मोठा माणूस

सूचना: या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग काल्पनिक आहेत. त्याचा वास्तविक जीवनाशी कोणताही संबंध नाही. संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा 🙂 😛

कॉलेजमधले ते दोघे, एकाच वर्षांत, एकाच वर्गात शिकणारे. अनिकेत आणि स्वराली. एकाच ग्रुपमधले, पण तरीही इतरांपेक्षा एकमेकांसोबत जास्त असणारे. खूप जवळचे मित्र, एकत्र अभ्यास करायचे, एकत्र डबा खायचे. लेक्चर बंक करायचं झाल्यास सुद्धा एकत्रच करायचे. खूप गप्पा मारायचे, सगळं शेअर करायचे. तो कविता करायचा, खूप सुंदर सुंदर. तिला ऐकवायचा. ती ऐकतच बसायची. सगळं भान हरपून, त्याच्या कवितांमध्ये हरवून जायची. तो कविता वाचायला लागला की त्याच्याकडे बघत बसायची, टक लावून. त्याचं वाचून झालं की तो मान वर करून तिच्याकडे बघायचा. 
“काय बघतेयस ग?” तो विचारायचा. 
“काही नाही” ती हसून म्हणायची. “तुझी कविता ऐकतेय. किती छान लिहितोस तू. एकदम मनाला स्पर्श करून जातात. एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात.”
तो मोठ्याने हसायचा. मग ती त्याच्या कवितेला चाल लावायची आणि गाऊन दाखवायची. मुळातच सुंदर असलेल्या कवितेचं त्याहून सुंदर अशा सुरेल गाण्यात रूपांतर व्हायचं. ती गायला लागली की तोही सगळं भान हरपून तिच्याकडे बघत बसायचा. तिच्यासोबत सगळा निसर्ग,सगळा आसमंत गातोय असं त्याला वाटायचं. ऐकता ऐकता नकळत त्याचे डोळे बंद व्हायचे आणि मंत्रमुग्ध, तल्लीन होऊन तो तिचं गाणं ऐकत बसायचा. तिचं गाऊन झाल्यावर ती त्याला हळूच हलवून जागं करायची. 
“कुठे हरवलास?” ती हसून विचारायची. 
“तुझ्या आवाजाच्या दुनियेत.” तो म्हणायचा. “किती गोड आवाज आहे तुझा. नावाप्रमाणेच आहेस तू. स्वराली. सगळ्या स्वरांची कृपा आहे तुझ्यावर. साक्षात कोकिळेचं वरदान आहे.” 
“चल काहीतरीच असतं तुझं.” ती लाजून म्हणायची. “तुझी कविताच इतकी सुंदर आहे, ती कोणीही गायली तरी ऐकायला चांगलीच वाटेल.” 
तो म्हणायचा, “माझी कविता म्हणजे फक्त शरीर आहे. त्यात संगीत आणि सुरांचा आत्मा तू भरतेस. निर्जीव शरीरात प्राण फुंकावे तसं माझ्या कवितेचं गाणं बनवतेस तू.” 
ती काहीच बोलत नाही नुसतीच हसते. 
“तू खूप छान लिहितोस.” ती म्हणते. “असाच लिहीत राहा. तू एक दिवस खूप मोठा कवी होशील. खूप मोठा माणूस होणार आहेस तू, मला खात्री आहे.” 
तोही हसून म्हणतो, “आणि तू सुद्धा अशीच गात राहा. तू पण खूप मोठी गायिका होणार आहेस. खूप मोठी होशील तू मलाही खात्री आहे.” 

त्यांच्याच ग्रुप मधला श्रेयस, हे सगळं रोज बघायचा. त्याला स्वराली मनापासून आवडायची. तिच्या अजून जवळ जाता यावं, तिच्याशी मैत्री वाढवावी म्हणून तो प्रयत्न करायचा. पण ती सतत अनिकेत सोबतच असायची. त्यात अनिकेत अभ्यासात हुशार. त्यामुळे अभ्यासातल्या शंका विचारायला, नोट्स घ्यायला सगळे त्याच्याकडेच जायचे. स्वरालीही त्याला अपवाद कशी असेल? त्यामानाने श्रेयस अभ्यासात जेमतेमच होता. अभ्यासाच्या आणि कवितेच्याही निमित्ताने अनिकेत आणि स्वराली एकमेकांच्या जवळ येत होते. नकळत कधी दोघे एकमेकात गुंतत गेले दोघांना कळलेच नाही. आणि एक दिवस स्वरालीने श्रेयसला येऊन सांगितलं, की अनिकेतने तिला प्रपोज केलं आणि तिने हो म्हटलं. “अरे वा.. छान. Congrats.” तो हसून म्हणाला. “थँक्स.” ती आनंदाने म्हणाली. “तुला माहित आहे, मी सगळ्यात आधी हे तुलाच सांगतेय. कारण तू माझा खूप चांगला आणि जवळचा मित्र आहेस.” श्रेयसने मनातलं दुःख चेहऱ्यावर अजिबात न दाखवता म्हटलं. “मी खरंच खूप खूष आहे तुम्हा दोघांसाठी. तुम्ही दोघेच परफेक्ट आहात एकमेकांसाठी.” “थँक्यू…” ती हसून म्हणाली. “तुला माहित आहे, त्याने मला प्रपोज पण कविता म्हणून केलं. आणि म्हणाला आपण दोघेही खूप सुंदर आयुष्य जगू. मी लिहेन आणि तू गा. किती छान ना. मला माहित आहे तो खूप मोठा होणार आहे.” ती आनंदाने जवळजवळ नाचत होती. 

‘तू त्याच्यासोबतच सुखात राहशील स्वरली.’ श्रेयस मनात म्हणाला. ‘कारण मी त्याच्याइतका अभ्यासात हुशारही नाही आणि त्याच्यासारख्या मला कविताही येत नाही. मी त्याच्याइतका मोठा माणूस कधीच बनू नाही शकणार.’ 

