निःशब्द

लिहावं की लिहू नये? बोलावं की बोलू नये? आणि जर बोलावं तर नेमकं काय बोलावं? खूप मोठा प्रश्न पडलाय? मी लिहिते ते व्यक्त होण्यासाठी, मनात साचलेल्या भावनांना वाट करून देण्यासाठी. पण गेले काही दिवस सगळीकडे एक हॅशटॅग व्हायरल होताना दिसतोय, #JusticeForAsifa आणि त्या संदर्भात जे सत्य समोर आलं ते ऐकल्यावर मला हा प्रश्न पडलाय की व्यक्त होऊ की नको? आणि नक्की कसं आणि काय व्यक्त होऊ?

८ वर्षाच्या मुलीला पळवून नेलं जातं, आजोबाच्या वयाचा माणूस अजून दोघांसहित तिच्यावर बलात्कार करतो. तिने प्रतिकार करू नये म्हणून वारंवार तिला ड्रग्स दिले जातात. हजारो किलोमीटर दूरवरून एका माणसाला ‘खास बलात्कार करण्यासाठी’ बोलवलं जातं. हा सगळा प्रकार आठवडाभर चालतो तेही एका मंदिरात. पोलिसही हे सगळं प्रकरण दडपून टाकतो आणि त्याच्या बदल्यात तोही आपली वासनेची भूक तिच्यावरच शमवतो. एवढं सगळं झाल्यावर अजून तिला मारण्यासारखं काही उरलेलंच नसतं. तरीही तिचा उरलेला जीव सुखासुखी जाऊ देत नाहीत तर दगडाने ठेचून मारलं जातं. प्रथमदर्शनी वाचताना हे सगळं एखाद्या तालिबानी राज्यात घडतंय की काय असंच वाटेल पण नाही….. हे सगळं घडतंय आपल्या देशात. आपल्या सुजलाम सुफलाम भारतात.

हे सगळं वाचून मनात असंख्य भावनांचा कल्लोळ उठलाय. राग, चीड, संताप, दुःख आणि अजून बरंच काही जे शब्दात मांडताच येत नाही. नक्की काय आणि कसं व्यक्त होऊ मी तेच कळत नाही. आपल्या राष्ट्रगीतात म्हटलंय ‘भारत भाग्यविधाता’. खरंच जर हा भारत आपला भाग्यविधाता असेल तर त्याने त्या चिमुरडीच्या भाग्यात काय लिहिलं? आणि हे असंच होणार असेल तर आपल्या सगळ्यांचं भाग्यही काय असणार आहे? काय दोष होता तिचा? ८ वर्षाची कोवळी पोर, खेळण्या बागडण्याचं वय तिचं. ज्या वयात साधं खरचटलं तरी भोकाड पसरून रडतात मुलं, त्या वयात इतक्या भयानक अत्याचाराला ती बळी पडली. आपल्यासोबत हे का होतंय, त्याहीपेक्षा हे नक्की काय होतंय, याला बलात्कार म्हणतात हेही कळलं नसेल तिला. आणि हे सगळं कशासाठी तर फक्त ती अमुक एका धर्माची किंवा जातीची होती म्हणून? त्या जातीला त्या गावाबाहेरच हुसकावून लावण्यासाठी? जात, धर्म आपल्यासाठी इतका महत्वाचा झालाय की त्याच्यासाठी क्रौर्याच्या कोणत्याही परिसीमा पार करायला आपण मागे पुढे पाहत नाही? आणि गावाबाहेरच काढून टाकायचं होतं तर त्यासाठी दुसरे कोणतेच मार्ग नव्हते? पुरुषाशी पुरुषासारखं दोन हात करण्याची हिंमत नव्हती म्हणून आपली शक्ती आणि पुरुषार्थ त्या निष्पाप मुलीच्या कोवळ्या शरीरावर दाखवून तुम्ही काय साधलंत? एखादा धर्म किंवा जात नष्ट करण्याचा एवढा पराकोटीचा अट्टाहास कशासाठी? आणि त्यासाठी त्यातल्या स्त्रियांवर आणि कोवळ्या मुलींवर अत्याचार करण्याचा हा कोणता हिडीस मार्ग आहे?

