हितगुज….पावसाशी

IMG-20180704-WA0017

घननिळा मेघ आज पुन्हा आला बरसाया
पाना फुलासंगे मन पाखराही भिजवाया

भेटीसाठीच तुझ्या रे, मन होते हे आतुर
तरी येण्याने तुझ्या का जिवा लागे हुरहूर?

मऊ आभाळाचं घर मागे ठेवून येतोस
ओळखीचे सूर काही, संगे घेऊन येतोस

ओल्या आठवणींमध्ये, मन घेतं रे हिंदोळे
तुझ्या धारांसंगे नकळत वाहतात डोळे

केले होते ना रे तेव्हाच मी मन माझे कोरे
पुन्हा कशासाठी शोधायचे हळवे कोपरे?

दिस रात रे पावसा, असा नको कोसळूस
जुन्या जखमांच्या तू रे नको खपल्या काढूस

माझ्या मनाचं काहूर नाही कळणार तुला
म्हणताच तोही वाऱ्यासंगे फिरून हसला

मनी माझ्याही दाटती, गतकाळाचे गं ढग
कोसळते धारांतून माझी सारी तगमग

किती काळ कोंडशील त्याच दुःखाची पोकळी
माझ्यापरी बरसून, तूही हो ना गं मोकळी

शेवटचे हुंदक्यांचे, उतू जाऊ देत कढ
चुकलेल्या त्या वाटांची, नको बाळगुस ओढ

भूतकाळाच्या भुतांचे पाश सगळे तुटू दे
आणि कोवळ्या स्वप्नांची नवी पालवी फुटू दे

जुन्या जखमांचे व्रण, चल धुवून टाकूया
हळव्या कोपऱ्यांतही थेंबांची आरास करूया

शोध घेऊन नव्याने पुन्हा भेट तू स्वतःला
क्षण साजरा कराया, साद घाल या सख्याला

बिलगून घे मला तू, दुःख नाही ना उरलं?
दोघे मिळून भिजुया, बघ आता हे ठरलं

सख्या पावसाशी नातं, माझं नव्याने सजलं
सरींमध्ये आता खरं, मन चिंब हे भिजलं

                                        -अनुया

Advertisements

हक्काचं गृहीतक

आपल्या आयुष्यात काही माणसं असतात,जी खूप जवळची असतात. आपल्याला अंतर्बाह्य ओळखतात, सगळ्या अडीअडचणीत आपल्या सोबत असतात, आपल्याला समजून घेतात. ज्यांना आपण आपली हक्काची माणसं म्हणतो. त्यात आपलं कुटुंब, कधी जवळचे नातेवाईक, काही जवळचे मित्र असतात. पण त्यांच्यावर हक्क गाजवताना आपण बऱ्याचदा त्यांना गृहीत धरतो आणि नकळत कधीतरी त्यांना दुखावतो का?

आपल्याकडे असाही एक समज असतो की जवळच्या हक्काच्या माणसाशी बोलताना, वागताना फॉरमॅलिटीज, मॅनर्स वगैरे पाळायची गरज नसते. त्यांच्याशी कसंही वागू शकतो. पण त्यालाही काही मर्यादा असतात. सगळ्यात जास्त हक्काचं म्हणजे आपलं कुटुंब आणि त्यातली माणसं असतात. बाहेरच्या जगातलं सगळं फ्रस्ट्रेशन, सगळा राग आपण घरी जाऊन त्यांच्यावर काढतो, ते आपले हक्काचे म्हणून. पण आपण घरी जातो तेव्हा त्यांच्याही काही अपेक्षा असतील आपल्याकडून याचा कधी कधी विचार करायचा राहून जातो.

कधी कामावरून दमून घरी गेल्यावर वेळेवर जेवण तयार नसेल म्हणून आईवर खूप चिडचिड केल्यावर, काही वेळाने राग शांत झाल्यावर, तिच्या हालचालीतला मंदपणा जाणवल्यावर आपण विचारतो की काय झालंय? आणि ती सांगते की थोडी कणकण वाटतेय. आणि जवळ जाऊन हात लावल्यावर कळतं की चांगलाच ताप आहे. आई म्हणजे आपल्यासाठी हक्काने राबणारी आणि तिच्यावर राग काढायचाही आपल्याला हक्कच आहे हे आपण गृहीत धरलेलं असतं. पण हे खरं कारण कळल्यावर कळतं, आपलं गृहीतक चुकलं.

कधी खूप वेळ बाहेर असल्यावर घरून बाबांचे सतत कॉल येत असतात आणि आपण गृहीत धरतो की आपल्याला उशीर का झालाय, कधी घरी येणार हे विचारण्यासाठीच ते कॉल करत असणार. काही कॉल टाळल्यावर नाईलाजाने आपण उचलतो आणि त्यांच्यावर वैतागतो. पण त्यांना खरं तर आपल्याला हे सांगायचं असतं की घरी येताना त्यांची औषधं घेऊन ये. पुन्हा एकदा गृहीतक चुकतं.