—————————————————————————————————————————————–

रुपाली त्यांच्या ग्रुपमध्ये नवीनच आली होती. खरं तर ती कॉलेजमध्येच नवीन होती, याच वर्षी ऍडमिशन घेतलं होतं तिने. सगळ्यांप्रमाणेच तीही नोट्स घेण्यासाठी आणि शंका विचारण्यासाठी अनिकेत कडेच यायची. सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं, नेहमीप्रमाणेच. पण नंतर नंतर त्या दोघांचं एकमेकांशी वागणं नॉर्मल नाही हे स्वरालीला जाणवायला लागलं. इतरांपेक्षा ती जरा जास्तच वेळ त्याच्यासोबत अभ्यास करायची. तोही हल्ली स्वरालीपेक्षा जास्त वेळ तिच्यासोबत घालवायला लागला होता. स्वरालीला हे खटकायचं. तिने त्याला कितीतरी वेळा हे सांगितलंही होतं पण त्याचा काही परिणाम झाला नाही. तो म्हणायचा की आमच्यात फक्त चांगली मैत्री आहे, बाकी काही नाही. पण स्वरालीला कळत होतं की तो रुपालीच्या जास्त जास्त जवळ येत चालला होता आणि स्वरालीपासून तितकाच दूर. 
स्वरालीला याचा खूप त्रास होत होता. आपलं सगळं दुःख ती श्रेयसजवळ हलकं करायची. मन मोकळं करून बोलायची त्याच्याशी. अनिकेतचं हे वागणं त्यालाही आवडत नव्हतं, स्वरालीला होणारा त्रास बघून त्यालाही त्रास होत होता. पण तो काहीच करू शकत नव्हता. त्यानेही अनिकेतला समजवायचा प्रयत्न केला पण अनिकेत आता काहीही ऐकण्याच्या पलीकडे गेला होता. आणि त्यातच एक दिवस त्याने स्वरालीला सांगितलं की तो MBA करण्यासाठी बॅंगलोरला चालला आहे. तिला धक्काच बसला. 
“अरे पण तू तर literature मध्ये मास्टर्स करायचं ठरवलं होतंस ना.” ती म्हणाली. “आपलं तसं बोलणं झालं होतं. तुला व.पु., दळवी, विंदा आणि अजून खूप मोठ्या मोठ्या लेखकांचं साहित्य वाचायचं होतं. हे MBA कुठे आलं मध्येच?”
“हो तसं सुरुवातीला वाटलं होतं पण त्यात मी काय करिअर करणार ना?” तो म्हणाला. “म्हणजे त्यात पुढे जास्त काही स्कोप नाही. आणि आपल्या भविष्यासाठी भरपूर पैसे हवे की नको आपल्याला.” 
“अरे पण पैसे यातूनही मिळतील की.” ती म्हणाली. “तुझ्यात मुळातच एक लेखक, एक कवी आहे. त्याला फक्त थोड्या मार्गदर्शनाची गरज आहे. तू नक्की मोठा लेखक होशील.” 
“ते बघू गं नंतर.” तो तिचं बोलणं उडवून लावत म्हणाला. “आधी मला असं वाटायचं पण रुपालीने माझ्या हे लक्षात आणून दिलं की माझी एवढी तल्लख बुद्दी मी साहित्यात वाया घालवू नये. त्यापेक्षा MBA in finance or marketting केलं तर मोठं पॅकेज मिळेल नोकरीत. आपलं भविष्य किती सुखात आणि आनंदात जाईल विचार कर.” तो तिला म्हणाला. ती काय समजायचं ते समजून गेली. “आणि साहित्य काय मी कधीही वाचू शकतो. MBA करता करता साईड बाय साईड वाचत आणि लिहीत राहीनच की.” तो हसून म्हणाला. “पण आता मला खूप मोठं व्हायचंय, मोठी स्वप्नं बघायची आहेत आणि ती पूर्ण करायची आहेत.” हे बोलताना त्याचे डोळे मोठे झाले होते. स्वरालीने हसून त्याला ऑल द बेस्ट केलं

—————————————————————————————————————————————–

तो बँगलोरला गेल्यावर त्यांचं बोलणं अजूनच कमी झालं. किती किती दिवस फोन यायचाच नाही त्याचा. तिने फोन केल्यावरही तो बरेचदा बिझी असायचा. आज काय परीक्षा, उद्या काय असाइनमेंट, पर्वा काय प्रेझेंटेशन असं त्याचं काही ना काही चालू असायचं. स्वराली एकटी पडत चालली होती. खचत चालली होती.  पण श्रेयसने तिला सावरलं. तो तिला हसवण्यासाठी प्रयत्न करायचा, तिला गाणं गायला लावायचा. त्याच्यासोबत असली की ती तिचं दुःख तेवढ्यापुरतं विसरायची. पण पुन्हा एकटी असल्यावर अनिकेतच्या आठवणीने व्याकुळ व्हायची. 

एक दोन वेळा त्यांचं बोलणं झालं तेव्हा स्वरालीने त्याला सांगितलं एखादी नवीन कविता ऐकव ना. तो म्हणाला, “अगं वेळच मिळत नाही कविता करायला. इतकं बिझी शेड्युल झालंय.” त्यानंतर पण जेव्हा जेव्हा तिने कवितेचा विषय काढला, हेच उत्तर मिळालं. जशी त्याची कविता बंद झाली तसे तिचे सूरही बेसूर होऊ लागले. आता गाणं म्हणावंसं वाटत नव्हतं. “का असं वागतोय तो?” ती कळवळून श्रेयसला म्हणाली. तिचं सांत्वन करत श्रेयस म्हणाला, “अगं मुद्दाम नसेल करत, त्याला खरंच वेळ मिळत नसेल. तुझ्याशी बोलायला, कविता करायला. परत आला की सगळं पुन्हा पाहिल्यासारखं होईल बघ. आणि तो खूप मोठा माणूस बनून येईल बघ.” त्याच्या शब्दांनी तिला जरा हुरूप यायचा. मग ती पुन्हा सूर लावायची. 

—————————————————————————————————————————————–

२ वर्ष संपत आली होती. स्वराली त्याची आतुरतेने वाट बघत होती. पण एक दिवस त्याचा फोन आला. “स्वराली तुला एक सांगयचंय.” त्याचा आवाज खूपच अनोळखी वाटत होता. “मी परत येत नाहीये. मला नोकरी मिळाली आणि त्यासाठी मला अमेरिकेला जावं लागतंय.” हे ऐकून तिला धक्काच बसला. “अरे पण… हे सगळं कधी झालं? तू काहीच बोलला नाहीस. मी कधीपासून तुझी वाट बघतेय.” ती रडवेली होऊन म्हणाली. “हो.. हे सगळं इतकं पटापट घडलं की तुला सांगायला वेळच मिळाला नाही.” तो म्हणाला. “मला २ दिवसांनी निघायचंय. आणि मी येईन ना परत. एक वर्षात मी परत येणार आहे. मग कायमचा तुझ्याजवळ.” असं म्हणून तो हसला. “थोडे दिवस त्रास सहन कर ना, आपल्या भविष्यासाठीच करतोय ना मी हे सगळं.” त्याच्या या शब्दांनी तिला थोडा आधार मिळाला आणि मन घट्ट करून तिने त्याचा निर्णय मान्य केला. 

तो अमेरिकेला गेल्यावर त्यांचं बोलणं अजूनच कमी झालं. तो एका वेगळ्याच जगात होता जणू. मोठं ऑफिस, मोठा पगार, मोठ्या सोयी आणि मोठा देश. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आता तो स्वतः एक मोठा माणूस झाला होता. तरीही तिच्या मनात तोच अनिकेत होता, कॉलेजमधला, कविता करणारा, संवेदनशील, हळवा. ती त्या अनिकेतला शोधायचा सतत प्रयत्न करायची पण तो कुठेतरी हरवला होता. तिला सापडतच नव्हता. तिने कितीतरी वेळा त्याला कवितेबद्दल विचारलं, लिहायला सांगितलं. पण प्रत्येक वेळी एकच उत्तर, “वेळ मिळत नाही.” आणि मग शेवटी शेवटी तर त्याने सांगितलं, “आता लिहायला नाही जमत. सुचतच नाही पाहिल्यासारखं.” त्याच्या या उत्तराने ती पार कोमेजून गेली. तिचं गाण्यातलं लक्षच उडालं. सूर सापडेना. श्रेयस हे सगळं बघत होता, त्याच्या परीने तिला सावरायचा प्रयत्न करत होता पण फारसा काही उपयोग होत नव्हता. 