या घटनेमुळे आपल्या समाजाचं एक भयंकर घाणेरडं स्वरूप समोर आलंय. मुळात अशा घटना जिथे घडतात त्याला समाज म्हणावा का हाच प्रश्न आहे. वासनांध, लिंगपिसाट आणि विकृत मनोवृत्तीचं एक अत्यंत भयानक, किळसवाणं दर्शन आहे हे. त्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना एकदाही आपली आई, बहीण, मुलगी आठवली नसेल? आणि त्याहीपेक्षा भयंकर हे आहे की एवढं सगळं होऊनही त्या आरोपींचं समर्थन केलं जातं, त्यांच्या समर्थनार्थ हातात तिरंगे घेऊन मोर्चे काढले जातात. हा त्या तिरंग्याचा अपमान आहे, त्याहीपेक्षा संपूर्ण स्त्रीजातीचा अपमान आहे. त्या मोर्चे काढणाऱ्यांच्या घरात सुद्धा कधीच कोणतीच स्त्री नव्हती का? किंवा दूरवरच्या नात्यात सुद्धा एखादी बहीण, मावशी, काकू, एखादी भाची, पुतणी कोणीच नव्हती? त्यातल्या कोणाचाच चेहरा तुम्हाला असिफाच्या चेहऱ्यात दिसला नाही? धर्मांधतेची झापडं डोळ्याला इतकी घट्ट बसवली आहेत की त्यापुढे माणसाच्या बेसिक संवेदनाही तुम्हाला उरल्याच नाहीत?

बरं याबाबत कोणी काही बोललं तरी त्यावरही उलट सुलट चर्चा. कोण म्हणतं की हा आताच का बोलला, मागे अमुक ठिकाणी हिंदू मुलीवर बलात्कार झालेला तेव्हा का नाही बोलला? तर कोण म्हणतंय की तमुक ठिकाणी मुस्लिमांनी हिंदू मुलींवर बलात्कार केलेच होते की. ही अशी विधानं ऐकून माझं डोकं सुन्न झालंय, विचार करण्याची शक्तीच संपली आहे. अमुक ठिकाणी केला किंवा तमुक धर्माच्या व्यक्तीने केला म्हणून हे बरोबर, हे अशा प्रकारचं स्पष्टीकरण असू शकतं? कोणी किती बलात्कार करायचे याची स्पर्धा लावली आहे का आपण? मुळात बलात्कार झाला आणि तोही एका कोवळ्या बालिकेवर झाला यापेक्षा कोणत्या जातीने कोणत्या जातीवर केला याच्यात जास्त रस आहे आपल्याला? म्हणजे आता आपण हाडामासांची माणसं न राहता फक्त भगव्या, हिरव्या, निळ्या अशा रंगांचे पोकळ पुतळे उरलो आहोत का? मुळात आपण माणसं आहोत का हाच प्रश्न पडलाय मला. त्या नराधमांना लांडगे, जनावरं वगैरे म्हणून खरं तर आपण त्या जनावरांचा अपमान करतोय कारण कोणतंही जनावर सुद्धा इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. आणि आपण स्वतःला या पृथ्वीवरची सर्वात सुशिक्षित आणि सुसंस्कृत जमात म्हणवतो? खरंच हीच आहे का आपली संस्कृती?

जातीधर्माचं हे जे भयानक विष पसरत चाललंय आपल्या समाजात ते घेऊन कुठे जाणार आहोत आपण? काय भवितव्य आहे या अशा घाणीत बरबटलेल्या समाजाचं आणि देशाचं? स्वच्छ भारत अभियानाने तुम्ही घरातला, रस्त्यावरचा, गावातला कचरा साफ कराल पण तुमच्या सगळ्यांच्या मनात आणि मेंदूत हा जो जातीपातीचा आणि धर्मांधतेचा कचरा भरलाय त्याचं काय? हे तुमचे सडके, कुजके मेंदू कोण आणि कसे साफ करणार? हा माझा धर्म, तो त्याचा धर्म, माझा देव, त्याचा देव या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण एकमेकांना माणूस म्हणून कधी बघणारच नाही आहोत का? देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली एकमेकांचे गळे कापणाऱ्यांनो एक लक्षात घ्या, की त्या कोवळ्या जीवाचे लचके तोडले जात असताना तिला वाचवायला ना तुमचा देव आला ना माझा.

मला फार किळस येतेय स्वतःचीच आणि त्याहीपेक्षा लाज वाटतेय की मी या अशा देशात जन्माला आले. किळस वाटतेय की मी या अशा समाजाचा भाग आहे जिथे माणसाच्या सगळ्या संवेदनाच संपल्या आहेत. १३० कोटींच्या देशात मानवतेला काळिमा फासणारी ही घटना घडते आणि तरीही सगळे हातावर हात ठेवून मूग गिळून गप्प बसतात हे सगळंच किती संतापजनक आहे. तिच्या बाबतीत जे घडलं ते तुमच्या माझ्या कोणाच्याही घरातल्या स्त्रीच्या बाबतीत घडू शकलं असतं, घडू शकतं. भीती वाटतेय आता मला स्त्री असण्याची, त्याहीपेक्षा माणूस असण्याचीच. कारण कोण जाणे उद्या मलाही असल्याच कोणत्यातरी धर्माच्या रंगाचं लेबल लावलं जाईल आणि त्यापुढे माझ्या स्त्रीत्वाची आणि माणूसपणाची किंमत शून्य होईल.

