नाही…. मला नाही आवडत कोबीची भाजी”

“असं नाही करायचं बाळा, आपल्याला शाळेत काय शिकवलंय, सगळ्या भाज्या खायच्या असतात ना. मग भरपूर ताकद येते की नाही. मग संपवणार ना सगळं? मग संध्याकाळी तुझ्यासाठी खाऊ घेऊन येते.”

“नक्की आणशील ना?”

“हो बाळा नक्की, चल आता पटापट खाऊन घे. शाळेत जायचंय ना. आणि हो ती पोएम झाली का पाठ? आज टीचर विचारणार आहेत ना”

मग अंकिताने सगळी पोएम फोनवर म्हणून दाखवली. त्यांनतर शर्वरीकडून संध्याकाळी घरी लवकर येण्याचं प्रॉमिस घेऊन तिने काकूंकडे फोन दिला. “काय झाल्या का मायलेकीच्या गप्पा?” काकूंनी हसत हसत विचारलं. “हो झाल्या झाल्या.” शर्वरी म्हणाली. “बरं काकू, ते शाळेत न्यायच्या डब्यातली भाजी जरा….” तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच काकू म्हणाल्या, “एकदा गरम करून देईन पुन्हा. आहे माझ्या लक्षात.” शर्वरी समाधानाने हसली आणि अजून काही सूचना देऊन तिने फोन ठेवला.

दुपारच्या जेवणानंतर शर्वरी पुन्हा कामाच्या रागाड्यात गढून गेली. इतकी की तिला वेळेचंही भान राहिलं नाही. ६ वाजता तिच्या मैत्रिणीने येऊन तिला विचारलं की निघणार नाहीयेस का, तेव्हा तिच्या लक्षात आलं. पण अजून थोडं काम बाकी होतं, म्हणून तिला निघायला सांगून शर्वरीने पुन्हा कामात डोकं घातलं. आज कसंही करून हे काम पूर्ण केलंच पाहिजे, तरच बॉसला सकाळच्या लेटमार्क बद्दल सांगता येईल हा विचार करून, तिने ७ पर्यंत सगळं संपवलं आणि मग बॉसच्या केबिनकडे गेली.

“सर, हे झालंय पूर्ण.” तिने फाईल्स बॉसच्या दिशेने सरकवत म्हटलं.

“ओके. गुड. ठेवा तिथे.”

“सर, थोडं बोलायचं होतं.” तिने चाचरत तोंड उघडलं.

“येस.” त्याने मान वर न करताच उत्तर दिलं.

“सर ते, आज सकाळी….. लेट झाला जरा १० मिनिटं, तर ते… ते वेव्ह ऑफ होईल का? म्हणजे….. प्लीज…”

त्याने मन वर करून तिच्याकडे रोखून बघितलं. “माझ्या मते तुमचे ४ लेटमार्क संपलेत शर्वरी मॅडम. त्यामुळे रुल्स प्रमाणे आज अर्धा दिवस रजा जाईल.”

“हो सर, पण पण आजचाच दिवस फक्त, म्हणजे मी आज वेळेत निघाले होते पण ट्रेन लेट झाली सर, म्हणून.” एवढं बोलून ती थांबली, पुढे काय बोलावं तिला सुचेना.

“अहो मग जरा लवकर निघायचं, एक ट्रेन आधीची पकडायची.” तो निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. शर्वरी काहीच न बोलता गप्प उभी होती. “ठीक आहे, आज तुम्ही जास्त वेळ थांबलात म्हणून कन्सिडर करतो मी. पण नेहमी नेहमी असं नाही चालणार, मागच्या महिन्यातही बरेच लेटमार्क झालेत तुमचे.”