एक वर्षानंतर अनिकेत परत आला पण रुपालीसोबत. आणि त्याने जाहीर केलं की ते दोघे लग्न करणार आहेत. स्वराली कोसळून पडली. ३ वर्ष तिने मन घट्ट करून, डोळ्यात प्राण आणून, एक एक दिवस वर्षासारखा काढून ज्याची वाट बघितली, तो आता परत आल्यावर तिचा राहिलाच नाही. “तू काय बोलतोयस हे अनिकेत?” तिने रडवेली होऊन विचारलं. “आपण एकत्र घालवलेले ते सगळे क्षण, तुझ्या कविता, त्यांना मी दिलेला सूर. आपली स्वप्नं. आठव सगळं. असा कसा विसरलास तू? तू तर म्हणाला होतास की तू हे सगळं आपल्या भविष्यासाठी करतोयस ना. मग आता हे?” तिला बोलायला शब्द सुचत नव्हते. तो शांतपणे म्हणाला, “तेव्हा मी खूप immature होतो स्वराली. म्हणजे आपण दोघेही होतो. असं कविता आणि गाणी म्हणून आयुष्य निघतं का? आपण प्रॅक्टिकल विचार केलाच नाही कधी. मला रुपालीने जाणीव करून दिली माझ्यात काय पोटेन्शिअल आहे त्याची. माझ्या बुद्धीला साजेसं करिअर निवडायला तिने मदत केली मला. आज तिच्यामुळेच मी एवढा मोठा झालोय. आणि या ३ वर्षात मला हे लक्षात आलं की आम्ही दोघे एकमेकांसाठी किती योग्य आहोत. तिची पण स्वप्नं, ध्येयं माझ्यासारखीच आहेत, मोठी, विशाल. आम्हाला दोघांनाही खूप मोठं व्हायचंय, आकाशाला गवसणी घालायची आहे. तुझ्याबद्दल मला जे वाटायचं ते फक्त वरवरचं होतं. आता मला तसं नाही वाटत. आणि जरी वाटलं असतं तरी तू मला समजून नाही घेऊ शकणार आता. आपले मार्ग पूर्ण वेगळे झालेत आता, खूप अंतर आलंय दोघात. त्यामुळे मला विसरून जा. या सगळ्यातून बाहेर पड. मला वाटतं तूही एखादा चांगला असा कोर्स कर ज्याला पुढे स्कोप असेल. मस्त पगाराची नोकरी मिळवं आणि एखादा चांगला मुलगा बघून लग्न कर.” 

त्याचा एक एक शब्द तिच्या काळजाला घरे पाडत होता. ती पूर्णपणे कोलमडून पडली. श्रेयसच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडली. 

—————————————————————————————————————————————–

“श्रेयस चांगला मुलगा आहे.” स्वरालीची आई तिला सांगत होती. “तुम्ही एवढी वर्ष एकमेकांना ओळखता. एवढे चांगले मित्र आहात. आता त्याला चांगली नोकरीही आहे. कुटुंब चांगलं आहे. अजून काय हवंय?” पण स्वरालीच्या कानात ते शब्द पडत होते की नव्हते काय माहित. “तुझं ऐकलं म्हणून २ वर्ष थांबलो आम्ही. तो परत येईपर्यंत. पण आल्यावर बघितलंस ना काय झालं ते. त्याने त्याचा मार्ग निवडलाय. तू अजून किती दिवस त्याच्या विचारात झुरत बसणार आहेस? तुला स्वतःच्या आयुष्याचा विचार करायला हवा की नको?” आई बोलत होती. 

“आपले आई बाबा काहीही म्हणू दे स्वराली.” श्रेयस म्हणाला. “पण जोपर्यंत तू मनापासून तयार होत नाहीस, तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही. तुझ्यावर मी किंवा कोणीही कसलीच जबरदस्ती करणार नाही. तू तुझा वेळ घे.” मग थोडं थांबून तो म्हणाला. “मी अनिकेत एवढा मोठा माणूस नाही आहे आणि कधी होणारही नाही मला माहित आहे. त्याच्यासारख्या कविताही जमत नाहीत मला. पण एक सांगतो, तुझ्या डोळ्यात पाणी येणार नाही एवढी काळजी घेईन तुझी. आणि तुझा हरवलेला सूर तुला पुन्हा मिळवून द्यायला नक्की प्रयत्न करेन.”  

तिला गेल्या ३ वर्षातलं सगळं आठवलं. प्रत्येक वेळी अनिकेतने सावरलंय आपल्याला. तो नसता तर काय झालं असतं. काही दिवसांनी तिने लग्नाला होकार दिला. थाटामाटात दोघांचं लग्न झालं. 

लग्नानंतर श्रेयसने तिला गाणं गायला भाग पाडलं. तिचा हरवलेला सूर पुन्हा मिळवून दिला. स्वतःला येत नसल्या तरी तिच्या आवडीच्या कवींच्या कवितांची पुस्तकं आणायचा, तिला कविता वाचून दाखवायचा. चांगल्या गायकांच्या कॅसेट आणि सीडीज आणून ऐकवायचा. हळू हळू तिला गाण्यात पुन्हा गोडी निर्माण झाली. तिचा आवाज लागायला लागला. पुन्हा पाहिल्यासारखीच गोड गाऊ लागली. मग त्याच्याच सांगण्यावरून तिने शास्त्रीय गायनाची शिकवणी सुरु केली. छोट्या मोठ्या कार्यक्रमातून गाऊ लागली. आणि सोबतीनेच तिचा आणि श्रेयसचा छोट्याशा घरातला संसारही फुलायला लागला. 

अनिकेत आणि रुपालीचं लग्न झालं. दोघांनी मिळून एक आलिशान फ्लॅट घेतला. मोठी गाडी घेतली. दोघेही आपापल्या कंपनीत मोठ्या पदांवर होते. दोघांचेही पगार भक्कम होते आणि दिवसेंदिवस वाढत होते.  सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या होत्या. कशाचीच उणीव नव्हती. 

—————————————————————————————————————————————–

२ वर्ष गेली. श्रेयस आणि स्वरालीच्या संसारात एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. बाळाचं कौतुक करण्यात ते दोघे आणि त्यांच्या घरचे रंगून गेले. घरात एक वेगळच चैतन्य आलं होतं. श्रेयसलाही त्याच्या मेहनतीमुळे नोकरीत बढती मिळाली होती. पगार बऱ्यापैकी वाढला होता. बाळ थोडं मोठं झाल्यावर स्वरालीने पुन्हा गाण्याचा रियाझ सुरु केला. नंतर हळूहळू ती छोट्या मोठ्या चित्रपटातून गाऊ लागली. लोकांना तिचा आवाज आवडायला लागला होता. तिच्या आवाजाची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. तिचं यश बघून श्रेयसही सुखावत होता. 

एक दिवस एके ठिकाणी अचानक त्याची अनिकेतशी भेट झाली. तो त्याला आग्रह करून हॉटेलमध्ये घेऊन गेला. अनिकेतने स्वतःसाठी बिअर मागवली. “तू काय घेणार?” त्याने श्रेयसला विचारलं. “नाही मी घेत नाही.” त्याने म्हटलं. “काय सांगतोस?” अनिकेतने आश्चर्याने विचारलं. “तू अजून तसाच आहेस हा … कॉलेजमध्ये होतास तसाच.” तो हसून म्हणाला. 
“पण तू मात्र खूपच बदलास नंतर.” श्रेयस म्हणाला. अनिकेत एकदम गप्प झाला. “श्रेयस… तुला अजूनही असं वाटतं की मी स्वरालीला…” अनिकेतचं बोलणं त्याने मधेच तोडलं आणि म्हणाला, “अरे ए… नाही नाही. मी त्याबद्दल काहीच बोलत नाहीये. तू गैरसमज करून घेऊ नकोस.” श्रेयस हसला. “ते सगळं मी मागेच विसरलोय. आणि स्वराली सुद्धा. आमच्या मनात तुझ्याबद्दल तसं काहीच नाही. मी जे म्हणालो ते तुला आता बघून. म्हणजे तुझे कपडे, तुझं राहणीमान सगळंच बदललंय असं म्हणायचं होतं मला.”
“हं.. ते तर बदलतचं रे.” अनिकेत बिअरचा घोट घेत म्हणाला. “सिनिअर मॅनेजर आहे मी आता. माझ्या स्टेटसला शोभेल असं राहावंच लागतं.” असं म्हणून तो हसला. मग अशाच एकमेकांच्या आयुष्याबद्दल गप्पा गोष्टी झाल्या. कॉलेजच्या जुन्या आठवणी निघाल्या. श्रेयस आणि स्वरालीच्या बाळाबद्दल कळल्यावर अनिकेतने त्याचं अभिनंदन केलं.