खूप प्रयत्न केला हे सगळं विसरण्याचा पण डोळ्यासमोर सतत त्या मुलीचा फोटोमधला तो चेहरा येतोय, माझी झोप उडवतोय. ती मुलगी मला विचारतेय, ‘माझ्या बाबतीत असं का घडलं? माझं नक्की काय चुकलं? मी तिकडे गुरं चरायला नेली हे चुकलं का? की मी मुस्लिम आहे हे चुकलं?’

काय सांगू मी तिला? तू माणूस म्हणून जन्माला आलीस हेच चुकलं? तुझ्या कोणत्याच प्रश्नांची उत्तरं नाहीयेत आमच्याकडे, मुळात आम्हाला त्यांची उत्तरं शोधण्यात कसलाच रस नाहीये. तू आमच्याकडून न्यायाची अपेक्षा करतेयस? तर ते साफ चुकीचं आहे. एवढं सगळं घडलं तेव्हाही आम्ही काहीच करू शकलो नाही तर आता काय करणार आहोत? तुला न्याय मिळवून देण्यापेक्षा कोणत्या धर्माच्या कोणी, कुठे, कसे, किती अत्याचार केले याची गणितं मांडण्यात आमच्या मीडियाला जास्त रस आहे. कारण त्यातूनच आम्हाला धर्माचं राजकारण करायचं आहे. एकमेकांच्या जातीधर्माच्या लोकांवर आणि स्त्रियांवर अत्याचार करण्याची आम्ही स्पर्धा लावली आहे आणि तू फक्त त्या स्पर्धेचा एक छोटासा भाग आहेस. उद्या त्याच स्पर्धेत तुझ्यासारखे अजून असंख्य बळी जातील कारण क्रौर्याच्या आणि अमानुषतेच्या किती सीमा आपण ओलांडू शकतो याचीच आमच्यात चढाओढ चालू आहे. ती तशीच चालू राहील आणि दिवसेंदिवस वाढत जाईल पण आम्ही मात्र काहीच करणार नाही. फार तर ४ दिवस कँडल मार्च काढू, सोशल मीडियावर बडबड करू, हॅशटॅग व्हायरल करू आणि नंतर सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा आपापलं आयुष्य नेहमीसारखं जगायला लागू. दूर कुठेतरी काश्मीरमध्ये तुझ्यासारख्या एका लहान मुलीचा जीव गेला, याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. या सगळ्या घटना आमच्यासाठी एकदम नॉर्मल आहेत कारण या विकृत, गलिच्छ समाजात राहून आमची मनंही तशीच बनली आहेत. आमच्या नजरा आणि भावना सगळ्या मेल्या आहेत, आम्ही सगळे असंवेदशील आणि षंढ आहोत. अशा षंढ लोकांकडून तू कसल्या न्यायाची अपेक्षा करतेस? मुळात आम्ही माणूसच नाही आहोत कारण माणूस असण्याची कोणतीच लक्षणं आमच्यात नाहीयेत. उलट तू गेल्यावरही आमच्यातले काहीजण म्हणतात की, ‘बरं झालं ती मेली, नाहीतरी मोठी होऊन दहशतवादीच झाली असती.’

हो खरं आहे, बरं झालं तू मेलीस. सुटलीस एकदाची. या राक्षसांच्या, वासनेच्या, धर्मांध विकृत लोकांच्या घाणेरड्या जगातून लांब गेलीस. आम्ही सगळेच तुझे गुन्हेगार आहोत आणि कदाचित आमची शिक्षा हीच आहे की आम्हाला इथंच राहावं लागणार. याच ओंगळवाण्या समाजात आम्हाला उरलेलं आयुष्य काढायचंय, इथंच या असंवेदनशील लोकांसोबत जगायचंय. या कल्पनेनेच अंगावर शहारा येतोय. जा बाळा जा, आता पुन्हा कधी या देशात जन्म घेऊ नकोस, खरं तर पुन्हा कधी माणूस म्हणूनच जन्म घेऊ नकोस. कारण माणसाला अजून माणूस बनायचंय.

अजूनही मनातलं सगळं बाहेर पडलेलंच नाही, खूप काहीतरी बोचतंय, आतमध्ये खूप काही जळतंय, धुमसतंय. पण… पण आता पुढे शब्दच सुचत नाहीत. खूप अगतिक, हतबल वाटतंय. लिहिताना हात थरथरतोय…..निःशब्द झालेय मी.

-अनुया

Advertisements