“नाही सर, आता नाही होणार असं. नक्की. थँक्यू व्हेरी मच सर, थँक्स अ लॉट.” शर्वरीने आनंदाने म्हणाली आणि घाईघाईत तिथून बाहेर पडली. ‘निदान आजची वेळ तरी मारून नेली, पुढचं पुढे बघू. पण आता उद्यापासून अजून लवकर निघावं लागणार, म्हणजे अजून लवकर उठणं आलं. ५.३० च्या ऐवजी आता ५ ला च उठलं पाहिजे. म्हणजे झोपेचं अजूनच खोबरं.’ याच विचारात ती ट्रेनमध्ये चढली. आज उशीर झाल्याने गर्दीची वेळ थोडी टळून गेली होती त्यामुळे बसायला जागा मिळाली. दिवसभराच्या थकव्याने तिला बसल्या बसल्या पेंग आली. पण जरा वेळाने फोनच्या आवाजाने जाग आली. फोन उचलला, पलीकडून आवाज आला, “हा मॅडम वो सायकल रेडी है, घर पे भेज दू की आप आ रहे हो लेने को?” ‘अरे हो आज अंकुची सायकल येणार होती नाही का. दिवसभर कामाच्या घाईत विसरूनच गेलो आपण.’ “हा हा… भेज दो घर पे, साब है घरपे वो पेमेंट कर देंगे.” असं म्हणून तिने घराचा पत्ताही सांगितला. फोन ठेवल्यावर तिला एक वेगळाच उत्साह वाटायला लागला. ६ महिन्यांपासून पोरगी मागे लागली होती, सायकल हवी म्हणून. पण काही ना काही खर्च निघतच होते त्यामुळे जमत नव्हतं. शेवटी फर्स्टक्लासचा पास बंद करून सेकंड क्लासचा काढायला सुरुवात केली आणि थोडे थोडे पैसे जमले. शिवाय अधून मधून ओव्हरटाईम केलाच. शेवटी एकदाची आज ती सायकल येतेय घरात. अंकुचा आनंदाने हरखून गेलेला चेहरा बघायला ती आतुर झाली होती, त्याच्यापुढे गेल्या ३-४ महिन्यातले सगळे कष्ट फिके होते, त्या कष्टाचं चीज झालं होतं. ट्रेनमधून उतरल्यावर तिने मार्केट मधून भाजी आणि बाकी घरातल्या काही वस्तू घेतल्या, अंकितासाठी खाऊ घेतला. हातात बरंच ओझं झालं होतं पण तरीही अंकूला भेटायच्या, तिच्या चेहऱ्यावरचा आंनद बघण्याच्या ओढीने ती घाईघाईने घरी आली.

घरी जाऊन पोचली तेव्हा सायकल आधीच आलेली होती आणि अंकिताने आशिषच्या मदतीने हळू हळू चालवायलाही सुरुवात केली होती. शर्वरीला बघताच ती सायकल वरून उतरून धावत तिच्याकडे आली आणि म्हणाली, “मम्मी माझी नवीन सायकल आली, बाबांनी आजच आणली.” ‘बाबांनी’ हा शब्द ऐकून शर्वरीच्या आत खोलवर कुठेतरी काहीतरी टोचलं. पण त्याबद्दल काही बोलायची ती वेळ नव्हती, शिवाय अंकिताच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्यासाठी जास्त महत्वाचा होता. “आणली का, अरे वा वा छान. मग आता लवकर लवकर चालवायला शिकायची हा.” असं म्हणून तिने हळूच अंकिताच्या गालाची पापी घेतली आणि ती आत गेली. आज आधीच उशीर झाला होता त्यामुळे बसायला वगैरे वेळच नव्हता. पटकन हातपाय धुवून ती किचनमध्ये आली आणि जेवणाच्या तयारीला लागली. थोड्या वेळाने आशिष आणि अंकिता सुद्धा घरात आले. अंकिता सोबत तिचे मित्रमैत्रिणीही होते, ते सगळे बाहेरच्या खोलीत खेळत होते. आशिष टीव्ही बघत बसला होता.

जरा वेळाने त्याला कोणाचा तरी फोन आला. बराच वेळ तो फोनवर बोलत होता. शर्वरी अधून मधून बाहेरच्या खोलीत येऊन मुलांवर लक्ष ठेवून होती, मध्येच टीव्ही बघत होती. बोलता बोलता अचानक आशिषचा आवाज वाढायला लागला. “अरे काय समजतो काय तो स्वतःला, आतापर्यंत किती म्हणून चालवून घेतलं आपण. पण आता हे अतीच झालंय. साला xxxxx.” शर्वरीने हे ऐकलं आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला खुणेनेच हळू बोलायला सांगितलं. त्याने होकारार्थी मान हलवली. अंकिता अजूनही तिथेच खेळत होती तिच्या मैत्रिणीसोबत. जरा वेळाने आशिषने पुन्हा बोलता बोलता अशीच एक शिवी दिली. तेव्हा मात्र शर्वरी त्याच्या समोर जाऊन उभीच राहिली आणि तिने त्याला फोन ठेवायला सांगितला. त्याने आधी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मग ती म्हणाली, “मला महत्वाचं बोलायचंय फोन ठेव. आत्ता लगेच.” तिचा जरासा चढलेला स्वर ऐकून त्याचा नाईलाज झाला आणि समोरच्या व्यक्तीला ‘नंतर बोलतो’ असं सांगून त्याने फोन ठेवला.