“काय मग तुमची गुडन्यूज कधी येतेय?” श्रेयसने त्याला छेडत विचारलं. अनिकेतचा चेहरा गंभीर झाला. “माहित नाही कधी.” तो खाली बघून म्हणाला. “का रे काय झालं?” श्रेयसने काळजीने विचारलं. “काही प्रॉब्लेम?” 
“बरेच आहेत रे. एक असेल तर सांगू.” अनिकेत सुस्कारा टाकत म्हणाला. “दोघांचेही प्रॉब्लेम आहेत. डॉक्टर म्हणतात तुमच्या लाइफस्टाइलमुळे आहे. अवेळी खाणं पिणं, अपुरी झोप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस.” अनिकेत बोलत होता. “आता या सगळ्या गोष्टी आमच्या हातात आहेत का सांग. आमचा जॉबचं असा आहे की हे सगळं पाळायला नाही जमत. तरीही We are trying our best. डॉक्टर सांगतायत ती सगळी ट्रीटमेंट पण घेतोच आहे.” 
“काही नाही रे होईल सगळं ठीक.” श्रेयस त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. “काळजी करू नकोस.” अनिकेत हसला. “By the way, स्वरालीने पुढे काही केलं नाही का? म्हणजे हायर स्टडी किंवा एखादा कॉम्प्युटर कोर्स वगैरे?” “नाही.” श्रेयस म्हणाला. 

“का?” अनिकेतने विचारलं, “म्हणजे तशी ती हुशार आहे, तिला फार कठीण गेलं नसतं ते. आणि चांगल्या मोठ्या पॅकेजचा जॉबही मिळाला असता.”

श्रेयस हसला मग म्हणाला, “हो ती हुशार आहेच आणि तिला ते जमलंही असतं माहित आहे मला. पण जे जमतं ते आवडतंच असं नाही ना.”

“म्हणजे?” अनिकेतने आश्चर्याने विचारलं. “अरे म्हणजे तिला मनापासून गायला आवडतं. गाणं हे तिचं पॅशन आहे आणि त्यासाठी तसा आवाजही तिला लाभलाय. मग उगाच जॉब करण्याची सक्ती का करू मी? जी व्यक्ती ताला सुरांत रमते तिला ऑफिसच्या चार भिंतींमध्ये का कोंडायचं? तिला गाणं गाण्यातच आनंद मिळतो. हा… कदाचित जॉबला लागल्यावर मिळाले असते त्यापेक्षा पैसे कमी मिळतात थोडे. पण तिची त्याबद्दल काहीच तक्रार नाही कारण तिला त्या कामातून समाधान मिळतंय. आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे.” असं म्हणून श्रेयस हसला. 

अनिकेत क्षणभर विचारात पडला. मग लगेच म्हणाला,” हो हो.. तेही खरंच आहे. स्वरालीची गाणी खूप छान असतात हा, मी ऐकतो ना अधून मधून. गोड आवाजाची देणगी तिला जन्मतःच लाभली आहे. तसाच आहे हा तिचा आवाज अजूनही, अजून सुंदर झालाय खरं तर. ती खूप मोठी गायिका होणार बघ, खूप मोठी माणूस होणार आहे. सांग तिला.” अनिकेत म्हणाला. 

“हो नक्की सांगेन.” श्रेयस हसून म्हणाला, “आणि तूही खूप मोठा माणूस झालायस हेही सांगेन.” दोघेही हसले. 

—————————————————————————————————————————————–

अजून काही वर्ष गेली. अनिकेत आणि रुपालीच्या कामाचा व्याप खूपच वाढला होता. पगारासोबतच कामाचा ताणही वाढला होता. त्यामुळे मुलाकडे लक्ष द्यायला वेळच नसायचा. मुलाकडे काय पण एकमेकांशी बोलायलाही वेळ नसायचा. त्यावरून दोघात खटके उडायला लागले. हळूहळू खटक्यांच रूपांतर वादात व्हायला लागलं. 
ती : तू आज पण पिऊन आलायस? 
तो: हो आलोय.. काय करणार आहेस?
ती: तुला हे बोलताना जराही लाज वाटत नाही? अरे निदान आपल्या मुलाचा तरी विचार कर. त्याच्यावर काय परिणाम होईल तुझ्या या वागण्याचा?
तो: ए तू गप्प बस्स…. तू शिकवू नकोस मला. तुला त्याची किती काळजी असते माहित आहे मला. घरात तरी असतेस का त्याला बघायला. 
ती: हो मी नसते कारण मला ऑफिसमध्ये खूप काम असतं. कामाचा स्ट्रेस असतो. तुझ्यासारखी दारू ढोसायला नाही जात मी. 
तो: ए… जास्त आवाज करू नको हा. काम काय तूच करतेस का? मी काय झक मारायला जातो रोज? हे एवढं मोठं घर, ही गाडी कुठून आली?
ती: तू एकट्याने नाही घेतलीयेस ती. मी सुद्धा हातभार लावलाय या सगळ्याला कळलं ना. 

त्यांचा ८ वर्षांचा अर्णव हे सगळं दारामागून गपचूप ऐकत असायचा. भेदरलेल्या डोळ्यांनी आई बाबाना भांडताना बघायचा. नक्की काय चाललंय, काय चुकतंय त्या कोवळ्या जीवाला काहीच कळायचं नाही. दिवसेंदिवस हे असंच चाललं होतं. 

श्रेयस आणि स्वरालीचं कुटुंब आता चौकोनी झालं होतं. दोन मुलांना वाढवण्यात, त्यांचं सगळं करण्यात दोघांचा वेळ कसा निघून जायचा कळायचंच नाही. श्रेयसला त्याच्या प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे चांगली वरची पोस्ट मिळाली होती. स्वरालीलाही एक नावाजलेली गायिका म्हणून चांगली प्रतिष्ठा मिळू लागली होती. मोठ्या मोठ्या संगीतकारांच्या तिला ऑफर्स येत होत्या. यशाची एक एक शिखरं ती चढत होती. आणि या सगळ्यात श्रेयस तिच्या पाठीशी ठामपणे उभा होता. जेव्हा तिला बॅक टू बॅक रेकॉर्डिंग असायचे, किंवा कधी एखादा शो असायचा तेव्हा तो ऑफिसमधून सुट्टी घेऊन घरी थांबायचा. मुलांची काळजी घ्यायचा. त्यामुळेच ती निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकत होती. 