मैत्रीवरचे जे फॉरवर्ड मेसेज येतात त्यात फार पूर्वी वाचलेला एक मेसेज आठवतोय, त्यात एक जण दुसऱ्याला विचारतो की, ‘तुला एकाच वेळी जर तुझं प्रेम आणि तुझा मित्र या दोघांनीही त्यांच्यासोबत बाहेर येण्याचा आग्रह केला तर तू कोणाचं ऐकशील? तेव्हा तो म्हणाला की मी माझ्या प्रेमासोबत जाईन कारण माझा मित्र मला समजून घेईल याची मला खात्री आहे’. आणि मग मैत्री इतकी सुंदर असते, मित्र किती हक्काचे असतात वगैरे वगैरे पुढे लिहिलं होतं.

त्या मेसेजप्रमाणे जर कधी अशी वेळ आलीच तर मित्र समजून घेईलही, पण कधीतरी असंही असू शकतं की त्या वेळी मित्राला तुमची जास्त गरज असेल. ‘तू सांभाळून घे ना यार’ असं आपण हक्काने ज्या मित्राला सांगतो, कधीतरी त्यालाच कोणीतरी सांभाळायची गरज असते. तो आपला जरासा वेळ मागत असतो, जीव तोडून सांगत असतो की आजचा दिवस मला दे, आज आता मला तुझी गरज आहे. पण आपण नेहमीप्रमाणे कुटुंबाला प्राधान्य देण्यात गुंतलेले असतो. नंतर कधीतरी कळतं की तेव्हाची त्याची स्थिती खरंच खूप वाईट होती पण आपण त्याला वेळ देऊ शकलो नाही. इथेही गृहीतक चुकलेलं असतं.

या अशा प्रसंगात नक्की काय करायचं मला कळत नाही. मनातून अपराधी तर खूप वाटत असतं, पण ती वेळ निघून गेलेली असते, तोंडून शब्दही निघून गेले असतात. त्या दोन्ही गोष्टी परत आणता येत नाहीत. आणि नंतर माफी मागून काही उपयोगही नसतो. एका बाजूला ती व्यक्ती असते जी हक्काने काहीतरी मागत असते आणि दुसरी व्यक्ती त्याच हक्काने हे गृहीत धरते की मी ते नाही दिलं तरी समोरची व्यक्ती समजून घेईल. नक्की कोणाचं चुकतं यात?

फार वर्षांपूर्वी एकदा असंच आम्ही काही जवळच्या मित्रांनी बाहेर भेटायचा प्लॅन केला होता. पण नेमकं आदल्या दिवशी मला अचानक कॉल करून कळवलं की मला एके ठिकाणी इंटरव्यू साठी यायचं आहे. तेव्हा जस्ट कॉलेजमधून पासआउट झालो होतो त्यामुळे नोकरीच्याच शोधात होते सगळे. अशा वेळी अशी संधी नाकारणं शक्यच नव्हतं. आणि मी विचार केला की भेटायचं तर संध्याकाळी आहे तोपर्यंत आटपेल सगळं. पण त्या दिवशी नेमका खूप पाऊस होता, सगळीकडे ट्रॅफिक, त्यामुळे मला तिकडे जातानाच खूप दगदग झाली. तिथे पोचल्यावरही सगळे राउंड्स होईपर्यंत खूप वेळ गेला. सोबत खायला काही नेलं नव्हतं, त्यांनी तिकडे थोडेफार जे स्नॅक्स खायला दिले तेवढेच. एवढं होऊनही शेवटी माझं सिलेक्शन नाहीच झालं. उशिरा संध्याकाळी जेव्हा मी तिथून निघाले तेव्हा सकाळपासूनची धावपळ, दगदग, अर्धवट भरलेलं पोट, दिवसभराचा मानसिक आणि शारीरिक ताण आणि शेवटी रिजेक्शन मुळे आलेली निराशा या सगळ्यामुळे मी पार थकून गेले होते. कुठेही जायची इच्छा आणि शक्ती दोन्ही नव्हती. म्हणून मी त्यांना कळवलं की मी आता येत नाही, मी सरळ घरी जातेय. पण तरीही ते आग्रह करतच राहिले आणि तरीही मी नाही गेले म्हणून नंतर किती दिवस रागावले होते. माझी मैत्रीण मला मला म्हणाली, की “आम्ही खूप वेळ वाट पाहिली तुझी, तुला भेटायचं होतं, यायचं होतंस ना थोडासा वेळ तरी. तू तेवढी जवळची आहेस म्हणूनच तुला हक्काने सांगितलं की दमली असशील तरीही ये.” मी म्हटलं की “मीही त्याच हक्काने सांगितलं की मी नाही येऊ शकत. कारण तुम्हीही मला तेवढेच जवळचे आहात म्हणून जेव्हा मी एवढं सांगतेय की मी नाही येऊ शकत तेव्हा तुम्ही समजून घ्याल की नक्कीच तसंच काहीतरी कारण असणार नाहीतर ही आली असती. तुम्ही हक्काचे आहात म्हणून मी हे गृहीत धरलं होतं की मी न सांगताही तुम्ही मला समजून घ्याल.” नक्की कोणाचं गृहीतक चुकलं इथे? मला नाही माहीत. पण नकळत हक्काच्या माणसांची मनं दुखावली जातात आणि ती वेळ निघून गेल्यावर काहीच करता येत नाही.