“तुला कितीदा सांगितलंय निदान घरात तरी अशी भाषा वापरू नकोस.” शर्वरी चिडून म्हणाली. “तू बघतोयस ना अंकिता इथेच खेळतेय कधीपासून, तिच्यासमोर तरी तोंडाला आवर घालत जा जरा.”

“हो सॉरी अगं, बोलण्याच्या नादात पटकन लक्षातच नाही आलं माझ्या.” आशिष अपराधी स्वरात म्हणाला.

“तू प्लीज तुझे कामाचे फ्रस्ट्रेशन्स घरी घेऊन येत जाऊ नकोस.” असं म्हणून वैतागून शर्वरी पुन्हा तिच्या कामाला निघून गेली. आशिष पुन्हा टीव्ही बघण्यात गुंतला. एका मराठी चॅनेलवर मराठी गाण्यांचा कार्यक्रम लागला होता. आत काम करताना शर्वरीच्या कानावरही टीव्हीचा आवाज पडत होता.

‘सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला

दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला!’

तेवढ्यात अंकिता आतमध्ये आली आणि म्हणाली, “मम्मी तू आज लवकर येणार होतीस ना आपण नवीन गेम खेळणार होतो.” “हो गं बाळा पण ऑफिसमध्ये खूप काम होतं, नाही जमलं यायला. सॉरी.” शर्वरीने कान पकडले. “मग आता खेळूया ना.” अंकिता तिला जवळ येऊन बिलगत म्हणाली. “आता वेळ नाहीये गं राणी, अजून जेवण बनवायचं आहे ना.” शर्वरीचा आवाज किंचित कापरा झाला. “तू असंच करतेस रोज, रोज प्रॉमिस करतेस पण कधीच लवकर येत नाहीस. माझ्या सगळ्या फ्रेंड्सच्या मम्मी घरी असतात जेव्हा त्या शाळेतून घरी येतात तेव्हा, फक्त तूच नसतेस.” असं म्हणून अंकिताने गाल फुगवले. शर्वरीच्या काळजात कसतरीच झालं, अंकिताचा एक एक शब्द जणू कुऱ्हाडीचा घाव असल्यासारखा तिच्या हृदयाला चिरत गेला. तरीपण मनातलं दुःख डोळ्यात येण्याआधीच त्याला थोपवून ती म्हणाली,”सॉरी ना सोन्या, खरंच सॉरी. बरं ऐक, आता ना तू तुझ्या फ्रेंड्स बरोबर खेळ. मग रात्री जेवल्यावर आपण खेळूया हा. चालेल का?” अंकिताच्या डोळ्यात एक चमक दिसली. “रात्री नक्की?” तिने विचारलं. “हो हो नक्की, एकदम गॉड प्रॉमिस.” असं म्हणून शर्वरीने गळ्याला हात लावला. अंकिता पुन्हा बाहेर गेली. टीव्हीवर अजून तेच गाणं चालू होतं

‘आटपाट नगरात गर्दी होती भारी

घामाघूम राजा करी लोकलची वारी

रोज सकाळीस राजा निघताना बोले

गोष्ट सांगायचे काल राहुनिया गेले

जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परी येणार मी वेळेतच घरी’

शर्वरीचं लक्ष आता कामातून उडालं होतं. डोक्यात असंख्य विचार चालू होते. रोज प्रयत्न करते लवकर घरी यायचा पण काही ना काही होतच राहतं. कुठून आणि कसा वेळ काढू अंकूसाठी? तरी ती गुणी आहे म्हणून एकदा समजवल्यावर पटकन समजून तरी घेते. कधी कधी वाटतं सगळं सोडून द्यावं आणि सगळा वेळ घरीच बसावं माझ्या छकुलीसोबत.