एक दिवस अनिकेतच्या घराची बेल वाजली. त्याने दार उघडलं तर समोर श्रेयस आणि स्वराली आणि त्यांची दोन मुलं. “अरे तुम्ही अचानक… या ना या.” अनिकेत आनंदाने म्हणाला. त्याने दोघांना घरात बोलावलं. नोकराला चहा नाश्ता आणायला सांगितलं. “तुम्ही तर एकदम सरप्राइजच दिलंत.” अनिकेत हसत हसत म्हणाला. “अरे या बाजूला आलोच होतो, म्हटलं तुला भेटून जावं.” श्रेयस म्हणाला. “इकडे कुठे?” अनिकेतने विचारलं. “अरे इकडे चौपाटीवर फिरायला आणलं होतं मुलांना.” श्रेयस म्हणाला. “मागचे दोन्ही रविवार हिचं रेकॉर्डिंग असल्यामुळे जमलं नाही. म्हटलं आज जरा जास्त वेळ फिरवूया. घोड्यावर बसले, भेळ खाल्ली. आता मूड एकदम खूष दोघांचा.” श्रेयस मुलांकडे बघत म्हणाला. अनिकेतने त्याच्या मुलांकडे बघितलं तर ती खरंच खूप खूष दिसत होती. “तुम्ही दार रविवारी येता चौपाटीवर?” त्याने विचारलं. “नाही चौपाटीवरच असं नाही. कधी पार्कमध्ये, कधी सिनेमाला, कधी नुसतंच आईस्क्रीम खायला.” श्रेयस म्हणाला. “आज दोघांनीही हट्ट केला चौपाटीवरच जायचंय, म्हणून मग आणलं. आणि मुळात काय, कुठे जातो ते महत्वाचं नाही. त्यांच्यासोबत वेळ घालवणं महत्वाचं.” 

अनिकेत विचारात पडला. चहा नाश्ता आला. “घर खूपच छान आहे हा तुमचं” श्रेयस म्हणाला. “खूप ऐसपैस आहे आणि खूप छान सजवलंय.” अनिकेत त्याला हसून थँक्यू म्हणाला. “रुपाली नाहीये का घरी?” चहाचा घोट घेता घेता स्वरालीने हळूच विचारलं. अनिकेतच्या चेहरा एकदम गंभीर झाला. तो काहीच बोलला नाही. स्वरालीला वाटलं आपण उगाच विचारलं, काहीतरी सारवासारव करायची म्हणून ती म्हणाली. “सॉरी म्हणजे मी सहजच विचारलं… नसेल सांगायचं तर राहू दे.”
“नाही नाही. तू का सॉरी म्हणतेयस.” अनिकेत म्हणाला. “तुम्हाला सांगायला काहीच हरकत नाही आता. ती घर सोडून गेलीये.” 
त्या दोघांनीही आश्चर्याने बघितलं. “काय? पण का? म्हणजे असं काय झालंय?” श्रेयसने विचारलं. “काही नाही रे नेहमीचंच.” अनिकेत वैतागून बोलला. “सतत भांडण, सतत वाद. आधीच मी ऑफिसच्या कामामुळे थकलेलो असतो. त्यात हिची कटकट. सारखं हिला नवीन काही ना काही हवं असतं. आणि कितीही दिलं तरी समाधान होतंच नाही. वर पुन्हा म्हणायचं तू मला वेळ देत नाही. त्यात अजून संशय पण घ्यायला लागली आहे माझ्यावर. आता मी काय जॉब सोडून हिच्याजवळच बसू का? आणि हिला तरी कुठे वेळ असतो माझ्यासाठी. ऑफिसची कामं घरी पण घेऊन येते आणि त्यातून पण वेळ उरलाच तर हिच्या किट्टी पार्ट्या असतातच. त्यादिवशी जरा अतीच केलं तिने मग माझा पण हात उचलला गेला. झालं, ही गेली निघून तरातरा. म्हणाली पुन्हा तुझं तोंड बघणार नाही.” 

श्रेयस आणि स्वराली दोघेही चकित होऊन हे सगळं ऐकत होते. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग श्रेयस म्हणाला. “पण तू हात उचलायला नको होतास, अरे बायको म्हणजे लक्ष्मी असते रे घरातली. तिचा असा अपमान करू नये.” “कुठल्या जुनाट गोष्टी घेऊन बसला आहेस यार तू.” अनिकेत वैतागून म्हणाला. “आणि जरी समजा तुझं मानलं, तरी तिने लक्ष्मी सारखं वागायला हवं ना. मी तरी किती सहन करायचं.” “बरं बरं.. ठीक आहे. पण मग तू नंतर सुद्धा तिला समजवायला नाही गेलास का?” श्रेयसने विचारलं. “नाही गेलो.” अनिकेत म्हणाला. “जाऊ दे. तिचं डोकं ठिकाणावर आलं की येईल घरी.” “असं नसतं बाबा.” श्रेयस त्याला समजावत म्हणाला. “संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. त्यातून मार्ग काढायचा असतो. जास्त ताणायचं नसतं. कोणीतरी एकाने समजून घ्यायलाच हवं ना. ती पण तुला घेत असेलच की समजून कधीतरी.” अनिकेत काहीच बोलला नाही. थोड्या वेळाने स्वरालीने विचारलं. “पण मग अर्णव कसा राहतो आईशिवाय? त्याला करमतं का?” 

“तो इथे नाहीये.” अनिकेत सुस्कारा टाकून म्हणाला. “म्हणजे?” त्या दोघांनी विचारलं. “त्याची सायकिऍट्रिस्टची ट्रीटमेंट चालू आहे.” “काय?” ते दोघेही जवळजवळ ओरडून म्हणाले. “हो. झाले २ महिने.” अनिकेत म्हणाला. “अभ्यासात खूप मागे पडला होता. खेळायलाही जायचा नाही. किती समजावून बघितलं ओरडून झालं पण काही उपयोग नाही. नंतर रात्रीचा झोपेतून उठून बसायला लागला, काहीतरी बडबडायला लागला. आणि आता तर…” बोलता बोलता अनिकेतला भरून आलं. त्याला पुढे बोलवेना. श्रेयसने त्याच्या खांद्यावर थोपटलं. थोड्या वेळाने तो शांत झाला आणि बोलला. “२ महिन्यांपासून सिटी प्राईड हॉस्पिटल मध्ये आहे. तिथेच ट्रीटमेंट चालू आहे त्याची. रोज सकाळी आणि संध्याकाळी जातो मी भेटायला. आताही थोड्या वेळाने जायचंच आहे. आपल्या शहरातील सगळ्यात बेस्ट हॉस्पिटल आहे आणि मी भारतातल्या बेस्ट सायकिऍट्रिस्टची ट्रीटमेंट देतोय त्याला. डॉक्टर मुखर्जी माहित आहेत ना तुला, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. मी त्यांना म्हटलं पैशाची काळजी करू नका मी हवा तेवढा पैसा देईन पण माझ्या मुलाला बरं करा. एकुलता एक मुलगा आहे माझा.” त्याचे डोळे पुन्हा पाणावले. मग पुढे म्हणाला,”मघाशी तुझ्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून इतकं बरं वाटलं ना मला. खरं तर हेवाच वाटला. माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर असा आनंद कधी बघायला मिळेल मला? त्याला काही म्हणजे काही कमी पडू दिलं नाही आम्ही दोघांनी, पण तरी तुमच्या मुलांच्या चेहऱ्यावर जे निरागस हसू दिसतंय ना, ते त्याच्या चेहऱ्यावर का नाही दिसत रे?”