मागे एकदा मला माझ्या एका मित्राकडून एक वस्तू हवी होती, म्हणजे ती वस्तू त्याच्या ऑफिसजवळच्या एका दुकानात मिळायची म्हणून मी त्याला सांगून तशी ऑर्डर द्यायला लावली. ते सगळं वेळेत पूर्णही झालं आणि त्याच्या हातात आलंही. आता फक्त त्याला ते मला भेटून द्यायचं होतं. पण त्याला भेटायला वेळ मिळत नव्हता, आज उद्या करत करत बरेच दिवस गेले. मलाही ती वस्तू वेळेत हवी होती कारण मला ती कुठेतरी पाठवायची होती. त्याच्या वेळ नाही, बिझी आहे या उत्तरांना मी कंटाळले होते. म्हणून एक दिवस मी त्याला खूप सुनावलं, ‘तुझं नेहमीचं झालंय हे, कधीच कसा वेळ नसतो. तुला माहित आहे ना हे माझ्यासाठी किती महत्वाचं होतं, म्हणून तर मी खूप आधीच ऑर्डर देऊन ठेवली होती नंतर घाई नको म्हणून. पण आता तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन विस्कटणार. तुला जमणार नसेल तर आधीच सांगायचं होतं, मी दुसरा ऑप्शन बघितला असता.’ आणि अजून बरंच काय काय बोलले त्याला. त्याच्या काही महिने आधीच त्याचा वाढदिवस झाला होता आणि त्या दिवशीही तो असंच वेळ नाही सांगून भेटला नव्हता, तो रागही होताच. सगळा राग काढला त्याच्यावर.

शेवटी एक दिवस वेळ काढून तो भेटला. ती वस्तू मला दिली. थोडा गप्प गप्प आणि शांत वाटत होता, किंचित थकल्यासारखाही. मी म्हटलं “काय झालं? मी बोलले म्हणून रागावला आहेस की काय?” तर म्हणाला, “नाही मी कुठे, तूच रागावलीस.” मी म्हटलं, “हो मग रागावणारच. गर्लफ्रेंड भेटल्यापासून तुला आमच्यासाठी वेळच नसतो अजिबात, बर्थडेलाही आला नाहीस भेटायला. राग तर येणारच ना, आणि तू तेवढा जवळचा आहेस, हक्काचा म्हणून रागावले. का आता रागवायचा हक्कही फक्त गर्लफ्रेंडलाच आहे का? आम्हाला नाही?” तरी तो शांतच होता. मी समोरचं खायला सुरुवातही केली आणि त्यालाही सांगितलं घ्यायला तेव्हा तो म्हणाला, “गेल्या आठवड्यात माझे आजोबा गेले.” माझा घास घशातच अडकला. कधी कसे वगैरे प्रश्न त्याला माझ्या चेहऱ्यावरच दिसले असावेत म्हणून त्याने स्वतःहूनच पुढे सांगितलं, “आजारी होते महिनाभर, हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते. त्याच सगळ्या धावपळीत होतो. आणि गेल्या काही दिवसात मग त्यांचं दिवसकार्य वगैरे चालू होतं. त्यात बिझी होतो.” मी निःशब्द होते, काय बोलावं कळत नव्हतं. “पण तू फोनवर….” मी जेमतेम एवढंच बोलू शकले. “मी सांगितलं ना मी खूप महत्वाच्या कामात बिझी आहे.” एवढंच बोलला तो आणि पुढचं काही बोलायची गरजही नव्हती. कदाचित त्यालाही हेच म्हणायचं असेल, की तू जवळची, हक्काची आहेस म्हणून महत्वाचं काम एवढं सांगितल्यावर तू समजून घेशील असं मी गृहीत धरलं.
हक्काच्या माणसाबद्दलचं गृहीतक इतकं जास्त चुकू शकतं???

त्यांनतर मी त्याला काय बोलले ते मला आठवत नाही आणि ते फार महत्त्वाचंही नाही. कारण अशा वेळी सॉरी वगैरे सारख्या शब्दांचे बुडबुडे फारच पोकळ वाटतात.

त्याने ती गोष्ट अजून लक्षात ठेवली की विसरला माहित नाही पण मला मात्र अजूनही ते आठवलं की अस्वस्थ वाटतं, अपराधी वाटतं.

-अनुया