तेवढ्यात अंकिता पुन्हा आत आली आणि म्हणाली, “मम्मी सुमेधची आई ना चकल्या करतेय दिवाळीसाठी. तू कधी करणार आपल्या घरी.” शर्वरी काहीच बोलली नाही. “सांग ना मम्मी आपल्याकडे कधी करणार?” अंकिताने पुन्हा विचारलं. “आणूया हां…. आपण पण आणू पुढच्या आठवड्यात.” शर्वरी म्हणाली. “आणायचा का? तू का नाही करणार घरी?” अंकिताने विचारलं. “बाकीच्या सगळ्यांच्या घरी त्यांची मम्मीच करते, तू का नाही बनवत?” शर्वरी निःशब्द झाली, काय बोलावं तिला कळेना. या एवढ्याशा जीवाला काय आणि कसं समजावून सांगणार माझे प्रॉब्लेम्स. तरीपण तिने शांतपणे म्हटलं, “बाळा, त्यांची मम्मी घरीच असते, मी ऑफिसला जाते की नाही. म्हणून मला वेळ नसतो.” “हं..” अंकिताने मान हलवली. “म्हणजे तू कधीच घरी नाही बनवणार मम्मा?” तिच्या निरागस प्रश्नाने शर्वरी अजूनच भांबावून गेली. “बनवूया हां.. पुढच्या वर्षी बनवूया घरी.” असं ती म्हणाली. तेवढ्यात शेजारच्या पवार वैनी डोकावल्या, “येऊ का? की कामात आहेस?” “अहो या ना वैनी, विचारायचं काय त्यात? या बसा.” शर्वरी म्हणाली. त्यांना बघून अंकिता पुन्हा बाहेर पळाली.

“काय गं फराळ काय करणार ते सांगत होतीस का लेकीला?” वैनींनी विचारलं.

“नाही हो, मला कुठे वेळ आहे?” शर्वरी म्हणाली. “आमच्या ओळखीतले एक आहेत परांजपे म्हणून, त्यांच्याकडूनच आणतो आम्ही दरवेळी.”

“हं…. पण विकतचं म्हणजे महागच असेल नाही? तरी बरं तुम्ही दोघे कमावता म्हणून परवडतं तुम्हाला.”

“नाही हो वैनी, अगदी खिशाला परवडणारे भाव आहेत त्यांचे.” बोलता बोलता शर्वरीचं काम सुरूच होतं. “हवं तर तुम्हीपण मागवता का एखादा पदार्थ या वेळी? बघा एकदा टेस्ट करून.”

“नको गं बाई.” वैनी जणू काही झुरळ झटकावं तशा अविर्भावात बोलल्या. “मी आपली घरीच करते सगळं. आमच्या घरात सात पिढ्यात कधी कोणी विकतचा फराळ आणला नाही बाई.”

“अहो वैनी एवढं वाईट तोंड का करताय?” शर्वरी हसत म्हणाली. “विकतचं म्हणजे काही फॅक्ट्रीमधलं नसतं ते. घरगुती असतं, त्या बाई स्वतः बनवतात सगळं घरी. चांगल्या तेलात आणि साजूक तुपात बनवलेले असतात सगळे पदार्थ. फक्त आपण विकत आणतो एवढंच. बाकी ते घरात बनवल्या सारखंच.”

“हं…” मान हलवत वैनी म्हणाल्या.”पण तरीही आपल्या घरात बनलेलं ते वेगळंच पडतं ना. आपलेपणाची एक वेगळी चव उतरते त्यात. आपल्या घरातल्या माणसांना कसं, आपण आपल्या हाताने गोडधोड करून घालण्यात मजा आहे.”

“हो पण सगळ्यांनाच ते शक्य नसतं ना वैनी.” शर्वरी म्हणाली. “माझ्यासारख्या नोकरी करणाऱ्या बायकांचं रोजचं काम उरकतानाच नाकी नऊ येतात. त्यात अजून फराळाचा घाट कुठे घालणार?”

“करायचं म्हटलं ना की सगळं जमतं बघ.” वैनी जराशा खोचक स्वरात म्हणाल्या. “फक्त मनापासून करायची इच्छा हवी.”

यावर शर्वरी काही बोलणार एवढ्यात बाहेरून मुलांचा काहीतरी गलका ऐकू आला. बहुतेक भांडणं झाली होती त्यांच्यात. आणि पाठोपाठ अंकिताचा आवाज, “ए साल्या, नाटकं करू नको हा, हलकट.” हे ऐकून शर्वरी थबकली. तिने आतूनच मोठ्याने ओरडून सांगितलं, “अंकिता, काय बोलतेयस तू? असं बोलतात का? सॉरी म्हण त्याला लगेच, आणि पुन्हा अशा शिव्या द्यायच्या नाहीत.”