“तू काळजी नको करुस. होईल सगळं ठीक.” श्रेयस त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाला. “देवावर विश्वास ठेव सगळं नीट होईल. तो लवकरच बरा होईल बघ. आणि हो आम्हीही येतोय तुझ्यासोबत त्याला भेटायला. चल.” असं म्हणून तो उठला. 

—————————————————————————————————————————————–

अजून काही वर्ष गेली. एक दिवस श्रेयस ऑफिसमधून घरी आला तोच चिंतातुर चेहऱ्याने. “काय झालं? तू असा का दिसतोयस?” स्वरालीने काळजीने विचारलं. “अगं आज तो कॉलेजमधला सचिन भेटला होता. त्याच्याकडून कळलं की अनिकेतचा डिव्होर्स झाला मागच्या महिन्यात.” “काय?” स्वरालीने आश्चर्याने विचारलं. “पण का? कसा? तो तुला काही बोलला होता का?” 
“म्हणजे त्यांच्यात भांडणं होती हे माहीतच होतं. पण हे सगळं इतक्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं ग. आणि गेले किती दिवस त्याच्याशी काहीच बोलणं काहीच कॉन्टॅक्ट नाही. मला पण धक्काच बसला हे ऐकून.” श्रेयस म्हणाला. “पण मग त्याचा तो मुलगा, काय त्याचं नाव… हा अर्णव. त्याचं काय झालं असेल? बिचारा आधीच सैरभैर झाला होता आता आईबाबांचं हे असं ऐकून काय अवस्था झाली असेल त्याची.” स्वराली म्हणाली. “अगं त्याची तर वेगळीच कथा आहे काय सांगू तुला.” श्रेयस डोक्यावर हात मारत म्हणाला. “तो नापास झाला म्हणे आणि आता दारू सिगरेटच्या व्यसनाला पण लागलाय असं ऐकलं. मागे तर कुठेतरी ड्रग्जच्या अड्ड्यावर छापा घातलेला तिकडे पण हा सापडला म्हणे. अनिकेतने पैसे भरून सोडवला त्याला कसाबसा.” स्वराली तोंडाचा आ आवासून त्याच्याकडे नुसती बघत होती. “मग आता कुठे असतो तो?”  तिने विचारलं. श्रेयस म्हणाला, “डिव्होर्स नंतर त्याची कस्टडी आईकडेच दिलीये, पण काय फरक पडतो. घरात थांबतोच कुठे तो. किती किती दिवस घरी येत नाही कुठे असतो कोणालाच माहित नसते.” “काय रे देवा हि अवस्था?” स्वराली हळहळत म्हणाली. “आपल्या स्वप्नीलच्याच वयाचा असेल ना तो. हे काय वय आहे का दारू सिगरेट आणि ड्रग्ज घेण्याचं. पण खरी चूक त्या दोघांचीच आहे, त्यांनी नीट लक्ष दिलं नाही म्हणूनच ही अवस्था झाली लेकराची.” असं म्हणून ती विचारात पडली. 

“सोड तू नको टेन्शन घेऊस.” श्रेयस कपडे बदलून आला आणि म्हणाला. “तू जेवायला वाढ. तू जेवलीस का?” 
“नाही अजून.” ती म्हणाली. “तुझीच वाट बघत होते. “चल बसुया दोघे.” असं म्हणून ती जेवण आणायला गेली. “मुलं झोपली का ग?” त्याने जेवता जेवता विचारलं. “हो आताच झोपलीत.” ती म्हणाली. “स्वप्नीलला मीच झोपवलं जबरदस्तीने. किती अभ्यास करतोय, आजारी पडेल अशाने.”
“काही नाही आजारी पडत. बारावीचं वर्ष आहे त्याचं. आणि त्याला कायम नंबरात यायचं असतं माहित आहे ना तुला.” तो म्हणाला. 
“हो.. पण तसा तो हुशारच आहे. आता प्रिलिमला आले की ९०%. अजून किती हवेत?” 
“अगं हवे असतील त्याला अजून.” श्रेयस हसत हसत म्हणाला. “खूप मोठा माणूस व्हायचं आहे त्याला.” त्याचं हे वाक्य ऐकून स्वराली विचारात पडली. 

रात्री सगळं आटपल्यावर स्वराली झोपायला आली. श्रेयसला आधीच झोप लागली होती. त्याचे मघाचे शब्द तिच्या कानात अजून घुमत होते. “मोठा माणूस व्हायचं आहे त्याला.” ती श्रेयसकडे बघायला लागली. किती शांत झोपला होता तो. त्याच्या झोपलेल्या चेहऱ्यावर एक निरागसता होती, एक समाधान होतं. पोट सुटायला लागलं होतं. अर्धे केसही बऱ्यापैकी रुपेरी झाले होते. त्याच्याजवळ बसून तिने त्याच्या केसातून हात फिरवला आणि स्वतःशीच विचार करायला लागली. ‘मोठा माणूस म्हणजे नक्की काय असतं? त्यावेळी मला वाटायचं की अनिकेतही मोठा माणूस होईल. आणि तो झालाही. पण…. पण ज्या अनिकेतवर मी प्रेम केलं होतं तो हळवा, संवेदनशील अनिकेत राहिलाच नाही. मोठा माणूस होताना त्याच्या आतला माणूसच हरवला. आणि त्याच्या आयुष्यात आता हे असं सगळं?? आणि श्रेयसने तर त्याच वेळी मला सांगितलं होतं, मी त्याच्याएवढा मोठा माणूस नाही होऊ शकत. पण त्याने माझा हरवलेला सूर मला शोधून दिला. त्याने मला मोठं केलं. तो नसता तर आज मी एवढी मोठी गायिका झाले असते का? पैशाने आणि कर्तृत्वाने नसेल तो मोठा झाला पण… इतकी वर्ष चांगला संसार केलाय त्याने. मला आणि मुलाना सांभाळून घेतलं. अजून काय हवंय मला?’ आणि मग पुन्हा त्याच्याकडे बघून ती म्हणाली, “आपला स्वप्नील पण मोठा माणूस होईल. पण अनिकेतसारखा नाही…..  आपल्यासारखाच.”असं म्हणून तिने त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं. 

—————————————————————————————————————————————–

“अनिकेत शिर्के.” श्रेयसने हॉस्पिटलच्या काऊंटरवरच्या बाईला नाव सांगितलं. “४थ्या मजल्यावर आहे, उजव्या बाजूला रूम नंबर २३.” तिने कॉम्प्युटर वर बघून सांगितलं. “थँक्यू.” असं म्हणून श्रेयस आणि स्वराली घाईघाईने लिफ्टकडे गेले. रूमजवळ पोचले तर आत जरा गर्दीच होती. जावं की जाऊ नये या विचारात दोघे दाराजवळच थांबले. तेवढ्यात अनिकेतचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि त्याने खूण करून त्यांना बोलावलं. ते दोघे जरा भीत भीतच आत शिरले. “ठीक आहे तुम्ही या आता, काही लागलं तर सेक्रेटरीला फोन करा माझ्या.” अनिकेत तिकडे उभ्या असलेल्या एका माणसाकडे बघून म्हणाला. “गेट वेल सून सर.” असं म्हणून तो माणूस निघून गेला. मग हळूहळू बाकीची माणसंही पांगली. 

अनिकेतचा चेहरा साफ उतरला होता. थकल्यासारखा दिसत होता. डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती. त्याची ही अवस्था बघून त्या दोघांनाही कसंतरीच झालं. “अरे तू उगाच त्यांना जायला सांगितलंस.” श्रेयस म्हणाला, “आम्ही थांबलो असतो जरा वेळ बाहेर, काहीच प्रॉब्लेम नव्हता.” 

“मला ते जायलाच हवे होते.” अनिकेत हसून म्हणाला. “तुम्ही आलात ते बरं झालं, त्या निमित्ताने त्यांना कटवलं.” “म्हणजे?” श्रेयसने आश्चर्याने विचारलं, “अरे तुला भेटायला आले होते ना ते लोक, असं काय बोलतोस?”

“भेटायला?” असं म्हणून अनिकेत उपहासाने हसला. “ऑफिसमधले लोक होते ते सगळे, आपापल्या कामासाठी आले होते. तो मघाशी आलेला तो माझ्या सह्या घेण्यासाठी आला होता. आणि बाकीचे पण असेच काही ना काही कामासाठी, तर काहीजण नुसतेच खूप काळजी असल्याचं दाखवायला, म्हणजे प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल म्हणून.” असं म्हणून अनिकेत क्षणभर थांबला. “मला खरोखर भेटायला आणि विचारपूस करायला आलेले तुम्ही पहिलेच आहात.” असं म्हणून तो हसला. 

“अशा वेळी सुद्धा ऑफिसमधली कामं घेऊन येतात हे लोक?” स्वरालीने आश्चर्याने विचारलं. “तुला हार्ट अटॅक आला होता, आरामाची गरज आहे तुला. काम काय माणसाच्या जिवापेक्षा मोठं असतं का?” 

“हो… बिझनेस मध्ये असतं.” अनिकेत हसून म्हणाला. “इकडे भावनांना अजिबात जागा नाही… काही झालं तरी शो मस्ट गो ऑन. उद्या जरी मी मेलो तरी सुद्धा..” त्याचं बोलणं मध्येच तोडत श्रेयस म्हणाला, “का असं बोलतोयस? काही होणार नाही तुला.” “झालं तरी कोणाला काय फरक पडतोय म्हणा.” अनिकेत एक उसासा टाकत म्हणाला. 

“का असं म्हणतोस? आम्हाला फरक पडेल आणि तुझ्या कुटुंबालाही पडेलच ना.” श्रेयस म्हणाला. “बरं ते सगळं जाऊ दे, तुला आता कसं वाटतंय ते सांग. आणि हे सगळं झालं कसं? म्हणजे तुला हार्टचा त्रास होता का आधीपासून?”

“परवा ऑफिसमध्ये असतानाच झालं अचानक. त्रास तर होताच आधीपासून.” अनिकेत म्हणाला. “मग तू त्यासाठी काळजी नाही घेतलीस का? म्हणजे औषध पथ्य पाणी वगैरे.” स्वरालीने विचारलं. “कामाचा व्यापच एवढा असतो की नाही लक्षात राहात सगळं.” अनिकेत म्हणाला, “आणि आठवण करून देणारं सुद्धा कोणीच नाही.” 

त्याच्या या वाक्यावर सगळेच शांत झाले. काही वेळ असाच गेला. मग स्वराली म्हणाली, “सॉरी म्हणजे मला तुला दुखवायचं नव्हतं. मी आपलं सहज म्हणाले.” “अगं नाही नाही… तू का सॉरी म्हणतेस?” अनिकेत म्हणाला. “उलट तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. कितीतरी दिवसांनी कोणीतरी आपलं माणूस भेटलंय.” बोलता बोलता तो तिच्याकडे रोखून बघायला लागला. तेवढ्यात श्रेयसचा फोन वाजला आणि तो बाहेर गेला. स्वरालीने पर्समधून एक पुस्तक बाहेर काढलं. “हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय. पाडगावकरांचं ‘जिप्सी’.” ती म्हणाली. “कदाचित तुझ्याकडे असेल आणि तू वाचलंही असशील पण…” तिला त्याने मध्येच थांबवलं आणि म्हणाला, “नाही… नाही वाचलं अजून. कधीपासून वाचायचं होतं मला. पण वेळच नाही मिळाला. पण… पण तुला कसं माहित मला हे वाचायचं होतं?” त्याने आश्चर्याने विचारलं. ती गालात हसली मग म्हणाली, “आपण फर्स्ट इयरला असताना तू एकदा म्हणाला होतास.” अनिकेत गंभीर झाला, “तुला अजून ते आठवतंय?” त्याने विचारलं. तिने मान हलवली. तिने त्याच्या हातात ते पुस्तक दिलं पण तेवढ्यात तो म्हणाला, “ऐक ना… तूच वाचून दाखव ना त्यातल्या कविता.” तिने हसून मान हलवली आणि वाचायला घेतलं. 

ती वाचत होती आणि त्या कविता ऐकता ऐकता अनिकेत एका वेगळ्याच जगात हरवून गेला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटत होतं, गेल्या कित्येक वर्षात उमटलं नव्हतं असं. नंतर त्याच्या सांगण्यावरून तिने एक गाणं म्हटलं. अनिकेत डोळे मिटून गाणं ऐकत होता. त्याला एकदम शांत वाटत होतं, हलकं वाटत होतं. डोक्यावरचं सगळं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. गाणं ऐकता ऐकता कधी त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याचं त्यालाही कळलं नाही. तिने गाणं थांबवलं आणि तो भानावर आला. “काय झालं? का थांबलीस?” त्याने विचारलं. “तुझ्या डोळ्यात पाणी?” तिने विचारलं. तो काहीच बोलला नाही. “आज तुझं गाणं ऐकून मनाला जी शांती मिळाली ना, ती गेल्या कित्येक वर्षात नाही मिळाली. पुन्हा वीस वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं, तेव्हा सुद्धा तुझ्या आवाजात असाच हरवून जायचो मी.” बोलता बोलता त्याने तिचा हात हातात घेतला. “खरंच स्वराली, ते दिवस किती सुंदर होते, आता हे काय होऊन बसलंय? मला खूप मोठं व्हायचं होतं, खूप यशस्वी व्हायचं होतं. पण त्याच्या मागे धावत धावता कुठे येऊन पोचलोय मी. कुटुंब तुटलं, मुलगा दुरावला, शरीराची काय अवस्था झाली, मनशांती गेली. मी तुला दुखावून खूप मोठी चूक केली आहे, त्याचीच ही सगळी शिक्षा मिळतेय मला. पुन्हा त्या वेळसारखं जगता येईल का मला?”

तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, “तू मुद्दाम काही केलं नाहीस अनिकेत, त्या त्या वेळी तुला जे योग्य वाटलं ते तू केलंस. आणि प्लीज शिक्षा वगैरे म्हणू नकोस. माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीच राग नाहीये, कधीच नव्हता. तुझं वाईट व्हावं अशी मी कधी स्वप्नात सुद्धा इच्छा ठेवली नाही. आणि मी श्रेयस बरोबर खरंच खूप सुखात आहे. माझी तुझ्याबद्दल किंवा आयुष्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. फक्त एक चूक तू केलीस, तुझ्यातला लेखक, कवी, एक संवेदनशील माणूस तू हरवलास. त्याला पुन्हा शोध, त्याला बाहेर आण. पुन्हा लिहायला लाग. कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर स्वतःला व्यक्त करण्यासाठी. तुझ्या मनातली सगळी घालमेल, सगळी व्यथा, घुसमट कागदावर उतरव. तू लिहायला लागलास ना की पुन्हा तुझी मनःशांती मिळेल तुला. बघ.”