गोंधळ जरासा कमी झाल्यासारखा वाटला. “आजकालची मुलं पण ना.” वैनी बोलायला लागल्या, “फारच आगाऊ झाली आहेत, आपल्या एक पाऊल पुढेच आहेत. आणि त्यातूनही वाईट गोष्टी लगेच शिकतात बघ. म्हणून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं हा.”

“हो ना. खरं आहे.” शर्वरी म्हणाली. “पण अंकिता असं कधी बोलत नाही, आजच पहिल्यांदा ऐकलंय मी.”

“तुला काय माहित गं, तू असतेस कुठे दिवसभर घरी तिला बघायला.” वैनी म्हणाल्या. “तुझा तरी काय दोष म्हणा, तुझी नोकरीच अशी आहे की…”

“मी नसले तरी माझं लक्ष असतं वैनी.” शर्वरीचा आवाज जरा चढला होता, “आणि जोशीकाकूंच्या पाळणाघरातली सगळी मुलं खूप चांगली आहेत शिवाय काकूंचंही बारीक लक्ष असतं सगळ्या मुलांवर.”

“ते सगळं ठीक आहे गं, पण तरी आपण घरात राहून जे संस्कार करतो ना मुलांवर ते वेगळं पडतं गं.” वैनी हे बोलतात न बोलतात तोच पुन्हा अंकिताचा आवाज आला, “गप्प बस तू साला xxxx.”

शर्वरीच्या डोक्यात तिडीक गेली. ती तरातरा बाहेर आली आणि तिने धपकन अंकिताच्या पाठीत एक धपाटा घातला. सगळी मुलं भेदरून शर्वरीकडे बघायला लागली. “एकदा सांगितलं ना तुला शिव्या नाही द्यायच्या म्हणून, कळत नाही? कुठून शिकलीस हे सगळं? सॉरी म्हण त्याला आधी.” शर्वरी रागाने थरथरत होती. अंकिता मुसमुसून रडायला लागली. तेवढ्यात आतून आशिष बाहेर आला. “काय झालं?” त्याने विचारलं. “काही नाही, कुठून कुठून काय काय शिकून येते नुसती, शिव्या द्यायला लागली आहे आता.” शर्वरी अजूनही ओरडतच होती. “आणि बस्स झाला आता खेळ, अभ्यास वगैरे काही आहे की नाही?” तिचा रुद्रावतार बघून बाकीची मुलं गपचूप आपल्या घरी पळाली. पवार वैनी सुद्धा हळूच तिथून सटकल्या. रडणाऱ्या अंकिताला आशिषने जवळ घेतलं. त्याने जवळ घेतल्यावर अंकिता अजूनच मोठ्याने रडायला लागली. “गप्प बस, काही नाटकं करू नकोस रडायची. पुन्हा असं काही बोलशील तर अजून बदडून काढेन लक्षात ठेव”. शर्वरी ओरडून म्हणाली. “तू जा आत मी बघतो.” आशिष म्हणाला आणि तो अंकिताला थोपटायला लागला.

शर्वरी आत आली मात्र आता तिच्या रागाचं रूपांतर अश्रूत झालं. आपला सगळा राग, सगळं फ्रस्ट्रेशन आपण त्या कोवळ्या जीवावर काढलं याचा तिला पश्चाताप झाला. मघाशी आशिषला आपण बोललो पण आता आपणही तेच केलं. थोडा वेळ ती रडून मोकळी झाली, मग तिने स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामाला लागली. इकडे आशिष आणि अंकिताचा संवाद चालला होता. “मम्मी वाईट आहे, मी कट्टी तिच्याशी आता. मी नाही बोलणार.” अंकिता रडत रडत बोलत होती. “असं नाही बोलायचं बाळा,” आशिष तिला समजावत होता. “मम्मी तुझ्या चांगल्यासाठी ओरडते ना, तू शिव्या का दिल्यास मग? तू अशा शिव्या दिल्या तर मग लोक म्हणणार अंकिता बॅड गर्ल आहे. तुला चालेल का मग?” तिने नकारार्थी मन हलवली. “मग म्हणूनच मम्मी रागावते, अंकूला सगळ्यांनी गुड गर्ल म्हणावं असं तिला वाटतं म्हणून ती ओरडते ना.” अंकिताने मान हलवली.

शर्वरीने ताटं वाढायला घेतली तेवढ्यात अंकिता आत आली. “सॉरी मम्मी, मी पुन्हा नाही असं बोलणार.” असं म्हणून खाली मान घालून उभी राहिली. “शहाणं माझं बाळ ते” असं म्हणून शर्वरीने तिला मिठीत घेतलं. तिला एका हाताने थोपटत, दुसऱ्या हाताने स्वतःचे डोळे पुसत तिने आशिषकडे पाहिलं. त्याने फक्त हसून डोळ्यांनी तिला शांत राहायची खूण केली. “चला आता खूप खूप जेवणार ना?” तिने अंकिताला विचारलं. “हो जेवणार. आणि मग नंतर आपण खेळायचंय ना?” “हो हो नक्की खेळूया हा.” शर्वरी म्हणाली आणि सगळे जेवायला बसले.

जेवल्यावर सगळं अटपताना शर्वरीने आशिषला आत बोलवलं. “आजच्या मिटिंगचं काय झालं?” तिने विचारलं.

“मिटिंग तर चांगली झाली.” आशिष म्हणाला. “काही दिवसात सांगतो म्हणालाय.”

“म्हणजे डील फायनल नाहीच झालं?”

“हं….. म्हणजे तसं कागदावर नाही झालं. पण होईलच लवकर.”

“लवकर म्हणजे नक्की कधी?” शर्वरीने विचारलं. “का हा सुद्धा त्या मागे आलेल्या क्लायंट सारखाच नुसत्याच कोरड्या गप्पा मारून जाणार?”

“हे बघ लगेच टोमणे मारून बोलायची गरज नाहीये.” आशिष वैतागून म्हणाला. “मी कोणाला फोर्स नाही करू शकत की आमच्याशीच डील करा म्हणून. आपण आपल्या परीने फक्त प्रयत्न करू शकतो पण शेवटी निर्णय तर त्यांचाच असणार ना.”

“अरे पण या सगळ्यातून इन्कम काहीच मिळत नाहीये ना.” शर्वरी वैतागून म्हणाली. “प्रत्येक वेळी तू हेच सांगतोस की मिटिंग चांगली झाली, मग पुढे त्याचं काहीच का होत नाही? कोणीच फायनल डील का करत नाहीत. आणि केली तरी अर्धेच पैसे देतात मग मधेच सोडून जातात असं का करतात? नक्की काय प्रॉब्लेम आहे?”

“प्रॉब्लेम काहीच नाहीये गं.” आशिष म्हणाला. “पण बिझनेस म्हटला की चढ उतार होणारच ना. अगदी स्मूथ होण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागणार ना?”

“अरे पण तुझ्या बिझनेस मध्ये उतारच जास्त चाललाय असं नाही वाटत का तुला?” शर्वरी म्हणाली. “आणि थोडा वेळ म्हणता म्हणता ४ वर्षं गेली. तुझं कधीच फिक्स असं इन्कम येत नाही, कधी पैसे मिळाले तर मिळाले नाही तर ६-७ महिने काहीच नसतं.”

“मग मी काय करू असं तुझं म्हणणं आहे?” आशिषने चिडून विचारलं. “क्लायंटला जबरदस्ती करू का?”

“नाही मी तसं म्हणत नाहीये. पण तू साईड बाय साईड एखादी छोटी मोठी नोकरी का नाही बघत? तुझे क्वालिफिकेशन चांगले आहेत, काही वर्षांचा अनुभवही आहे तुला, सहज नोकरी मिळून जाईल कुठेही.”

“माझं मन नाही रमत नोकरीत हे मी पुन्हा नव्याने सांगायला हवं का तुला?” आशिष म्हणाला. “म्हणून तर नोकरी सोडून बिझनेस सुरु केला ना स्वतःचा. मला नाही जमत मूर्ख लोकांच्या हाताखाली त्यांच्या ऑर्डर्स ऐकत त्यांची हांजी हांजी करायला. आणि तेव्हा तर तूही सपोर्ट केला होतास ना? मग आता काय झालं?”

“हो केला होता आणि आताही करतेय.” शर्वरी म्हणाली. “पण थोडा प्रॅक्टिकल विचारही नको का करायला? अजूनही हवे तसे रिझल्ट मिळत नाहीयेत तुझ्या बिझनेस मधून. माझ्या एकटीच्या पगारात काय काय भागवू मी? तेव्हाची गोष्ट वेगळी होती, अंकू लहान होती. आता तिच्या शाळेचा आणि बाकी सगळे खर्च वाढलेत आणि इथून पुढेही वाढतच जाणार. कसं जमवणार आहोत आपण? आता दिवाळी येतेय, फराळाचा खर्च आहे शिवाय अंकुलाही नवीन कपडे घ्यावे लागतील. थोडेफार साठवले होते ते सायकल मध्ये संपले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की बिझनेस मध्ये नीट जम बसेपर्यंत नोकरी कर कुठेतरी म्हणजे एक फिक्स इन्कम येईल तुझा. नंतर सोड ना पुन्हा.”