“मी खूपदा प्रयत्न केला स्वराली.” अनिकेत म्हणाला. “पण आता नाहीच जमत पाहिल्यासारखं लिहायला. माझ्यातला लेखक आणि कवी हरवला नाही स्वराली, तो मेलाय. आणि त्याला मीच मारलंय. यशाच्या मागे धावण्यात, मोठा माणूस बनण्याच्या नादात. त्याला परत कसा मिळवू आता? कुठे सापडेल तो?” 

“नक्की सापडेल.” स्वराली म्हणाली. “म्हणून तर तुझ्यासाठी हे पुस्तक आणलंय ना. आणि अजूनही अशी पुस्तकं आणेन. तू वाचायला सुरुवात कर, मग हळूहळू लिहायलाही जमेल. मला खात्री आहे. थोडासा वेळ काढ स्वतःसाठी.” 

“मी आता अशा ठिकाणी येऊन थांबलोय की, जिथून मागेही वळू शकत नाही आणि जिथे थांबूही शकत नाही.” अनिकेत शून्यात बघत म्हणाला. “इथे माझ्यापुढे फक्त एकच पर्याय आहे, पुढे चालत राहण्याचा. नाही… धावत राहण्याचा. मला धावलंच पाहिजे.” 

काही वेळ स्वराली काहीच बोलली नाही. मग म्हणाली, “बघ, मला जे वाटलं ते मी सांगितलं, बाकी तुझी मर्जी. आणि हो… तू जे काही करशील त्यात तू नक्की यशस्वी होशीलच याची खात्री आहे मला. अजून खूप मोठा होशील तू.” असं म्हणून ती हसली. 

“काय म्हणतेय तब्येत?” डॉक्टरांच्या आवाजाने त्या दोघांची तंद्री भंगली. डॉक्टरांच्या मागोमाग श्रेयसही आत आला. त्याला बघून स्वरालीने पटकन आपला हात अनिकेतच्या हातातून सोडवून घेतला. “आज पहिल्यांदाच एवढं आनंदी बघतोय तुम्हाला.” डॉक्टर अनिकेतकडे बघून हसून म्हणाले. त्यांच्या बोलण्यावर अनिकेत सहित सगळेच हसले. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि निघून गेले. श्रेयस आणि स्वराली सुद्धा निघण्यासाठी उठले. 

“पुन्हा एकदा थँक्स.” अनिकेत त्यांच्याकडे बघून म्हणाला. “खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून.” “अरे थँक्स काय त्यात?” श्रेयसने त्याच्या पाठीवर थोपटत म्हटलं. “मित्रासाठी एवढं तर करूच शकतो ना. आणि तू आधी नीट बरा हो. आणि कधीही काहीही गरज लागली तर अगदी हक्काने सांग.” असं म्हणून ते दोघे निघाले. 

श्रेयस आणि स्वराली दोघे चालत होते पण स्वराली त्याच्या नजरेला नजर देत नव्हती. तिला जरासं विचित्र वाटत होतं. शेवटी न राहवून ती म्हणाली, “श्रेयस, मघाशी तू आत आलास तेव्हा… म्हणजे मी आणि अनिकेत. म्हणजे तुला वाटलं असेल की….” तिला नीट शब्दात सांगता येत नव्हतं. ती अडखळत होती. “तेव्हा तुम्ही एकमेकांचा हात हातात घेतला होतात ना.” श्रेयस म्हणाला, “बघितलंय मी.” स्वराली अपराधी चेहऱ्याने त्याच्याकडे बघायला लागली. “अरे म्हणजे तसं नाही… तुला वाटेल की…” असं काहीतरी बोलण्याचा ती प्रयत्न करत होती पण तेवढ्यात श्रेयसने तिला थांबवलं. “तुला कसलंही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. त्या एवढ्याशा गोष्टीवरून मी भलता अर्थ घेईन इतका खालच्या दर्जाचा माणूस वाटलो का मी तुला?” त्याने विचारलं. स्वराली आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती. तो पुढे म्हणाला, “आणि तुला काय वाटलं मी खरंच फोनवर बोलण्यासाठी बाहेर गेलो होतो?” “म्हणजे?” तिने आश्चर्याने विचारलं. “म्हणजे अनिकेतच्या अवस्थेची मला पूर्ण कल्पना आहे. आणि आज त्याला माझ्यापेक्षा तुझ्या सोबतीची जास्त गरज होती हे मला माहित होतं. मी तिथे थांबलो असतो तर कदाचित त्याला तुझ्याशी मोकळेपणाने बोलता आलं नसतं म्हणून मी मुद्दाम बाहेर गेलो. आणि बघितलंस ना, तुझ्याशी बोलल्याने त्याला किती बरं वाटलं? डॉक्टर सुद्धा तेच म्हणाले.” 

स्वराली त्याच्याकडे फक्त थक्क होऊन बघत होती. “काय बघतेयस?” त्याने विचारलं. “काही नाही… मला माझ्याच नशिबाचा हेवा वाटतोय आता, की मला तुझ्यासारखा जोडीदार मिळाला.” बोलता बोलता तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने तिला जवळ घेऊन थोपटलं. 

—————————————————————————————————————————————–

३०  वर्षानंतर आज तिला तिच्या आयुष्यभराच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटत होतं. तिच्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीची दखल घेण्याची वेळ आली होती. तसे पुरस्कार खूप मिळाले पण आज संपूर्ण राज्यात आणि संगीत क्षेत्रासाठी सर्वात मनाचा असा जीवनगौरव पुरस्कार तिला मिळत होता. “आणि या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जातोय, स्वराली इंदुलकर याना.” सगळयांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सगळेजण उभे राहून तिला मानवंदना देत होते, टाळ्या वाजवत होते. श्रेयसच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते, तिची दोन्ही मुलंही त्याच्यासोबत आली होती आणि अभिमानाने टाळ्या वाजवत होती. हळू हळू पायऱ्या चढत ती स्टेजवर गेली. “आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी स्टेजवर बोलावते, आपल्या आजच्या सोहळ्याचे प्रमुख स्पॉन्सर, जॅक्सन टेकनॉलॉजिस कंपनीचे सीईओ श्री. अनिकेत शिर्के यांना.” स्टेजमागून अनिकेत हळू हळू चालत आला. सूटबूट घातलेला, बरंचसं टक्कल पडलं होतं. पोट बऱ्यापैकी सुटलं होतं. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघत राहिले, सगळ्या आयुष्याचा पट त्या एका क्षणात दोघांच्याही डोळ्यासमोरून गेला.  “आणि मी शिर्के सरांना विनंती करते की त्यांनी स्वराली ताईंना हा पुरस्कार द्यावा.” निवेदकांच्या या वाक्याने दोघेही भानावर आले. अनिकेतने ती पुरस्काराची मूर्ती तिच्या हातात ठेवली आणि म्हणाला, “मला माहित होतं तू खूप मोठी गायिका होणार, खूप मोठी होणार तू. आणि तू झालीस.” तिने हसून तो घेतला आणि म्हणाली, “तूही खूप मोठा माणूस होणार, मला माहित होतं. आणि तूही झालासच की. खूप मोठा माणूस झालास.” 

सगळं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेलं होतं. सगळ्या झगमगाटात आणि फोटोंच्या लखलखाटात त्या दोघांच्याही डोळ्यातलं पाणी कोणालाच दिसलं नाही, श्रेयस वगळता. 

—————————————————————————————————————————————–

Advertisements