“मी काय म्हणतोय.” आशिष विचार करत म्हणाला, “या वेळी तू फराळ घरीच का नाही करत? तेवढेच थोडे पैसे वाचतील आणि तसंही अंकू म्हणतच होती ना की आपल्या घरी कधी करणार? तिलाही बरं वाटेलं.”

“तू काय बोलतोयस तुला कळतंय ना?” शर्वरी त्याच्याकडे आश्चर्याने आणि अविश्वासाने बघत म्हणाली. “तुला माहितेय माझं दिवसभराचं शेड्युल कसं असतं ते. रोजचं उरकतानाच दिवस पुरत नाही, त्यात अजून फराळाचा घाट कधी घालू? माझ्याकडे ना स्वतःसाठी वेळ आहे ना अंकूसाठी. माझं तिच्याकडे लक्ष नाही, मी नीट संस्कार करत नाही असं वाटायला लागलंय आता सगळ्यांना. आणि तू म्हणतोयस अजून उरला सुरला जो वेळ आहे तो पण मी फराळात घालवू?” बोलता बोलता शर्वरीचा आवाज जड झाला.

“अगं हो हो शांत हो.” आशिष म्हणाला. “मी फक्त थोडे पैसे वाचतील म्हणून म्हणालो, तुला नसेल जमत तर ठीक आहे. आणि कोणाला वाटतंय तू संस्कार करत नाहीस असं? कोण काही बोललं का तुला?”

“मघाशी पवार वैनी आलेल्या ना त्या बोलल्या. त्यांच्यासमोरच अंकूने शिवी दिली ना, त्यांनी लगेच संधी पकडली ऐकवून दाखवायची. म्हणे तू घरातच नसतेस, मग पोरीकडे लक्ष कसं देणार?”

“अच्छा म्हणून तू त्याचा राग अंकुवर काढलास का?” आशिषने विचारलं. “कम ऑन शर्वरी, तुला माहित आहे त्या कशा आहेत ते, त्यांच्या खोचक बोलण्यापासून कधी कोणाची सुटका झालीये का? त्या प्रत्येकातच काही न काही दोष काढत असतात, त्यांचं काय एवढं मनावर घ्यायचं? आपण दुर्लक्ष करायचं, आपल्याला माहित आहे ना आपण काय करतोय ते, मग झालं तर. उगाच तिला मारलंस तू.”

“उगाच नाही, बरोबरच केलं मी.” शर्वरी करड्या स्वरात म्हणाली. “तिची चूक होतीच, शिव्या देणं चूकच आहे. आणि तुला बोलायला काय जातं दुर्लक्ष कर म्हणून, तुला कोणीच काही बोलणार नाहीये. कारण संस्कार करायची सगळी जबाबदारी आईचीच असते ना, मूल बापामुळे वाया गेलं तरी सगळ्याचं खापर मात्र आईच्याच डोक्यावर फुटतं. त्यातून माझ्यासारखी दिवसभर बाहेर असणारी आई असल्यावर काय, बोलायला अजूनच वाव. आज त्या बोलल्या, उद्या अजून सगळं जग बोलेल. माझं मधल्या मध्ये मरण.”

“एक मिनिट, बापामुळे वाया गेली तरी म्हणजे?” आशिषने तिच्याकडे रोखून बघत विचारलं. “तुला काय म्हणायचं आहे अंकू माझ्यामुळे वाया जातेय? मी तिला वाईट सवयी लावतोय?”

“मुद्दामहून शिकवायला नाही लागत काही.” शर्वरी म्हणाली. “आपलं बघून बघूनच शिकतात मुलं. तुला कितीदा सांगितलंय की घरात तिच्यासमोर शिव्या देत जाऊ नकोस, भाषा नीट वापर पण नाही, तुझं तेच चालू असतं. तुझं बघूनच शिकली आहे ती हे असं बोलायला. नाहीतर तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये कोणी असं बोलणार नाहीये मला माहित आहे. पण तुला काय त्याचं, कारण ती चुकीची वागली तरी तुला कोणीच काही बोलणार नाही, सगळे माझ्याच तोंडात शेण घालणार की आईचं लक्ष नाही मुलीवर.”

“हे बघ तू उगाच राईचा पर्वत करतेयस.” आशिष म्हणाला. “रागाच्या भरात जातं कधीतरी माझ्या तोंडून निघून, पण मी प्रयत्न करतोय ना ते टाळण्याचा. आणि प्लीज डोक्यावर खापर वगैरे मोठे मोठे शब्द वापरू नकोस, कोणी तुला कोर्टाच्या पिंजऱ्यात नाही उभं केलंय. मला माहित आहे ना तुझं तिच्यावर किती लक्ष आहे ते आणि आपण तिला काय संस्कार देतोय ते. मग लोकांच्या बोलण्याकडे का लक्ष द्यायचं? पण तू असं तुझं फ्रस्ट्रेशन तिच्यावर काढत जाऊ नकोस, लहान आहे ती, उगाच भलत्या गोष्टी घेऊन बसेल डोक्यात.”

“तू तर असं बोलतोयस जसं काय मी रोजच बडवते तिला.” शर्वरी आता भलतीच चिडली होती. “तुलाही माहित आहे की मला मुलांना मारायला नाही आवडत. पण एखाद्या दिवशी आली पटकन रिऍक्शन आणि कारणही तसंच होतं ना. एकतर ऑफिस करून घरातलं करताना माझी नुसती तारेवरची कसरत होते आणि त्यात घरी आल्यावर या पवार वैनीसारख्या बायकांकडून टोमणे ऐकून घ्या. डोक्याला जरा म्हणून शांती नाही. त्यात नेमकी अंकू तेव्हा तसं बोलली म्हणून भडकले मी. कधीतरी माझ्या जागी राहून विचार कर म्हणजे कळेल तुला.” बोलता बोलता शर्वरीच्या डोळ्यात पाणी जमा झालं.

“अगं हो हो, शांत हो. किती हायपर होतेस.” आशिष तिला थोपटत म्हणाला. “मी फक्त तुला सांगत होतो की रागावर ताबा ठेव. पण जाऊ दे, आपण आता नको बोलूया यावर. तू पण दमली आहेस आणि मी पण. तू आवर सगळं आणि झोपायला ये.” असं म्हणून आशिष निघून गेला.

सगळं काम आटपून शर्वरी मोकळी झाली तेव्हा १२ वाजत आले होते. तिने बेडरूम मध्ये जाऊन पाहिलं तर अंकिता गाढ झोपली होती. शर्वरी तिच्याजवळ जाऊन बसली, काही वेळ तिच्या झोपलेल्या शांत, निरागस चेहऱ्याकडे टक लावून पाहत बसली. मघाच्या गाण्यातल्या ओळी तिला आठवल्या,

‘असा गेलो आहे बाळा पुरा अडकून

हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून

असा कसा बाबा देव लेकराला देतो

लवकर जातो आणि उशिरानं येतो’

आणि हळू हळू शर्वरीच्या डोळ्यातून आसवं वाहायला लागली. ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. ‘आज सुद्धा तुझ्याशी खेळायचं राहूनच गेलं गं. काय करू, कितीही धावपळ केली तरी दिवसाचे २४ चे २५ तास होत नाहीत गं. रोज ठरवते तुझ्यासाठी वेळ काढेन, पण नाही जमत गं. कितीदा वाटतं हे सगळं सोडून द्यावं आणि अख्खा दिवस तुझ्यासोबत घालवावा, भरपूर खेळावं तुझ्याशी. पण तुझ्यासाठीच करतेय गं बाळा सगळं, तुला सगळं मिळावं म्हणून, तुझ्या भविष्यासाठी. मला माहित आहे, उद्या पण तुला माझा राग येईल, मी लवकर घरी नाही आले म्हणून, तुझ्याशी खेळले नाही म्हणून तू कट्टी घेशील माझ्याशी. माझी कसरत तुला कशी सांगू समजावून? कारण जगाला आणि लिहिणाऱ्याला सुद्धा फक्त ‘दमलेल्या बाबाची कहाणी’च माहित आहे. पण कसं सांगू तुला, आई सुद्धा दमते गं बाळा. आई पण खूप दमते.’

रात्रीच्या निरव शांततेत शर्वरी कितीतरी वेळ झोपलेल्या अंकिताच्या डोक्यावरून हात फिरवत बसली होती. सगळे झोपलेले असताना तिला फक्त तिच्या डोळ्यातल्या अश्रुंचीच सोबत होती.

-अनुया

 

Advertisements